दिवाळीमध्ये घरोघरी फराळाचे पदार्थ तर असतातच. पण भेटायला येणाऱ्या पाहुण्यांना या फराळाच्या पदार्थाबरोबरच काही तरी वेगळं करून खायला घालायचं असेल तर या खास रेसिपीज थेट शेफच्या किचनमधून

बीन्स ऑन राइस फ्लोअर पॅनकेक

ruchkar-02साहित्य –

तांदळाचे पीठ- २ कप

उकडलेला राजमा- १ कप

टोमॅटो- १ कप

लाल तसेच पिवळ्या रंगाची सिमला मिरची- १ कप

कांदापात- अर्धा कप

३-४ लसूण पाकळ्या

हिरव्या मिरच्या- २

ताजी कोथिंबीर

चवीपुरते मीठ

कोथिंबीर, टोमॅटो तुमच्या गरजेनुसार त्या त्या आकारात कापून घ्या. लाल तसेच पिवळ्या रंगाची सिमला मिरची तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.

कृती –

तांदळाचे पीठ आणि पाणी एकत्र करून भजीच्या पिठासारखे दाट पीठ तयार करून घ्या. त्यात मिरच्या तसेच कोथिंबीर टाका. मीठ घाला आणि बाजूला ठेवून द्या. राजमा मिक्सरमधून बारीक करून घ्या.

आता एका भांडय़ात तेल गरम करून घ्या. त्यात कांदापात, लसूण, सिमला मिरची घाला आणि चांगले परतून घ्या. त्यात बारीक केलेला राजमा घाला. टोमॅटो घाला आणि १० मिनिटे शिजवा. त्यानंतर हे मिश्रण थंड करायला ठेवून द्या.

आता गॅसवर नॉन स्टिक पॅन ठेवून तो गरम झाल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून पातळ, वरील फोटोत दिल्याप्रमाणे लहान लहान धिरडे बनवा. ते दोन्ही बाजूंनी चांगले झाल्यावर तव्यावरून बाजूला काढा. अशी ४-५ धिरडी झाल्यावर त्यात राजमाचे मिश्रण घाला. आधी चिरून ठेवलेल्या सिमला मिरची, कांदा पात या भाज्या एका बोलमध्ये मिसळून त्या डिशमध्ये ठेवलेल्या बीन्स पॅनकेकवर घालून सजवा आणि खायला द्या.

पालक पकोडा चाट

ruchkar-06साहित्य –

पालकाची १० पाने

बेसन- ३-४ टीस्पून

दही- १ कप

साखर- चवीनुसार

चिंचेची चटणी- चवीनुसार

तिखट- चवीनुसार

सैंधव- चवीनुसार

जिरे पावडर- चवीनुसार

कृती – पालकाची मोठी पाने स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. बेसन पिठात पाणी घालून ते भजीच्या पिठाप्रमाणे तयार करून घ्या. आता पालकाची पाने या पिठात बुडवून काढा आणि सोनेरी रंगावर तळून घ्या. दही एका वेगळ्या भांडय़ात घेऊन त्यात साखर घाला. एका प्लेटमध्ये तळलेली पालकाची पाने ठेवा. त्यावर गोडूस दही, चिंचेची चटणी पसरा. सैंधव, लाल तिखट, जिरे पावडर भुरभुरा. गरमगरमच खायला द्या.

इडली की मेलडी

ruchkar-04साहित्य –

इडली  पिठासाठी

उकडीचा तांदूळ- २ कप

उडीद डाळ- १ कप

मीठ – चवीनुसार

थोडी बेकिंग पावडर

बर्गरसाठी

सोया चंक्स- १०० ग्रॅम

एक कांदा चिरून

३-४ लसणीच्या पाकळ्या. बारीक करून

मीठ

काळीमिरी

चिरलेली कोथिंबीर

तेल

केचप

लॅटय़ूसची पाने

कृती –

इडलीसाठी उडीद डाळ आठ तास पाण्यात भिजवून ठेवा. तांदूळ धुऊन कोरडे करून मिक्सरमधून दळून घ्या. उडीद डाळही मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे बारीक केलेले डाळ आणि तांदूळ एकत्र करा. त्यात मीठ घालून ८-९ तास ठेवून द्या. ते चांगले फुगले की इडलीचे पीठ तयार झाले. इडलीपात्रात ते घालून इडल्या करून घ्या. त्या बाहेर काढून मधोमध चिर देऊन बाजूला ठेवून द्या.

आता सोया चंक्स पाच मिनिटे गरम पाण्यात ठेवा. पाण्यातून बाहेर काढून कोरडे करून घ्या आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या.

एका पॅनमध्ये तेल घाला. कांदा, लसूण, बारीक केलेले सोया चंक्स घालून चांगले परतून घ्या. आता त्यात कोथिंबीर, मीठ आणि काळीमिरी पावडर घाला.

आता या मिश्रणाचे चार वेगवेगळे भाग करा. लहानसर थापून घ्या आणि हॉट प्लेट किंवा तव्यावर ठेवून थोडेसे भाजा. आता हे मिश्रण इडलीच्या चिर दिलेल्या भागात ठेवा. त्याच्यावर लेटय़ूसची पाने ठेवा. केचपच्या साहाय्याने इडलीवर स्मायलीचा आकार काढा आणि खायला द्या.

शेफ नीलेश लिमये

 

शेवया आणि पिस्त्याचे बक्लव

ruchkar-03साहित्य –

बारीक शेवया – अर्धा कप

तूप – २-३ टेबलस्पून

दूध – १ कप

साखर – तीन ते चार टेबलस्पून

वेलची पावडर – अर्धा टीस्पून

काप केलेले पिस्ते ३ टेबलस्पून

मनुके – अर्धा चमचा

काप केलेले बदाम ३ टेबलस्पून

फिलो – एक पाकीट

दाट साखर पाक – एक कप

कृती – गॅस पेटवून त्याच्यावर एक जाड बुडाचे भांडे ठेवा. ते भांडे तापल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून तूप घाला. त्यात बारीक शेवया घाला. त्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत चांगल्या भाजून घ्या. मग त्या एका ताटलीत काढून ठेवा. आता गॅसवरच्या भांडय़ामध्ये पुन्हा एक चमचा तूप घाला. ते गरम झाल्यावर त्यात पिस्ते, बदामाचे काप घालून चांगले भाजून घ्या. मग ताटलीत काढून ठेवा.

आता दुसऱ्या भांडय़ात दूध घेऊन ते मध्यम आचेवर उकळा. ते उकळायला लागले की त्यात भाजलेल्या शेवया घाला. त्या मध्यम आचेवर छान, दाट  शिजवून घ्या. त्यात बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. मात्र शेवया अती शिजू देऊ नका. मनुके, वेलची पावडर घाला. २-३ मिनिटं ढवळा. गॅस बंद करा. गार झाल्यावर ही खीर सवर्ि्हग बोलमध्ये घाला.

आता फिलो घ्या.  एका पाकिटात फिलोच्या दोन-तीन लेअर्स असतात. त्याला अगदी हलका तुपाचा हात द्या. त्यावर शेवयांची खीर, बदाम-पिस्त्याचे तुकडे घाला आणि रोल करा. त्या रोलचे लहान लहान तुकडे करा. हे तुकडे बेकिंग पॅनवर ठेवा. फिलो हलक्या सोनेरी रंगांचे होईपर्यंत पॅन आठ ते दहा मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. बाहेर काढल्यावर त्यांच्यावर गरम साखरेचा पाक घाला. थंड होऊ द्या. पिस्ते, बदामाचे तुकडे पेरून खायला द्या.

काजूचे शंकरपाळे 

साहित्यruchkar-07

तूप – १०० ग्रॅम

साखरेचा पाक – १०० ग्रॅम

मिल्क पावडर – १०० ग्रॅम

पीठ – पाव किलो

काजू पावडर – १५० ग्रॅम

तळण्यासाठी तेल

मीठ चिमूटभर

१ टेबलस्पून रवा

कृती –

मिल्क पावडर आणि तूप एकत्र करून घ्या. त्यात साखरेचा पाक मिसळा. काजू पावडर, पीठ, रवा हे सगळं त्यात मिसळून मऊसर आणि घट्ट असा गोळा तयार करून घ्या. तो तीस मिनिटे ठेवून द्या. मग तो लाटून शंकरपाळ्याच्या आकारात लहान लहान तुकडे करून कापून घ्या आणि सोनेरी रंगावर कापून घ्या. गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

पोहय़ांचा फ्रेश फ्राइड कोथिंबीर चिवडा

साहित्यruchkar-08

अर्धा कप कोथिंबीर

अर्धा कप शेंगदाणे

सुके खोबरे

अर्धा कप मिक्स शेंगदाणे

२ टेबलस्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ

१ चमचा धणे पावडर

१ चमचा जिरे

१ चमचा साखर

अर्धा चमचा मोहरी

अर्धा चमचा तीळ

२ ते ३ चमचे तूप

कृती- एका भांडय़ात तूप घ्या. त्यात शेंगदाणे तळून घ्या. बाहेर काढून ठेवा. कोथिंबीर त्या तेलात घालून चांगली तळून कोरडी करून घ्या. बाहेर काढून घ्या. काजू, सुकं खोबरं तळून बाहेर काढून ठेवा. आता एका वेगळ्या भांडय़ात लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, मीठ हे सगळं एकत्र करून घ्या. गॅसवर एक भांडं ठेवून त्यात तूप घाला आणि नंतर पोहे घालून चांगलं परतून घ्या. आता त्यात बाहेर काढून ठेवलेले सगळे मसाल्याचे पदार्थ घालून सगळं चांगलं मिसळून घ्या. सतत ढवळत राहा. सगळ्यात शेवटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे, साखर, सुकी केलेली कोथिंबीर, शेंगदाणे, तीळ यांची वेगळी फोडणी करून घाला.

नारळ आणि आंब्याची ब्राऊनी

ruchkar-05साहित्य

पीठ – २०० ग्रॅम

तूप – २०० ग्रॅम

दूध – १०० मिलीलिटर

आंब्याचा पल्प – २०० ग्रॅम

व्हाइट चॉकोलेट – २०० ग्रॅम

बेकिंग पावडर

किसलेला ओला नारळ – १०० ग्रॅम

कृती

१२०० मिली दूध उकळून घ्या. त्यात २०० ग्रॅम व्हाइट चॉकोलेट मिसळा. तूप वितळवून घ्या. ते या दूध आणि चॉकोलेटच्या मिश्रणात घाला. आता दुसऱ्या भांडय़ात आंब्याचा पल्प, किसलेला ओला नारळ, बेकिंग पावडर, पीठ हे सगळं एकत्र करा. या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. आता हे मिश्रण आणि व्हाइट चॉकोलेटचं मिश्रण एकत्र करा. चांगलं फेटा. ते एका बेकिंग पॅनमध्ये घालून १८० सेल्सिअसला २५ ते ३० मिनिटं ठेवा. बाहेर काढून गार करा. गार झाल्यानंतर त्याच्या वडय़ा पाडा आणि खायला द्या.
शेफ विवेक ताम्हाणे
response.lokprabha@expressindia.com