devi-ogस्रीच्या मातृरूपाचा अन्वयार्थ  येत नव्हता तेव्हा ती देवीच्या रूपात पुजली जायला लागली. त्यात नंतर अनेक परंपरा, श्रद्धांचा संगम होत देवीची विविध रूपं निर्माण होत गेली आहेत.

देवीचा उदोकार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांत अनेक शतके घुमतो आहे. नानाविध लोकमाता गावागावांतून, नगरानगरांतून जनतेच्या हाकेला ओ देत आहेत. परकीय आक्रमण झाले त्यावेळी प्रसंगी जनतेसोबत त्या स्वत: चिरडल्या भरडल्या गेल्या. परंतु जगण्याच्या उमेदीसारखीच लोकांची श्रद्धा चिवट असल्याने त्यांची ठाणी पुन्हा उभी राहिली. काही वेळा बदलत्या जाणिवा, गरजा आणि उदयोन्मुख संप्रदाय यांनी जुन्या श्रद्धा नवीन मुशीत ओतल्या. या सर्व हलकल्लोळात देवतांचे पुनर्जन्म झाले नसते तरच नवल. अशा काही देवतांच्या आजी-माजी रूपांचा धांडोळा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.

कोल्हापूरची महालक्ष्मी

करवीरनिवासिनी आदिशक्ती महालक्ष्मीला जाणून घेण्यासाठी आधी श्री, लक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजे काय ते पाहू.

वैदिक ‘श्री’ ते पौराणिक लक्ष्मी-

अनंत काळाच्या ओघात जेव्हा मानवाच्या बुद्धीत हेय (नकोसे/ त्याज्य) आणि उपादेय (हवेसे/उपयोगी) वस्तूचा निर्णय करण्याची क्षमता आली असेल तेव्हापासून भाग्य आणि शुभाशुभत्व या भावनांनी त्याच्या मनात प्रवेश केला असेल. लक्ष्मीचा जन्म या भावनांपासून आहे. जीवनासाठी जे काही हितकर, जे उदात्त, जे सुंदर, जे आनंददायी त्या सगळ्याशी लक्ष्मीचा दृढ संबंध आहे. किंबहुना लक्ष्मी हा शब्दच महन्मंगलतेशी जोडला गेला आहे.

ऋग्वेद काळात लक्ष्मी शब्दाचा ‘भाग्य’ असाच अर्थ असावा. कारण ‘भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधि वाचि’ (त्यांच्या वाचेशी इष्ट असे भाग्य जोडलेले आहे.) असे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील वाक्सूक्तात म्हटले आहे. तसेच अथर्ववेदात ‘त्याच्या (अर्भकाच्या) जन्माबरोबर शंभर लक्ष्मी जन्माला आल्या आहेत. त्यातील शुभलक्ष्मी इथे राहोत. अशुभ लक्ष्मींना मी निष्कासित करीत आहे’ अशा अर्थाचा मंत्र सातव्या अध्यायातील ११५ व्या सूक्तात येतो.

श्रीसूक्तातील लक्ष्मी ही कृषीदेवता आणि त्याचबरोबर नागरी सुबत्तेची प्रतिमा आहे. ती देवसखा कुबेर तसेच त्याचे यक्ष कीर्ती आणि मणिभद्र यांच्याशी संबंधित आहे. तिच्याकडून सोने, गायी, दास, घोडे आणि प्रजा मिळवण्याची श्रीसूक्ताच्या ऋषींची आशा आहे. शतपथ ब्राह्मणात ‘श्री’ ही देवता प्रचंड गुणवत्ता, अनेक शक्ती आणि सौभाग्याचे आलय असल्याचे म्हटले गेले आहे. अनेक देवता तिच्या प्रसादाने उच्च अधिकार प्राप्त करतात असे वर्णन आहे.

पुराणांच्या काळात मात्र ही देवता विष्णूची अर्धागी म्हणून अधिक प्रचलित झाली. असे म्हटले जाते की समुद्र मंथनातून तिचे प्राकटय़ झाले आणि तिने देवांमध्ये श्रेष्ठ अशा श्रीहरीच्या गळ्यात वरमाला घातली. विष्णू श्रीपती झाला. जगाच्या पालनासाठी कार्यरत असणाऱ्या विष्णूला लक्ष्मी साहाय्य करू लागली. जगाचे व्यवहार धन आणि धन्याशिवाय चालू शकणार नाहीत. म्हणून जगाच्या पालनकर्त्यांला लक्ष्मीचे साहाय्य अनिवार्यपणे घ्यावेच लागले. ही लक्ष्मी कमलासना आहे. तिच्या हातात कमळे आहेत. हत्ती तिला अभिषेक करतात. ती धनाचा वर्षांव करते. श्री, पद्म, कमला अशी तिची अनेक नावे आहेत. लक्ष्मीचे असे घनीभूत रूप जरी साकारले गेले तरी लक्ष्मी ही संज्ञा अनेक महत्त्वाच्या स्त्री देवतांना दिली गेली. उदाहरणार्थ महागणपतीच्या अंकावर सिद्धलक्ष्मी असते. तसेच नरसिंहाच्या आख्यायिकांमध्ये भूतलावरील त्याची एक पत्नी चेंचू या वन्य जमातीतली असल्याने तिला चेंचूलक्ष्मी म्हणतात. दुर्गा सप्तशतीत महिषासुरमर्दिनीलासुद्धा महालक्ष्मी म्हटले आहे. पुराणांचा अभ्यास केला तर तो काळ सांप्रदायिक अहमहमिका असणारा होता यात काही शंका उरत नाही. पुराणांचा आढावा घेतला तर असे समजते की –

१. जी देवता नवीन असते ती तत्कालीन प्रचलित देवतांपेक्षा जुनी आहे असे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.
२. वैदिक देवता किंवा त्यावेळच्या इतर प्रस्थापित देवता नवोदित देवतांचे अंश, परिवार सदस्य अथवा दास बनतात.

या सर्व चळवळीत जेव्हा शाक्तांनी प्रवेश केला तेव्हा महालक्ष्मीचा जन्म झाला असावा.

महालक्ष्मीचा उदय –

अंदाजे तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत रचल्या गेलेल्या मार्कण्डेय पुराणांतर्गत देवी माहात्म्य म्हणते- ‘सर्वस्याद्य महालक्ष्मीस्त्रिस्त्रगुणा परमेश्वरी  लक्ष्यालक्ष्यस्वरूपा सा व्याप्य कृत्स्नं व्यवस्थिता’ अर्थात विश्वाचे आदिकारण महालक्ष्मी असून ती प्रकट आणि अप्रकट रूपाने हे विश्व व्यापून राहिली आहे. तिचे स्वरूप कसे आहे? ‘ मातुलिङगं गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती नागं लिङगं च योनींच वहन्ति नृप मूर्धनी- हे राजा, ती महाळुंग (एक विशिष्ट फळ), गदा, ढाल आणि पानपात्र (वाडगा किंवा तत्सम पात्र) घेतलेली असून नाग, शिवलिंग आणि योनी (इत्यादी प्रतिमा) तिने शिरावर धारण केल्या होत्या. तिची कांती तापलेल्या सोन्यासारखी होती आणि स्वत:च्या तेजाने ती सर्व अवकाश भरून टाकत होती.’

mahalaxmi, navratri
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव.

आपल्याशिवाय अवकाशात कोणीच नाही असे पाहून तिने तिच्या तमोगुणापासून एक काळीकुट्ट भयावह स्त्री निर्माण केली आणि तिचे नाव महाकाली ठेवले. महामाया, महामारी, क्षुधा, तृषा, निद्रा, तृष्णा एकवीरा, कालरात्री आणि दुरत्यया अशी तिची आणखी नावे ठेवली. नंतर स्वत:च्या सत्त्वगुणांतून तिने चंद्राच्या कांतीसारख्या शीतल तेजाने युक्त स्त्री निर्माण करून तिला महासरस्वती म्हटले. तिला महाविद्या, महावणी, भारती, वाक्, आर्या, ब्राह्मी, कामधेनु, वेदगर्भा आणि धीश्वरी अशी नावे ठेवली.

ब्रह्मादि देवता   

सृष्टीक्रम चालावा यासाठी महालक्ष्मीने महाकाली आणि महासरस्वतीला आज्ञा केली की तुम्ही एक एक स्त्री-पुरुष निर्माण करा. असे म्हणून तिने स्वत: एक युगुल निर्माण केले. महालक्ष्मीपासून ब्रह्मा आणि कमलालक्ष्मी, महाकालीपासून शिव आणि सरस्वती तसेच महासरस्वतीपासून विष्णू आणि गौरी निर्माण झाले. मग त्यांच्या जोडय़ा बनवल्या. ब्रह्मासोबत सरस्वती, विष्णूसोबत कमलालक्ष्मी आणि शिवासोबत गौरी. या जोडप्यांना अनुक्रमे ब्रह्मांडाचे सृष्टीस्थिती आणि लय यांचे कार्य सोपवले गेले.

कथानकाच्या आधी विशद केलेला पुराणांचा साचा इथे चपखल बसतो. शाक्त सांप्रदायिक मार्कण्डेय पुराणात, वैष्णव कमलालक्ष्मीपेक्षा वरचढ देवतेचा उदय घडविण्यासाठी महालक्ष्मी असे तिचे नामाभिधान झाले. तिचे रूप शैव-शाक्तपंथीय चिन्हे धारण केलेले आहे. मार्कण्डेयाला चिरंजीव बनविण्यास शिवाचे वरदान कारणीभूत होते हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे मार्कण्डेय मूलत: शैव सांप्रदायी होता. शैव संप्रदायातील क्रियाशक्तीला प्राधान्य देऊन पुढे शाक्त संप्रदाय निर्माण झाला.

कोल्हापूरच्या मंदिरात मूर्त रूपाने जी अंबाबाई आज नांदते आहे, ती ही आदिशक्ती महालक्ष्मी आहे असे आपल्याला मूर्तिविधान शास्त्राच्या आधारे म्हणता येईल. महिषासुराचा वध करणाऱ्या अठरा हातांच्या दुर्गादेवीलासुद्धा महालक्ष्मी असे म्हटले आहे. परंतु ती सर्जन क्रमात नंतर येते आणि कोल्हापूरच्या विग्रहाशी तिचे साम्य नसल्याने तिचा विचार या संदर्भात आपण करणार नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अनेक राजकुलातील भक्त लाभले. कोल्हापुरात तिचे मंदिर प्रथम सहाव्या, सातव्या शतकात चालुक्य राजवंशाने बांधले. पुढे एका भूकंपात ते देऊळ नष्टप्राय झाले. दहाव्या शतकात जेव्हा शिलाहार राजा पहिला जतिग याने राष्ट्रकुटांकडून कोल्हापूर जिंकले तेव्हा त्याला असे वाटले की देवीच्या प्रसादाने ही सत्ता त्याला मिळाली आणि त्याने देवीचे मंदिर पुन: बांधले. सध्या जी देवीची मूर्ती आहे ती त्याच काळातली आहे.

मूर्ती काळ्या पाषाणाची असून चतुर्भुज आहे. उजवीकडील  हातात मातुलिंग (महाळुंग) आणि गदा तसेच डावीकडे ढाल आणि पानपात्र असे तिचे रूप आहे. मस्तकावर अस्पष्ट शिवलिंग नागफणा आहेत. देवीच्या गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर मात्र शिवलिंग स्थापित केलेले असून त्यासमोर नंदी आहे. याला लोक मातुलिंग म्हणतात!!

devi
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सव

बाराव्या शतकातील देवगिरीच्या यादवांचे अमात्य हेमाद्री यांच्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात त्यांनी महालक्ष्मीचे उपर्युक्त वर्णन करून म्हटले आहे की महालक्ष्मीचे रूप कोल्हापूरच्या मंदिरातील रूपाप्रमाणे घडवावे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी ज्या यात्रा केल्या त्यात त्यांना महालक्ष्मीची २७ देवळे आढळली. त्यातील मूर्ती कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणेच होत्या.

गोव्यामध्ये नागेशी देवस्थानाच्या आवारात इसवी सन १४१३ चा एक शिलालेख सापडला असून त्यात नागनाथ (सांप्रत नागेश) देवस्थान आणि महालक्ष्मी देवस्थान (बांदिवडे) येथील सेवेसाठी काही जमिनी दान केल्याचा उल्लेख आहे. हे महालक्ष्मी देवस्थानसुद्धा अत्यंत जुने आहे. तेथील महालक्ष्मीचे स्वरूपसुद्धा करवीर निवासिनीसारखे आहे. विशेष म्हणजे नागेश, मंगेश, शांतादुर्गा आणि म्हाळसा कुलदैवत असणाऱ्या काही यजमानांची महालक्ष्मी ही उपदेवता आहे.

करवीर महालक्ष्मीचा लौकिक सर्वदूर पसरला होता. देवी भागवतातील ५१ शक्तीपीठांत कोल्हापूर येते. सतीचा मृतदेह घेऊन शिव त्रिभुवनात फिरत असताना तिचे अवयव जिथे पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली. करवीरास सतीचे नेत्र पडले असे म्हणतात. म्हणजे पुन: शिव आणि शक्ती संप्रदायांशी महालक्ष्मीचा संबंध जोडला गेला.

वरील मुद्दे संक्षेपाने पुन: मांडू

१. महालक्ष्मीचा आदिशक्ती म्हणून पुरस्कार करणारे देवी माहात्म्य शैव उपासक मरकडेयाने रचले.
२. महालक्ष्मीची वर्तमान मूर्ती देवी माहात्म्यातील वर्णनानुसार आहे. तिच्यात शैव आणि शाक्त चिन्हे आढळतात.
३. ही मूर्ती शिष्टसंमत होती आणि तशी प्रतिमा असलेली देवळे अन्यत्रसुद्धा झाली.
४. कोल्हापूर शक्तीपीठ मानले गेल्यामुळे सती आणि शिवाशी अन्योन्यपणे जोडले गेले आहे.

वरील मुद्दय़ांचा विचार करता असे दिसते की शैव आणि शाक्त परंपरा करवीर निवासिनी महालक्ष्मीशी आधीपासून निगडित होत्या.

महालक्ष्मीचे लक्ष्मीकरण –

या महालक्ष्मीला वैष्णव रूपाचा मुलामा कसा चढला? लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांची अदलाबदल कशी झाली असेल? याची उकल सहाव्या-सातव्या शतकातील देवी भागवतात होते. यात आद्यशक्ती नावाची आदिकारण देवता आहे. ती आद्यशक्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिवाला अनुक्रमे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली अर्पण करते. इथे महालक्ष्मी आणि लक्ष्मी यांचे पहिले तादात्म्य झाले.  देवी भागवत हा ग्रंथ ढोबळ मानाने सातव्या-आठव्या शतकानंतर रचला गेला असण्याची शक्यता आहे. काही विद्वान याला श्रीमद्भागवतोत्तर ग्रंथ मानतात. वैष्णव आणि त्यातल्या त्यात कृष्ण उपासनेची गहिरी छाप या ग्रंथावर आहे.

करवीर माहात्म्याची जोड –  

१८२१ ते १८३७ दरम्यान दाजीबा जोशीराव या महापंडिताने मराठीत करवीर माहात्म्य लिहिले, त्यात करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या कथा आहेत. कोलासुर आणि त्याचा पुत्र करवीर या बलाढय़ राक्षसांना तिने कंठस्नान घातले. असुरांचे राज्य नष्ट करून भक्तकाजास्तव देवी कोल्हापुरास राहिली.  कालभैरव, रंकभैरव, केदारनाथ, त्र्यम्बुली देवी आणि अनेक देवतांनी तिला युद्धात सहकार्य केले. त्यांचीही मंदिरे कोल्हापूर क्षेत्राच्या आसपास निर्माण झाली.

करवीर माहात्म्य ग्रंथाच्या मंगलाचरणात गणेशाच्या स्तवनानंतर लगेचच नरसिंहाचे स्तवन आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीचे. नरसिंहाला मंगलाचरणात गणपतीनंतर लगेचचे स्थान दिलेले असल्याने मला असे वाटते की जोशिरावांचे कुलदैवत नरसिंह असावे. अर्थात ते वैष्णव असावेत. त्यामुळे या ग्रंथात अंबाबाई आणि विष्णू यांचे एकात्म्य, अंबाबाई आणि लक्ष्मी यांचे ऐक्य साधणारे उल्लेख मिळतात.

विष्णुमय क्षेत्र-

करवीर क्षेत्राचे वर्णन करताना पहिल्या अध्यायात ते म्हणतात की या क्षेत्राने चंचल इंदिरेला (लक्ष्मीला) स्वत:मध्ये स्थिर केले. ते विष्णुभक्तांनी भरलेले आहे. पुढे एके ठिकाणी ते म्हणतात की महासरस्वती स्वरूपाने ब्रह्मा, महालक्ष्मी स्वरूपाने विष्णू आणि महाकाली स्वरूपाने शिव इथे नांदत आहेत. दुसऱ्या अध्यायात करवीर क्षेत्र  विष्णूने निर्माण केले असे ते म्हणतात.

shiv, devi, shankar
सतीचा मृतदेह घेऊन त्रिभुवनात फिरणारा शिव (सौजन्य विकिपीडिया)

करवीर माहात्म्य हे पद्मपुराणातील करवीर खंडावरून रचले आहे असे जोशीराव म्हणतात. परंतु पद्मपुराणातील सध्या उपलब्ध गौडीय आणि दाक्षिणात्य प्रतींत असा करवीर खंड नाही. प्राप्त पुराव्याच्या आधारे असे म्हणावे लागेल की कोल्हापुरात वैष्णव संप्रदायी लोकांची संख्या त्या काळी अधिक असावी आणि शाक्त संप्रदाय स्मार्त ब्राह्मणांत मिश्र रूपात जिवंत राहिला असावा. वैष्णवांच्या भावभूमीत विष्णुपत्नी लक्ष्मीलाच आदिशक्तीचे स्थान असल्याने लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांचे तादात्म्य स्वीकारले गेले असावे.

गिरीचा व्यंकोबा झाला भरतार

बालाजीला भजणारी अनेक मंडळी महाराष्ट्र, कर्नाटक भागात आहेत. या भागात करवीरची महालक्ष्मीसुद्धा एक लोकप्रिय देवता आहे.  वेंकटाचल माहात्म्यात भृगुऋषींचा उद्दामपणा विष्णूने सहन केल्यामुळे लक्ष्मी रुष्ट झाल्याची कथा आहे. ती रुसून कोल्हापुरास तप करू लागली अशी आख्यायिका आहे. पुढे वेंकटेश अवतार घेऊन विष्णूने पद्मावतीशी लग्न केले. पद्मावती आणि लक्ष्मी यांचे कडाक्याचे भांडण झाले असाही उल्लेख आहे. त्यांच्या भांडणाला कंटाळून वेंकटेशाला दगडाची मूर्ती व्हावे लागले. पद्मावतीचे देऊळ तिरुचानूर या ठिकाणी आहे. पण लक्ष्मीचे देऊळ मात्र आसपास नाही. बालाजीसारख्या अतिश्रीमंत देवाला करवीर लक्ष्मीइतकी राजमान्य आणि लोकप्रिय पत्नी कुठे सापडणार?

नवऱ्यावर रुष्ट होऊन लक्ष्मीबाई थेट कोल्हापुरास आल्या आणि तिची मनधरणी करायला बालाजीने सूर्यनारायणाला मध्यस्थ केले. तो किरणोत्सवाच्या वेळी बालाजीचा सांगावा तिला पोहोचवतो. या दोघांचे नाते वैष्णव भावनेला साहजिकच रुचले. त्यामुळे लक्ष्मी विजय या १८व्या शतकाच्या उत्तरार्धात रचलेल्या ग्रंथाने महालक्ष्मी आणि बालाजी यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय बालाजीची यात्रा सुफळ संपूर्ण होत नाही असा समज आता रूढ झाला आहे.

हल्ली या आख्यायिकेमुळे तिरुपती बालाजीला जाणारे यात्रेकरू महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला कोल्हापूरला येऊ  लागले आहेत. ही गर्दी उत्तरोत्तर वाढत जाईल यात शंका नाही. आता तिरुपती ते कोल्हापूर धावणारी हरिप्रिया एक्स्प्रेस भारतीय रेल्वेने चालू केली आहे. २००८ सालापासून बालाजी मंदिर प्रशासन महालक्ष्मीला नवरात्राच्या वेळी शालू पाठवू लागले आहे. हा शालू विजयादशमीला देवीला नेसवतात आणि नंतर त्याचा लिलाव होतो. २०१३ साली या शालूचा लिलाव महालक्ष्मी देवस्थानाला साडेसात लाख रुपये देऊन गेला. अंबाबाईची ही नवीन ओळख तिच्या मंदिराला, शहराला, व्यापारउदीमाला, पर्यटन व्यवसाय इत्यादींना लाभदायक ठरली आहे. विष्णुपत्नी लक्ष्मी ही महालक्ष्मीच्या अंशातून उत्पन्न झाली. परंतु तिचाच मुखवटा लेऊन आता आदिशक्ती महालक्ष्मीला स्वत:चे रूपांतर सोसावे लागणार आहे.

devi, navratri
तळे येथील महालसा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूळ मूर्ती

त्रिपूरसुन्दरी :

शाक्त परंपरेतील अत्युच्च पद प्राप्त करणारी ललिता महात्रिपूरसुन्दरी ब्रह्मांडपुराणातून लोकांसमोर आली. ब्रह्मांड पुराणाचा काळ इसवी सन २५० ते ९५० पर्यंतचा मानतात. असे असले तरी तमिळ संत साहित्यातील काही खुणांवरून या देवतेचे मंत्र सातव्या शतकाच्या पूर्वी प्रचलित होते असे कळते. पूर्वीच्या सर्व संप्रदायातील सर्व देवतांवर तिने अधिराज्य गाजवले. श्रीयंत्र हे तिचे स्वरूप आहे आणि तिच्या दिव्य नगराचे प्रतीक आहे.

श्रीयंत्राची आकृती शाक्त तत्त्वज्ञानाचा भौमितिक आकृतिबंध आहे. यंत्रात असणारा बिंदू हा शिवशक्ती रूप आहे. आत्म्याची निरालंब अहंता म्हणजे प्रकाश (ज्ञान) आणि या अहंतेची जाणीव म्हणजे विमर्श (क्रिया.) प्रकाश हा शिव आणि विमर्श ही शक्ती. ज्ञानाची जाणीव हीसुद्धा क्रिया आहे. जाणल्याशिवाय ज्ञान हे ज्ञान म्हणून ओळखू येत नाही. त्यामुळे क्रिया ही श्रेष्ठ ठरते असा शाक्त संप्रदायाचा पक्ष आहे. त्यांच्या लेखी शक्तीशिवाय शिव जड आहे. ही विमर्श शक्ती जगताचे आदिकारण आहे. ती अव्यक्त असल्याने तिला बिंदूच्या रूपात दाखवतात. त्यानंतर सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी ती प्रगटते आणि जगाची उत्पत्ती करते. हा त्रिकोण आहे. अशा त्रेचाळीस त्रिकोणांचे श्रीयंत्र बनलेले आहे.

ललितेचा असा महिमा आहे की जीव पिंडात कुंडलिनी शक्तीच्या रूपाने ती राहते. वाणी हे तिचेच रूप आहे. ती प्राणशक्ती आहे. ब्रह्मांडाची संचालक शक्ती तीच आहे. ती शिवाशी अभिन्न आहे. असेही असून शिव आणि शक्ती रूपाने ती क्रीडा करते. तिने हे सर्व चराचर विश्व व्यापले आहे.

श्रीयंत्राची पूजा करून श्रीविद्येचा जप करणाऱ्या साधकाच्या पायावर सर्व ऐहिक सुखे लोळण घेतात आणि अंती तो मोक्ष प्राप्त करून घेतो अशी वर्णने अनेक शाक्त सांप्रदायिक ग्रंथांत आहेत. भोग आणि मोक्ष हे दोन्ही पुरुषार्थ सिद्ध करून देणाऱ्या यंत्राने उदंड लोकप्रियता मिळवली नसती तरच नवल.

ललिता आणि श्री

आपण पूर्वी पाहिलेच आहे की नवोदित देवता प्रस्थापित देवतेच्या गुणांपेक्षा अधिक श्रेष्ठ गुणांनी आविर्भूत होते. हा सगळा मामला सांप्रदायिक अहंतेचा पुष्टीचा आहे. लक्ष्मी वैष्णवपंथाशी संलग्न झाल्यावर तिच्यापेक्षा वरचढ अशी धनदात्री देवता शाक्त पंथीयांनी लोकांसमोर आणल्याखेरीज वैष्णवांना ते शह देऊ  शकणार नव्हते. ललिताम्बिकेच्या रूपात त्यांना ती देवता मिळाली. तिला त्यांनी रमा, महालक्ष्मी, सर्वसंपत्प्रदायिनी, राज्यलक्ष्मी, कोशनाथा, साम्राज्यदायिनी असे म्हटले आहे.

श्रीविद्या हा तिचा मंत्र म्हणजे गायत्री मंत्राचे गुप्त रूप आहे असे प्रतिपादन करून ललितेची प्राचीनता आणि वेदप्रामाण्य शाक्त लोकांनी दाखवले. त्याच्या पुष्टय़र्थ त्रिपुरतापनीय उपनिषद आणि त्रिपुर-उपनिषद अशा वैदिक साहित्यात तिचे यंत्र, मंत्र आणि तंत्र कसे आढळतात हे दाखवण्याचा शाक्तपंथीयांनी आटोकाट प्रयत्न केला.

ललितेचे अनंत ऐश्वर्य

दुसरी खेळी म्हणजे प्रस्थापित देवतांना नव्या देवतेचे अंश अथवा दास बनविणे. ललितेच्या सिंहासनाचे खूर ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर बनले. त्या देवांवर सदाशिव फलकरूपाने आडवा पडला आहे. या सिंहासनावर सिंदुरी रंगाची, त्रिनेत्रा, चंद्रमंडिता, त्रिपूरसुंदरी ललिताम्बिका आसनस्थ आहे. पाश, अंकुश, उसाचे धनुष्य आणि पाच फुलांचे बाण तिने धारण केले आहेत. डावीकडून लक्ष्मी आणि उजवीकडून वाणी (सरस्वती) चौऱ्या ढाळून तिची सेवा करीत आहेत. इंद्रादि सुरगणांच्या मुकुटातील रत्नांनी तिची पावले उजळली आहेत. तिच्या पाय ठेवण्याच्या पीठापाशी हात जोडून सर्व देव सतत उभे असतात. त्यामुळे तिच्या पावलांची पूजा केली तर सर्व देवांची पूजा होते. हे सर्व वर्णन ब्रह्मांड पुराण, ललिता सहस्रनाम, त्रिशति आणि सौंदर्यलहरी या वाङ्मयात आलेले आहे.

‘श्री:’ चा अर्थ

‘श्री:’ हा शब्द लक्ष्मीवाचक आहे. तसेच संपत्ती, प्रकाश, शोभा, भाग्य इत्यादीसाठीसुद्धा हाच शब्द वापरतात. मुमुक्षूमधील शम, दम, तितिक्षा इत्यादी षट्संपत्ती आणि मोक्षश्रीसुद्धा ‘श्री:’मध्ये सामावलेली आहे. त्यामुळे देवीच्या मंत्राला म्हणजे विद्येला श्रीविद्या असे म्हटले गेले असावे. ललितेच्या सोळा अक्षरी विशेष विद्येत ‘श्री’ हे बीज जोडले जाई. सोळा या अंकाला तंत्रात अनन्यसाधारण महत्त्व

shree yantra
श्री यंत्र

आहे. म्हणून देखील या विद्येला श्रीविद्या म्हटले गेले असावे. श्रीविद्येशी संबंधित यंत्र हे श्रीयंत्र म्हणून ओळखले गेले.

श्रीयंत्र महालक्ष्मीयंत्र बनले

ललिता ही देवता तंत्रातल्या गोपनीयतेमुळे सगुण साकार रूपात लोकांसमोर फारशी आली नाही. तिचे यंत्र हेच तिचे प्रतीक होते. हे यंत्र अनेक ठिकाणी मातृदेवतेशी संबंधित धार्मिक स्थळी पुजले जाऊ  लागले. उदाहरणार्थ, कोल्हापूरच्या मंदिरात एक दगडी भूपृष्ठ (सपाट) श्रीयंत्र आहे. काशीला अन्नपूर्णेच्या देवळातही हल्ली मेरू (पर्वताचा आकार असणारे) श्रीयंत्र बसवले आहे. त्याच देवळाच्या आवारात यंत्रेश्वर महादेव नावाचे एक लहान देऊळ आहे. या देवळातील शिवलिंगावर श्रीयंत्र कोरलेले आहे. हे लिंग सतराव्या-अठराव्या शतकातील भास्करराय मखिन् या थोर आचार्यानी स्थापित केले असे मानतात. विंध्यांचली सरस्वतीच्या डोंगरावर भैरव कुंडाजवळ पाषाणातील एक प्राचीन श्रीयंत्र आहे. यापैकी कोणत्याही स्थानी ललितेची मूर्ती नाही. साहजिकच या अज्ञात श्रीची जागा ओळखीच्या श्रीने म्हणजे लक्ष्मीने घेतली आणि श्रीयंत्राचे श्रीमहालक्ष्मीयंत्र व्हायला वेळ लागला नाही.

गोमंतकातील म्हाळसाई

म्हाळसा नारायणी या एका देवतेत तीन देवतांचा संगम झाला आहे. कर्नाटक-गोव्याकडील माळचि, खंडोबा पत्नी म्हाळसा आणि नेवाश्याचा मोहिनीराज. विष्णूचे मोहिनी रूप असा तिचा सध्याचा लौकिक आहे. हा लौकिक तिच्यावर कसा आरोपित झाला ते आपण पाहू.

माळचि – रा. चिं. ढेरे यांच्या ‘खंडोबा’ या पुस्तकावरून अशी माहिती मिळाली की, कर्नाटकातील देवीहोसुरच्या बनशंकारीच्या देवळात सन ११४८ चा कन्नड शिलालेख आहे. त्यात रेचरस या बनवासी प्रांताच्या अधिपतीने माळचिदेवीला नैवेद्य आणि नंदादीप चालावा यासाठी दान देऊन नवस फेडल्याचा उल्लेख आहे. त्या शिलालेखातील  देवीच्या स्तुतिपाठात काळी, काळराक्षसी, रौद्रा, भैरवी, उग्रा, महाकाली, काळयोगिनी या नामांनी तिचा गुणगौरव केला आहे. त्याच मंदिरातील सन १०६३ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की, इंदपय्य नावाच्या अधिकाऱ्याने माळज देवीच्या मंदिराला मकरतोरण बांधून दिले. ज्यांनी या लेखांवर प्रकाश टाकला त्या पांडुरंग देसाईंचे असे मत आहे की, माळचि देवीचे परिवर्तन अथवा नामांतर बनशंकरीदेवीत झाले असावे. साधारणत: भैरवी ही देवता चार हात असणारी असून त्रिशूल डमरू, खड्ग आणि पानपात्र ही आयुधे भैरवाप्रमाणे तिने घेतलेली आढळतात. ती काही वेळा चामुण्डेप्रमाणे शववाहना अथवा शव संस्थिता असते. तिच्या जवळ कुत्रा किंवा कोल्हा असतो.

मोहिनी- अमृतमंथनाचे वेळी अमृतकुंभ जेव्हा असुरांनी पळविला, तेव्हा विष्णूने असुरांना मोहित करून देवांना अमृत मिळवून देण्यासाठी अतिशय सुंदर स्त्रीचे रूप घेतले. ज्ञानेश्वरीत या देवीला ‘ महालसा/ महालया’ असे म्हटले आहे. एकनाथी भागवतात अमृतप्राशन करणाऱ्या राहूचे शिर उडवून त्याच्या धडावर स्थित होऊन ‘म्हाळसा’ नेवाश्याला राहिली असा उल्लेख आहे. म्हाळसा आणि मोहिनी ऐक्याची चुणूक इथे प्रकट होते. विष्णूच्या या अवताराला ‘मोहिनीराज’सुद्धा म्हणतात. त्याचे देऊळ महाराष्ट्रात नेवाश्याला आहे. मोहिनीराजाचे रूप अर्धनारीश्वराप्रमाणे आहे. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा आणि सुधाकलश आहे. त्याचा श्रृंगार मात्र देवीप्रमाणे करतात.

म्हाळसा-मोहिनीच्या कथेचे सूत्र खंडोबाच्या आख्यानात चालू राहते. मोहिनीचे सौंदर्य इतके पराकोटीची होते की महादेवाचे चित्त तिला पाहून चळले. त्याने तिची कामना व्यक्त केली तेव्हा मल्हारी अवतारात त्याची पत्नी होण्याचे तिने वचन दिले. आणखी एका आख्यायिकेत, शिवाची मोहिनीबद्दलची आसक्ती पाहून मल्हारी मरतड अवतारात पार्वतीने तसे रूप धारण करून शिवाची इच्छा पूर्ण केल्याचे सांगतात.

नेवाश्याचा लिंगायत वाणी तिम्माशेठ याच्या घरी बाल रूपाने म्हाळसेने अवतार घेतला. पुढे तिचे खंडोबाशी लग्न झाले. खंडोबापत्नी म्हाळसेचे रूप मात्र कधी दोन हातांचे तर कधी चार हातांचे असते. द्विहस्ता म्हाळसेचा एक हात कमळ धरलेला तर दुसरा हात खाली सोडलेला असतो. चतुर्हस्ता म्हाळसा भैरवीप्रमाणे, त्रिशूल, डमरू, खड्ग आणि पानपात्र घेतलेली असते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात ही दोन्ही रूपे देवालयात आढळतात.

खंडोबा आणि माळचि

devi
देवी

आपण पूर्वी पाहिले आहेच की नवीन देवतांचा जुन्या देवतांशी अंश, कुटुंब सदस्य किंवा पार्षद अशा प्रकारे संबंध येतो. अकराव्या- बाराव्या शतकात जेव्हा खंडोबाचे प्रस्थ वाढत चालले तेव्हा माळचिसारख्या प्रस्थापित देवतेला डावलून चालणार नव्हते. खंडोबा मरतड भैरव या रूपाने लोकप्रिय होत असताना, भैरवी रूप माळचि ही त्याची अविरोध सहचरी बनू शकत होती. तरीही म्हाळसेचे स्वतंत्र अस्तित्व तिने जपलेले दिसते. तिची स्वतंत्र मंदिरे तर आहेतच. परंतु तिच्या मंदिराजवळ खंडोबाचे एखादे ठाणे निर्माण झालेले दिसते. नेवाश्यास खंडोबाचे स्वतंत्र मंदिर आहे. तसेच मादरेळासही देवळासमोरील टेकडीवर मल्हाराचे स्थान आहे. उतरोत्तर काळात खंडोबा, म्हाळसा-मोहिनी असे नाते तयार झालेले आढळते.

गोमंतकातील महालसा नारायणी

मादरेळची महालसा ही विष्णूचे चतुर्भुज मोहिनी रूप आहे असे मानले जाते. तिच्या हातातील शिर राहूचे आहे असे म्हणतात.

सह्यद्रीखंडातील कथेनुसार ते शीर चंडासुराचे आहे. या गोष्टीतील महालसा देवी ही परशुराम पुरस्कृत एक स्वतंत्र देवता असून तिचा मोहिनीशी काहीच संबंध नाही हे विशेष.

आणखी एका कथेचा अंतर्भाव या मूर्तीत आहे. विरोचन राक्षसाबरोबर मोहिनीने लग्न करून त्याचे मस्तक फोडून त्याचा वध केला. हा विरोचन खड्गाच्या खालील खुजा पुरुष असल्याचे सांगतात.

मादरेळची महालसा मूर्ती –

मादरेळच्या मंदिरात तीन मूर्ती आहेत. पहिली मुख्य मूर्ती गाभाऱ्यातली. ही गंडकी शिळेची आहे असे सांगतात. ही मूर्ती अतिशय जीर्ण असल्याने बारीकसारीक तपशील लांबून दिसत नाहीत. चेहरा पूर्णत: झिजला आहे. मुकुटाचा अर्धा भाग खंडित आहे. शीर धरलेला हात, खड्ग धरलेला हात आणि पानपात्रधारी हात बऱ्यापैकी दिसतो. त्रिशूळ दिसत नाही. नेसणाच्या चुण्या वगैरे दिसून येतात. कटिवस्त्राच्या निऱ्या पायापर्यंत लांब आहेत. जानवे स्पष्ट दिसते. हाताखालचा खुजा पुरुष दिसतो. पायाखालचा पुरुष आणि रक्तपिपासू प्राणी नीट दिसत नाहीत.

संकष्टी

गाभाऱ्याच्या बाहेर जी मूर्ती आहे ती महालसाच आहे, परंतु तिला संकष्टी देवी म्हणतात. तिच्यावरून महालसेचे रूप हे चतुर्भुज असून उजव्या हातात तिने खड्ग आणि त्रिशूल धरले आहेत आणि डाव्या हातांत पानपात्र आणि कापलेले मुंडके आहे असे दिसते. मूर्तीच्या खांद्यावरून उजव्या हाताखाली गेलेले यज्ञोपवीत मात्र ठसठशीत आहे. अधोवस्त्र गुडघ्याच्या खालपर्यंत असून कटिवस्त्राच्या निऱ्या पायापर्यंत लांब आहेत. दागिने बेताचेच कोरले आहेत.

ती एका पुरुषावर उभी आहे. खड्गाखाली एक खुजा पुरुष दिसतो ज्याचा उजवा हात वर उचललेला तर डावा साधारण कटिहस्त म्हणता येईल. देवीच्या डावीकडे एक चेहरा दिसतो. त्याबद्दल काही कळू शकले नाही. देवीच्या हातातील कापलेल्या शिरातून गळणारे रक्त पिण्यासाठी मागच्या पायांवर बसलेला एक प्राणी दिसतो. त्याचे डोके आणि शेपूट मार्जार वंशाशी संबंधित वाटते. त्याचा एक पंजा शिर धरण्यासाठी सरसावला आहे.

तळीवरची महालसा

तिसरी मूर्ती मंदिराच्या मागच्या अंगास असणाऱ्या तळीवर आहे. परंतु संकष्टीच्या मूर्ती प्रमाणेच तिची रचना आहे.

एक विशेष फरक म्हणजे देवीच्या डावीकडील प्राणी स्पष्टपणे कुत्र्यासारखा दिसतो. वेण्र्याचे देऊळ पोर्तुगीजांनी पाडल्यावर महालसादेवी मादरेळला स्थलांतरित झाली. मूळ मूर्ती नष्ट झाल्याने देवीच्या मूर्तीच्या तीन प्रतिकृती बनवून कौल प्रसाद घेऊन त्यातील एक मूर्ती गाभाऱ्यात स्थापन केली असे मादरेळच्या पुरोहितांकडून कळते.

सांप्रतचे परिवर्तित रूप

महालसेच्या आवारातील तिच्या अन्य मूर्ती अर्वाचीन असून त्यांच्या रूपात काही सूचक बदल झालेले आहेत. तिचे नेसण काचा मारलेल्या आखूड दुटांगी धोतराप्रमाणे आहे. डाव्या हातात जे पानपात्र होते त्याचा सुधाकलश झाला आहे. जानवे थोडेसे दिसते पण ते अत्यावश्यक मानतात.

देवीच्या हातातल्या शिराखालचा प्राणी वाघ बनला आहे, पण काही चित्रांत त्याला सिंहदेखील बनवतात. भैरवीच्या रूपापासून दूर जाण्याचा हा प्रयत्न असावा. पायाखालचा पुरुष राक्षसरूप झाला आहे. हे सगळे बदल महालसेच्या विष्णू-मोहिनी रूपाला साजेलसे आहेत. तिच्यात पुरुष देवता कशी दडली आहे ते दाखवण्याचा तो प्रयत्न आहे.

तिन्ही मूर्तीचा अभ्यास करता असे लक्षात येईल की –

१.     खंडोबापत्नी म्हाळसा शव संस्थिता नाही.
२.     नेवाश्याच्या मोहिनी-म्हाळसेच्या आणि मादरेळ-महालसेच्या विग्रहातील रूपात तसेच आयुधांमध्ये काहीच साम्य नाही.
३.     जानवे घालणाऱ्या स्त्री देवता बऱ्याच आहेत.
४.     महालसेच्या रूपाचे साधम्र्य भैरवी अर्थात माळचि या रूपाशी आहे.

या कारणांमुळे महालसेच्या मूर्तीला विष्णूरूप मानणे मूर्तिविधान शास्त्राने चुकीचे ठरेल.

प्रथा आणि उपासना पद्धती

नवरात्राच्या वेळी होणाऱ्या तिच्या उत्सवात देवीची पालखी डोंगरावर खंडोबाला भेटायला जाते. तिथे कुक्कुटबळी दिला जातो. तसेच मंदिरातल्या काही देवतांसाठी प्रांगणात अज-बळी देतात. मंदिरात नवचंडी, अयुतचंडी इत्यादी अनुष्ठाने मोठय़ा प्रमाणावर होतात. महाशिवरात्रीलासुद्धा मादरेळला मोठा उत्सव असतो. या सर्वातून शैव, शाक्त उपासना प्रतीत होते. तरीसुद्धा या देवीला मोहिनी, नारायणी अशा वैष्णवी अभिधानाने का ओळखू लागले असावेत?

सांप्रदायिक वर्चस्वाचे फलित

गोव्यात मध्वसंप्रदायी वैष्णवांचा मोठा समुदाय होता आणि आहे. मूळचे स्मार्त ब्राह्मण जेव्हा मध्वसंप्रदायाचे अनुयायी झाले तेव्हा त्यांची कुलदैवते काही बदलली नाहीत. परंतु त्या दैवतांच्या बाह्य़रूपात बदल झाला. उदाहरणार्थ, या संप्रदायाचे अनुयायी ज्या शिव मंदिरांत बहुसंख्येने कुळावी होते तेथील देवतेच्या श्रंगारात त्रिपुंड्र लावण्याऐवजी देवतेला उभे गंध लावून देवतांचे वैष्णवीकरण करण्यात आले. तसेच कदाचित ज्ञानेश्वर, एकनाथांच्या साहित्यातील म्हाळसा-मोहिनी संबंध दृढतर करून तिला नारायणीचे नाम चिकटविले असावे. दुर्गासप्तशतीमध्येसुद्धा शुंभ-निशुंभ दैत्यांना मारणाऱ्या देवीला नारायणी म्हटले आहे. त्यामुळे हे नाव देवीला जोडण्यात काहीच अडचण नव्हती.

महालसा जशी सारस्वत, कऱ्हाडे, पद्ये ब्राह्मणांची कुलदेवता आहे, तशीच ती गोमंतकातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे. कर्नाटकातसुद्धा तिचे प्रस्थ मोठे आहे. महालसेच्या वैष्णवीकरणाने त्या देवस्थानांवर आणि त्या त्या ठिकाणच्या जनतेवर वैष्णव मठांचे वर्चस्व कायम करण्याचा प्रभावी मार्ग माध्वसांप्रदायिक लोकांनी शोधला असावा असे मला वाटते. मादरेळच्या महालसेच्या वैष्णव मोहिनीरूपाचे हेच रहस्य असावे.

अंधेरीची महाकाली

डॉ. सुरज पंडित आणि अरुण नारायणन् लिखित ‘ स्टोरीज इन स्टोन – हिस्टॉरिक केव्ह्ज ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या आधारे खालील माहिती मिळाली.  मुंबईमध्ये कान्हेरी गुंफांपासून ११ कि.मी  दक्षिणेस महाकाली (अर्थात कोंडीवटे) गुंफांचा समूह आहे. या बौद्ध गुहा असून त्यांच्या उपयोगाचा काळ इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत आहे असे अभ्यासक मानतात. या गुहांच्या पायथ्याशी महाकालीचे एक मंदिर आहे. या मंदिरामुळेच त्या गुहांना महाकाली गुंफा असे म्हणतात.

मंदिरातील देवतेच्या मूर्तीचे निरीक्षण केले तर असे दिसून येईल की ही महाकाली स्तूपावर अधिष्ठित आहे. स्तूपावरील देवतेची मूर्ती अतिशय जीर्ण झाल्याने तिची रूपरेषा सांगणे अवघड आहे. हा स्तूप वरील गुहेतून घरंगळत खाली आला आणि पुढे तिथे देऊळ बांधले गेले. या देवतेचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत येतो. परंतु बखरीत सुरुवातीला हे दैवत महाकाल या रूपाने ओळखले जात होते आणि नंतर त्याचा उल्लेख महाकाली असा होतो. म्हणजे बाराव्या-तेराव्या शतकात कधीतरी हा बदल घडला असावा असा कयास आहे. बिंब द्वितीय या राजाने इथे यज्ञ याग केल्याची आख्यायिका आहे. असाच इतिहास जोगेश्वरी गुफांचा आहे. बौद्ध धर्माचा अस्त आणि शाक्त पंथाचा प्रभाव या बदलाला कारणीभूत झाले असावेत.

देवांनाही शिरोधार्य

वरील चार देवतांचे निरीक्षण हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. अशा अनेक देवता काळाच्या ओघात उत्पन्न होऊन लयाला गेल्या असतील. काही देवता इतर देवतांमध्ये समाविष्ट होतात. देवतांचे विलीनीकरण आणि रूपांतर हे त्यावेळच्या समाजाच्या विचारप्रवाहाचे प्रतीक असते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बदलत्या नीतिमूल्यांबरोबर आणि गरजांबरोबर देवतांची स्वरूपे बदलत जातात. श्रद्धेच्या आधारे देवतेची मूर्ती बनते आणि त्या मूर्तीच्या आधाराने नव्या श्रद्धा बनतात.

श्रद्धेची ही प्रतीके बऱ्याच वेळा सामूहिक अहंकार आणि प्रतिष्ठेचा विषय बनतात. त्यातून सांप्रदायिक वाद आणि कुरघोडीचे प्रयत्न होतात. या सर्व गोंधळात नवीन दैवत अथवा जुन्या देवतेची नवीन ओळख जन्माला येते.

दुर्गासप्तशतीतल्या दोन श्लोकांचे स्मरण या संदर्भात होते ‘ जी देवी सर्व जिवांमध्ये श्रद्धेच्या रूपाने नांदते आहे तिला वंदन असो!’ ‘जी देवी सर्व जिवांमध्ये भ्रांती रूपाने वास करते आहे तिला नमस्कार असो!’ महामायेच्या या विलक्षण खेळाचे वर्णन आणखी करावे तरी कसे?
चंद्रशेखर खांडळेकर – response.lokprabha@expressindia.com