scorecardresearch

साद्यंत दत्तक्षेत्रे

तीर्थयात्रेची संकल्पना आपल्या तमाम भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे.

साद्यंत दत्तक्षेत्रे

lp17तीर्थयात्रेची संकल्पना आपल्या तमाम भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे. ‘काशीस जावे नित्य वदावे’ अशी प्रत्येक  भाविकाची मनोभूमिका. दळणवळणाची साधने मर्यादित होती तेव्हा कोणतेही तीर्थाटन हे दिव्यच असायचे. कालौघात अनेक सोयी-सुविधांनी तीर्थयात्रा सुकर होत गेल्या. माहितीच्या विस्फोटात तर तीर्थक्षेत्रेदेखील मागे राहिली नाहीत. मात्र तरीदेखील भाविकाला नेमके काय हवे आहे हे जाणून घेऊन त्याच्या भक्तिभावाला साद घालणाऱ्या आणि त्याच वेळी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या माहितीची वानवाच असते. नेमकी ही उणीव क्षितिज पाटुकले यांच्या या तीन पुस्तकांनी दूर केली आहे.
‘कर्दळीवन एक अनुभूती’, ‘श्रीदत्त परिक्रमा’ आणि ‘उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा’ ही तीनही पुस्तके भाविकांच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारी अशीच आहेत. मुळात लेखक स्वत:च दत्तभक्त असल्यामुळे आणि ही प्रत्येक परिक्रमा स्वत: अनुभवली असल्यामुळे भाविकाला काय हवेय याची त्यांना पुरेपूर जाण आहे. त्याचेच प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेले दिसून येते.
दत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवन अनेक भाविकांना माहीत असले तरी अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्दळीवनाबाबत मोजकीच माहिती उपलब्ध होती. नृसिंह सरस्वतींनी कर्दळीवनात जाताना नावाडय़ांकरवी दिलेला निरोप आणि स्वामी समर्थानी कलकत्ता येथील भक्ताशी केलेल्या संवादातील कर्दळीवनचा उल्लेख दत्त भक्तांना माहीत होता. पण कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, सद्य:स्थिती, परिक्रमा मार्गाची माहिती या गोष्टी तशा दुर्लक्षितच होत्या. लेखकाने स्वत: कर्दळीवनाची परिक्रमा अनेकदा पूर्ण केली. आणि त्यातून हाती आलेले संचित त्यांनी भक्तांसाठी या पुस्तकातून मांडले आहे.
कर्दळीवन या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील माहिती ही केवळ सांगोवांगी नाही. स्वत:च्या अनुभवातून आलेली ही माहिती त्यांनी अत्यंत रसाळ आणि भक्तीपूर्ण भाषेत वर्णिली आहे. स्थानमाहात्म्य आणि महत्त्व याबाबत तर त्यांनी अधिकाराने भाष्य केले आहेच, पण इतपतच मर्यादित न ठेवता, त्याचबरोबर भौगोलिक माहितीची सांगड घातली आहे. कर्दळीवन आणि दत्तात्रेयांचे तीन अवतार, इतिहास, भौगोलिक स्थान आणि परिसर, परिक्रमेचा इतिहास, पंचपरिक्रमेची माहिती, माहात्म्य आणि महत्त्व, समज, अपसमज आणि श्रद्धा, अन्नदान, अतिथिसेवा, अशा कर्दळीवनासंदर्भातील अनेक घटकांची विस्तृत माहिती या पुस्तकातून मिळते. त्याचबरोबर अनेक महत्त्वाची दत्तक्षेत्रे, संपर्काची ठिकाणे, नर्मदा परिक्रमा अशा परिशिष्टांमुळे या पुस्तकाची महत्त्व आणखीनच वाढते. अर्थात, कर्दळीवनाच्या परिक्रमेची काठिण्यपातळी पाहता सर्वानाच इच्छा असूनदेखील ही परिक्रमा करणे शक्य होतेच असे नाही. त्यासाठीच ही संपूर्ण परिक्रमा भाविकांनी पाहता यावी यासाठी परिक्रमेवर आधारित माहितीपटदेखील सीडीस्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.
नर्मदा परिक्रमेबद्दलदेखील आजकाल भरपूर वाचावयास मिळते. पण उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच जुजबी माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी म्हणतात. संपूर्ण नर्मदा परिक्रमेबरोबरच या परिक्रमेलादेखील महत्त्व आहे. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची अगदी साद्यंत माहिती उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा या पुस्तकात मिळते. येथेदेखील भौगोलिक माहितीची जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहीत यात मिळते.
दत्तात्रेयांच्या २४ गुरूंबद्दल प्रत्येक दत्तभक्तास अपार श्रद्धा आहे. हाच धागा घेऊन पाटुकले यांनी दत्तात्रेयांची २४ दत्तक्षेत्रे जोडणारी दत्त परिक्रमा स्वत:हून आखली आणि १२ दिवसांत पूर्णदेखील केली. एकूण ३६०० किलोमीटरचे हे अंतर २४ महत्त्वाच्या दत्तक्षेत्रांना जोडणारे असून ही परिक्रमा वाहनाने सुलभपणे करता येण्यासारखी आहे. दत्तसंप्रदायातील विविध परंपरा, उपसंप्रदाय यावर भाष्य केले आहे. दत्तात्रेयांचे २४ गुरू, उपासन व इतर परिक्रमांची माहिती पुस्तकात मिळते. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतील दत्तानुभूती देणारी २४ क्षेत्रांचा समावेश यात आहे.
थोडक्यात काय तर दत्तभक्तांसाठी सर्वच दत्तक्षेत्रांची ही साद्यंत माहिती उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या दत्तोपसानेला बळकटीच प्राप्त होण्यास मदतच होईल.

*    कर्दळीवन एक अनुभूती
पृष्ठसंख्या १७६, मूल्य रु.३००/-
*    उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा
पृष्ठसंख्या ९६, मूल्य रु. २००/-
*    दत्तपरिक्रमा
पृष्ठसंख्या १६०, मूल्य रु.३००/-
तीनही पुस्तकांचे प्रकाशक – कर्दळीवन सेवा संघ
लेखक – प्रा. क्षितिज पाटुकले

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2015 at 01:49 IST

संबंधित बातम्या