सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

टी-२० कशाला, इतरही दोन प्रकारांमध्ये भारताचा ‘ब’ किंवा ‘क’ संघ आजच्या अनेक आंतरराष्ट्रीय संघांना भारी पडू शकेल अशी परिस्थिती आहे. या सर्व खेळाडूंची मानसिक घडण (कंडिशनिंग) करणारी व्यवस्था भारतात तयार असून एखाद्या फॅक्टरीसारखे या व्यवस्थेतून गुणवान क्रिकेटपटू बाहेर येत आहेत ही जाणीव सुखावणारी ठरते.

तो कर्णधार मैदानावर उभा राहून चेंडू हवेत उंच फेकायचा. ज्याच्या हातात चेंडू पडेल तो गोलंदाजी करायचा..!

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार आणि माजी कर्णधार सर क्लाइव्ह लॉइड यांच्याविषयी आणि त्यांच्या भेदक शिलेदारांविषयी अशी आख्यायिका सांगितली जायची. लॉइड चेंडू उंच फेकणार आणि अँडी रॉबर्ट्स, कॉलिन क्रॉफ्ट, मायकेल होल्डिंग, ज्योएल गार्नर किंवा माल्कम मार्शल यांच्या हातात पडणार! यांच्यापैकी कुणाची गोलंदाजी खेळण्यास सोपी वगैरे मुद्दाच नव्हता. एकीकडे असे गोलंदाज आणि दुसरीकडे गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, रिची रिचर्डसन, खुद्द लॉइड असे फलंदाज. अधूनमधून लॅरी गोम्स, गस लोगी, जेफ्री दुजाँ वगैरे. वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगात आणि विशेषत: त्यांचा गोलंदाजांचा तोफखाना धडाडत असताना वेन डॅनिएल, विन्स्टन डेव्हिस, सिल्वेस्टर क्लार्क, पॅट्रिक पॅटर्सन, एझरा मोझली या गुणी गोलंदाजांना फारशी संधीच मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णकाळातही स्टुअर्ट लॉ, मॅथ्यू इलियट, डॅरेन लीमान, ब्रॅड हॉज या क्रिकेटपटूंची कारकीर्द बहरलीच नाही. भारताचा हंगाम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू झाला आणि परवा रविवारी संपला. प्रतिस्पर्धी दोनच – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड; पण दोन्ही संघ अतिशय मातब्बर. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात एकदिवसीय मालिका आपण १-२ अशी गमावली; पण टी-२० आणि कसोटी अशा दोन्ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय अशा तिन्ही मालिका आपण अनुक्रमे ३-१, ३-२ आणि २-१ अशा जिंकल्या. दोन्ही संघांविरुद्ध कसोटी मालिकांची सुरुवात पराभवाने झाली होती. दोन मालिका विजयांमुळे भारताला आयसीसी कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवता आले.

पण या विजयगाथा निव्वळ आकडय़ांतून व्यक्त होण्यासारख्या नाहीत. जवळपास प्रत्येक विजयामध्ये जुन्यापेक्षा नवीन चेहऱ्यांनी भरीव योगदान दिल्याचे आढळते. विख्यात समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल यांनी भारताकडे उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट गुणवत्तेविषयी सहर्ष आश्चर्य व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या पॅटर्नची सुरुवात झालेली दिसते. त्या दौऱ्यात शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन यांनी पदार्पण केले. आपला मराठमोळा पालघरवासी शार्दूल ठाकूर हाही त्याचा दुसराच कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला आणि अत्यंत मोलाची कामगिरी करून गेला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्या सामन्यासह पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने २७ बळी मिळवले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्ये इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पदार्पण केली. त्या सामन्यात किशनने आणि चौथ्या सामन्यात यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकाच सामन्यात कृणाल पंडय़ा आणि प्रसिध कृष्णा यांनी पदार्पण केले. कृणालने अर्धशतक झळकवले, प्रसिधने चार बळी घेतले. शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पंडय़ा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी. नटराजन आणि प्रसिध कृष्णा असा ११ जणांचा टी-२० आंतरराष्ट्रीय संघ सहज उभा राहू शकेल. टी-२० कशाला, इतरही दोन प्रकारांमध्ये भारताचा ‘ब’ किंवा ‘क’ संघ आजच्या अनेक आंतरराष्ट्रीय संघांना भारी पडू शकेल अशी परिस्थिती आहे. हे दोन्ही दौरे अत्यंत महत्त्वाचे होते. ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये हरवणे गेल्या ३२ वर्षांमध्ये कोणत्याही संघाला जमलेले नाही. ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिकांमध्ये मात देणे हेही जवळपास तितकेच दुरापास्त. शिवाय पहिली कसोटी वगळता ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित तीन सामन्यांमध्ये पूर्ण क्षमतेचा भारतीय संघ उतरवता आला नव्हता. त्यात विराट कोहलीसारखा कर्णधार पहिल्या सामन्यापुरताच उपलब्ध होता. हे कमी म्हणून की काय, अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांमध्ये उखडला गेला! या धक्क्यांतून बाहेर येत मेलबर्नमध्ये विजय, मग सिडनीत सामना अनिर्णित राखणे आणि ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवणे अजिंक्य रहाणेचे नेतृत्व आणि रवी शास्त्रींच्या चतुर मार्गदर्शनाने शक्य झाले हे खरेच, पण जवळपास प्रत्येक सामन्यात एखाद्या नवोदिताने जबाबदारी ओळखून योगदान दिले आहे. हे केवळ रहाणे-शास्त्रीच्या मार्गदर्शनातूनच घडून येण्यासारखे नाही. या सर्व खेळाडूंची मानसिक घडण (कंडिशनिंग) बनवणारी व्यवस्था भारतात तयार असून एखाद्या फॅक्टरीसारखे या व्यवस्थेतून गुणवान क्रिकेटपटू बाहेर येत आहेत ही जाणीव सुखावणारी ठरते. एखादा सूर्यकुमार यादव कारकीर्दीच्या पहिल्या चेंडूवर दिमाखात षटकार ठोकतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा इंग्लंडसारखे मातब्बर प्रतिस्पर्धी यांची भीती किंवा पहिल्याच चेंडूवर विकेट गमावण्याचे दडपण यांच्या मनातून निघून गेलेले असते. कृणाल पंडय़ा पहिल्याच सामन्यात पदार्पणवीरासाठी विक्रमी वेगवान ठरलेले अर्धशतक ठोकतो, त्या वेळची परिस्थिती आव्हानात्मक होती. अशा वेळी काही चेंडू स्थिरावण्यासाठी त्याने घेतले असते, तर नवोदित फलंदाजास एकाग्रतेसाठी व धैर्यग्रहणास आवश्यक उसंत असेच त्याच्या फलंदाजीकडे पाहिले गेले असते. शार्दूल ठाकूरचे ब्रिस्बेन कसोटीतले काही फटके किंवा शुभमन गिलची त्याच कसोटीतली शेवटच्या दिवसातली खेळी किंवा ऋषभ पंत समोर मनमोकळा खेळू लागल्यानंतर त्याला तितकीच जिगरबाज साथ देणारा वॉशिंग्टन सुंदर यांच्या मनात भीतीची भावना बहुधा सर्वात तळाला असते.

हा बदल काही जणांच्या मते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामुळे घडून आला. काहींनी याचे श्रेय नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीच्या निडर नेतृत्वाला दिले. काहींच्या मते जगमोहन दालमियांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कौशल्य पारखी योजनेची (टीआरडीओ) फळे भारताला आता मिळू लागली आहेत. लहान शहरांतील क्रिकेट गुणवत्ता हुडकून काढण्याच्या त्या मोहिमेत आपल्याकडील क्रिकेट प्रशिक्षक व विश्लेषक डॉ. मकरंद वायंगणकर यांचे अमूल्य योगदान होते. आज वायंगणकर सरांना पाकिस्तानातूनही दूरसंवाद माध्यमातून चर्चेचे आमंत्रण सातत्याने मिळत असते. टीआरडीओसारखी योजना पाकिस्तानमध्ये का राबवली जात नाही, हा तेथील माध्यमांचा पाकिस्तानी क्रिकेटव्यवस्थेला विचारला जाणारा सवाल. आजही हे बहुतेक नवोदित खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असताना, ते युवा स्तरावर कसे खेळायचे याविषयीचे नेमके टिपण वायंगणकर सरांच्या ट्वीट्समधून हमखास आढळून येते. तेव्हा ही प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झाली आहे. एरवी एखादा सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहली पदार्पणाच्या किंवा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमक दाखवून लक्ष वेधून घेत. आज पदार्पणात चमकणाऱ्यांचे प्रमाण भारतीय क्रिकेट परिप्रेक्ष्यात प्रचंड वाढलेले दिसते. पुढील अत्यंत व्यग्र हंगामासाठी अशा प्रकारे गुणवत्तेचे आगार हाताशी असणे ही समाधानाची बाब आहे. येथून पुढे कसोटी चॅम्पियनशिप, इंग्लंडचा प्रदीर्घ दौरा, या वर्षी आणि पुढील वर्षी असे सलग दोन टी-२० विश्वचषक, २०२३ मध्ये भारतात होणारा पारंपरिक विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा होत आहेत. त्या सर्वच्या सर्व जिंकण्याची भारताच्या विद्यमान संघाची आणि कदाचित राखीव संघाचीही क्षमता आहे. क्षमता आहे, म्हणून अपेक्षाही आहेत. यातील बहुतेक स्पर्धा आपण जिंकल्या, तर खऱ्या अर्थाने गतशतकातील वेस्ट इंडिज किंवा चालू शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले, तसे आपणही गाजवू शकू.