गुन्हेगारीचं न संपणारं दुष्टचक्र

कव्हर स्टोरी
गुन्हेगारी मार्गानी पैसा मिळवणाऱ्यांसाठी तो उडवण्याचं डान्स बार हे एक माध्यम होतं. त्यामुळे गुन्हेगार, डान्स बार आणि बारबाला यांचा नेहमीच निकटचा संबंध राहिला आहे.

कव्हर स्टोरी
गुन्हेगारी मार्गानी पैसा मिळवणाऱ्यांसाठी तो उडवण्याचं डान्स बार हे एक माध्यम होतं. त्यामुळे गुन्हेगार, डान्स बार आणि बारबाला यांचा नेहमीच निकटचा संबंध राहिला आहे. कित्येकदा तर डान्स बार हे गुन्हेगारीचं केंद्र ठरलं…
काही वर्षांपूर्वीची घटना. मुंबई उपनगरातील एका डान्स बारमध्ये एक इसम नेहमी यायचा. तेथील बारबालांवर पैसे उधळवायचा. मद्याची धुंदी आणि बेधुंद संगीताच्या तालावर बेफाम नाचायचा. एकदा नाचता नाचता त्याच्या खिशातून हिरे खाली पडले.. ते चकाकणारे हिरे पाहून सर्वाचे डोळे दिपून गेले. पोलिसांना कुणी तरी टिप दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो गुन्हेगार नव्हता, पण बोलते केल्यावर त्याने कबुली दिली. मुंबईच्या प्रख्यात भीमजी ज्वेलर्सच्या घरी सुतारकामासाठी तो सहकाऱ्यासोबत गेला होता. त्या वेळी काम करत असताना कपाटाच्या एका कोपऱ्यात दडवलेले हिरे त्यांना दिसले. त्यांनी ते लंपास केले. विशेष म्हणजे आपल्या घरातील हिऱ्याची चोरी झाली हे त्या घरातील कुणालाही माहीत नव्हते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. चोरी केल्यानंतर आलेले पैसे डान्स बारमध्ये उडवायला गेला आणि गुन्हा उघडकीस आला, पण ही केवळ एकच घटना नाही. अशा असंख्य घटना केवळ डान्स बारमुळेच मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.

एखाद्या वाईट कामातून, गुन्ह्य़ातून आलेला काळा पैसा हा उडविण्यासाठी गुन्हेगार डान्स बारचा मार्ग आपोआप निवडतो, कारण मद्यपानाबरोबरच नेत्रसुखद बारबाला असतात.

बाई, बाटली आणि पैसा हे गुन्ह्य़ांचे मूळ मानले जाते. जिथे जिथे या गोष्टींचा संबंध येतो तिथे तिथे गुन्ह्य़ाला खतपाणी मिळत असते. डान्स बारमध्ये या तिन्ही गोष्टी येतात. त्यामुळेच डान्स बार आणि गुन्हेगारी यांचा जवळचा संबंध आहे. काळा पैसा, बारबालांच्या सौंदर्याचे मायाजाल आणि मद्याची नशा गुन्हेगारीस प्रवृत्त करत असते. असं म्हणतात, अंधार झाला की गुन्ह्य़ांचे विश्व सुरू होते.. अंधारात गुन्हेगार बाहेर पडतात आणि काळ्या दुनियेच्या कारवायांना सुरुवात होत असते. डान्स बार हे रात्रीच्या अंधारात झगमगत असतात. याच डान्स बार आणि गुन्हेगारीचा जवळचा संबंध आहे. डान्स बारमध्ये जायचं तर पैसा हवा आणि साहजिकच कष्टाने मिळविलेला पैसा कुणी डान्स बारमध्ये उडविणार नाही. हा पैसा भ्रष्ट मार्गाने कमविलेला किंवा गुन्हेगारीच्या मार्गाने मिळवलेला असतो किंवा वरकमाईचा असतो किंवा मग अतिश्रीमंतांचा पैसा. हा पैसा उडविण्यासाठी मग पावले डान्स बारकडे वळायची आणि एक कळत नकळत पुढचे पाऊल गुन्हेगारीकडे वळायचे. त्या झगमगाटाची लागलेली सवय किंवा नशा, मग नर्तिकेची निर्माण झालेली ओढ, तिच्यावर फिदा झाल्याने तिला खूष करण्यासाठी मग तिच्यावर उधळलेला पैसा, बारबालेशी निर्माण झालेले प्रेमसंबंध आणि मग त्यातून पुढे तिचीच हत्या करण्याचे प्रकार होत गेले.
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
डान्स बार हे गुन्हेगारांचे आश्रयस्थानही मानले जाते. रात्रीचे हे झगमगते विश्व त्यांना आकर्षित करत असते. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटणे, व्यवहारांची देवाणघेवाण याच ठिकाणी चालते. डान्स बारमुळे सामाजिक स्वास्थ्य जरी बिघडत असले तरी पोलिसांना अनेक सावज या डान्स बारमध्येच सापडले आहेत, कारण वाम मार्गाने पैसा आला की तो वाम मार्गाकडेच जातो असा निसर्गनियम आहे. गुन्ह्य़ाच्या रूपाने, अवैध मार्गाने आलेला पैसा आला की ती व्यक्ती तो पैसा उडविण्यासाठी डान्स बारमध्ये जात असते. अनेक फरार गुन्हेगार या डान्स बारमध्ये सापडल्याचे पोलीस सांगतात. या गुन्हेगारांच्या ठरावीक बारबाला असतात. त्यांना भेटण्यासाठी गुन्हेगार येत असतात. त्यामुळे पोलिसांनी सापळा लावून अनेकांना पकडले आहे
अनेक गुन्ह्य़ांची उकल
डान्स बारमधून अनेक गुन्ह्य़ांची उकल झाल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी दिली. एखाद्या वाईट कामातून, गुन्ह्य़ातून आलेला काळा पैसा हा उडविण्यासाठी गुन्हेगार डान्स बारचा मार्ग आपोआप निवडतो, कारण मद्यपानाबरोबरच नेत्रसुखद बारबाला असतात. पोलिसांनी सापळे लावून अनेक गुन्हेगारांना अशाच डान्स बारमधून अटक केलेली आहे. फरार गुन्हेगार तर आपल्या आवडत्या बारबालांना भेटण्यासाठी बारमध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
एक कोटींची चोरी
दादरच्या पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्समधील एक कोटी रुपयांची चोरी डान्स बारमुळेच उघडकीस आल्याची घटना घडली होती. १९९४ मध्ये ही घटना घडली. एक आरोपी गोरेगावच्या एका डान्स बारमध्ये जाऊन पैसे उडवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दररोज नर्तिकेवर पैसा उडविणारा या इसमाचा संशय आल्याने पोलिसांनी माहिती पुरवली गेली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो पांडुरग हरी वैद्य ज्वेलर्समध्ये चोरी करणारा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते.
दरोडय़ाची उकल
हैदराबादच्या अनुका ज्वेलर्समध्ये काही वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपयांचा दरोडा पडला होता. आरोपींना पकडण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने लाखो रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. विनोद रामबली सिंग हा त्यातील मुख्य आरोपी होता. बोरिवलीच्या एका डान्स बारमध्ये एक आरोपी दररोज हजारो रुपये उधळत होता. ती माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो विनोद सिंगचा साथीदार होता. त्याने चौकशीत कबुली दिली.
मारेकरी बारबालेमुळे सापडला
घाटकोपरचे प्रख्यात बिल्डर अजमेरा यांच्या पत्नी चेतना अजमेरा यांची चोरीसाठी दोन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्यांच्या घरातील नोकरांनीच अजमेरा यांची हत्या करून लाखो रुपयांची चोरी केली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले होते पण मुख्य आरोपी अशोक पुरोहित फरार होता. पोलिसांनी जंग जंग पछाडून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता. नंतर पोलिसांना माहिती मिळाली की, तो मुंबईच्या एका डान्स बारमध्ये नियमित येत असतो. तेथे त्याची बारबाला त्याची प्रेयसी होती. पोलिसांनी त्या बारमध्ये पकडण्यासाठी त्याला सापळा लावला होता. पण रोज येणारे आपले गिऱ्हाईक जाईल म्हणून बारमालकांनीच त्याला आधीच माहिती देऊन सावध केले होते. अर्थात नंतर त्याच धाग्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती.
बारबालेसाठी चोरी
८ जुलै २०१३ रोजी कुर्ला येथील मधुरम ज्वेलर्समध्ये ६० लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्या दुकानात काम करणाऱ्या उमेदसिंग सोलंकी (२४) या नोकरानेच चोरी केली होती. अवघ्या ८ दिवसांपूर्वी तो कामाला आला होता. चोरी करण्यासाठी तो संधीची वाट बघतच होता. मालक नवीन देवपुरा यांनी त्याला साफसफाई करण्यासाठी चुकून दुकानाबरोबर तिजोरीची चावीसुद्धा दिली आणि उमेदसिंगला आयतेच घबाड सापडले. जेव्हा त्याला कुर्ला पोलिसांनी अटक केली तेव्हा चोरीमागचे कारण त्याने स्पष्ट केले. त्याची प्रेयसी एक बारबाला होती. तिच्यासोबत तो राहत होता. एका प्रकरणात त्या बारबालेला अटक झाली होती. तिला सोडविण्यासाठी उमेदसिंगकडे पैसे नव्हते. मग त्याने चोरीची योजना बनवली होती. पण त्याला आयतेच ६० लाखांचे घबाड सापडले होते.
बारबालांच्या हत्या
डान्सबारमध्ये लोक  जातात ते बारबालांसाठी. त्यामुळे प्रत्येक बारमालक आपल्या बारमध्ये सुंदर बारबाला आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. सुंदर दिसणाऱ्या बारबाला असल्या की गिऱ्हाईक त्या बारमध्ये जातातच. काही बार तर केवळ बारबालांमुळेच ओळखले जात होते. बारबालांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गिऱ्हाईकांमध्ये चढाओढ लागते. जो जास्त पैसे उडवील त्याच्याकडे बारबाला जातात. तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण होतात. तरुण असो वा विवाहित पुरुष तो बारबालेच्या प्रेमात पडतो. पुढे तो बारबालेसोबत वेगळा संसार थाटतो. पण या प्रेमाचा झरा आटल्यावर वास्तव समोर येते आणि संषर्घ सुरू होते. पैशांचा ओघ आटल्यावर बारबाला दुर्लक्ष करते. इतर पैसे उडविणाऱ्या गिऱ्हाईकाकडे जाते. मग तिच्या प्रेमात सर्वस्व लुटविलेला मग ईष्येने पेटून उठतो, कधी आपल्या बारबालेवर नजर ठेवली म्हणून दोघांना संघर्ष होतो. हाणामाऱ्या हा तर नेहमीचा विषय. पण संघर्षांची परिणती बारबालांच्या हत्येत होते. अनेक बारबालांच्या हत्या या अनैतिक संबंधामुळे झालेल्या आहेत. अंडरवर्ल्डच्या अनेक कुख्यात गुंडांच्या बारबाला प्रेयसी होत्या. टायगर मेमन, शोभन मेहता अशी त्यापैकी काही उदाहरणे.

काही बार तर केवळ बारबालांमुळेच ओळखले जात होते. बारबालांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गिऱ्हाईकांमध्ये चढाओढ लागते.

३० डिसेंबर २००८ रोजी सपना मंडल (२८) या बारबालेची हत्या झाली. कांदिवलीत एका गोणीत सपनाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तिचा प्रियकर तुलसीराम यादव याला अटक केली. सपना ही विवाहित होती, पण बारमध्ये गिऱ्हाईक म्हणून आलेल्या तुलसीरामबरोबर तिची ओळख झाली. प्रेम जुळले आणि दोघे एकत्र राहात होते, पण नंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्यामुळे तुलसीरामने सपनाची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून फेकून दिला.
१० डिसेंबर २०१२ रोजी मीरा रोडच्या शांती पार्क येथे राहणाऱ्या कांचन राज (२८) या बारबालेची हत्या झाली. कांचन मीरा रोडच्या बिंदिया बारमध्ये काम करत होती. तेथे विजय गौसर (३८) या व्यावसायिकाबरोबर तिचे सूत जुळले. गौसर एका प्लास्टिक कंपनीचा मालक होता. तो कांचनवर भरपूर पैसा उधळायचा. त्याने कांचनला मीरा रोडच्या शांती पार्क येथील रॉयल पॅलेस इमारतीत फ्लॅटही घेऊन दिला होता. काही दिवसांनी गौसरला धंद्यात तोटा होऊ लागल्यामुळे पैशांची आवक बंद झाली आणि परिणामी कांचनला पैसे कमी मिळू लागले. त्यामुळे कांचनने गौसरकडे दुर्लक्ष करून इतर ग्राहकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गौसरने मीरा रोडच्या राहत्या घरात कांचनची हत्या केली.
२४ एप्रिल २०१२ रोजी चेंबूरला राहणाऱ्या पायल भारद्वाज (२४) या बारबालेची तिचा प्रियकर अमनजित सिंग याने हत्या केली. दोघेही दिल्लीचे. मुंबईत स्थिरावले. पायलने डान्स बारमध्ये बारबालेचा पेशा स्वीकारला. अमनजित आणि पायल यांचे प्रेम जुळले. अमनजित तिच्यात गुरफटत गेला. लग्नासाठी तगादा लावला. पायलला लग्न करायचे नव्हते. भांडण विकोपाला गेले आणि अमनजितने पायलची हत्या केली.

डान्सबारचे वातावरण, मद्याची धुंदी आणि गुर्मीत असणारे लोकयामुळे डान्स बारमध्ये हाणामाऱ्या या नित्याच्याच. कधी नृत्यावरून, कधी क्षुल्लक कारणावरून, तर कधी बारमध्ये कुठले गाणे लावावे यावरून वाद होत. त्या वादाचे पर्यवसान मग गंभीर गुन्ह्य़ात घडल्याची उदाहरणेसुद्धा आहेत.

११ जानेवारी २०१३ रोजी मालाडच्या मालवणी येथील गेट नंबर ६ मध्ये राहणाऱ्या परवीन बाबू शेख (२९) या बारबालेची हत्या झाली. परवीन ही घटस्फोटिता होती. डान्स बार बंदीनंतर ती मालवणीत राहून स्टेज शो आर्टिस्ट म्हणून काम करायची. या शोनिमित्ताने ती हैद्राबाद येथे गेली होती. त्या ठिकाणी तिचे इक्बाल (१७) (नाव बदललेले) या अल्पवयीन तरुणाशी तिची ओळख झाली आणि या सहा महिन्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात. पण इक्बाल संशयी होता. परवीनने इतर पुरुषांशी बोलू नये, अशी ताकीद त्याने दिली होती. ११ जानेवारीला इक्बाल परवीनच्या मालवणी येथील घरी आला. त्या वेळी परवीनला मोबाइलवर एका इसमाचा फोन आला. त्यामुळे आधीच संशयी वृत्ती असलेल्या इक्बालचा राग अनावर झाला आणि त्याने परवीनची हत्या केली.

मुंबईत आजही बेवारस महिलांचे मृतदेह आढळले की बारबालांपासून शोधण्यास सुरुवात होते. कारण या बारबालांचं मुंबईत कुणी नसतं. प्रेमप्रकरणातून त्यांची हत्या होत असते. अनेक बारबाला गायब झाल्या आहेत, त्याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.
गुन्हेगारीला पोषक वातावरण
डान्स बारमध्ये जाणे आणि बारबालांचे नृत्य बघणे किंवा तेथे बसून मद्य पिणे हे बेकायदेशीर नाही, पण त्या ठिकाणी पावले वळल्यावर माणूस कुठल्याना कुठल्या गुन्हेगारीत वळू लागतो. सुरुवातीला कुतूहल म्हणून गेलेल्या इसमाला डान्स बारची चटक लागते. बारमध्ये उडविण्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा मिळविण्यासाठी मग इतर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात होते. किशोरवयीन मुले डान्स बारला जाण्यासाठी चोरी करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. छोटे-मोठे गुन्हेगार डान्स बारमध्ये जाऊन पैसा उडवितात. मग आणखी पैशांसाठी पुन्हा गुन्हा करतात. व्हाइट कॉलर गुन्हेही डान्स बारमुळे घडत असल्याचे पोलीस सांगतात. मग पैसा कमविण्यासाठी आर्थिक गुन्हे, फसवणूक सुरू केली जाते. भ्रष्टाचार वाढीस लागतो.
डान्सबारचे वातावरण, मद्याची धुंदी आणि गुर्मीत असणारे लोकयामुळे डान्स बारमध्ये हाणामाऱ्या या नित्याच्याच. कधी नृत्यावरून, कधी क्षुल्लक कारणावरून, तर कधी बारमध्ये कुठले गाणे लावावे यावरून वाद होत. त्या वादाचे पर्यवसान मग गंभीर गुन्ह्य़ात घडल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. दहिसरमध्ये याच कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
  डान्स बारचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुली. डान्स बार हे केवळ मुलींसाठीच ओळखले जातात. अधिकाधिक सुंदर मुली आपल्या डान्स बारमध्ये आणण्यासाठी बारमालकांची चढाओढ असते आणि त्यातून मग मुलींना या व्यवसायात आणण्यासाठी एक चक्र सुरू होते. दलाल सक्रिय होतात. उत्तर भारतातून आणि पश्चिम बंगालमधून मुली मोठय़ा प्रमाणात आणल्या जातात. कुणाला आमिष देऊन, कुणाला फसवून. डान्स बार आणि त्याच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापार. यामुळे विमेन ट्रॅफिकिंगचा मोठा गुन्हा घडत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

पैसा तिथे अंडरवर्ल्ड हे समीकरण जुनेच आहे. मग तो बांधकाम व्यवसाय असो वा चित्रपट निर्मिती. अंडरवर्ल्डने त्यात पैसा गुंतवत असतो. मग डान्स बार तरी कसे मागे राहतील? डान्स बारमधून खोऱ्याने पैसा येत असल्याने अनेक अंडरवर्ल्डच्या गुंडांनी डान्स बारमध्ये पैसा गुंतविला आहे.

या संदर्भात किरण पटेल या अवलिया तरुणाचे प्रकरण बोलके ठरावे. त्याच्या नावावर दीडशेहून अधिक गुन्ह्य़ांची नोंद आहे. रस्त्याने एकटय़ाने जाणाऱ्या तरुणांना गाठून त्यांना तो लुटत असे. त्याच्या नावावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल दीडशेहून अधिक गुन्ह्य़ांची नोंद आहे, पण तो पकडला जात नव्हता. जून २०१३ मध्ये जेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडील माहिती ऐकून पोलीसही थक्क झाले. अटकेच्या भीतीने तो गेली ८ वर्षे घरी गेला नव्हता, पण त्याचे राहणीमान अत्यंत चैनीचे होते. दररोजचा त्याचा खर्च हा तब्बल १५ हजार रुपयांचा असायचा. लुटीतून आणि चोरीतून त्याला खूप पैसा मिळायचा. त्यामुळे रोज रात्री लेडिज बारमध्ये जायचा आणि बारबालांवर पैसे उडवायचा. महागडे मोबाइल, घडय़ाळे वापरणारा किरण एकदा घातलेला शर्ट दुसऱ्या दिवशी घालत नसे.
तरन्नुम आणि सट्टेबाज
डान्स बारमध्ये केवळ गुन्हेगारच संबंधित नव्हते, तर व्यावसायिक आणि सट्टेबाजही संपर्कात होते. क्रिकेटमधील सट्टेबाजीतून आलेला पैसा सट्टेबाज डान्स बारमध्ये उडवीत असे. तरन्नुम ही त्यांची आवडीची बारबाला. श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीधरन पण तिचा चाहता. कुख्यात सट्टेबाज सुनील दुबई (ज्याला क्रिकेटचा एन्सायक्लोपीडिया म्हटलं जातं) तरन्नुमचा आशिक. त्याच्यामार्फत तरन्नुम सट्टेबाजीत पैसा लावत गेली आणि कोटय़धीश झाली होती.
अंडरवर्ल्डचा पैसा
जिथे पैसा तिथे अंडरवर्ल्ड हे समीकरण जुनेच आहे. मग तो बांधकाम व्यवसाय असो वा चित्रपट निर्मिती. अंडरवर्ल्डने त्यात पैसा गुंतवत असतो. मग डान्स बार तरी कसे मागे राहतील? डान्स बारमधून खोऱ्याने पैसा येत असल्याने अनेक अंडरवर्ल्डच्या गुंडांनी डान्स बारमध्ये पैसा गुंतविला आहे. साधू शेट्टी, इक्बाल मिर्ची, शरद शेट्टी, मुस्तफा राय आदींनी मुंबईत स्वत:चे डान्स बार उभारले होते. पुढे त्याची व्याप्तीसुद्धा वाढवत नेली. शरद शेट्टीने नंतर दुबईला आणि मुस्तफा रायने नंतर बंगळुरू आणि आखाती देशातही आपले डान्स बार सुरू केले होते.
पिकअप पॉइंट
२००५ साली डान्स बार (अधिकृतपणे) बंद झाले. त्यापूर्वीच्या शेवटच्या काही वर्षांत डान्स बारचे स्वरूप बदलले होते. डान्स बार हे केवळ पिकअप पॉइंट बनले होते. म्हणजे डान्स बारमध्ये जायचं, आपल्याला हवी ती मुलगी पसंत करायची आणि तिला घेऊन जायचं. यामुळे डान्स बारचालकांचा पुष्कळ फायदा व्हायचा. कारण मुली निवडण्यासाठी ग्राहक डान्स बारमध्ये येणार. त्याला मद्यपान करावे लागणार. त्यानंतर याच डान्स बारचालकांची लॉजेस असतात. त्यामुळे मुलींना त्याच लॉजेसमध्ये नेल्यावर तिथूनही आर्थिक उत्पन्न मिळायचे. दहिसर चेकनाका सोडला की मुंबईची हद्द संपते. या ठिकाणी काशिमीरा, मीरा रोडचा परिसर सुरू होतो. महामार्गाचा हा परिसर डान्स बारसाठी ओळखला जातो. मिलेनियम, रेड हॉर्स, िबदिया, स्वागत, आर्चिड, व्हाइट हाऊस, नाइट मीटिंग, वेलकम अशी पन्नासहून अधिक डान्स बार या परिसरात आहेत. या ठिकाणचे डान्स बार पिकअप पॉइंट बनलेले आहेत. कुठलेही धार्मिक अथवा र्पयटनस्थळ नसतानाही या ठिकाणी जागोजागी लॉजेस आढळतात ते याच कारणांसाठी.
  एकंदरीत डान्स बार हे एक दुष्टचक्र आहे. वाममार्गाने मिळालेला पैसा उडवायला डान्स बारमध्ये आणि तेथून मग पुन्हा वाममार्गाला सुरुवात. अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असते, तर अनेकांचा त्यामुळे गुन्हेगारी विश्वाचा मार्ग तयार होत असतो.  ८ वर्षांनतर पुन्हा डान्स बार सुरू झाले तर ते यापूर्वीच्या अधिक जोमाने असतील असे जाणकार सांगतात.
त्यामुळे पुढचे चित्र अधिक भेसूर असण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Criminals dance bar and bar girls

ताज्या बातम्या