05 June 2020

News Flash

कथा : क्रिमिनल सायकोलॉजी

‘‘सायकॉलॉजी हा विषय खूप गुंतागुंतीचा असतो. त्याला कधीही अंडरएस्टिमेट करू नये. आपण इकडे काही तरी शिकण्यासाठी जमलेलो आहोत. नुसते दिले आहे ते पाठ करून परीक्षेपुरते

| October 31, 2014 01:20 am

lp39‘‘सायकॉलॉजी हा विषय खूप गुंतागुंतीचा असतो. त्याला कधीही अंडरएस्टिमेट करू नये. आपण इकडे काही तरी शिकण्यासाठी जमलेलो आहोत. नुसते दिले आहे ते पाठ करून परीक्षेपुरते मार्क मिळवायला नाही. ज्ञान मिळवायला आलो आहोत,’’ प्रो. शर्मानी बजावले.

संपूर्ण वर्ग गंभीर झाला. पण बऱ्याच जणांना प्रोफेसरचे हे बोलणे पटले होते.

‘‘म्हणूनच माझा याबद्दलचा दृष्टिकोन, खूप वेगळा आहे. परीक्षा तुम्ही द्यालच. प्रोजेक्ट वगैरेही करालच. पण ते फक्त पास होण्यापुरते असेल. पण मला खरोखर तुम्हाला तो विषय किती समजला आहे आणि त्याचा वापर करण्याची तुमची क्षमता कशी आणि किती आहे ते मी तपासणार आहे. खरे तर तेच आपल्या कॉलेजचेही उद्दिष्ट आहे.’’

हे ऐकल्यावर मात्र संपूर्ण वर्ग गंभीर होऊन तणावपूर्ण शांतता पसरली. सर्व जण अस्वस्थ होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

‘‘म्हणजे सर, आपण नक्की काय करणार आहोत?’’ सर्वाच्याच मनात खदखदत असलेला प्रश्न रोहितने विचारला.

‘‘मी आधीच सांगितलंय की, आम्हाला तुमची क्षमता आणि इच्छाशक्ती तपासायची आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. मी तुमच्या हुशारीची, क्षमतेची आणि इच्छाशक्तीची परीक्षा माझ्या पद्धतीने घेईन. माझ्या कसोटीला जे निवडक विद्यार्थी उतरतील त्यांना आपल्या कॉलेजकडून विशेष सहकार्य मिळेल. आपले कॉलेज किती प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित आहे हे सांगायला नकोच. आपल्या कॉलेजने शिफारस केलेले विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी निवडले जातातच. तुमच्यापैकी काही जणांनाही ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’ या आपल्या विषयात खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. त्या लोकांना सी.बी. आय., रॉ या संस्थांमध्ये पाठवण्यात येईल!’’

‘‘म्हणजे सर या निवडीसाठी कुठली परीक्षा घेणार का?’’ रोहिणीने डोळे मिचकावत विचारले. ‘‘नाही. टिपिकल पद्धतीने फक्त परीक्षाच घेऊन हे होणार नाही. कितीही अवघड आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतली तरी त्याने निवड शंभर टक्के अचूकच होईल अशी खात्री देता येत नाही. मी सांगितलं ना, हे अधिकार फक्त मलाच आहेत. ते मी माझ्या पद्धतीने करेन. ते जाहीर करेपर्यंत पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. त्यासाठी तुम्हाला वेगळे काहीच करायचे नाहीये. रोज असता त्याप्रमाणेच तुमची वागणूक ठेवा,’’ शर्मा.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांना पूर्णपणे संभ्रमात टाकून ते निघून गेले. पण त्याचा परिणाम वेगळा झाला. संधी आपल्यालाच मिळावी म्हणून प्रत्येक जण जास्त अभ्यास करू लागला. वर्गात फारच लक्ष देऊ लागला. प्रश्नांची उत्तरे देऊन किंवा शंका विचारून सरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करू लागला.

शेवटी निकालाचा दिवस उजाडला. अ‍ॅड्रेस हॉलमध्ये मोठा समारंभ करून तीन नावे जाहीर करण्यात आली. चिन्मय, दीपक आणि रोहित.

प्रो. शर्मा नेहमीप्रमाणे आरामखुर्चीत बसून पेपर वाचत होते. तेवढय़ात बेल वाजली. दारात एक पन्नाशीचे गृहस्थ उभे होते.

‘‘प्रो. शर्मा..’’

‘‘हो. मीच तो. आपण?’’

‘‘मी.. मी तुमच्या वर्गात शुभांगी शिकते ना, तिचे वडील.’’

‘‘ओ हो. या ना! बसा!’’ प्रोफेसर म्हणाले.

‘‘धन्यवाद, माझ्या मते तुम्हाला मी का आलो आहे याची कल्पना असेल. माझी मुलगी येऊनसुद्धा गेली होती ना?’’

‘‘अं.. हो.’’

‘‘मीसुद्धा तुम्हाला तीच विनंती करायला आलो आहे. मनापासून सांगतो, की माझ्या मुलीला खूप इच्छा आहे की तिलाही मोठय़ा संस्थेमध्ये काम मिळावे, पण त्यासाठी कॉलेजच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे तिची खूप इच्छा आहे की विशेष प्रशिक्षणासाठी निवडले जाण्याची. ‘त्या’ विद्यार्थ्यांमध्ये तिचाही समावेश व्हावा. मला ठाऊक आहे की तुम्ही आधीच तिला नकार दिला आहे. पण तिने हट्टच धरला. तिचं म्हणणं पडलं की तुम्हाला पैशांची गरज आहे आणि ते दिले तर तुम्ही तयार व्हाल. म्हणजे तिलाही काही शिकायला आणि कर्तृत्व दाखवायला मिळेल.

‘‘पण हा पैशांचा..’’

‘‘तुम्हाला तसं वाटत असेल प्रोफेसर,’’ शुभांगीचे वडील म्हणाले, ‘‘मी त्याची कदरही करतो. पण शेवटी मी एक बिझनेसमन आहे. माझ्या अनुभवानुसार कुठल्याही माणसाची एक किंमत असते.’’

‘‘तुम्ही तुमचं मत बनवायला स्वतंत्र आहात, मिस्टर,’’ शर्मा थंडपणे म्हणाले, ‘‘पण मी आधीच सांगितलं की हा कसलीही किंमत किंवा पैशाचा प्रश्न नाही. मी प्रसिद्ध का आहे? मी काही सगळय़ात महागडा प्रोफेसर म्हणून प्रसिद्ध नाही किंवा मला मिळणाऱ्या पैशासाठीही नाही. माझ्यावर माझ्या व्यवसायामुळे एक वेगळी जबाबदारी आहे. मी तीन हुशार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. ते गरीब आहेत. पण तरी माझ्यासाठी शुभांगीपेक्षा जास्त योग्य आहेत. आणि हो जास्त फायदेशीरसुद्धा?’’

‘‘कारण?’’

‘‘ते मी शुभांगीलाच सांगेन. तुम्ही एक काम करा. उद्या कॉलेजच्या वेळापूर्वी तिला माझ्याकडे पाठवून द्या. मी तिला माझा शेवटचा ठाम नकार आणि कारणपण सांगेन.’’

‘‘ठीक आहे. मग काय बोलणंच संपलं.’’ म्हणून शुभांगीचे वडील निघून गेले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रोफेसर पेपर वाचत असताना बेल वाजली. दार उघडल्यावर त्यांच्या कपाळावर आठी पडल्याशिवाय राहिली नाही. दारात अर्थातच शुभांगी होती.

‘‘आलीस का तू? ये बस!’’ ते नाखुशीनेच म्हणाले.

‘‘सर. तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे सांगा ना. काल तुम्ही बाबांचेही ऐकले नाहीत. त्यांनी तुम्हाला हवे तेवढे पैसे दिले असते. बाबा म्हणाले की तुम्ही मला बोलावलंत, शेवटचं सांगायला. तेव्हा आपण सरळ मुद्दय़ावर येऊ या?’’

उगीच कशाला सांगा, शर्मानी विचार केला. तिचं मन दुखवायला नको म्हणून ते म्हणाले, ‘‘त्याचं काय आहे. निवड फक्त तीन लोकांची करायची होती ना, म्हणून..’’

‘‘तुम्ही मला असं फसवू शकत नाही सर.. मी पहिल्यांदा तुम्हाला निवडीचं विचारायला आल्यावर किती तरी दिवसांनी निवड झाली. आणि तुम्ही म्हणताय हे खरं धरून चाललं तर मग हे तिघेच का? मी का नाही?’’

‘‘ठीक आहे. तुला खरंच कारण हवं असेल तर..’’

‘‘हो. मला अंधारात ठेवलेलं आवडत नाही. मी लहान नाही.’’

‘‘ठीक आहे. माझ्या दृष्टीने हे तिघे कॉलेजला आणि समाजाला तुझ्यापेक्षा जास्त उपयोगी आहेत.’’

‘‘म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत?’’

‘‘तसं नाही. पण त्यांच्याकडे काही करण्याची इच्छाशक्ती जास्त आहे असं म्हणू या.’’

‘‘म्हणजे मी पुरेशी गंभीर नाही?’’

‘‘मी आहे, सर! खरं तर तुम्ही पूर्वग्रहदूषित आहात. तुम्हाला वाटतं मी श्रीमंत आहे म्हणजे बिघडलेली आहे आणि तशाच गोष्टी करते पण तसं नाहीये.’’

‘‘मला कॉलेजला जायला उशीर होतोय.’’

‘‘पण मी खरंच गंभीर आहे.’’

‘‘हे बघ हा विषय आता संपलाय आणि निवड झालेली आहे. तेव्हा मी आता काही करू शकत नाही.’’

शुभांगी नाइलाजाने निघून गेली.

त्यानंतर कॉलेजची नेहमीची परीक्षाही झाली. पुढच्या टर्मच्या आधी एक अनाऊन्समेंट कॉलेजकडून झाली. या सर्व गोष्टींनी थकलेल्या आणि कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी फुल टू धमाल करण्याचे फुल लायसन्स! ते म्हणजे गोवा ट्रिपची घोषणा. वर्गातल्या बहुतेक मुलांनी नाव ताबडतोब नोंदवले.

लगेचच ट्रिप सुरूही झाली. गोव्याला पोहोचल्यानंतर सगळय़ांनाच एक रिफ्रेशिंग ब्रेकही मिळाला. सर्वच मुलं छान एंजॉय करू लागली. ही ट्रिप अतिशय छान होणार असा इन-चार्ज प्रो. शर्मानाही विश्वास वाटल्यामुळे तेही आनंदात होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सध्या तरी शांत वाटणाऱ्या समुद्रात थोडय़ाच वेळात वादळ होणार होते.

‘‘प्रो. शर्मा. मी आत येऊ का?’’ रोहितने विचारले. तो त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत आला होता.

‘‘अरे, ये की बस! आपण पिकनिकला आलो आहोत. इथे फॉरमॅलिटी कशाला?’’

रोहित बसला. तो चांगलाच अस्वस्थ वाटत होता.

‘‘काय रे, काय झालं?’’

‘‘अं.. सर मला तुमच्याशी थोडं खासगी बोलायचं होतं. तुम्हाला माहीतच आहे ना की आम्ही तुमच्यावर विश्वास किती ठेवतो ते. तुम्ही आमचे प्रॉब्लेम्स समजून घेता. म्हणून तुम्ही आम्हाला सरांपेक्षा मित्रच वाटता.’’

‘‘हो! मला माहीत आहे’’ स्मित, करत सर म्हणाले, ‘‘म्हणूनच सांगतोय काय प्रॉब्लेम आहे, बिनधास्त सांग!’’

‘‘सर, आधीच मला माहीत होतं की असं काही तरी होईल. म्हणून माझी यायची तयारी नव्हती, खरं तर तुम्हाला माहीत आहे ना, आपल्याबरोबर चैत्रालीपण आली आहे?’’

‘‘हो! मला हा प्रॉब्लेम होईल याची कल्पना होती. पण मी मुद्दाम असा विचार करूनच दोघांना आग्रह केला की, तुम्ही दोघं झालं गेलं विसरून पुन्हा मित्र बनावं!’’

‘‘पण याचा परिणाम उलटा होऊन आम्ही परत एकमेकांजवळ पूर्वीसारखेच येत असू तर?’’

‘‘काय!’’ शर्मा दचकले. ‘‘हो, सर. असं होतं आहे!’’

‘‘अरे पण, असं नाही होऊ शकत! तू आताच तर ब्रेकअप केलास ना?’’

‘‘हो! पण आता मला जाणवत आहे की ती फार मोठी चूक झाली आहे. इथे आल्यापासून मी परत तिच्याकडे आकर्षित होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाला आपल्या मनाला खरंच काय वाटत आहे हे कळतं. असं तुम्हीच शिकवलंय ना?’’

शर्मा काय बोलावं हे न सुचून सुन्न होऊन पाहत राहिले.

‘‘तर सर, सांगा आता या परिस्थितीत मी काय करू?’’

‘‘मी सगळं ऐकलं आहे, रोहित!’’ अचानक दारातून आवाज आला. दार उघडंच होतं.

दोघांनी अचानक दचकून पाहिलं. दारात रोहिणी उभी होती. लगेच तिथे चैत्रालीही येऊन पोहोचली.

‘‘चैत्राली, मी काय सांगतोय ते ऐक.’’

‘‘नाही! मी ऐकलं आहे. आपल्यात जे होतं ते आता संपलंय रोहित! तू आता रोहिणीशी एंगेज्ड आहेस.’’

‘‘नाही, आतापर्यंत जे झालं ते आपण विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करू.’’

‘‘तू रोहिणीलासुद्धा विसरणार?’’

‘‘ती समजूतदार आहे. ती समजून घेईल,’’ रोहितने दारात उभ्या असलेल्या रोहिणीकडे चोरटय़ा नजरेने पाहत सांगितले.

‘‘पण, तू रोहिणीवर प्रेम करत होतास ना?’’ चैत्रालीने विचारले.

‘‘सांगितलं ना, ती माझी सर्वात मोठी चूक होती.’’

‘‘सॉरी, हं. मध्ये बोलल्याबद्दल,’’ रोहिणी आत येत म्हणाली. ‘‘पण मी योग्य वेळी हस्तक्षेप केलाय.’’

‘‘हे बघ. रोहिणी, ऐकून घे..’’ रोहित म्हणाला.

‘‘ऐकू? मी बरंच काही ऐकलंय. मी जे ऐकायला हवं होतं तेच ऐकलंय.’’

‘‘मी आता माझ्या खोलीवर परत जात आहे आणि झोपणार आहे,’’ चैत्राली म्हणाली.

‘‘हो जा ना आता!’’ रोहिणी किंचाळली, ‘‘तुला जे काय करायचं होतं ते केलंच आहे. पण मी गप्प बसणार नाही.’’

‘‘त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही,’’ एवढंच म्हणून चैत्राली निघून गेली.

‘‘हे बघ, चैत्रालीची यात काहीही चूक नाही. सगळा दोष माझा आहे. तेव्हा मला जे बोलायचं ते बोल,’’ रोहित म्हणाला.

‘‘मी तेच करणार आहे,’’ रोहिणी जोरात म्हणाली. ‘‘कसा माणूस आहेस तू? तू पहिल्यांदा चैत्रालीशी प्रेम केलंस, मग माझ्याकडे आलास आणि आता पुन्हा तिच्याकडे?’’

‘‘हे बघ..’’

‘‘मला त्रास देऊ नकोस.’’

‘‘तू माझी बाजू ऐकून घे. मला खरंच वाटतंय की माझं खरं प्रेम तीच आहे. मला फक्त ते आता कळलंय. तुझ्यावरचं प्रेम म्हणजे फक्त एक वेडेपणा होता. पण ते बरोबर नाही. त्यापेक्षा सरळ ब्रेकअप..’’

‘‘ते शक्य नाही. आता आपण एकत्र असताना मी तुला सोडणार नाही. हा सगळा तिचाच दोष आहे. तिला खूप आनंद होत असेल आता. पण तुला दिसेलंच आता मी काय करते ते!’’ रोहिणी रागाने निघून गेली.

या सगळय़ा रामायणात पिकनिक नेहमीप्रमाणे चालू होती. त्यांना बिचवर जायचं होतं. आता हा ग्रुप सोडला तर इतरांना काय घडलंय हे माहीत नव्हतं. आणि माहीत असलं तरी त्यात आपण काही करून उपयोग नाही म्हणून याकडे फार लक्ष दिलं नव्हतं. सर्वाची एंजॉयमेंट व्यवस्थित चालू होती. या सगळय़ात अस्वस्थ होते ते फक्त शर्मा. लवकरच काही तरी घडणार असं त्यांना सारखं वाटत होतं. त्यात भर पडली. त्यांना एक गोष्ट ताडकन जाणवली. त्यांनी शुभांगीला विश्वासात घेऊन त्याबद्दल माहिती विचारली. तिनं जे सांगितलं ते ऐकून ते सुन्न आणि आणखीनच चिंताग्रस्त झाले.

त्या दिवशीचे ठरलेले स्पॉटस् पाहून सगळे परत आले. सगळे जेवण झाल्यावर आपापल्या खोलीमध्ये जाण्याआगोदर नेहमीप्रमाणे शर्मानी उद्या काय करायचे यावर बैठक घेतली. पण लगेचच रोहिणी उभी राहून म्हणाली, ‘‘सर, मी आता झोपायला येणार नाही. माझं डोकं दुखत आहे. तुम्हाला माहीतच आहे काय झालंय ते. मी बाहेर, चक्कर मारायला जाणार आहे. रात्री उशिराच येईन.’’

‘‘मला बरंच काही माहीत आहे. ठीक आहे! जा तू,’’ शर्मा म्हणाले.

रोहिणी निघून गेली. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले. झोपायच्या आधी गप्पागोष्टीही केल्या. सगळे आनंदात होते. उद्या काय भयानक प्रकार पाहायला लागणार आहे याची कुणाला जराही कल्पना नव्हती.

सकाळी प्रो. शर्माना जाग आली तीच अत्यंत विचित्र. त्यांना आपण कसे अचानक जागे झालो कसे हेच कळेना. मग लक्षात आलं, कुणीतरी जोरजोरात दरवाजा ठोठावत होता. धडपडून दरवाजा उघडला. दारात सीमा उभी होती. चैत्रालीची रूम पार्टनर. अत्यंत घाबरलेल्या स्थितीत!

‘‘अगं, काय गं सीमा? काय झालं? आणि तू अशी घाबरलेली का दिसत आहेस?’’ शर्मानी घाईघाईत विचारले.

‘‘सर.. सर.. चैत्राली.. चैत्रालीला बघा, काय झालं, रक्त..’’

शर्मा धावतच चैत्रालीच्या खोलीत गेले. चैत्राली फरशीवर उताणी पडली होती. तिच्या डोक्याची मागची बाजू रक्ताळली होती. बाकी खोलीत काहीही दिसत नव्हतं.

‘‘सर.. डॉक्टरांना बोलवायचं ना? लवकर बोलवा.’’ सीमा रडवेल्या आवाजात म्हणाली. ‘‘त्याचा आता उपयोग नाही, सीमा!’’ शर्मा गंभीरपणे म्हणाले. ‘‘शी इज नो मोअर. तिचा खून झाला आहे. कुणीतरी पाठीमागून वार केला आहे.’’

‘‘काय?’’ ती किंचाळली.

‘‘हो. दुर्दैवाने खरे आहे. तू इथेच थांब. मी सगळय़ांना बोलावून येतो. पोलिसांनाही कळवले पाहिजे.’’

थोडय़ाच वेळात प्रचंड गोंधळात सगळेजण चैत्रालीच्या खोलीत आणि खोलीबाहेर जमले.

‘‘आता काय करायचं?’’

‘‘हे सगळं कसं झालं?’’

‘‘आपण अडकणार तर नाही ना?’’

सगळय़ांचे एकामागोमाग एक प्रश्न सुरू झाले.

‘‘शांत व्हा!’’ शर्मानी सगळय़ांना थांबवले. ‘‘आपल्याला सर्वात आधी पोलिसांना कळवायला हवं. आणि त्यात आपण अडकणार नाही, काळजी करू नका. माझा एक साटम नावाचा विद्यार्थी होता. तोच इथे पोलीस इन्स्पेक्टर आहे. मी त्यालाच फोन करतो.’’

शर्मा फोन करायला निघून गेले. तोपर्यंत सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. शर्मानी ‘पोलीस येतायत’ म्हणून सांगितल्यावर तर वातावरणातला ताण आणखीनच वाढला.

काही मिनिटांनी इन्स्पेक्टर साटम पथकासह आले. ती मिनिटे सर्वानाच युगाप्रमाणे वाटली.

सर्वात प्रथम डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली.

‘‘कुणीतरी हिच्या डोक्याच्या मागच्या भागावर पूर्ण ताकदीने प्रहार केला आहे. त्यामुळे एकच घाव पुरेसा ठरला आहे. अर्थात कुठल्यातरी वस्तूनेच केला आहे तो! मृत्यू मध्यरात्रीच्या सुमारास झाला असावा. अर्थात निश्चित काहीतरी मी पोस्टमार्टमनंतरच सांगू शकेन.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही आधी सर्वाच्या खोलीची पूर्ण झडती घ्या. काही मिळतंय का पाहा!’’ इन्स्पेक्टरांनी पथकाला सांगितले.

थोडय़ाच वेळात रोहितच्या खोलीत गेलेले हवालदार परत आले. त्यांच्या हातात रक्ताळलेली बॅट होती. ताबडतोब रोहितच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आणि ते पूर्णपणे जुळले!

‘‘आता, मला सगळय़ांना काही प्रश्न विचारायचे आहेत.’’ इन्स्पेक्टर साटम म्हणाले. ‘‘अर्थात पाश्र्वभूमी आणि हे कसं उघडकीला आलं हे मला कळलं आहेच. आता जास्त महत्त्वाचे प्रश्न मी विचारणार आहे. पहिल्यांदा काही जुजबी प्रश्न मी प्रो. शर्माना विचारतो.’’

शर्मा पुढे आले.

‘‘प्रो. शर्मा, तुम्हाला या प्रेमप्रकरणाची माहिती होती ना?’’

‘‘हो.’’

‘‘कशी काय?’’

‘‘त्या दिवशी रोहितनेच मला हे सर्व सांगितलं. कालच!’’

‘‘आणि हे भांडणही तुमच्यासमोरच घडलं, हो की नाही?’’

‘‘अं.. हो.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही बसा. मिस रोहिणी, तुम्ही या.’’

‘‘मी जास्त वेळ अशा वातावरणात राहू शकत नाही. मला बाहेर जायचं आहे. तुम्ही जे करायचंय ते करू शकता.’’ रोहिणी त्रासून म्हणाली.

‘‘याला फार वेळ लागणार नाही मिस रोहिणी. तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला आता जाता येणार नाही.’’

‘‘पण तुम्हाला काय अधिकार मला असं बसवून ठेवण्याचा? मी काही केलेलं नाही.’’

‘‘हो नक्कीच. पण काही प्रश्न आहेत जे आवश्यक आहेत.’’

‘‘पण का?’’

‘‘आम्हाला ते प्रत्येकालाच विचारावे लागतात.’’

‘‘ठीक आहे. एकदा संपू दे कटकट.’’

‘‘ठीक आहे. मला सांगा, काल रात्री जेवणानंतर तुम्ही काय केलंत?’’

‘‘मी डोकं दुखत होतं म्हणून माझ्या खोलीची चावी घेऊन निघून गेले होते.’’

‘‘डोकं इथे येऊन दुखलं कधी? की कालच?’’

‘‘कालच.’’

‘‘का?’’

‘‘कारण माझं रोहितशी भांडण झालं होतं आणि चैत्रालीचाही राग आला होता.’’

‘‘बरं झालं, तुम्ही मान्य केलंत. याचा अर्थ शर्मानी सांगितलेलं यामागचं कारणही बरोबर आहे.’’

‘‘हो.’’

‘‘तुम्ही धमकीही दिली होती ना, मी काय करते ते दिसेलच म्हणून?’’

‘‘हो. पण माणूस रागात बरंच काही बोलतो. प्रत्येक गोष्ट खरी करत नाही ना?’’ तिने चिडून विचारले.

‘‘हं, बरं. तुम्ही जाऊ शकता. मिस सीमा तुम्ही या.’’

‘‘मिस सीमा तुम्ही चैत्रालीच्या रूम पार्टनर ना?’’

‘‘हो.’’

‘‘तुम्हाला काहीच जाणवलं नाही? ठीक आहे, चैत्राली झोपेत होत्या म्हणून आवाज आला नसेल, पण रूममध्ये कोणीतरी आलंय की नाही, काही हालचाल, काहीच नाही?’’

‘‘हो. कारण मला झोपेच्या गोळय़ा घ्यायची सवय आहे. त्या दिवशीसुद्धा मी गोळी घेऊनच झोपले होते.’’

‘‘ठीक आहे. खोलीचं दार बंद होतं का, तुम्हाला आठवतंय?’’

‘‘मी ते केलं नव्हतं हे माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी बीचवर जाऊन आल्यानंतर दमले होते, त्यामुळे लगेच झोपले. चैत्रालीने केलं का. काही कल्पना नाही.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही जा. किती मजेदार गोष्ट आहे ना? त्या दिवशी सगळे दमलेले आणि त्रासलेले होते. सगळे लवकर झोपले. फक्त खुनी सोडून!’’

सगळे एकमेकांकडे बघत राहिले, ‘‘ठीक आहे. सर्वात शेवटी मि. रोहित तुम्ही या.’’

रोहित जड पावलाने आणि तणावग्रस्त चेहऱ्याने पुढे आला.

‘‘मि. रोहित, तुम्हाला कळतंय ना, की सगळे पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत? ती रक्ताळलेली बॅट तुमची आहे आणि त्यावरचे बोटांचे ठसेसुद्धा!’’

‘‘हो.. हो.’’

‘‘मग मी सांगतोय ते ऐका. तुमच्यावर मिस चैत्राली यांच्या खुनाचा संशय आहे. इथून पुढे तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे विचार करून बोला आणि तुम्हाला काहीही न बोलण्याचा अधिकारही आहेच.’’

‘‘तुम्ही मला धमकावताय का?’’

‘‘अजिबात नाही, कायद्याप्रमाणे हे आवश्यक आहे.’’

‘‘ठीक आहे. मग मी काहीही न बोलणं पसंत करेन.’’

‘‘तुम्हाला नक्कीच तो अधिकार आहे. पण मी तुम्हाला मित्रत्वाचा सल्ला देईन की तुम्ही बोलावं. नाहीतर तुमच्यावरचा संशय जास्तच वाढेल.’’

‘‘ठीक आहे. विचारा.’’ रोहित अस्वस्थपणेच बोलला.

‘‘तुम्ही चैत्रालीला शेवटचं कधी भेटलात?’’

‘‘भांडण झालं तेव्हाच. त्यानंतर सकाळी उठलो तेव्हा मला ही बातमी समजली.’’

‘‘नंतर दिवसभरात कधीच भेटला नाहीत?’’

‘‘नाही. मी आपला माझ्या-माझ्यातच होतो.’’

‘‘मग बॅटवर ठसे कसे आले तुझे?’’

इन्स्पेक्टरने चढय़ा आवाजात विचारले. ‘‘हे बघ रोहित, आतापर्यंत मी तुला मान देऊन बोलत होतो. पण तू असं खोटं बोलत राहिलास तर मग मला वेगळा विचार करावा लागेल!’’

‘‘अहो इन्स्पेक्टर, मी खरंच सांगतो आहे. तुम्ही विश्वास का ठेवत नाही?’’ रोहित काकुळतीने म्हणाला. ‘‘ती माझी बॅट आहे, मी ती वापरतो. मग त्यावर माझेच ठसे येणार ना?’’

‘‘अच्छा? आणि मग ते रक्त?’’ ते चैत्रालीचं आहे याची आम्ही खात्री करून घेतली आहे.’’

‘‘त्या बाबतीत मी खरंच काही सांगू शकत नाही. पण मला सांगा की मी तिचा खून का करेन? मला तर परत तिच्याबरोबर राहायचं होते, झालं गेलं विसरून.’’

‘‘हेतू माहीत नाही म्हणून तर तुला आम्ही अजून अटक केलेली नाही रोहित! पण त्याचा छडा लागेलच आणि मग तुला कोणीच वाचवू शकणार नाही!’’ इन्स्पेक्टर ठामपणे म्हणाले, ‘‘ठीक आहे. आतातरी माझे काही प्रश्न नाही. तू जाऊ शकतोस.’’

इन्स्पेक्टरही उठले. त्यांनी शर्माना खूण केली. शर्मा त्यांच्याबरोबर बाजूने चालू लागले. ‘‘सर, तुमचं काय मत आहे याबद्दल? मी गोंधळतोय.’’ इन्स्पेक्टर म्हणाले.

‘‘खरंतर माझंही तेच झालंय रे. मला रोहित खुनी असेल असं वाटत नाही.’’

‘‘मलाही. त्याच्याविरुद्ध इतके पुरावे आहेत की त्यामुळेच नेमकं उलट वाटतंय. इतके पुरावे नसतात आणि इतकं निष्काळजी पण कुणी नसतं.’’

‘‘साहेब, हे बघा, काय मिळालंय!’’

एक हवालदार आला. त्याच्या हातात काचेचा तुकडा होता.

‘‘हा तुकडासुद्धा रक्ताळलेला आहे. गूढ आणखीनच वाढत चाललंय. ठीक आहे. आम्ही बॉडी आणि या सर्व वस्तू लॅबोरेटरीत पाठवून देतो. तिथे कळेलच काय ते!’’

शेवटी इन्स्पेक्टर आणि त्यांचे पथक दुसऱ्या दिवशी आले, बरोबर एक महिला कॉन्स्टेबल घेऊन!’

‘‘मिस रोहिणी, आम्ही तुम्हाला मिस चैत्राली यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करत आहोत. यापुढे तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द पुरावा म्हणून गृहीत धरला जाईल. तुम्ही तुमच्या वकिलाला बोलावू शकता.’’

‘‘मी काहीही केलं नाहीये.’’ रोहिणी किंचाळली. ‘‘खरं आहे, रोहिणी असं करणं शक्य नाही.’’ रोहितही बेभानपणे ओरडला.

‘‘हे पाहा, आम्ही वॉरंट आणलं आहे. त्यामुळे आम्हाला हे करावंच लागेल. सर तुम्ही पण माझ्याबरोबर चला.’’ इन्स्पेक्टर म्हणाले आणि रोहिणीला अटक करून घेऊन गेले. बरोबर शर्माही होतेच.

तब्बल तासभराने शर्मा परत आले. हताशपणे बसले.

‘‘काय झालं सर?’’ रोहितने अधीरपणे विचारलं, ‘‘नो होप्स. ते लोक अजिबात ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात आता कोर्टातच या.’’

‘‘पण नक्की झालं तरी काय?’’ कुठल्या आधारावर अटक झाली?’’

‘‘तो काचेचा तुकडा. त्यावर रोहिणीच्या बोटांचे ठसे मिळाले. आणि तिला अर्थातच मोटिव्ह पण आहे. त्यात तिने धमकीही दिली आहेच ना?’’ शर्मा हताशपणे म्हणाले.

‘‘अहो, पण सर, रोहिणी असं करू शकत नाही हो. माझं तिच्याबरोबर ब्रेकअप झालं असलं तरी हे मी सांगू शकतो.’’ रोहित रडकुंडीला येऊन म्हणाला.

‘‘माझं पण तेच म्हणणं आहे रे. पण मी त्या साटमला कसा पटवू?’’ आता डी.एन.ए. टेस्ट हीच आशा!’’

जरा वेळ कुणीच काही बोललं नाही.

अचानक शुभांगीने प्रश्न विचारला.

‘‘अरे पण रोहित, मी तुला चैत्रालीच्या खोलीकडे जाताना पाहिलं होतं रात्री. मी मुद्दामच सांगितलं नाही पोलिसांसमोर.’’

‘‘अगं हो, मी गेलो होतो. पण तिथे सगळय़ा बिअरच्या बाटलीच्या काचा पाहून..’’ रोहितने वाक्य अर्धवट सोडलं.

सगळय़ांनी चमकून रोहितकडे पाहिलं. ‘‘काय रे रोहित, हे तू आधी का नाही सांगितलंस? तिथे एवढय़ा काचांचे तुकडे होते आणि मुख्य म्हणजे बिअरच्या बाटलीचे हे तुला कसं समजलं?’’

‘‘अहो सर.. मला समजलं म्हणजे मला बिअरच्या काचा ओळखता येतात. मी पितो.’’

‘‘आता मला सगळं लक्षात आलंय रोहित! आता मला..’’

तेवढय़ात फोन आला. शर्मानी बोलणं अर्धवट सोडून फोन उचलला.

‘‘हां बोल रे, आं, काय म्हणतोयस? अरे वा! मला हीच अपेक्षा होती. इथेसुद्धा हा बोलण्यामध्ये अडकला आहेच. हो, ये तू!’’

‘‘बघितलं?’’ शर्मा हसत म्हणाले.

‘‘यालाच योगायोग म्हणतात. मला साटमला फोन करायचाच होता. त्याचाच आला. तो येतोच आहे रोहितला अटक करायला!’’

‘‘अहो सर, पण मी खरंच काही केलं नाहीये.’’ रोहित काकुळतीला येत म्हणाला.

‘‘आता नाटक करून उपयोग नाही रोहित! त्यांच्याकडे आता पुरावा आहे. बॅटवर लागलेलं रक्त तेच आहे हे डी.एन.ए. टेस्टमधून सिद्ध झालं आहे. काचेवर जे रक्त होतं ते रक्त नाही, साधं केमिकल होतं.’’

‘‘अहो पण सर, हेतू काय? मी का मारू चैत्रालीला?’’

‘‘हो, हेतू नाही का, कळेलच इन्स्पेक्टर आल्यावर!’’

थोडय़ाच वेळात साटम आले.

‘‘ये रे! हा म्हणतो, मी तर पुन्हा तिच्याशी नातं जोडू इच्छित होतो, मी का मारू तिला? मी सांगतो. कारण तिचं प्रेम चिन्मयवर आहे हे त्याला कळलं होतं!’’

सगळे चकित होऊन शर्माकडे पाहत राहिले. ‘‘खुनाच्या रात्री आपण सगळे बीचवर गेलो होतो. चैत्राली आणि चिन्मय सोडून! मी विचारलं तेव्हा मला त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलं. तसंच रोहितलाही!’’

‘‘अहो, नाही..’’

पण त्याच्या सारवासारवीकडे दुर्लक्ष करून त्याला अटक केलीच! शेवटी ट्रिप गुंडाळूनच सगळे परत आले. ही ट्रिप सगळय़ांच्या आठवणीत राहणार होती. अर्थातच वाईट कारणासाठी!

शर्मा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आरामखुर्चीवर बसले होते. पण पेपर वाचत नाही, तर हताशपणे!

दार वाजलं. या वेळी कोण असेल म्हणून त्यांनी जरा आश्चर्याने दार उघडलं. दारात शुभांगी उभी होती.

‘‘तू? या वेळी?’’

‘‘सर, मी सरळ मुद्दय़ावर येते. आतातरी तुम्ही माझी निवड त्या विद्यार्थ्यांमध्ये करणार का?’’

‘‘अगं शुभांगी, प्रसंग काय, आपण कशातून आलो आहोत कळतंय का? आणि आता असं काय झाल आहे नेमकं की मी तुझी निवड करावी?’’

‘‘तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही?’’ शुभांगी मंदपणे हसत म्हणाली, ‘चैत्रालीचा खून मी केला सर. रोहितची बॅट मी त्यासाठी वापरली. पण त्यावर तुमची खात्री होईल असं वाटेना. म्हणून मी एक तत्त्व वापरलं. ‘एकाच्या बाबतीत तुम्हाला दोषी म्हणून खात्री पटवायची असेल तर दुसऱ्या संशयिताला काही काळासाठी दोषी ठरवा आणि त्याला निदरेष म्हणून सिद्ध करा! म्हणजे पहिल्याच्या दोषी असण्याबद्दल आपोआपच खात्री पटते!’ सांगा, अजून कुठला पुरावा पाहिजे की माझ्याकडे इच्छाशक्ती आहे? क्रिमिनल सायकोलॉजीचा उपयोग करून मी खून करून दाखवला! अजूनही मी तुम्हाला कच्ची वाटते?’’

प्रोफेसर शर्मा तिच्याकडे बघत हळू हळू जमिनीवर कोसळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2014 1:20 am

Web Title: criminal psychology
टॅग Story
Next Stories
1 रोमांचक सायकल सफर..
2 स्वास्थ्य : स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या – नोव्हेंबर महिना
3 मध्यांतर : तू माझा सांगाती
Just Now!
X