scorecardresearch

उपासना गुरुचरित्राची

धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे नृसिंह सरस्वतींनी दत्त भक्ती स्वीकारली.

उपासना गुरुचरित्राची

lp17नृसिंह सरस्वतींनी चौदाव्या शतकात लिहिलेला ‘श्री गुरुचरित्र’ हा दत्त भक्तांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रंथ. भाविक भक्तिभावाने  त्याची पारायणे करतात.
अवतार उदंड होती।
सवेचि मागुति विलया जाती।
तैसी नव्हे श्री दत्तात्रेय मूर्ती।
नाश कल्पांती असेना॥
सर्व दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुचरित्र’ होय. या ग्रंथात एकूण बावन्न अध्याय आहेत. श्रीदत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती व तिसरा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, असे सांगतात. त्यातील पहिला अवतार श्रीपाद विल्लभ यांनी कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी येथे जपानुष्ठान केले. भीमा अमरजा संगमावर गाणगापूर येथे त्यांचे वास्तव्य दोन तपे म्हणजे चोवीस वर्षे होते. त्यामुळे गाणगापूरला दत्तपंथीयांत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
गुरुचरित्राच्या चवथ्या अध्यायात आलेल्या दत्त कथेचा आधी परिचय मला महत्त्वाचा वाटतो. असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाचे जे सात पुत्र होते त्यात अत्री प्रमुख होत. त्यांची पत्नी अनुसूया. ती रुपवती, पतिव्रता, पतिसेवा तत्पर मनापासून अतिथी सेवा करणे हा तिचा आचार होता.
सूर्य भीतसे गगनीं। उष्ण तिसी लागे म्हणोनि। मंद मंद तपतसे अग्नी झाला अति भीत। शीतल असे वर्तत। वायु झाला भयभीत मंद मंद वर्ततसे। अशा प्रकारे तिची महती सांगणारे सर्व वर्णन श्रीगुरुचरित्रात आहे.
योग, ज्ञान, संन्यास, वैराग्य, सातत्य, चिकाटी, चमत्कार व कडक शिस्त व शिस्तीचे कडक आचरण म्हणजे गुरुचरित्र होय. या सगळ्या गोष्टीचे एकत्रित करून सामान्य माणसाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भक्ती, मुक्ती, अनन्यसाधारण भरवसा (विश्वास) ठेवण्याचा प्रयत्न करून साकल्याने विचार करावयास लावणारे दैवत आहे.
हा विषय व यातील आशय हा पूर्ण श्रद्धेचा आहे. पण या गोष्टी सातत्याने पार पाडावयाच्या म्हणजे शरीर प्रकृती उत्तम हवी. निरामय हवी. तरच हातून सेवा घडते.
धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे नृसिंह सरस्वतींनी दत्त भक्ती स्वीकारली. त्यामुळे अनेक भक्त वाढले. जप, तप, हाच मुख्य नेम असल्यामुळे ‘‘अवतार धरतां मानुषि। तया परी रहाटावे॥’’ हे मनी धरून ते या नात्याने दत्ताची उपासना करीत. यांच्या काळासंबंधाने मतभेद आहेत. पण त्यामध्ये सामान्य माणसाला रस नाही श्री गुरूंचे आयुष्य ऐंशी वर्षांचे होते. त्यांचा जन्म सन १३७८ मानतात. त्याचप्रमाणे त्यांच्या निजानंद गमनाचा काळ शके १४४० मानतात. श्रीगुरूंनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतही लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनाचे फार मोठे अमोल कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थाना नवा उजाळा देऊन त्यांचे माहात्म्य वाढवले. लोकांना सन्मार्ग दाखवला. अनेकांच्या भौतिक व्याधी दूर केल्या. अनेक लोकांना आत्मिक समाधान प्राप्त करून दिले. व्रते व वैकल्ये आणि कर्मकांड यांची पुनस्र्थापना करून सर्वसामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. समाजातील तळागाळातील लोकांनाही त्यांनी सोबत घेतले.
lp24त्याकाळी म्लेंच्छ राजांचे आक्रमण मधून मधून होत होते, पण काही म्लेंच्छ राजेही त्यांचे सेवक होते. त्यांच्यावरही महाराजांच्या कर्तृत्वाचा व अधिकाराचा फार मोठा प्रभाव होता. हिंदू धर्माच्या पडत्या काळात वर्णाश्रम व धर्माची विस्कळीत झालेली अवस्था त्यांनी सावरून धरली. तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे सुधारित नवे आदर्श स्वत:च्या आचरणाने व उपदेशाने सिद्ध केले, असे सांगितले जाते.
तेराव्या शतकाच्या अखेपर्यंत दत्त उपासनेचा जो प्रवाह वाहत आला त्याला सजीव करण्याचे काम नृसिंह सरस्वतींनी केले. त्यांचे जीवनकार्य केवळ दत्त उपासनेच्या पुरते नसून सर्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. त्यांच्या काळात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच या संतांचा उदय झाला. त्या काळात आक्रमशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा नाश करण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रभर चालविला होता. त्या महान संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे काम स्वामींनी केले. असा अनेक लोकांचा दत्त, दत्तपंथ व स्वामींचे कार्य याकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन होता. पण सर्वाचा सारांश एकच होता. धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे महाराजांनी एका विशिष्ट देवाची भक्ती वाढविली नाही. तप, सदाचरण, ध्यानधारणा यालाच महत्त्व होते.
त्याकाळी निजामशाही व आदिलशाही या मुस्लीम राजांच्या स्वामित्वाखाली महाराष्ट्राला नांदावे लागले. ती राजवट कधी जुलमी तर कधी सुसह्य़ होती. मूर्तीची, देवळांची मोडतोड झाली. बाटवाबाटवी झाली. काही काळाने दिलजमाई झाली. धर्माधर्मातील कटुता न वाढावी व हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मीयांकडून संरक्षण केले. हेच मुख्य कार्य आहे. त्याचे वर्णन गुरुचरित्रात आहे. त्याच प्रमाणे वैदिक धर्माचे रक्षण व त्याची वाढ हाही मुख्य हेतू होता. श्रीज्ञानेश्वरांच्या वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील फार मोठय़ा वर्गाचा मनुष्य या नात्याने अध:पात होऊ दिला नाही. नृसिंह सरस्वतीचे कार्य नंतरच होते. जनतेत आत्मविश्वास उत्पन्न करून मनोधैर्य वाढवले. भक्तीमार्गाकडे वळवले. गायनावर महाराजांची फार छाप होती. त्यांना आवड होती. त्यामुळे जनतेच्या मुखी याचे वर्णन करणारी काव्ये होती. दत्तप्रेमींना मराठी भाषेप्रमाणे संस्कृत स्तोत्रांबद्दलही आदर आहे.
गुरुचरित्रातील कित्येक ओव्यांना मंत्राचे सामथ्र्य आहे. किंवा हा सगळा ग्रंथच प्रभावी मंत्र आहे, असे मानले जाते. गुरुचरित्राचे पारायण कसे व किती दिवसांत करावे. याचेही मार्गदर्शन या गं्रथात आहे. सप्ताह वाचावयाची पद्धतीही सांगितली आहे. शुचिर्भूत होऊन, रांगोळी काढून, स्नानसंध्या करून, संकल्प करून एकाच आसनावर बसावे. अतत्त्वार्थ भाषण करू नये. सुंदर दिवा लावून त्याची पूजा करून वडील माणसांना नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून वाचावयास बसावे. ७। १८। २८। ३४। ३७। ४३। ५१ अशी सप्ताहाची पद्धत आहे. सर्व दिवस भजन, पूजन, मनन, चिंतन करावे. रोज  हलका व प्रमाणबद्ध थोडा आहार घ्यावा. रात्री धाबळी अथवा घोंगडीवर झोपावे. कोणत्याही प्रकारच्या वासना निर्माण होणार नाहीत असे आचरण असावे, असे सातव्या दिवसांपर्यंत वाचन करून ब्राह्मण, सुवासिनींना यथाशक्ती भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. मोठेपणा मिरवण्यासाठी, श्रीमंतीची ऐट दाखवण्यासाठी वेगळे काही करू नये. मन पवित्र, शुद्ध असावे. त्याचप्रमाणे आचरणही पवित्र हवे. सर्वसाधारण लोकांसाठी पारायण करताना संकल्प करावा. तो असा- अस्मिन भारतवर्षीय जनांना क्षेमश्वैर्य, ऐश्वर्याभवृद्धय़र्थ धर्म अविरुद्ध- स्वातंत्र्य प्राप्त्यर्थ स्वातंत्र्यमध्येषु सकल शत्रुविनाशनार्थ ततू शत्रुसंहारक तेजोबलवार्य प्राप्त्यर्थ सकल भय निरसनरथ, अभय सिद्धर्य़थ च श्रीदत्तोत्रय देवता प्रीत्यर्थ श्रीगुरुचरित्र सप्ताह पारायणाख्यं कर्म करिपये’’ असा संकल्प सांगितला आहे. असा हा सप्ताह वाचण्यासाठी सवड नसेल तर विशिष्ट अध्यायाची २८, ५६ किंवा १०८ पारायणे करावयाचा प्रघात आहे.
सारांश भक्तीमार्गातील अथवा नामस्मरणाच्या मार्गातील स्वकर्मच्युति हा शास्त्रोक्त दोष तो नाहीसा करून जनतेला स्वकर्माच्या ठिकाणी अभियुक्त करून भक्तिप्रवण करण्याकरिता, शिवाय त्याग व निर्भयता लोकांमध्ये निर्माण करण्याकरिता गुरुचरित्र लिहिले गेले असे मानले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सत्यंवद, र्धमचर, मातृ-पितृ देवोभव हे नियम पाळलेच पाहिजेत. सामान्य जनतेसाठी, ‘‘ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन तो काय? श्रीगुरुकृपा लाभल्यास काहीही अशक्य नाही. त्रलोक्य विजयी यही असंभव नाही शिवाय साम्राज्य संपन्न होतेच. यात नवल नाही. साधुसंतांनी उत्पन्न केलेला हा विश्वासच पुढे शिवाजी व तानाजीच्या रूपाने प्रकट झाला, असे मानले जाते. अटकेपासून रामेश्वरापर्यंत व द्वारकेपासून जगन्नाथपर्यंत साम्राज्य विस्तार झाला. श्रीगुरुचरित्र कोरडा वेदान्त सांगत नाही. निष्क्रिय भक्तीमार्ग शिकवत नाही अथवा मानवाला कमी लेखून कोणत्याही आभासमय ध्येयाच्या मागे लागत नाही. ज्ञानपूर्वक, भक्तीयुक्त असे आचरण शिकविते. वेदप्रतिपादित मार्गाप्रमाणे ऐहिक जीवनाचा यथाशास्त्र उपभोग घेऊन मुक्ती मिळविता येते.
अव्यक्तीची उपासना फार कठीण आहे. त्यांत सुखापेक्षा क्लेश जास्त आहेत. म्हणून मोठमोठे साधुसंत, साधक हे सर्व सगुण भक्तीचेच उपासक आहेत. दत्तभक्तीत पादुकांना फार महत्त्व आहे. श्रीराम वनवासात असतानाही भरताने त्यांच्या पादुकाच सिंहासनी ठेवल्या. श्रेष्ठ सत्यगुरूची सारी दैवी शक्ती त्याच्या चरणांत एकवटली आहे. त्यांच्या चरणांच्या कंपनद्वारा ती शक्ती भक्ताला मिळते. अशी श्रद्धा आहे.
दत्त दैवताचे रूप संमिश्र आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश काय किंवा सत्वरज, तम काय त्रिविध प्रकृतीधर्माचा व शक्तींचा सुरेख संगम दत्तात्रेयात दिसून येतो. म्हणून विशेषत: महाराष्ट्रात, कर्नाटकात (दक्षिण भारत) यामध्ये श्री दत्तात्रेयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सुधा गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2015 at 01:50 IST

संबंधित बातम्या