मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा लवाजमा वगैरे बरोबर न घेताच त्यांच्या मुलीच्या शाळेत निव्वळ तिचे पालक म्हणून ‘डॅडीज डे’च्या कार्यक्रमाला गेले. इतर मुलांच्या पालकांप्रमाणेच त्यांनी तिथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. अगदी रस्सीखेचदेखील खेळले. त्यांच्या या सहभागाचे फोटो प्रसारमाध्यमांमधून झळकणं अगदीच साहजिक होतं. काही शाळांमध्ये असा थेट ‘डॅडीज डे’ असल्यामुळे मुलांच्या डॅडींना असं जावं लागत असलं तरी प्रत्यक्षात, रोजच्या आयुष्यात असा ‘डॅडीज डे’ खरंच असतो का?

शहर असो की ग्रामीण भाग, जास्तीत जास्त आयांकडून याचं उत्तर नाही असंच येईल. मुलांचा अभ्यास घेणं, त्यांच्या शाळांमधल्या पालकसभांना जाणं, मुलांच्या लहानसहान अडीनडीला सुट्टी घेऊन घरी थांबावं लागलं तर थांबणं, त्यांचं संगोपन ही सगळी कामं आजही अलिखितपणे आईचीच असतात. मुलांच्या शाळेतल्या पालकसभेलाही बहुतांश वेळा आईचीच उपस्थिती असते. वडिलांचा सहभाग वाढावा यासाठी काही शाळांच्या पातळीवर ‘डॅडीज डे’सारखा उपक्रम राबवला जात असला तरी प्रत्यक्षात हा ‘डॅडीज डे’ प्रतीकात्मकच असतो, असं बऱ्याच आया सांगतात.
स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत नव्हत्या तेव्हा चूल आणि मूल ही तिची जबाबदारी होती. घर सांभाळणाऱ्या आणि मुलांचा अभ्यास घेणाऱ्या आया घरोघरी असायच्या. स्त्री शिक्षण, तिचं अर्थार्जन सुरू झालं, त्यासाठी ती घराबाहेर पडायला लागली तसंतशी तिच्यावर घराची आणि नोकरीची अशा दोन्ही जबाबदाऱ्या आल्या. कोणत्याही लग्नासाठीच्या जाहिरातीत ‘नोकरी करणारी बायको हवी’ असं कलम असायचंच, पण म्हणून तिच्या घरकामाच्या, मुलांच्या संगोपनाच्या जबाबदारीवर कोणताही परिणाम झाला नाही. नोकरी करणारी गृहकृत्यदक्ष असेलच असं गृहीत धरलं गेलं. स्त्रियांच्या मनावरही ते अशा रीतीने बिंबवलं गेलं की नोकरी करताना घरातल्या गोष्टी जमल्या नाहीत तर तिलाच स्वत:ला दोषी वाटायला लागतं. आपण नोकरी करता करता घरातल्या सगळ्याच गोष्टी नीट सांभाळल्या पाहिजेत, या सुपरवुमेन सिन्ड्रोमने तिला आजही ग्रासून टाकलेलं आहे.
एखाद्या अत्यंत यशस्वी स्त्रीची मुलाखत घेताना तिला मुलाखतकार सहजपणे विचारतो, ‘करिअर किंवा नोकरी आणि घर ही कसरत तुम्ही कशी सांभाळता?’ पण एखाद्या अत्यंत यशस्वी पुरुषाची मुलाखत असेल तर त्याला ‘तुम्ही तुमचं करिअर आणि घर हे दोन्ही कसं सांभाळता?’ असं कधीच विचारलं जात नाही. का? कारण घर सांभाळणं हे त्याचं काम नाही असंच गृहीत धरलं गेलेलं असतं.
काही आस्थापनांमध्ये आईच्या मॅटर्निटी लीव्ह म्हणजेच बाळंतपणाच्या रजेप्रमाणेच वडिलांना मुलाचं संगोपन करण्यासाठी वेळ देता यावा यासाठी पॅटर्निटी लीव्ह पण दिली जाते. पण बहुतेक ‘डॅडी’ या वेळेचा ‘सदुपयोग’ वेगळ्याच कामांसाठी करतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मुळात माणसाचं पिल्लू इतर प्राण्यांच्या पिल्लाप्रमाणे पटकन आईवेगळं होत नाही. त्याचं पालकांवरचं विशेषत: अवलंबित्व बराच काळ असतं, मुळात ते वयाच्या जवळजवळ दीड वर्षांपर्यंत आईचं दूध पीत असतं तेव्हा सहा महिन्यांची मॅटर्निटी लीव्ह पुरेशी मानणं आणि मुलाला दुसऱ्या कुणावर तरी सोपवून त्या आईला कामावर रुजू व्हायला लागणं हे आईने ते मूल वाढवणं ही जबाबदारी तिची एकटीचीच आहे, त्या जबाबदारीशी व्यवस्थेचा काहीही संबंधच नाही असं मानण्यासारखं आहे. सहा महिन्यांनंतर मुलाला चांगल्या वाढीसाठी आईचं दूध लागतंच ना? मुलाला आईच्या सहवासाची मानसिक गरज नसते का? आईच्या सहवासाचा त्याच्या वाढीवर परिणाम होत नाही का? मग सहा महिन्यांच्या पूर्ण मॅटर्निटी लीव्हनंतर सहा महिन्यांची अर्ध वेळ रजा का असू नये? लहानपणी आईचं पुरेसं दूध, तिचा सहवास मिळालेली, निकोप वाढलेली मुलं ही उद्या समाजाचीच संपत्ती ठरणार असते ना? मग ते मूल वाढवणं ही आईची एकटीचीच जबाबदारी कशी असू शकते? त्यासाठी तिला घरातल्या पुरुषापासून ते समाजातल्या प्रत्येक यंत्रणेचं सहकार्य मिळायला नको का?
आपण आपल्या मुलीचं संगोपन कसं केलं याबद्दल सांगताना हिलरी क्लिंटन यांनी आपल्या ‘इट टेक्स अ व्हिलेज अ‍ॅण्ड अदर लेसन्स चिल्ड्रन टीच टू अस’ या पुस्तकात ‘इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड.. ’ या आफ्रिकी म्हणीचा आधार घेतला आहे. एक गाव उभं करण्यासाठी जेवढे कष्ट पडतात, तेवढेच एक मूल वाढवण्यासाठी पडतात, असा त्याचा शब्दार्थ असला तरी त्याचा वाच्यार्थ असा की मूल वाढवण्यासाठी इतक्या गोष्टी, इतक्या यंत्रणा लागतात की त्या यंत्रणांमधून एक गाव उभं राहील. मूल केवळ एका घरात, एका कुटुंबात वाढत नाही, तर त्यासाठी समाजाची गरज असते.
आणि तरीही नोकरी न करणाऱ्या, गृहिणी असलेल्या, घर आणि मुलं सांभाळणाऱ्या स्त्रीबद्दल बोलताना सहजपणे ‘ती ना, ती काहीच करत नाही, फक्त गृहिणी आहे’, असं सहजपणे सांगितलं जातं. आजही नोकरी करून संध्याकाळी घरी आलेला पुरुष दमूनभागून आलेला समजला जातो आणि नोकरी करून आलेली स्त्री परत घरातल्या संध्याकाळच्या कामांसाठी उभी राहते, मुलांचा अभ्यास घेते. त्यांच्या रोजच्या खस्ता खाते. वेळोवेळी त्यांच्या पालकसभांना जाते. काही शाळांना ‘डॅडीज डे’ ही संकल्पना राबवावीशी वाटते यातच या सगळ्यामध्ये ‘डॅडीं’चा सहभाग किती असतो याचं उत्तर दडलेलं आहे.
वैशाली चिटणीस