28 May 2020

News Flash

क्राइम टाइम, प्राइम टाइम…!

सास-बहूच्या ड्रामेबाज मालिकांना वैतागलेल्या प्रेक्षकांना भुरळ घातली ती क्राइम शोजनी. ती इतकी जबरदस्त होती की त्यामुळे मालिकांचं आणि वाहिन्यांचं अर्थकारणच बदलत गेलं...

| August 7, 2015 01:33 am

सास-बहूच्या ड्रामेबाज मालिकांना वैतागलेल्या प्रेक्षकांना भुरळ घातली ती क्राइम शोजनी. ती इतकी जबरदस्त होती की त्यामुळे मालिकांचं आणि वाहिन्यांचं अर्थकारणच बदलत गेलं..

टीव्ही हे माध्यम अधिकाधिक प्रभावी होऊ लागलंय. प्रादेशिक आणि इतर जीईसी म्हणजे जनरल एंटरटेंमेंट चॅनल्सची संख्या वाढत चालल्यामुळे त्याचा आवाकाही वाढत गेला. या वाढत्या संख्येला स्पर्धेचं स्वरूप येऊ लागलं. चॅनल्सची संख्या वाढणं हे या माध्यमाच्या अर्थकारणाशी निगडित आहे. टीव्हीचं अर्थकारण बदललं. पूर्वी करमणूक आणि प्रबोधन करणारं माध्यम म्हणून ओळखलं जाणाऱ्या मनोरंजन वाहिन्यांना उद्योगाचं स्वरुप येत गेलं. ‘डेली सोप’ची लोकप्रियता वाढली. लोकप्रियता वाढली म्हणून त्यात प्रयोग होत गेले. नवनवीन प्रयोगांना नवनवीन प्रेक्षक वर्ग मिळू लागला. प्रेक्षकांची संख्या वाढणं हे चॅनल्ससाठी हितकारक ठरू लागलं. मालिकांमुळे मोठा आणि प्रामाणिक प्रेक्षकवर्ग महिलांच्या रूपात लाभला. पण विशिष्ट काळानंतर या मालिकांचाही कंटाळा येऊ लागला. महिला प्रेक्षकवर्ग टीव्हीपासून दूर होणं किंवा कमी होणं वाहिन्यांना निश्चितच आर्थिकदृष्टय़ा परवडणारं नव्हतं. म्हणूनच त्यांनी गुन्हेगारी विश्वावरील कार्यक्रमांकडे मोर्चा वळवला. हा तसा नवाच प्रयोग होता. या नव्या प्रयोगाकडे महिलांनी वळावं म्हणून त्यात महिलांच्या संदर्भातले विषय दाखवण्यात आले. यानिमित्ताने वाहिन्यांचा महिला प्रेक्षकवर्ग टिकून राहिला आणि काही नवीन प्रेक्षकांचीही भर पडली. नव्या प्रेक्षकांमुळे चॅनलला निश्चितच आर्थिक फायदा झाला. प्रेक्षकांमध्ये वाढ झाल्याने त्यात्या कार्यक्रमांचं रेटिंग, लोकप्रियता वाढली. ही नवी आर्थिक उलाढाल चॅनल्ससाठी फायदेशीर ठरू लागली.
उद्योग म्हटला की स्पर्धा आलीच. त्यामुळे या माध्यमातली स्पर्धा यातून सुटलेली नाही. प्रतिस्पर्धी काय करतोय, याचा अभ्यास असणं जास्त महत्त्वाचं, स्पर्धेत उतरताना प्रत्येक वाहिनीने लक्षात ठेवावं असं हे धोरण. नवी गोष्ट करून बघितली तरी त्यातून पैसा किती मिळतोय हे महत्त्वाचं असतंच. क्राइम शोजची लोकप्रियता आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरते आहे हे लक्षात आल्यावर इतर वाहिन्यांनीदेखील क्राइम शोज दाखविण्यास सुरुवात केली. परस्परांच्या धोरणांचा विचार करून आपापल्या वाहिन्यांच्या कार्यक्रमांमध्ये आवश्यक बदल करणं हा आर्थिक दृष्टिकोन ठेवावाच लागतो.
एखादा शो लोकप्रिय होऊ लागला की स्पर्धेतील इतर वाहिन्या वेगळ्या नावाने त्याचेच अनुकरण करण्यास सुरुवात करतात. कारण ही लोकप्रियता पैसा मिळवून देणारी आहे हे तोपर्यंत स्पष्ट झालेले असते. मात्र त्याचवेळेस नव्या प्रयोगाची सुरुवात करणाऱ्या त्या पहिल्या वाहिनीला त्या पहिल्या प्रयोगातून पुरेसा पैसा मिळाल्यानंतर ‘आता पुढे नवीन काय’ याचा विचार करावा लागतो. क्राइम शोजचा इतिहास जाणून घेतला की मालिकांमधील जे रुढ अर्थचक्र तिथेही नेमके लागू झालेले दिसते. सुरुवातीला महिला प्रेक्षकवर्गाला लक्ष्य करणाऱ्या या क्राइम शोजनी नंतर आपला मोहरा तरुणांकडे वळविला. आतातर सर्वच वयोगटातील प्रेक्षकवर्ग या शोजकडे ओढला गेलेला आहे.
वाहिन्यांच्या विषयांमध्ये दर तीनेक महिन्यांनी बदल होत असतात. ठरावीक कार्यक्रमाचा टीआरपी घसरला, त्यातून मिळणारा महसूल कमी झाला तर त्याबाबत सगळ्यात आधी विचारणा गुंतवणूकदारांकडून होते. गुंतवणूकदार वाहिनीकडे विचारणा करतात. ठरावीक कार्यक्रमांमधून महसूल कमी येतोय तर नवीन काही करा, प्रेक्षकांना काय आवडतयं ते बघा, निश्चित असं एक लक्ष्य ठेवा, या सगळ्याबाबत सूचनावजा सल्ला देतात. गुंतवणूकदारांकडून अशा सूचना आल्यानंतर वाहिन्यांना त्याबाबत हालचाली करणं भाग असतं. वाहिन्यांकडून ही सूचना रिसर्च टीमकडे जाते. सर्वेक्षण करण्याच्या पद्धतीत बदल करण्याबाबतही सुचवलं जातं. आणि तसा बदलदेखील केला जातो. हे सर्वेक्षण जिथे थांबतो तिथे लेखकाचं काम सुरू होतं. नव्याने आलेल्या निष्कर्षांनुसार त्याला वेगळं काही तरी लिहायला सांगितलं जातं. यातून नवीन विषय समोर येतो. नव्या विषयांमुळे नवं रेटिंग, महसूलात चांगला बदल पाहायला मिळतो. या अर्थचक्रामध्ये गुंतवणूकदार, मार्केटिंग टीम, चॅनल्स हेड, क्रिएटिव्ह टीम, सव्‍‌र्हे-रिसर्च टीम आणि लेखक असे सगळेच सहभागी असतात. यात लेखक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कारण कार्यक्रमाचं लेखन जितकं खुसखुशीत तितका प्रेक्षक वर्ग मोठा असं गणित असतं. म्हणजेच विशिष्ट कार्यक्रमाच्या महसूलवाढीची संधी थेट लेखकच देत असतो.
हाच मुद्दा अलीकडच्या शोजमध्ये झालेल्या बदलांमध्ये लागू होतो. कोणताही कार्यक्रम एका साच्याचा झाला की त्यातून मिळणाऱ्या महसुलात घट होते. म्हणूनच गुंतवणूकदार ते लेखक या प्रवासातून कार्यक्रमांमध्ये बदल झाले, तर काही नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले. महिला प्रेक्षकांसाठी केलेल्या क्राइम शोजना रेटिंग कमी मिळू लागलं. रेटिंग कमी म्हणजे महसूलही कमी हे साधं गणित. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून आलेला सूचनावजा सल्ला तरुण प्रेक्षकांना लक्ष्य करण्याचा ठरला. म्हणूनच अशा शोजमध्ये ग्राफिक्स वापरणं, मनोरंजक ठेवणं, समाजप्रबोधन असे पैलू बघता आले. ‘सावधान इंडिया’, ‘कोड रेड’मधून समाजप्रबोधनाचा मुद्दा आला. ‘क्राइम पेट्रोल’मधून गुन्ह्य़ाच्या नाटय़-रूपांतराच्या माध्यमातून मनोरंजन आलं. ‘सुपर कॉप्स वर्सेस सुपर व्हिलन्स’ या शोमधून ग्राफिक्सचा वापर केला गेला.
क्राइम शोजचे पडसाद न्यूज चॅनल्सवरही काही काळ पडले. पूर्वी एखाद्या गुन्ह्य़ाची फक्त बातमी दाखवली जायची. कोणता गुन्हा घडलाय, संशयित कोण, आरोपी कोण, पोलिसांचा तपास कुठवर आलाय याचं वृत्तांकन त्या बातमीतून केलं जायचं. त्यानंतर त्याचं विश्लेषण करणारा एक कार्यक्रम त्या चॅनलवर विशिष्ट वेळेत दाखवला जायचा. त्यात गुन्हा घडला कसा, त्याची कारणं, आरोपी, शोध असं साऱ्याचं नाटय़-रूपांतर करून दाखवलं जायचं. केवळ असे कार्यक्रम बघण्यासाठी न्यूज चॅनल बघणाराही एक वेगळा प्रेक्षकवर्ग होता. तिकडे प्रोग्रामिंग चॅनल्सवर म्हणजे मालिका सुरू असलेल्या चॅनल्सवर क्राइम शोजसारखा नवा विभाग सुरू केल्यामुळे न्यूज चॅनल्सचा तो प्रेक्षकवर्ग प्रोग्रामिंग चॅनल्सकडे खेचला गेला. सुरुवातीला संपूर्ण प्रेक्षक वळला नाही. तो विभागला गेला. पण, प्रोग्रामिंग चॅनल्सने क्राइम शोजमध्ये मनोरंजन म्हणून त्यात नाटय़रुपांतर आणले. तसतसं न्यूज चॅनलचा प्रेक्षक पूर्णपणेच प्रोग्रामिंग चॅनलकडे वळला. तसंच न्यूज चॅनल्समध्ये त्या कार्यक्रमांसाठी गुंतवणूक करणारा जाहिरातदार वर्गही या निमित्ताने प्रोग्रामिंग चॅनलकडे वळला. आता आणखी नवं काय करायचं हे न्यूज चॅनलपुढे नवीन आव्हान आलं. म्हणूनच चर्चात्मक कार्यक्रम ही संकल्पना सुरू झाली. दिवसभरातल्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या बातमीची विश्लेषणात्मक चर्चा या कार्यक्रमांमधून होऊ लागली.
कार्यक्रमांसाठी विशिष्ट रकमेचं बजेट ठरवून दिलेलं असतं. हे बजेट दर एपिसोडप्रमाणे असतं. ठरलेल्या बजेटमध्ये निर्मात्याने एक एपिसोड चॅनलला द्यायचं, असं ठरतं. मराठी चॅनल्सकडून निर्मात्याला मालिकेच्या दर एपिसोडसाठी सरासरी दोन ते अडीच लाख इतकी रक्कम दिली जाते. तर क्राइम शोच्या दर एपिसोडसाठी सरासरी तीन ते साडे तीन लाख दिले जातात. हिंदीत मालिकेसाठी दर एपिसोडला सात ते दहा लाख रुपये दिले जातात; तर क्राइम शोसाठी दहा ते बारा लाख रुपये दिले जातात. एकदा वाहिनेने विशिष्ट रक्कम प्रॉडक्शन हाऊसला दिली की निर्मात्याला त्याच रकमेत एपिसोड तयार करावा लागतो. जर दिलेल्या बजेटच्या पुढे खर्च झाला तर तो निर्मात्याला करावा लागतो. त्यामुळे या व्यवहारात नुकसान झालं तर ते निर्मात्याचच होतं; चॅनलचं नाही. कारण चॅनलने विशिष्ट रक्कम प्रॉडक्शनला दिल्यानंतर जाहिरातींमधून येणारा सगळा पैसा थेट चॅनलकडेच जातो. या फायद्यामुळे चॅनलची आर्थिक बाजू भक्कम होत जाते. ही बाजू पक्की झाल्यामुळे नवीनवीन प्रयोग करण्यासाठी खर्च करणं चॅनलला शक्य होतं. हे चक्र सुरूच राहतं.
मालिका ‘चालण्या’साठी चॅनल्स प्रयत्नशील असतात. मालिका किचन पॉलिटिक्स, सासू-सून नातं, कौटुंबिक कथा, प्रेमकथा अशा विषयांशी निगडित आहेत. यासाठी महिलांची संख्या जास्त असल्यामुळे मालिकांची लोकप्रियताही जास्त आहे. मालिकेच्या यशाचा चॅनलच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होतो. खासगी चॅनल्सना अंदाजे ८० ते ८५ टक्के महसूल मालिकांमधून मिळतो. कालांतराने झालेल्या बदलांमुळे अशा कार्यक्रमांना महिला, पुरुष, तरुण, लहान मुलं असे सगळ्याच वयोगटातला प्रेक्षकवर्ग लाभला. अशा कार्यक्रमांची मागणीही वाढू लागली. गुन्हेगारीविश्वावरील कार्यक्रमांमधून साधारणत: १० टक्के महसूल चॅनल्सना मिळतो. अशा कार्यक्रमांच्या प्रेक्षकांमध्ये ग्रामीण आणि शहरी अशी विभागणीही होते. टीव्ही आता ठिकठिकाणी पोहोचत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशी दरी कमी होतेय. म्हणूनच सर्व विभागांतून मिळणाऱ्या प्रेक्षकसंख्येत फारशी तफावत आढळून येत नाही.
प्राइम टाइम आणि ऑफ प्राइम टाइम अशा दोन घटकांवर चॅनलचं वेळापत्रक चालतं. प्राइम टाइम साधारणत: संध्याकाळी सहापासून सुरू होऊन वेगवेगळ्या चॅनल्सनुसार दहा किंवा अकरा वाजता संपतो तर ऑफ प्राइम टाइम सकाळी सहा ते संध्याकाळी ५-५.३० पर्यंत सुरू असतो. ऑफ प्राइम टाइमला मालिका, कार्यक्रमांचे पुन:प्रक्षेपण दाखवत असल्यामुळे त्यासाठी नवा कन्टेंट तयार केला जात नाही. चॅनलच्या अर्थकारणाचं गणित बहुतांशी प्राइम टाइमवर बेतलं आहे. प्राइम टाइमचा प्रेक्षकवर्ग, जाहिराती, नफा, तोटा यावर चॅनलचं असणं-नसणं अवलंबून असतं. जाहिरातदार प्राइम टाइमलाच प्राधान्य देतात. त्यातही लोकप्रियतेचा जास्त विचार केला जातो. काही लहान कंपन्यांना संध्याकाळच्या जाहिरातींचा दर परवडत नसेल तर ते दुपारच्या शोजची वेळ घेतात. अशा वेळी दुपारच्या शोजचं रेटिंग त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. अन्यथा दुपारचं रेटिंग फारसं गृहीत धरलं जात नाही. पण, गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या लहान कंपन्यांसाठी दुपारच्या कार्यक्रमांच्या रेटिंगची नोंद चॅनल्सना घ्यावी लागते. जाहिरातदार एकेका महिन्याचं पॅकेज नोंदवून ठेवतात. चॅनल्सकडून अशा जाहिरातदारांना दर महिन्याचं वेळापत्रक येतं. त्याला ‘फिक्स प्रिंट चार्ट’ असं म्हणतात. यात येणाऱ्या महिन्यात कोणकोणते शोज कधी आहेत, त्यांची वेळ, नवीन येणाऱ्या कार्यक्रमाचं नाव आणि त्याची वेळ, कार्यक्रमांचा कालावधी या सगळ्याची नोंद असते. त्यानुसार प्रॉडक्ट्स त्यांच्या जाहिराती देण्याचं वेळापत्रक आखतात आणि ते महिन्याचं पॅकेज घेतात. टीव्हीचं अर्थकारण जास्तीत जास्त मालिकांमधून येणाऱ्या उत्पन्नावर असतं. अर्थातच मालिकांच्या वेळेत मिळणाऱ्या जाहिरातींचे दर अधिक असतात. पण, क्राइम शोजने प्रत्यक्षात डेली सोपइतकी उंची गाठली नसली तरी या शोजच्या दरम्यान येणाऱ्या जाहिरातींचे दरही मालिकांच्या वेळेइतकेच आहे. जाहिरातदार दर दहा सेकंदांसाठी साधारणत: एक लाख रुपये इतकी रक्कम मोजतो. ही रक्कम मालिका, रिअ‍ॅलिटी शो, क्राइम शो अशा सगळ्यांसाठी सारखीच आहे. म्हणजेच, मालिकांइतकीच लोकप्रियता आता क्राइम शोजनाही मिळू लागली आहे.
मालिकांपेक्षा गुन्हेगारीवरील कार्यक्रम बनवणं अधिक खर्चीक आणि आव्हानात्मक असतं. क्राइम शोची निर्मिती करणं म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीत हत्ती समजला जातो. याची महत्त्वाची तीन कारणं आहेत. एक म्हणजे, प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे कलाकार असतात. त्याचं मानधन वेगवेगळं असतं. म्हणजे, एका आठवडय़ात तीन एपिसोड असतील आणि प्रत्येक एपिसोडमध्ये पंधरा कलाकार असतील तर एका आठवडय़ात एकूण पंचेचाळीस कलाकारांचं मानधन द्यावं लागतं. याचा अर्थ एका महिन्यात १८० कलाकारांच्या मानधनासह तांत्रिक विभागातल्या लोकांचंही मानधन असतं. मालिकेसारखी कलाकारांची निश्चित संख्या नसते. दुसरं कारण असं की, हे शोज एपिसोडिक असल्यामुळे त्यातल्या लोकेशन्समध्येही वैविध्य दाखवावं लागतं. तसंच वास्तवदर्शी चित्रणामुळे भरपूर लोकेशन्स दाखवणं, त्याची परवानगी काढणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तिसरं म्हणजे, अशा कार्यक्रमांमध्ये बहुतकरून नवोदित कलाकार असतात. अनुभवी कलाकार एखादा सीन वन टेक ओके करतात. नवोदित कलाकारांच्या बाबतीत तसं आभावानेच घडतं. त्यामुळे बराच वेळही जातो. इथे आर्थिक बाबीसह वेळेच्या दृष्टीनेही हे शो खर्चीक असतात.
वास्तवदर्शी कथांच्या चित्रणामुळे शो लोकप्रिय होत असल्याचं ‘क्राइम पेट्रोल’चे निर्माते सुब्रमण्यम यांचं म्हणणं आहे. ‘क्राइम पेट्रोल’मध्ये दाखवल्या जाणाऱ्या कहाण्या वास्तवाचं अचूक चित्र रेखाटतात. प्रेक्षकांना त्या पटत असल्यामुळे त्या बघितल्या जातात. वास्तवदर्शी चित्रण करताना तो प्राइम टाइमला दाखवला जात असेल तर त्याची निश्चितच काळजी घेतली जाते’, असं ते सांगतात. क्राइम शोज बघून लहान मुलांवर परिणाम होतो असं थेट विधान करणं सुब्रमण्यम यांना चुकीचं वाटतं. ‘समाजात इतरही अनेक गोष्टी परिणामकारक असतात. त्यातल्या कोणत्या गोष्टीचा मानसिक परिणाम होऊ शकतो हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. क्राइम शो दुष्परिणाम करतात तर त्याची चांगली बाजूही असतेच. त्याचाही विचार केला पाहिजे’, असं त्यांचं म्हणणं आहे. निर्माते आदेश बांदेकर ‘लक्ष्य’ मालिकेविषयी सांगतात, ‘अनेकदा सिनेमांमधून पोलिसांची थट्टाच केली जाते. मात्र पोलीस डोकं लढवून तपासकामही करतात हे दाखविण्याचे काम क्राइम शोजनी केले. हेच नेमकं प्रेक्षकांना आवडत असल्यामुळे या मालिकेची लोकप्रियता खूप आहे. तसंच समाजात वावरताना काय खबरदारी घ्याल हेही दाखवलं जातं. गुन्हा कसा घडतो हे दाखवलं जात नाही तर तो घडल्यानंतरच्या परिणामांचं चित्रण मालिकेत केलं जातं. प्रेक्षकांना मनोरंजन हवं असतं हे खरं आहे पण, त्याचसोबत त्यांना डोक्याला खाद्य देणाऱ्या गोष्टीही हव्या असतात. गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिकांमधून ते साध्य होतं. एका एपिसोडमध्ये एक कथा हा साचाही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे एपिसोड सुरू झाला की, प्रेक्षक गुन्हेगाराबाबत आपापले अंदाज बांधत जातात. आपला अंदाज बरोबर की चूक हे तपासण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत प्रेक्षक उत्सुकतेने मालिका बघत असतो.’
१६-१७ वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘सीआयडी’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर लोकप्रिय होऊ लागला. सुरुवातीला करमणूक म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या शोचा नंतर महसूल मिळवण्याचं शस्त्र म्हणून वापर केला जाऊ लागला. हा प्रयोग पचनी पडल्यामुळे इतरही चॅनल्सनी आजमवायचं ठरलं. एकदा एका गोष्टीचं अनुकरण झालं की जुनी गोष्ट नव्याने किंवा नवीनच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न होतो. या शोजना प्रेक्षकवर्गही मिळू लागला आणि त्यामुळे पैसाही चॅनल्सकडे येऊ लागला. अशा शोजचा सुरुवातीला आर्थिकदृष्टय़ा फायदा होत नसला तरी त्याचं नुकसानही होत नव्हतं. ते लक्षात आल्यामुळे चॅनल्स अशा शोजवर उडय़ा मारू लागले. मालिकांइतकी लोकप्रियता सुरुवातीला मिळाली नसली तरी क्राइम शोज दुर्लक्षितही केला गेला नाही. सध्या ‘सीआयडी’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’, ‘कोड रेड’ असे हिंदीत तर ‘अस्मिता’, ‘लक्ष्य’ हे मराठीतले शोज गुन्हेगारी विश्वाचं चित्रण करताहेत. तरुणाईला आकर्षित करणारे ‘गुमराह’, ‘सड्डा हक’, ‘एमटीव्ही वेब्ड’, ‘हल्ला बोल’ असे गुन्हेगारी विश्वाकडे झुकणारे शोजही लोकप्रिय आहेत. सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे प्रयोगही करण्यात आले. ‘क्राइम पट्रोल’मध्ये ‘सतर्क’ या संकल्पनेअंतर्गत विविध कथा दाखवण्यात आल्या तर काही एपिसोड्स गुन्हेगारीविश्वाशी निगडित नसतानाही प्रेरणादायी कथा म्हणून दाखवले गेले. ‘लक्ष्य’मध्ये मधल्या काही भागांमध्ये महिलांचे प्रश्न हाताळले होते. तर आता काही भागांपासून कार्यक्रमात असलेले पोलीस अधिकारी कार्यक्रमाच्या अधे-मधे थेट प्रेक्षकांशी संवाद साधतात. ‘सीआयडी’मध्ये गेल्या महिन्यात एक उपक्रम राबवला होता. कार्यक्रमाच्या टीमने अर्धवट लिहिलेली कथा प्रेक्षकांनी पूर्ण करावी. असे सगळे प्रयोग हे केवळ प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यासाठी केले गेले. कोणतीही कलाकृती प्रेक्षकांशी कनेक्ट झाली की त्याचा फायदा थेट त्याच्या अर्थकारणाशी येऊन पोहोचतो हे चॅनल्सनी सिद्ध केलं. काही यशस्वी कार्यक्रमांसह न चाललेल्या कार्यक्रमांचीही यादी आहेच. मध्यंतरी आलेले ‘अर्जुन’, ‘हमने ली शपथ’, ‘एनकाऊंटर’, ‘रक्षक’ या हिंदी तर ‘जय हो’, ‘जयोस्तुते’ या मराठी कार्यक्रमांना फारसं यश मिळू शकलं नाही. एकच कथासूत्र धरून केलेल्याही काही मालिका येऊन गेल्या. ‘चोबीस’, ‘छब्बीस बारा’ या फिक्शन स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडल्या. ‘चोबीस’ या मालिकेला टीआरपी फारसा मिळालेला नसला तरी दखल घेण्याइतकं त्या मालिकेने यश मिळवलं होतं.
काही वर्षांपूर्वी क्राइम शोजकडे गांभीर्याने बघितलं जात नव्हतं. पण, जसजसे हे शोज चॅनलला पैसा मिळवून देऊ लागले तेव्हा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्राइम शोजना प्रेक्षकवर्ग मिळालाय. प्रेक्षक आहे म्हणून रेटिंग आहे. रेटिंगमुळे जाहिराती आहेत. जाहिरातींमुळे चॅनलला पैसा मिळतोय. पैसा आहे म्हणून अशा शोजचं बजेट वाढतंय आणि बजेट वाढतंय म्हणून आता यात मोठमोठे कलाकारही काम करू लागले आहेत. म्हणूनच ‘सावधान इंडिया’साठी अतुल कुलकर्णी अँकरिंग करताना दिसतो. तर ‘कोड रेड’साठी साक्षी तन्वर सूत्रधाराचं काम करते. ‘अदालत’मध्ये रोनित रॉय दिसतो तर ‘एन्काऊंटर’च्या कहाण्या मनोज वाजपेयी सांगायचा. या गोष्टी एकमेकांना पूरक असल्यामुळे क्राइम शोज आणि पर्यायाने चॅनल्सचा आर्थिक फायदा होतो. प्रयोगशील माध्यम म्हणून टीव्ही ओळखला जातो. एका चॅनलने अमुक कार्यक्रम केला म्हणून दुसरं चॅनल तसंच किंवा तत्सम काही करण्यासाठी पुढे सरसावतं. मालिकांपेक्षा वेगळा विचार करत चॅनल्स क्राइम शोजकडे वळले. केवळ वेगळं काही करायचं म्हणून अशा शोजची निर्मिती झालेली नाही. तर सुरुवातीला प्रयोग म्हणून विचार केलेल्या क्राइम शोजमधून चांगला महसूल मिळू लागला. महसूल मिळत असल्यामुळे असे कार्यक्रम सुरू करण्याची चॅनल्समध्ये स्पर्धा सुरू झाली. आजही टीव्हीमध्ये मालिकांना प्राधान्य असलं तरी क्राइम शोजमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार वाढत असल्यामुळेच चॅनलचं अर्थकारणही सकारात्मकदृष्टय़ा बदलत आहे.

lp53बघा पण, सतर्क राहून
डॉ. वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ज्ञ
गुन्हेगारी विश्वावर आधारित कार्यक्रम बघणाऱ्यांमध्ये टीन एज सर्वात महत्त्वाचा वयोगट आहे. लहान मुलांसाठी रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याचं निमित्त म्हणजे हे कार्यक्रम असतात. पालकांच्या संवादामध्ये सहभागी होता यावं म्हणून म्हणून अशा कार्यक्रमांचं कारण पुढे केलं जातं. कालांतराने त्याची गोडी लागते. चांगला माणूस वाईट माणसाला पकडतो, असा समज ते करून घेतात. एखाद्या माणसामध्ये चांगले-वाईट असे दोन्ही गुण असतात, ही संकल्पना त्यांच्यात रुजलेली नसते. एखादा माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट अशीच त्यांची समजूत असते. क्राइम शोजमध्ये हेच दाखवलं जातं. त्यांच्या समजुतीवर शिक्कामोर्तब होतं. टीन एजच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ‘हे चालू शकतं. लोक असंही वागतात’ असा दृष्टिकोन तयार होतो. ‘खोटं बोलायचं नाही’, ‘लोकांना त्रास द्यायचा नाही’ असं आपण लहान मुलांना सांगतो. पण, जेव्हा ते क्राइम शोजमधला ड्रामा बघतात तेव्हा खोटं बोलण्याचे परिणाम त्यांना समजतात. ‘एवढं काही घडत नाही; मग बोलायला काही हरकत नाही’ असा दृष्टिकोन तयार होतो. आपण हे करून बघू, अशी भावना त्यांच्या मनात रुजत जाते. टीन एजच्या पुढच्या वर्षांमध्ये मुलांचा दृष्टिकोन बदलत जातो. अमुक एखादी गोष्ट केली तर आपल्याला पकडण्याची शक्यता खूप कमी आहे असं त्यांना वाटू लागतं. क्राइम शोजमध्ये गुन्हेगाराला कसं पकडलंय हेही दाखवलं जातं, तर तशी चूक आपण करायची नाही असंही ते पक्कं ठरवतात. एक्स्पेरिमेन्टेशन आणि इमिटेशन या दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरतात. एक्स्पेरिमेन्टेशन म्हणजे ‘असं वागून बघायचं काय होतंय ते’ आणि इमिटेशन म्हणजे ‘काळजी घेत ठरावीक गोष्ट करून बघायची’. या दोन्ही प्रकारांमुळे मुलांना चुकीचं वागण्याची सवय लागते. पर्यायाने त्यांच्यातला आक्रसताळेपणा वाढत जातो. तरुण नोकरदारवर्गामध्ये असे शोज बघण्याचं प्रमाण तुलनेने कमी असू शकतं. त्यांच्याबद्दल ठामपणे कोणताच मुद्दा सिद्ध झालेला नाही. या वर्गात थ्रिल, अ‍ॅक्शनची पसंती असलेले बरेच असले तरी अशा शोजचे ते प्रेक्षक आहेत का हा अंदाज बांधता येणं काहीसं कठीण आहे. हे कार्यक्रम बघण्यामध्ये वयस्क वयोगटातील लोकांचं प्रमाणही तसं कमी आहे. कारण अशा शोजमुळे त्यांच्या मनातली चिंताजनक अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे तुलनेने या वयोगटातील प्रेक्षकसंख्या कमी असते. मध्यमवयीन वर्गात मात्र अशा शोजची प्रेक्षकसंख्या जास्त आहे. क्राइम शोज बघण्यामध्ये वाईट काहीच नाही. कारण कलाकृती बघण्याच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. पण, त्याचा मनावर, मेंदूवर आणि पर्यायाने दैनंदिन जीवनावर किती परिणाम होतो याकडे हमखास लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना अशा कार्यक्रमांपासून लांब ठेवायला हवं.

क्राइम शोजची लोकप्रियताही वाढलेलीच
टीव्हीवर जाहिराती देताना कोणत्या कार्यक्रमांना किती प्रेक्षकवर्ग मिळतोय, विश्ष्टि कार्यक्रम कधी बघितला जातो, का बघितला जातो याचा अभ्यास केला जातो. लोकप्रिय कार्यक्रमांची यादी करून त्यांचं रेटिंगही बघितलं जातं. तसंच यात प्रॉडक्टच्या टार्गेट ऑडिअन्सचाही विचार महत्त्वाचा ठरतो. चॅनलगणिक जाहिरातींचे दरही बदलत जातात. दर दिवसाचे जाहिराती देण्याचे दर बदलत असतात. पण, महिन्याचं पॅकेज घेतलं तर मात्र ते विशिष्ट प्रॉडक्टसाठी बदलत नाही. चॅनलकडून येणाऱ्या महिन्याच्या वेळापत्रकानुसार जाहिरातींची योजना आखली जाते. क्राइम शोजची लोकप्रियता वाढतेय हे खरं असलं तरी जाहिराती देताना त्याचा वेगळा विचार केला जात नाही. पण, डेली सोपइतकाच जाहिरातींचा दर क्राइम शोजसाठीही द्यावा लागतो.
नंदिनी डायस,
सीईओ, लोडस्टार यूएम (अ‍ॅड एजन्सी)

जबाबदारीचं काम
टीव्ही हे सशक्त माध्यम असल्यामुळे गुन्हेगारीवरील कार्यक्रम दाखवताना अतिदक्षता घ्यावी लागते. चॅनलची विशिष्ट सेल्फ सेन्सॉरशिप असते. पूर्वी हा विभाग नसल्यामुळे प्राइम टाइममधील कार्यक्रमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींना लगाम नसायचा. म्हणून ते कार्यक्रम उशिरा दाखवले जायचे. आता सेन्सॉरशिप असल्यामुळे काही नियम आखले आहेत. नियमांमुळे आशयावर मर्यादा येते. अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाला पाहता यावे आणि महत्त्वपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी या हेतूसाठी गुन्हेगारीवरील कार्यक्रम प्राइम टाइमला दाखवले जातात. प्रेक्षकांना ‘सतर्क राहा’ असा संदेश देताना कार्यक्रमांच्या आशयाबद्दल आम्हालाही तेवढंच सतर्क राहावं लागतं.
जयेश पाटील,
प्रोग्रामिंग हेड, स्टार प्रवाह

रोमांचकारी सादरीकरणामुळे लोकप्रिय
गुन्हेगारीविषयक कार्यक्रमांच्या लोकप्रियतेमागे रोमांचकारी सादरीकरण हे एक महत्त्वाचं कारण आहे. ‘सीआयडी’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘अदालत’ या तिन्ही कार्यक्रमांच्या रंजक, रोमांचकारी सादरीकरणामुळे प्रेक्षक त्याकडे आकर्षिला जातो. अशा कार्यक्रमांमध्ये दाखवल्या जाणारी साहसी दृश्यं, ड्रामा, शोधप्रक्रिया यामध्ये प्रेक्षक गुंतून राहतो. कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय आहे. त्यातले वादविवाद, निर्दोषत्व सिद्ध करण्याची प्रक्रिया, पुरावे गोळा करणे या पायऱ्या प्रेक्षकांना बघायला आवडतात. महिला प्रेक्षकही आता असे कार्यक्रम बघू लागले आहेत. लहान मुलंसुद्धा प्रेक्षक असल्यामुळे प्राइम टाइममध्ये असे कार्यक्रम दाखवताना विशेष काळजी घ्यावी लागते.
अजय भाळवणकर,
प्रोग्रामिंग हेड, सोनी टीव्ही

गुन्हेगारीविषयक कार्यक्रम प्रेक्षक का बघतात; याचं उत्तर त्यांच्याच शब्दात :

lp52नातवामुळे मीही चाहती
माझ्या दहा वर्षांच्या नातवामुळे मला ‘सीआयडी’ या कार्यक्रमाची गोडी लागली. अशा कार्यक्रमांमधून तर्कज्ञान विकसित होतं. संकटावर कशा प्रकारे तोडगा काढता येईल याचीही माहिती मिळते. कार्यक्रमात गुन्हा घडल्यानंतर सीआयडी जेव्हा घटनास्थळी पोहोचतात तो क्षण नातवाला फार आवडतो. एपिसोडमध्ये पुढे काय होणार हे तो मला सांगत असतो.
अनगळ, गृहिणी, सोलापूर

lp51रहस्यमयता आवडते
क्राइम शोजमधलं रहस्य, शोधप्रक्रिया आवडते. ‘सीआयडी’ लहान मुलांसोबत बघितलं जाऊ शकतो. तसंच माणुसकीला धरून भाग दाखवले जातात. ‘क्राइम पट्रोल’ हा शो वास्तवदर्शी चित्रण करण्याच्या नादात अनेकदा अतिरेक करतो. त्यात दाखवला जाणारा हिंसाचार नको वाटतो.
ल्ल चंद्रशेखर पत्की,
नोकरी, उस्मानाबाद

lp50थ्रिलचा अनुभव
क्राइम शोजमधलं रहस्य, गूढ शोधताना केलेलं सादरीकरण भावतं. शोधप्रक्रियेचा ड्रामाही आवडतो. गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा लढा बघायला आवडतो.
ल्ल आदित्य जोशी, विद्यार्थी, औरंगाबाद

lp49सतर्क राहायला शिकवतात
‘सीआयडी’, ‘सावधान इंडिया’, ‘अस्मिता’ हे बघतो. गुन्हेगारी विश्व छोटय़ा पडद्यावर बघता येतं. अनेक गोष्टी ज्ञात होतात. सतर्क राहण्याबाबत माहिती मिळते.
ल्ल प्रथमेश शिंदे, असोसिएट ऑपरेशन्स, शिपिंग इंडस्ट्री, कल्याण

lp48मानसिकता महत्त्वाची
‘सावधान इंडिया’ हा कार्यक्रम सत्य घटनांवर असल्यामुळे त्यातलं वास्तव जाणवतं. प्रेक्षकांची मानसिकता महत्त्वाची ठरते. शोजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसेबद्दल गैर वाटत नाही. ड्रामा दाखवल्याशिवाय प्रेक्षक बघत नाही. लहान मुलांना असे कार्यक्रम मोठय़ांच्या उपस्थितीतच दाखवावेत. ते कार्यक्रमातील माहिती त्यांना समजावून सांगू शकतात.
ल्ल सुमती शिवलकर, मानसोपचारतज्ज्ञ, पनवेल

lp47हिंसा आहे म्हणून दाखवतात
क्राइम शोमधल्या हिंसक प्रसंगांबाबत मतमतांतरे असतील. पण, समाजातच हिंसा असल्यामुळे ती दाखवणं गरजेचं आहे. त्याबाबत माहितीच मिळते. विविध प्रवृत्तीची माणसं या कार्यक्रमांमध्ये दिसतात.
ल्ल मानसी भिंगार्डे, क्रीडा शिक्षिका, मीरा रोड

हे करायला हवं :
* १६ वर्षांखालील मुलांना गुन्हेगारीविश्वावर आधारित कार्यक्रम दाखवू नये.
* तुमचा मुलगा किंवा मुलगी कार्यक्रमात दाखवलेल्या एखाद्या व्यक्तिरेखेसारखं चुकीचं वर्तन करत असेल, तर ते चुकीचं आहे हे त्याला स्पष्टीकरणासह पटवून द्या.
* अशा कार्यक्रमांचा तुमच्या झोप आणि दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतोय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे याबाबत स्वनिरीक्षण करा.
* गुन्हेगारीवरील कार्यक्रम बघून तुम्हाला त्रास होतोय, हे तुमच्या लक्षात आलं तर ते बघणं तातडीने बंद करा. ते बघण्याचा अट्टहास नको.
* कुटुंबातील एखाद्या सदस्याला जर असे कार्यक्रम बघून त्रास होत असेल तर इतर सदस्यही असे कार्यक्रम निदान त्याच्यासमोर बघणार नाही याची काळजी घ्या. आजच्या डिजिटलच्या जमान्यात असे शोज रेकॉर्डिग करून नंतर ते बघितले जाऊ शकतात.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 1:33 am

Web Title: crime time on television
Next Stories
1 गुरुपरंपरा : एक विचार
2 परंपरा गुरूपौर्णिमेची
3 आधुनिक गुरू अर्थात मेंटॉर
Just Now!
X