हावभाव, वेशभूषा, संगीत, नेपथ्य, साहित्य हे सगळं एकत्र येऊन रंगमंचावर जेव्हा काहीही सादर केले जाते, तेव्हा त्यामध्ये ‘हस्तमुद्रा’ हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो. याच ‘मुद्रा’ नृत्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. किंबहुना ‘हस्तमुद्रा’ ही नृत्याची भाषाच आहे असे म्हणता येईल.
कुठून आल्या या मुद्रा याचा विचार करत मी मानवनिर्मितीपर्यंत जाऊन पोहोचले. मानवाची निर्मिती झाली तेव्हा भाषा कुठे होती? तेव्हा मानव संवाद कसा साधायचा? तर याच ‘मुद्रां’च्या आधारे. त्याकाळी एकमेकांशी हातवारे करूनच मनुष्य संवाद साधत असे, हे आपण सर्वच लहानपणी इतिहासात शिकलो आहोत.
आपल्या हाताला विविध आकार देऊन त्याचा ठरावीक अर्थ स्पष्ट करणे याला शास्त्रीय नृत्याच्या भाषेमध्ये ‘हस्तमुद्रा’ असे म्हटले जाते. मुद्रा या शब्दाचा अर्थ व्यावहारिक जीवनात आपण ‘नाणे’ असंही करतो. नृत्यामध्ये मात्र तो ‘सांकेतिक’ अर्थाने वापरला जातो. ‘मुद’ या धातूला ‘रा’ हा प्रत्यय जोडून मुद्रा या शब्दाची निर्मिती झाली आहे. ‘मुद’ या शब्दाचा अर्थ आनंद किंवा आमोद आणि ‘रा’ याचा अर्थ ‘देणे’ असा होतो.
आचार्य नंदिकेश्वर आणि भरतमुनी यांनी हजारो वर्षांपूर्वी अनुक्रमे ‘अभिनय दर्पण’ आणि ‘नाटय़शास्त्र’ हे नृत्य आणि नाटय़ाच्या नियमांवर आधारित ग्रंथ लिहिले. आजही शास्त्रीय नृत्य शिकवताना याच दोन ग्रंथांमध्ये नमूद केलेल्याच गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. किंबहुना नाटय़शास्त्र आणि हे दोनच शास्त्रीय नृत्यासाठी प्रमाणग्रंथ मानले आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये असंयुक्त हस्तमुद्रा आणि संयुक्त हस्तमुद्रांचे श्लोकांमधून स्पष्टीकरण दिले आहे. केवळ एकाच हाताने ज्या मुद्रा केल्या जातात त्यांना असंयुक्त हस्त असे म्हटले जाते आणि ज्या दोन्ही हातांनी केल्या जातात त्यांना संयुक्त हस्त म्हटले जाते.
नृत्यप्रस्तुती करताना एखादे कथानक सादर करताना ठरावीक मुद्रा केली जाते. ती मुद्रा केल्यावर त्या मुद्रेवरून नर्तकाने अथवा नर्तकीने कोणती भूमिका धारण केली आहे हे लगेचच प्रेक्षकांना कळू शकते. याचेच एक सोपे उदाहरण म्हणजे, बासरीची मुद्रा धरल्यास तो कृष्ण आहे हे आपण लगेच ओळखू शकतो. तसेच घुंघट घेऊन डोक्यावर मडके घेऊन पाणी भरायला निघालेली स्त्री ही राधा किंवा गोपीच असू शकते हेही आपण समजू शकतो.
काही मुद्रांचं स्पष्टीकरण पाहू या. ‘पताका हस्त’ – ही एका हाताने करायची मुद्रा आहे. हाताची पाचही बोटे उघडून, बोटांमध्ये अंतर न ठेवता सरळ केल्यावर ‘पताका’ ही मुद्रा होते. ज्याचा उपयोग नृत्यामध्ये आशीर्वाद देणे, थांब म्हणणे, झेंडा दाखवणे, ढग दाखवणे अशा विविध क्रिया दाखवण्यासाठी केला जातो.
सूची मुद्रा, – तर्जनी उभी करून इतर चारही बोटे मिटली असता सूची ही मुद्रा होते. या मुद्रेचा उपयोग अनेक व्यक्ती दाखवणे, ‘गप्प बस’ म्हणणे, विचार करणे या क्रिया करण्यासाठी केला जातो.
अभिनय दर्पण ग्रंथामध्ये एकूण ३२ असंयुक्त हस्तमुद्रा आणि २३ संयुक्त हस्तमुद्रा सांगितल्या आहेत. यातल्या प्रत्येक मुद्रेला वेगळा अर्थ आहे. अशाही काही हस्तमुद्रा आहेत ज्यांचा उपयोग एकच क्रिया करण्यासाठी होतो, मात्र त्यासाठी वेगवेगळ्या मुद्रांचा वापर केला जातो. उदा. डोळे दाखविणे- शंकराचा तिसरा डोळा दाखवण्यासाठी ‘मयूर हस्त’ वापरले जाते, डोळे चोळताना ‘मुष्ठी’ ही मुद्रा, तर डोळ्यातील अश्रू पुसताना ‘पताका हस्तमुद्रा’, डोळ्यात काजळ घालताना, ‘त्रिपाताका’ हस्तमुद्रा वापरली जाते. तसेच अग्नी दाखवणे, केस दाखवणे, मडके घेणे, कुंकू / गंध लावणे, वेगवेगळे दागिने घालणे या सर्व क्रिया नृत्यातून दाखवण्यासाठी वेगवेगळ्या हस्तमुद्रांचा उपयोग केला जातो. केस दाखवताना- ओल्या केसातील पाणी काढून टाकण्यासाठी मुष्ठी मुद्रेचा उपयोग केला जातो, तर केसांची वेणी घालताना मयूर हस्त, केस मोकळे सोडण्यासाठी ‘पताका हस्त’ वापरले जाते. यावरून आपण बघू शकतो की मुद्रा किती सूक्ष्म विषय आहे. प्रत्येक मुद्रेचा जो अर्थ ग्रंथांमध्ये अनेक वर्षांपूर्वी सांगितला आहे तो आजही किती महत्त्वाचा आहे.
नृत्यामध्ये जसे या हस्तमुद्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसे योग, अ‍ॅक्युप्रेशर, विज्ञान या विषयांमध्येसुद्धा ‘मुद्रा’ महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ‘आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनवले आहे. या पंचतत्त्वामधील एक जरी तत्त्व शरीरामध्ये कमी-जास्त झाले तरी त्याची वाटचाल ही रोगनिर्मितीकडे होऊ शकते. या मुद्रांमुळे हे तत्त्व वाढायला नक्कीच मदत होते. मुद्रांचा अभ्यास केल्यावर असे जाणवले की, आजार बरे होण्यासाठी या मुद्रा निश्चितच कायमस्वरूपी मिळतात. आजार बरे होतातच परंतु होऊ नये यासाठीही ‘हस्तमुद्रांची’ भूमिका खूपच महत्त्वाची आहे’ असे प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी सांगितले आहे.
तसेच अ‍ॅक्युप्रेशरचा अभ्यास केल्यानंतर असे जाणवले की, शरीरातील नसांच्या अंतर्गत बिघाडामुळे, रक्तप्रवाहाचा संचार नीट न झाल्यामुळे उत्पन्न होणारे आजार म्हणजे उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, चक्कर येणे, वात दोष इत्यादी दूर करण्यासाठी ज्या मुद्रा अ‍ॅक्युप्रेशरमध्ये सांगितल्या आहेत त्या निश्चितच उपयुक्त आहेत. त्याचा १००% फरक काही वेळा लगेच, काही वेळा कालांतराने दिसून येतो असे डॉक्टर सांगतात.
यावरूनच हस्तमुद्रा या केवळ नृत्यामध्येच नाही तर इतरही विषयांमध्ये किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे आपल्या लक्षात आले. मुद्रांचे महत्त्व लक्षात आल्यामुळे आपण सगळ्यांनी हस्तमुद्रांचा सखोल विचार करून त्याचा निश्चितच दैनंदिन आयुष्यात उपयोग करून घ्यावा.
शीतल कपोले

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प