News Flash

कथा : शाप

शिशिरच्या सांगण्यानुसार अप्पांनी त्या गुंतवणूक कंपनीत आपले पैसे ठेवले. सुरुवातीला शिशिर त्यांना पैसे द्यायचा. ते पैसे त्यांना पुरायचे नाहीत. तसं त्यांनी शिशिरला सांगितलंही. मग..

| September 5, 2014 01:07 am

शिशिरच्या सांगण्यानुसार अप्पांनी त्या गुंतवणूक कंपनीत आपले पैसे ठेवले. सुरुवातीला शिशिर त्यांना पैसे द्यायचा. ते पैसे त्यांना पुरायचे नाहीत. तसं त्यांनी शिशिरला सांगितलंही. मग..

अप्पांचे रिटायरमेंट लाइफ सुरू झाले. दहा-पंधरा दिवस त्यांना खूप बरे वाटले, पण हळूहळू त्यांना कंटाळा येऊ लागला. त्यांना कामाची सवय होती, माणसांच्या सहवासाची सवय होती.. पण आता काम नव्हतंच. पण माणसे.. पण माणसेसुद्धा भेटत नव्हती. जो तो आपल्या विश्वात रममाण झालेला होता. कुणाला वेळच नव्हता. दिवसभर बसून टी.व्ही पाहाणे, पेपर वाचणे, नाही तर झोपा काढणे, एवढंच काय अप्पांच्या हातात होते. ते चांगलेच वैतागले.. मध्येच त्यांना आपल्या सौभाग्यवतीची आठवण यायची आणि ते व्याकुळ होऊन जायचे.
असेच सहा महिने संपले. अप्पांजवळ थोडेफार पैसे होते, त्याचा त्यांनी उपभोग घेतला. आता पैसे संपत आलेले होते पण त्यांना त्याची चिंता नव्हती. आपला शिशिर आहे ना.
एक दिवस त्यांनी शिशिरकडे पैशांची मागणी केली.
थोडय़ा नाराजीनेच ‘दादा पैसे जरा जपून वापरा.’ असं म्हणून शिशिरने पैसे दिले, पण ते फारच अपुरे होते.
‘हे काय.. एवढेच.. मला अजून पैसे पाहिजेत.’ ते जरा घुश्श्यातच म्हणाले. त्याने पुन्हा काही नोटा त्यांच्या हातात सरकवल्या.
त्या एका घटनेने अप्पा नाराज झाले.
अप्पांना खाण्यापिण्याची चटक होती. आपल्या सद्दीत त्यांनी सर्व प्रकारची मजा केलेली होती, पण आता सून येता-जाता तब्येतीच्या, पथ्याच्या नावाखाली त्यांच्या पुढे चवहीन जेवण ठेवत होती. कमी तेलाच्या भाज्या.. मोजकाच आहार. चहापाणी वज्र्य.. त्यांना सारं काही कळत होतं, पण घरात कटकटी नकोत म्हणून ते शांत बसायचे. बाहेर जाऊन ते आपली हौस भागवून घ्यायचे. आज मात्र ताट समोर आल्यावर ताटातलं जेवण पाहिलं तसं ते सुनेला म्हणाले, ‘असं मिळमिळीत जेवण नकोय मला.’
ती नवऱ्याला म्हणाली, ‘बघा हो, यांच्या तब्येतीची काळजी आणि डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी यांचा खास वेगळा स्वयंपाक करून खाऊ घालते तर हे काय म्हणतात पाहा.’
शिशिर आला. त्याने विचारले, ‘काय झालं दादा..!’
अप्पा चिडलेले होते. ते संतापाने म्हणाले, ‘हे असं जेवण.. त्याला न चव आहे, त्यात ना तेल ना तिखट.’
‘दादा, असं काय करता, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून तुमची काळजी घेतोय आणि तुम्ही आरोप करता आहात.’
‘आरोपच आहे माझा.. माझ्या तब्येतीच्या नावावर माझी भूक मारायचा डाव असतो तुमचा. मला तुमचं वागणं समजतं बरं.’
शिशिर म्हणाला, ‘दादा, तुम्हाला असं अन्न देऊन आम्ही पंचपक्वान्नं खात नाही. आम्हीही तेच खातो ना.’
‘तुम्हाला जे खायचे ते खा रे.. पण मला चांगलं खायला लागतं. तुला माहीत आहे ना मला खाण्याचा शौक आहे. मला चांगलं चांगलं खायला दे. मला चिकन, मटण, अंडी आवडतात. आणलं कधी तू या सहा महिन्यांत?’
शिशिर म्हणाला, ‘मला परवडत नाही. तुमच्या राज्यात केली असेल मजा, पण तुमचे चोचले पुरवायला मी काही बांधलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही काहीही खाल्लं तर त्याचं काय सोनं होणार आहे का? वर जायची वेळ आली तरी तुम्हाला चिकन-मटण पाहिजे कशाला?’
शिशिरच्या सडेतोड बोलण्याने सून चांगलीच खूश झाली. अप्पा मात्र उद्ध्वस्त झाले. आपला पोरगाच आपल्याला असे काही सुनावेल असं कधी वाटलंच नव्हतं. ते समजून चुकले.. आता आपलं सारं काही संपलेलं आहे. ते खिन्न मनाने उठले आणि अंथरुणात जाऊन कोसळले.
त्या क्षणापासून अप्पा समजून चुकले की, या जगात खरंच कुणी कुणाचं नाही. आपल्या रक्तामांसाचा आपलाच मुलगा आपल्याला असे बोल सुनावतो आणि आपण ते ऐकून घेतो कारण आपल्या हातात काही राहिलंच नाही. त्या दिवसापासून अप्पा खचून गेले. आता घरातही त्यांच्याशी जास्त कुणी बोलत नसे. त्यांचा कोंडमारा व्हायला लागला.
आपलं दु:ख कुणाला जाऊन ऐकवावं असं त्यांना वाटत असलं तरी हक्काचं असं कुणी भेटत नसे. घरात वेळच्या वेळी खायला मिळेल याची काही खात्री नव्हती. बाहेर काही खावं तर हातातला पैसा संपलेला होता. पोराकडे मागावं तर हल्ली तोही ताठ वागतोय. एवढं करून पैसा मागितला तर म्हणतो, ‘मागे तुम्हाला पैसे दिले होते त्याचा हिशेब द्या.’
अप्पा एकदा म्हणाले, ‘मी माझ्या बापालासुद्धा कधी हिशेब दिला नाही.’
‘नसेल दिला.. पण आता द्यावा लागेल.. तरच पैसे मिळतील.’
‘मी माझा पैसा मागतोय!’ अप्पा संतापून बोलले.
‘तुमचा पैसा तुम्ही स्कीममध्ये अडकविलेला आहे. मी थोडेफार पैसे देतो ही मेहेरबानी समजा.. म्हणे माझा पैसा..’ शिशिर म्हणाला.
त्या दिवशी ते तिरमिरीत उठले आणि ऑनेस्टीच्या ऑफिसमध्ये आले. मॅनेजरला भेटून म्हणाले, ‘मला ते पैसे परत पाहिजेत.. मला नको तुमचे दुप्पट पैसे.’
मॅनेजर नम्रपणे म्हणाला, ‘काका ते पैसे तुम्हाला आता नाही मिळणार.. करारानुसार तुम्हाला ते साडेतीन वर्षांनंतर काढता येतील.’

त्या क्षणापासून अप्पा समजून चुकले की, या जगात खरंच कुणी कुणाचं नाही. आपल्या रक्तामांसाचा आपलाच मुलगा आपल्याला असे बोल सुनावतो आणि आपण ते ऐकून घेतो कारण आपल्या हातात काही राहिलंच नाही.

‘पण मला अडचण आहे.. अन् गरजेला तो पैसा उपयोगी पडत नसेल तर तो पैसा काय चाटायचा..’ ते संतापले. त्यांचे हातपाय थरथरू लागले. मॅनेजर बोलला, ‘‘काका. शांत व्हा.. पाणी प्या..!’’
अप्पा पाणी प्याले. शांत झाले. तसा मॅनेजर मृदुस्वरात म्हणाला,
‘त्याचं काय काका, तुमचे पैसे झटपट दामदुप्पट योजनेत गुंतविलेले असल्याने त्यासाठी तुम्हाला थांबावेच लागेल. शिवाय हा पैसा काढण्यासाठी तुम्हाला मुलाला घेऊन यावं लागेल.. तुमच्या दोघांच्या नावावर हा पैसा ठेवलेला आहे.’
अप्पांना ही नवीनच माहिती होती. एक संतापाची सणसणीत लहर त्यांच्या अंगातून गेली. म्हणजे काटर्य़ाने येथे पण तंगडी अटकावून ठेवलेली होती.
अप्पा संतापलेले होतेच. ते तडक घरी आले. संतापाच्या भरात त्यांनी पोराला विचारले,
‘माझे पैसे बँकेत ठेवले तेव्हा दोघांच्या नावावर का ठेवलेस?’
शिशिर साळसूदपणे म्हणाला, ‘दादा दोघांच्या नावाने ठेवले कारण तुमची तब्येत तशी नाजूक.. कधी काय होईल हे सांगता येतं का? अन् तुमचे पैसे तर नंतर मलाच मिळणार आहेत ना.. माझा पुढचा त्रास वाचावा म्हणूनच मी जॉइन्ट अकाऊंट काढलं..’
‘मला माझे पैसे पाहिजेत.’
‘मुदत संपल्यावर घ्या.. आज मिळणार नाही.’
अप्पांनी खूप आदळ-आपट केली. तेव्हा त्याने थोडय़ा फार नोटा त्यांना दिल्या, पण पैसे स्कीममधून काढण्यास ठाम नकार दिला.
अप्पा आता जास्तच निराश झाले. त्यांना क्षणाक्षणाला आपल्या बायकोची आठवण यायची. पैशावरून घरात बाप-लेकांची भांडणे सुरू असायची. शिशिरच्या मते आपला बाप खूप पैसे उडवतो. म्हणून तो त्यांना पैसा द्यायला तयार नसायचा.
सुनेने कधीच बोलणं टाकलेलं होतं. पोरगा मोजकं बोलायचा. अप्पा मनातल्या मनात कुढत होते.. रागाचे कढ गिळत होते. खिन्न होऊन लांब लांब फिरायला जात होते. फिरताना त्यांना छान छान हॉटेल्स दिसायची. भजी, मिसळीचा वास जाणवायचा. भूक चाळवयाची; पण खिशात छदाम नसायचा. बाजारात फिरायला गेले की तिथल्या कबाब, बिर्याणीच्या वासानं ते पागल व्हायचे. हल्ली त्यांनी त्या दिशेला जायचंच सोडून दिलेलं होतं.
रिटायरमेंटला दोन र्वष झाली होती. अप्पांना साऱ्या गोष्टींची सवय झालेली होती. मरण येत नाही तोपर्यंत जगावंच लागणार आहे. ते शांततेनं जगायचं बस्स. जे मिळेल ते खायचं. आपली आवडनिवड आता संपली.
पण ठरवून काही होत नाही. आपण एखाद्या गोष्टीला टाळावं तर तीच गोष्ट आपल्याला अधिक त्रास देते. ते एके दिवशी सकाळी दिशाहीन रस्त्यांना फिरायला निघाले. घरी जाण्याची घाई नव्हती, त्यामुळे रमतगमत चालले असतानाच त्यांना आवाज आला,
‘काका मॉर्निग वॉकला का?’,
संतोष होता तो.
शिशिरचा एकेकाळचा मित्र.
‘संतोषच ना तू?’
‘होय, काका मी संतोषच.’
‘हल्ली येत नाहीस घरी’
‘काय करणार आता.. कामं वेगवेगळी झालीत त्यामुळे भेटीगाठी होत नाहीत.. पण काका तुमची तब्येत फारच खराब झालेली दिसतेय..’ संतोष सहज बोलला. अन् अप्पांचा कोंडलेला संताप फसफसून बाहेर आला. ते म्हणाले,
‘अरे, संतोष शिशिर माझी काळजी घेत नाही, पण मला वाट्टेल ते बोलतो.’ असं बोलताना त्यांच्या डोळय़ांत टचकन् पाणी आलं. ते बघताच संतोष पुढे झाला. म्हणाला,
‘काका काय झालं.. सांगा मला. मग बघतो त्याच्याकडे मी’ संतोष म्हणाला. अप्पांना पण आपलं मन हलकं करायचं होतंच; ते म्हणाले,
‘काय सांगू संतोष हा मला काही चांगलं खायला देत नाही. डॉक्टरांनी मला रोज एक अंडं खायला सांगितलं आहे तर तो मला म्हणतो अंडं रोज देणं परवडणार नाही. अमकं परवडत नाही तमकं परवडत नाही. माझे पैसे होते. ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे गुंतवले आहेत. तर आता त्याने मला काढता येणार नाहीत, अशी व्यवस्था करून ठेवली आहे. वर त्याला त्याच्या बायकोची चांगली साथ आहे. दोघंही मिळून ठरवून मला खर्चायला पैसे देत नाही. सांग मी कसा जगू? अरे, आयुष्यभर पैसे कमावले मी आणि आता भूक लागली तरी खिशात पैसा नसतो.. माझा पैसा घेऊन याने माझे हाल चालविलेले आहेत संतोष.
अप्पांना हुंदका फुटला.

अप्पा संतोषला म्हणाले, ‘बरं का संतोष शिशिरने माझे पैसे असे अडकून ठेवलेत ना.. तुला सांगतो त्याला हे पचणार नाही.. बघशील तू.’

संतोषला हे सारं ऐकून आपल्या मित्राचा फार राग आला. शिशिरला एवढे दहा लाख रुपये देऊन शिवाय मोठा बंगला दिला आहे अप्पांनी. एखाद्या मुलाला त्याच्या बापाने अजून काय द्यायला पाहिजे होते. बापाला फुलासारखं जपायचं सोडून हा असा वागतो.. थूं अशा मुलावर.
संतोषशी बोलल्यानंतर गदगदलेले अप्पा हळूहळू शांत झाले. त्यांनी आपला चेहरा साफ केला. मग हसतच म्हणाले,
‘जाऊ दे संतोष. तुझं कसं चाललंय?’
‘माझं ठीक चाललंय काका.. चला नाश्ता करू या.’
अप्पाने आढेवेढे घेतलेच नाहीत. ते दोघे एका टपरीवजा हॉटेलकडे वळले. हॉटेलच्या दर्शनीच एका भल्यामोठय़ा कढईत एक जण भजी काढीत होता. त्या भज्याचा वास वातावरणात दरवळत होता. बाजूलाच एका मोठय़ा पातेल्यात मिसळ रटरटत होती. काऊंटरवर एका परातीत भजी, पुऱ्या ठेवलेल्या होत्या. आत आठ-दहा टेबलं होती. प्रत्येक टेबलावर चार-चार माणसं बसण्याची जागा होती. एका टेबलावर अप्पा बसले. संतोषने बसता बसता अप्पांना विचारलं, ‘काका काय खायचं सांगा.. नि:संकोचपणे सांगा.’
‘अरे तुझ्याकडे कसला संकोच. तसं काही वाटलं असतं तर मी तुझ्याबरोबर आलोच नसतो. मागव, काहीही मागव. मला सागळंच आवडतं खायला. भजी, मिसळपाव काहीही मागव..’ अप्पा.
संतोषने वेटर येताच ऑर्डर दिली. काही वेळात वेटरने मिसळपाव, गरमागरम भजी आणून ठेवली. त्या भरलेल्या डिश बघताच अप्पा खूश झालेत. त्यांनी चवीचवीने सर्व नाश्ता संपवला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज दिसू लागलं. बऱ्याच दिवसांनी आज भरपेट नाश्ता केला होता. नाश्ताची चव जिभेवर रेंगाळत असताच टेबलावर वाफाळलेला चहा आला.
बिल देऊन दोघं बाहेर आले. हातात असलेली वीसची नोट संतोषने अप्पांना दिली. म्हणाला,
‘राहू द्या. जवळ.’
अप्पांचं मन पुन्हा भरून आलं. रक्तामांसाचा पोर बघत नाही आणि हा कोण कुठला-किती जीव लावतो आपल्याला. एकदम आठवल्यासारखं ते संतोषला म्हणाले, ‘बरं का संतोष शिशिरने माझे पैसे असे अडकून ठेवलेत ना.. तुला सांगतो त्याला हे पचणार नाही.. बघशील तू.’
संतोष दचकला. पण काही बोलला नाही. फक्त त्याला त्यातून एकच जाणवलं की काका शिशिरवर भयंकर संतापलेले आहेत. आणि त्यांचं संतापणं साहजिकच आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी अचानक संतोषला ऑफिसच्या कामासाठी आठ दिवस हैदराबादला जाण्याचा निरोप मिळाला. जावंच लागणार होतं. डय़ुटी होती, काय करणार?
तो आपलं काम संपवून हैदराबादहून परत आला. त्या वेळी त्याला एकानं माहिती दिली,
‘अरे त्या शिशिरचे वडील गेलेत रे.’
‘कधी?’ संतोषने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
‘अरे मला वाटतं मागच्या आठवडय़ात.. मला वार माहीत नाही.’
संतोष म्हणाला, ‘मागच्या आठवडय़ात भेटले होते मला.. जायला हवं शिशिरकडे.’ संतोष म्हणाला. त्याच दिवशी संतोष शिशिरच्या घरी गेला. संध्याकाळची वेळ होती. शिशिरकडे जाताना संतोषला अप्पा भेटले, ती आठवण झाली. त्यानंतर तो या बाबतीत शिशिरला दोन गोष्टी ऐकवणारसुद्धा होता. पण आता त्याचा बापच गेला होता. बोलून उपयोग तरी काय. तो विचाराच्या तंद्रीतच शिशिरच्या घरी आला. शिशिर आणि त्याची बायको वर्षांचं आजारपण आल्यासारखे थकलेले दिसले. शिशिर तर काळा ठिक्कर पडलेला आहे, असा भास संतोषला झाला. वडील गेल्याच याच्या मनाला चांगलं लागलेलं दिसतंय, असं संतोषला वाटलं. संतोषच्या अगोदरही त्यांचा एक मित्र सुन्नपणे बसलेला होता. कुणीकुणाशी काहीच बोलत नव्हता. संतोषने बसता बसता विचारलं, ‘कसं झालं रे काकाचं.. काही आजारी वगैरे.’
शिशिर खिन्नपणे बोलला,
‘कसले आजारी..अरे त्या दिवशी मॉर्निग वॉक करून आले. जरा वेळ झोपले. ते झोपलेच.’
‘म्हणजे झोपेतच खेळ खलास झाला म्हणायचा.’
‘तसंच.’
संतोष थोडा वेळ बसला आणि उठला. त्याच्याबरोबर त्याचा मित्रपण उठला. ते दोघेही बाहेर आले. संतोष मित्राला म्हणाला,
‘वडील गेल्याचं चांगलंच मनाला लावून घेतलं शिशिरनं.’ दोस्ताने संतोषकडे बघितलं.. म्हणाला,
‘तुला कोणी सांगितलं वडील गेल्याचं दु:ख आहे म्हणून.’
‘मग त्याला कसलं दु:ख आहे. चेहरा पाहिला का कसा उदास-भकास होता,’ संतोष म्हणाला.
तो म्हणाला,
‘तू पेपर वगैरे काही वाचत नाहीस कां रे.. अरे बाबा ऑनेस्टी इन्व्हेस्टमेंट कंपनीचे बारा वाजले. ते लोक गाशा गुंडाळून निघून गेले, त्यात या शिशिरचे दहा लाख रुपये होते. त्याचा शॉक बसला आहे त्याला.’
‘काय म्हणतोस’ संतोषनं अविश्वासानं विचारलं आणि त्यांना त्या दिवशी अप्पा बोलले ते आठवले, ‘माझा पैसा याला पचणार नाही.. कधीच पचणार नाही’ अप्पांची शापवाणी खरी झाली होती.
(उत्तरार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2014 1:07 am

Web Title: curse
टॅग : Story
Next Stories
1 भविष्य : ५ ते ११ सप्टेंबर २०१४
2 नायकीण आणि नाटकशाळा
3 शब्द एक, अर्थ अनेक
Just Now!
X