20 September 2019

News Flash

टाचणी आणि टोचणी : गोपुराण…

प्राचीन धर्मग्रंथ धुंडाळले तर एकीकडे गाय पवित्र असल्यामुळे गोमांस खावे, असा उल्लेख आहे तर दुसरीकडे गोमांस खाणे हे पापकर्म मानून ते वज्र्य ठरवले गेले आहे.

| March 27, 2015 01:32 am

प्राचीन धर्मग्रंथ धुंडाळले तर एकीकडे गाय पवित्र असल्यामुळे गोमांस खावे, असा उल्लेख आहे तर दुसरीकडे गोमांस खाणे हे पापकर्म मानून ते वज्र्य ठरवले गेले आहे. मग यातल्या कोणत्या मताचा आधार घ्यायचा?

‘गायीत देव आहेत म्हणून पोथ्या सांगतात तर वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात! मग गोरक्षण का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापून डुक्कर-पूजा का प्रचलवू नये?’
हा तब्बल ८० वर्षांपूर्वी सवाल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी विचारलेला. पण तो काही कोणी फारसा मनावर घेतलेला नाही. आजही आम्ही गायीत तेहतीस कोटी देव आहेत असेच मानतो. तिच्या ‘पुच्छे नागा: खुराग्रेषु ये चाष्टौ कुलपर्वता:’मध्ये ‘देवगणा: लर्वे लोमकूपे महर्षय: अपाने तू मरुद्देवो यौनौ च वरुण: स्थित:’ म्हणजे पुच्छात नाग, खुरांमध्ये कुलपर्वत आणि केसांच्या रंध्रारंध्रात महर्षी असतात. नको त्या जागी मरुत आणि वरुण देव असतात. आणि आमच्या संस्कृतीची जी जननी ती गंगामैया ती गायीच्या मूत्रात असते. ही आमची श्रद्धा आहे. गाय आमच्यासाठी पवित्रच आहे. बरे हे काही आजचे नाही.
अगदी नेमके सांगायचे तर ऋग्वेद काळापासून आम्ही हे मानत आहोत. हा काळ इसवीसन पूर्व दोन हजार ते चौदाशे. हे सध्याचे प्रचलित मत. ते खरे मानले तर गेली किमान चार हजार वर्षे आम्ही धेनूमातेला भजत आहोत. ऋग्वेद हा आमचा प्राचीन पवित्र ग्रंथ. सनातन आर्य धर्माची गंगोत्रीच ती. त्यात तर गौ आणि त्यापासून उत्पन्न झालेले गवि, गविष्ठी, गोष्ठ, गोधन अशा प्रकारचे शब्द किमान हजार वेळा तरी आले आहेत. गायी आपणांस कसे अमृताहूनी गोड दूध देतात, आपणांस त्या कसे पुष्ट बनवतात असे उल्लेख आहेत. आमच्या त्या ऋचाकर्त्यांचे गायींवर एवढे प्रेम की त्यांना सतत त्यांच्या रक्षणाचीच चिंता लागून राहिलेली आहे. त्यासाठी ते सतत इंद्राला, अग्नीला, अश्विनांना, नाहीतर रुद्रांना साद घालत असतात.
ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ३१ व्या सुक्तात एक ऋचा आहे. –
त्वं नो अग्ने तव देव पायुभिर्मघोनो रक्ष तन्वश्र्च वन्द्य
त्राता तोकस्य तनये गवामस्यनिमेषं रक्षमाणस्तव व्रते
म्हणजे हे अग्निदेवा, आपण वंदनेस योग्य आहात. आपल्या रक्षणसाधनांनी तुम्ही आमचे संरक्षण करा. आपल्या सामर्थ्यांने आमच्या शारीरिक क्षमतेचे पोषण करा. आणि आमच्या पोराबाळांचे आणि गायीगुरांचे संरक्षक बना.
आता प्रश्न असा निर्माण होतो की बुवा, गोमाताच का?
तर त्याचे उत्तर दहाव्या मंडलातील १६९व्या सूक्तात मिळते. शबर ऋषींनी रचलेल्या या गोसूक्ताची देवता गाय आहे. त्यात हे इंद्रा, गायींचे रक्षण कर, हे पर्जन्या, त्यांना वृष्टीरूप असा सुखाश्रय अर्पण कर अशा प्रार्थना येतात. चौथ्या आणि शेवटच्या ऋचेमध्ये या धेनूंना आमच्या घरी आण अशी याचना आहे. ती का? तर आपली आचळे दुग्धभाराने भरून त्यांनी आम्हाला संततीयुक्त केले आहे.
थोडक्यात काय, तर अजून आम्ही पशुपालक अवस्थेत आहोत. तसे शेतात सातु (यव – बार्ली) पिकवतो. पण आमची खरी उपजिविता चालते ती गायीगुरांच्या खिल्लारांवरच. तेव्हा अर्थातच गाय हा आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पशू आहे. ती आम्हाला पोसते, जगवते. ती आम्हाला बैल देते. तिच्यामुळेच आमचे पशुधन वाढते.
बरे गाय केवळ एवढय़ापुरतीच उपयोगी ठरते असे नाही. ती व्यवहारातही चालते. ऋग्वेदातील काही ऋचांनुसार त्या काळात गायीचे मोल पैशासारखे होते. त्यातील एका ऋचेत दहा गायींच्या बदल्यात इंद्राची प्रतिमा विकण्यात आल्याचा उल्लेख आहे. (क: इमं दशभिर्ममेन्द्रं क्रीणाति धेनुभि: – ऋग्वेद ४.२४.१०)
एकंदर गाय हा मोठाच उपयुक्त पशू झाला. आपले सावरकर तरी वेगळे काय सांगत होते? पण हा एवढा उपयुक्त पशू आहे म्हटल्यावर त्याला देवतेचा दर्जा दिला तर बिघडले कुठे? आणि एकदा देवता म्हटल्यावर तिची हत्या कशी करणार? त्यावर बंदीच हवी. जशी ती महाराष्ट्र सरकारने घातली आहे.
त्यातही गंमत अशी की राज्य सरकारने गायीवर काही आज बंदी घातलेली नाही. ती ३९ वर्षांपासून आहेच. ती घातली होती काँग्रेसच्या सेक्युलर सरकारने. १९७६च्या त्या कायद्यानुसार राज्यात दुभत्या गायींची हत्या करण्यास बंदी घालण्यात आली होती. मारून खायच्या तर त्या भाकड गायी आणि निकामी बैल खा. या वेळी फरक एवढाच की भाकड गायींचीच नव्हे, तर त्यांच्या पुत्रांची हत्या करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आता मारायच्या तर म्हशी मारा. रेडे मारा. ते अखेर असुरच.
हे म्हशींचे दुर्भाग्यच म्हणायचे की ऋग्वेद काळात त्यांचा पाळीव प्राण्यांत समावेश झाला नव्हता. नाही तर त्यांनाही देवतेचे रूप मिळाले असते. त्यांच्या मुलांना महिषासुर म्हटले गेले नसते. नाही तर म्हशींचे दूध काय ढवळे नव्हते? रेडे काय शेतीच्या कामाला येत नव्हते? पण त्यांची कत्तल केली तरी चालते. गायींना मात्र संरक्षण. कारण – गाय ही राष्ट्राची देवता.
पण हे तरी खरे आहे का? गायींचा वध कधी केला जात नव्हताच का? म्हणजे प्रश्न असा आहे की हिंदू लोक गायी कापत नव्हते का? की ते पापकर्म केवळ मुसलमानांचेच? आपल्या प्राचीन धर्मग्रंथांवरून तरी तसे काही दिसत नाही. गायीला माता, देवता मानणारे आम्ही प्रसंगी गोवधही करीत होतो. ज्या ऋग्वेदात गायींचा उल्लेख अघन्य म्हणजे अवध्य असा आहे त्याच ऋग्वेदात गायी कापल्याचेही उल्लेख आहेत. (या अघन्य शब्दाचीही मोठी मौज आहे. त्याचा दाखला देऊन ऋग्वेदाने गोवध निषिद्ध म्हटल्याचे सांगितले जाते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते येथे अघन्य हा शब्द केवळ दुधाळ गायींच्या संदर्भात येतो.)
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ८९व्या सूक्तातील १४व्या ऋचेत गोवधाचा उल्लेख अत्यंत सुस्पष्टपणे येतो. त्यात म्हटले आहे की – हे इंद्रा, ज्याप्रमाणे गोवधाच्या स्थानी गाय कापली जाते त्याप्रमाणे तुमच्या या अस्त्राने मित्रद्वेषी राक्षस कापले जाऊन नेहमीसाठी झोपी जावेत. (कूवो यक्षसने न् गाव: पृथिव्या आपृगामृया शयंते – ऋग्वेद, १०.८९.१४) त्यातल्या ९१व्या सूक्तातील १४व्या ऋचेतही गोवधाचा उल्लेख आहे. ज्यामध्ये घोडा, बैल, गाय, बोकड यांचे हवन केले गेले त्या अग्नीवर थोडा सोमरस शिंपडून मी त्याचे स्तवन करतो अशी ती ऋचा आहे. फक्त तिच्यातील गाय भाकड आहे.
गोमातेप्रमाणेच तिच्या पुत्रांच्या हत्येचेही उल्लेख आहेत. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील २८ वे सूक्त इंद्राला उद्देशून आहे. त्यात म्हटले आहे, की हे इंद्रा, अन्नाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते, त्या वेळी यजमान तातडीने दगडाच्या तुकडय़ावर सोमरस तयार करतात. तो तू पितोस. यजमान बैल शिजवतात आणि तो तू खातोस. (अद्रिणा ते मन्दिन इन्द्र तुयान्त्सुन्वन्ति सोमान्पिबसि त्वमेषाम । पचन्ति ते वृषभाँ अत्सी तेषां पृक्षेण यन्मधवनहूयमान: – ऋग्वेद १०.२८.३ ) या इंद्राला बहुधा बीफ अतिशय प्रिय असावे. याच मंडलातील ८६व्या सूक्तातील एका ऋचेत इंद्राचे उद्गार आले आहेत. तो म्हणतो – इंद्राणीद्वारा प्रेरित यज्ञकर्ते माझ्यासाठी पंधरा बैल शिजवतात. मी त्यांचे मांस खातो आणि त्याने माझे पोट भरते. ते माझे पोट सोमरसानेही भरतात. (उक्षणों ही में पंचदंश साकं पंचंती: विश्तिम् उताहंमदिंम् पीव इदुभा कुक्षी प्रणन्ती में विश्व्स्मान्दिन्द्र) एकंदर आपल्या पूर्वजांना गोवंश हत्येचे वावडे नव्हते. ते गोमांसही आवडीने खात.
ऋग्वेदातल्या या उल्लेखांवर काही मंडळी – त्यातही प्रामुख्याने आर्यसमाजी – म्हणतात की हे उल्लेख आहेत खरे. पण त्यांचा अर्थ वेगळा आहे. कारण की एक तर ते प्राचीन संस्कृत आहे. शिवाय संस्कृतमध्ये एकच शब्द भिन्न अर्थानेही येतो. आता उपरोक्त अर्थ खुद्द स्वामी विवेकानंदांनी लावले असले तरी आपण या ऋग्वेदप्रेमी गोरक्षक संघाचे म्हणणे ग्रा मानून चालू या. कारण अखेर आपण गायीला गोमाता मानणारे आहोत. पण मग धर्मशास्त्रांच्या इतिहासात महामहोपाध्याय पां. वा. काणे गोवधाबद्दल सांगतात त्याचे काय करायचे हा प्रश्न येतो.
काणे यांच्या म्हणण्यानुसार श्राद्धात गायीचे मांस दिले तर आपले पितर वर्षभर तृप्त राहतात असे आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांनी याच धर्मसूत्रातील १४, १५ आणि १७व्या श्लोकात ‘गाय आणि बैल पवित्र असतात म्हणून खाण्यायोग्य असतात’ असे म्हटल्याचा दाखला दिला आहे. हे सोडून ब्राह्मणांत यावे तर तेथेही हेच. शतपथ ब्राह्मणात स्पष्टच म्हटले आहे, की ‘राजा किंवा ब्राह्मण घरी पाहुणा आल्यास त्याप्रीत्यर्थ बैल किंवा बकरा मारावा.’ (राज्ञे वा ब्राह्मणाय वा महोक्शम् वा महाजाम् वा पचेत). ऐतरेय ब्राह्मणांतही राजा किंवा प्रतिष्ठित गृहस्थ पाहुणा आल्यास बैल वा वंध्या गाय मारावी, असे सांगितले आहे. (मनुष्यराजे आगते न्यास्मिन् वा अर्हती उक्षाणाम् वा वेहतम् ला क्षदन्त:) शतपथ ब्राह्मणाचे एक कर्ते याज्ञवल्क्य म्हणतात – मी गायबैलाचे मांस खातो, पण ते मऊ असेल तरच!
पुराण आणि इतिहासांतही गोवधाचे दाखले मिळतात. महाभारतातील वनपर्वात (२०८ : ८,१०) रन्तिदेव नावाच्या राजाची गोष्ट येते. सत्ययुगातील सोळा श्रेष्ठ राजांपैकी हा एक. तो अतिथीधर्मासाठी खूप प्रसिद्ध होता. वनपर्वातील वर्णनानुसार त्याच्या पाकशाळेत रोज दोन हजार गायींचा वध होत असे. मांसान्नाचे दान केल्याकारणाने या राजाची कीर्ती अतुलनीय झाली. तो श्लोक असा –
राज्ञो महानसे पूर्वं रन्तिदेवस्य वै द्विज,
द्वे सहस्र्ो तु वध्येते पशूनामन्वहं तदा,
अहन्यहनि वध्येते द्वे सहस्र्ो गवां तथा,
समांसं ददतो न्नं रन्तिदेवस्य नित्यश:,
अतुला कीर्तिरभवन्नृपस्य द्विजसत्तम
या रन्तिदेवाचा उल्लेख शांतिपर्वातसुद्धा (अ. २९, श्लो. १२३) आहे. त्यात आजच्या चंबळ नदीच्या जन्माचे रहस्य सांगितले आहे. म्हणजे या रन्तिदेवाच्या अतिथीधर्मासाठी कापल्या जाणाऱ्या गायींचे चामडे सोलले जात असे. त्यातून झिरपलेल्या पाण्याचा प्रवाह बनून त्याची नदी बनली. ती चर्मातून उगमली म्हणून तिचे नाव चर्मण्वती.
महानदी चर्मारशेरुत्क्लेदातू संसृजे यत:
ततश्चर्मणव्तीत्येवं विख्याता सा महानदी
पुराणांतही अशा प्रकारचे उल्लेख येतात. ब्रह्मवैवर्तपुराणात श्रीकृष्णजन्मखंडामध्ये रुक्मीच्या लग्नाचे वर्णन येते. त्यात भोजनसमारंभासाठी एक लाख गायींची हत्या केल्याचे (गवां लक्ष छेदनं) म्हटले आहे. एकंदर प्राचीन भारतात गोमातेस कापून खाण्याचे वावडे नव्हते. पुढे हळूहळू बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रभावाने म्हणा वा स्पर्धेने एकूणच प्राणीहत्या निषिद्ध मानली जाऊ लागली. पण येथे मुद्दा तो नाही. मुद्दा गायीच्या देवत्वाचा आहे.
गाय ही देवता आहे हे परंपरेने सर्वानाच मान्य होते. नंदी हीसुद्धा आपण देवता मानतो. आजही गायीला वसुबारसेला आणि बैलाला बैलपोळ्याच्या दिवशी पुजले जातेच. पण पूजनीय आहे असे म्हणता म्हणता या नंदींच्या पुठ्ठय़ांना पराण्या टोचून आपण त्यांना शर्यतीत दामटवतोच. तेथे धार्मिक मुद्दय़ावर बैलगाडा शर्यतीला बंदी घालावी असे कोणी म्हणत नाही. उलट परंपरेच्या नावाने बंदीला विरोधच केला जातो. तसेच गाय ही माता असली तरी तिने भरल्या पिकात तोंड घातले तर तिला दोन रट्टे देण्यासही आपण कमी करीत नाही.
कारण अखेर कितीही उपयुक्त असली तरी अखेर ती पशूच आहे हे आपण चांगलेच जाणत असतो. फरक एवढाच की आपल्या पूर्वजांना ती जाणीव जरा अधिक होती. राहता राहिला प्रश्न हिंदू धर्ममतांचा. तर या धर्मात गोमातेचे मांस खाणे पुण्याचे आहे असेही म्हटले आहे आणि पापकर्म आहे असेही. आता यातले कोणते मत ग्रा मानायचे?
येथे आपल्या उपयोगी अखेर सावरकरच येतात. वाईट एवढेच की सावरकरवाद्यांनाही याबाबतीत सावरकर अडचणीचे ठरत आहेत.
रवि आमले

First Published on March 27, 2015 1:32 am

Web Title: cow
टॅग Cow