01tejaliविविध प्राचीन संदर्भ तसंच देवळांमधील शिल्पकला पाहिली तर नृत्य आणि शिल्पकला याचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे असं लक्षात येतं. या दोन्ही कला एकमेकींना पूरकच ठरल्या आहेत.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला इतर माणसांची सोबत आवश्यक असते. तो इतर माणसांवर अवलंबून असतो व एकमेकांस मदत करत समाजजीवन जगत असतो. त्याचप्रमाणे मनुष्याने निर्माण केलेल्या विविध कला या एकमेकांस पूरक आहेत. प्रत्येक कलेला एक स्वतंत्र कला म्हणून दर्जा प्राप्त झालेला असला तरी या कला एकमेकांवर अवलंबून आहेत आणि इतर कलांच्या साहाय्याने प्रत्येक कला समृद्ध होण्यात निश्चितच मदत झाली आहे. नृत्यकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गायन, वादन इ. ६४ कला आणि १४ विद्यांचे माहेरघर म्हणून भारत देशाचे नाव सर्वश्रुत आहे. त्यापैकी अगदी पुरातन काळापासून नृत्यकला व शिल्पकला यांचा घनिष्ठ संबंध दिसून येतो. हा विषय तसा फार मोठा आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा असला तरी या लेखातून नृत्य व शिल्पकलेच्या विविध पैलूंवर नजर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
lp71सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांच्या ‘कथ्थक कौमुदी’ या पुस्तकात त्यांनी असा उल्लेख केला आहे की, ‘भरतमुनी, पाणिनी, पतंजली आदी विद्वानांनी नृत्यकलेचा उल्लेख ‘नृत्यशिल्प’ असा केला आहे. ‘त्रिविधो शिल्पं नृत्यंगीतंवादित्रंच’ म्हणजेच नृत्य, गीत, वादन हे तीन शिल्प प्रकार आहेत. नाटय़शास्त्रात नृत्याच्या शिल्पगत, शिल्पसदृश, अंङ्ग, प्रत्यंग, उपांगांचे सम्यक व विस्तृत विवेचन पाहायला मिळते.’ या संदर्भावरून प्राचीन काळात सर्व कला शिल्पकलेच्या नावाखाली येत होत्या, हे स्पष्ट होते. काळानुरूप प्रत्येक कलेला आपापले स्थान प्राप्त झाले व हा विकास होत असताना या कला इतर कलांना अनुरूप अशा स्वरूपात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व मिळवू लागल्या. भारतातील नृत्यकला व शिल्पकला यांच्या संदर्भात म्हणायचे तर, भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकार ज्या ज्या प्रदेशात उगमाला आले, तेथे शिल्पकलेतही त्याची छाप दिसून येते. जरी शास्त्रीय नृत्य प्रकारांचे स्वरूप एकमेकांपासून भिन्न असले तरी त्याचा शास्त्रोक्त पाया बहुतांश प्रमाणात समानच आहे. भरतमुनीलिखित ‘नाटय़शास्त्र’ हा नृत्यकलेच्या साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत ग्रंथ समजला जातो. या नाटय़शास्त्राचा आधार घेऊन विविध शिल्पे साकारली गेली, त्याचा पुरावा भारतातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळतो. ‘मंदिर’ परंपरेनेदेखील अनेक कलांना प्रोत्साहन देण्यात व विकसित करण्यात अत्यावश्यक कार्य केले आहे, हे निर्विवाद आहे. विशेषत: नृत्यकलेच्या बाबतीत म्हणायचे तर देवदासींमार्फत नृत्यकलेच्या उगमामध्ये व विकासामध्ये भरीव योगदान करण्यात आले. तसेच मंदिर हे श्रद्धास्थान असल्याने भगवानाच्या चरणी कला अर्पण करण्यासाठी कित्येक विद्वानांनी व कलाकारांनी मंदिरात त्यांच्या कलेचे सादरीकरण केले, याचेही अनेक प्राचीन संदर्भ पाहावयास मिळतात. शिल्पकलादेखील याला अपवाद नाही. मंदिराच्या स्तंभांवर गोपुरावर, द्वारावर विविध शिल्पे कोरलेली दिसतात. ते मंदिर कोणत्या काळात बांधले गेले असेल, याचीही ही शिल्पे प्रचीती देतात. भारतामध्ये आज आपल्याला घारापुरीच्या लेणी, अजिंठा-वेरुळच्या लेणी, पट्टडकळ, बदामी औरंगाबाद येथील लेणी, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर, ओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर, भुवनेश्वरचे मुक्तेश्वर मंदिर, उदगिरीच्या राणीगुंफा, तामिळनाडूमधील थिलाई नटराज मंदिर, तंजावूर येथील बृहदिश्वर मंदिर इ. अनेक मंदिरे व लेण्या नृत्यकलेवर आधारित शिल्पांचा प्रत्यय देतात.
भरतमुनीने ‘नाटय़शास्त्र’मध्ये नृत्यातील अत्यंत मूळ आणि महत्त्वाच्या ‘करणां’विषयी चर्चा केली आहे. ‘हस्तपाद समायोगो नृत्तस्य करणं भवेत्’ म्हणजेच हातापायांच्या सौंदर्यपूर्ण हालचालींमुळे ‘करण’ बनले जातात. अशा १०८ करणांची नावे, शारीरिक कृती, उपयोग याचे समालोचन नाटय़शास्त्रात दिसून येते. ‘करण’ ही केवळ एक शारीरिक स्थिती नसून ती एक अखंड क्रिया आहे. विशिष्ट अवस्थेत हस्तक, पदन्यास, अंगाची ठेवण करण्याने ‘करण’ साध्य होतात. सुप्रसिद्ध भरतनाटय़म् नर्तिका व संशोधक डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी ‘भारतीय नृत्यकला व शिल्पकलेमधील करण’ हा विषय शोधप्रबंधासाठी घेतला होता. डॉ. टी. एन. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गोष्टीचा सखोल अभ्यास केला व जनसामान्यांपर्यंत आणि नृत्य विद्यार्थिनींपर्यंत ‘करणांविषयी’ अभ्यासपूर्ण माहिती पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. तामिळनाडू येथील चिदंबरममधील थिलाई नटराज मंदिरात ४ मुख्य प्रवेशद्वारांवर हे १०८ ‘करण’ अत्यंत कुशल कलाकारांनी कोरले आहेत. असे शिल्पकलेतील प्रमुख संदर्भ व पुरावे वापरून डॉ. पद्मा यांनी शिल्पकला व नृत्यकलेतील अविभाज्य साधम्र्य, परस्परावलंबी आविष्कार यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला. ‘करण प्रकारम्’ या सी.डी.मध्ये त्यांनी नाटय़शास्त्राच्या आधारावर रचल्या गेलेल्या या शिल्पकलेच्या साहाय्याने नृत्यकलेतील ‘करणांचे’ महत्त्व व त्यांचे मूळ रूप दृक्-श्राव्य स्वरूपात मांडले आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी इ. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तमिळनाडूमधील तंजावूर येथील बृहदिश्वर मंदिरात ११व्या शतकात चोल्ल राजा ‘राजराजा’ याच्या कारकीर्दीत १००० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन ‘नाटय़शास्त्र’च्या जतनासाठी त्यातील ‘करणं’ मंदिरावर शिल्परूपात कोरले जावे, अशी lp73राजाची इच्छा होती व त्याप्रमाणे शास्त्रीय नृत्यातील शरीराकृती व ८१ करणं तंजावूर मंदिरात आजही आढळतात. क्षारंगपाणी या कुंबाकोणम येथील मंदिरातदेखील १०८ करणं कोरलेली असून त्याखाली त्यांची नावे नमूद केली आहेत. डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे चिदंबरम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे व तेथेही करणांचा उपयोग प्रवेशद्वारांवर केला आहे. करणांना नृत्यकलेची मुळाक्षरे मानली गेली आहेत; पण मधल्या काळात नृत्याचा खूप विकास झाल्यावर या मुळाक्षरांकडे जरा दुर्लक्ष झालं होतं, परंतु आता परत एकदा नर्तकांनी या मुळाक्षरांकडे, नृत्याच्या उगमाकडे संशोधक वृत्तीने पाहायला सुरुवात केली आहे व या प्रक्रियेत पुरातन काळातील शिल्पे, हा संशोधनासाठी मोठा आधारस्तंभ ठरत आहेत. शास्त्रावर आधारित ही शिल्पे नृत्यकला जतन करण्यात व त्याच्या मूळ स्वरूपाचा अभ्यास करण्यास अत्यावश्यक कामगिरी बजावत आहेत. दक्षिणेत भरतनाटय़म, कुचिपुडी, मोहिनीअट्टम या नृत्यकलांसाठी या शिल्पांची झालेली मदत निर्विवाद आहे; परंतु उत्तर भारतातील कथक नृत्यासाठी शिल्पकलेचा कसा वापर झाला असेल, या संशोधनासाठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना रोशन दाते यांनी अनेक परिश्रम घेतले. सरकारची सीनिअर फेलोशिप त्यांना या संशोधनासाठी मिळाली होती. त्यांनी ‘कलासमन्वय’ या त्यांच्या लेखात असे नमूद केले आहे की, ‘उत्तर भारतातील खजुराहो, दिलवाडा, शणकपूर, ग्वालियर, भोपाळ, लखनऊ, अहमदाबाद, मथुरा, इंदोर, उदयपूर इ. अनेक ठिकाणी मंदिर व प्राचीन वास्तूंचे निरीक्षण करून जवळपास दोन हजार फोटो काढले व असे लक्षात आले की, मंदिरांच्या मंडोवरावर, जगतीवर, विविध स्तंभांवर, द्वारशाखेवर अंकित मूर्ती शिल्पातून, मध्ययुगीन लघुचित्रांमधून साकार होणारे विविध विषय व आजच्या कथक नृत्य प्रस्तुतीमधील विषय यात अनेक बाबतीत साम्य आढळते. ‘नाटय़शास्त्रातील’ १०८ पैकी ४२ करणांच्या विविध स्थिती उत्तर भारतातील नृत्यमूर्तीमध्ये पाहायला मिळतात. कथक नृत्यात ठुमरी, कवित्त, गतभाव इ.मधून नायिकांचे वर्णन, अभिनय केला जातो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेल्या
भारुतच्या स्तूपावरील मूर्तीपासून ते थेट १५व्या शतकातील राणकपूरच्या मंदिरावरील नृत्यमूर्तीपर्यंत सर्वत्र नायिका-भेदाच्या असंख्य शिल्पाकृतींनी विविध वास्तूंना नटवले आहे. मंदिरावरील या मूर्तीना सामान्यत: सुरसुंदरी अर्थात देवांगना म्हणून ओळखले जाते आणि नृत्याप्रमाणेच शिल्पामध्येही या नायिका नर्तनाच्या लोकधर्मी तसेच नाटय़धर्मी पद्धतीने अभिव्यक्त होताना दिसतात.’ अशा अनेक उदाहरणांतून रोशनताईंनी शिल्पकला व उत्तर भारतातील कथक कला यांचा निकटचा संबंध यावर समर्पक भाष्य केले आहे.
भारतात ताम्रपाषाण काळापासून म्हणजे सुमारे पाच सहस्र वर्षांपासून नृत्यमूर्ती उपलब्ध आहेत. ‘हडप्पा येथील पाच नर्तकांचा शिरोहीन पुतळा व मोहेनजोदडो येथील नर्तिकेची धातूतील प्रतिमा’ हे अतिप्राचीन काळातील नृत्यमूर्तीचे दाखले देतात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील उदगिरी व खंडगिरी लेणींमधील मूर्त्यां ओडिसी नृत्याशी असलेला प्राचीन संबंध दर्शवितात. ओरिसातील असंख्य मंदिरांवर नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या विविध पोजेस पाहायला मिळतात. ब्रrोश्वर, मेघेश्वर, मुक्तेश्वर, राजाराम, लिंगराज आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर, या सर्व मंदिरांमध्ये नृत्य करण्यासाठी खास अशा ‘नाट मंदिराची’देखील रचना पाहावयास मिळते. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांनी एका लेखात म्हटले आहे की, ‘‘ओडिसीमधील ‘त्रिभंग’ (मान, कंबर व पायांच्या साहाय्याने केलेला त्रिमितीय आकृतिबंध) ओरिसातल्या मंदिरांच्या शिल्पात सतत पाहायला मिळतो. ओडिसीचा चौक म्हणजे पुरीच्या मंदिरातला जगन्नाथ म्हणजेच कृष्ण. ‘दर्पणी’ हातातल्या आरशात बघणारी स्त्री, ‘मर्दळा’ पखवाज वाजवणारी स्त्री, ‘शालभंजिका’ – झाडाच्या फांदीला धरून प्रियकराची वाट बघणारी नायिका अशी अनेक शिल्पे मंदिरात दिसतात व त्याचेच प्रतिबिंब नृत्यात पाहावयास मिळते.’’
lp72मंदिरे व लेणींमधील शिल्पांत कधीकधी नृत्यमूर्तीद्वारे संपूर्ण प्रसंगदेखील दाखवलेला असतो. राम थत्ते यांनी ‘लेणींमधील नृत्य: शिल्प व चित्र’ या लेखात अनेक दाखले दिले आहेत. नटराज शिव वेरुळ येथील १५ क्रमांकाच्या ‘दशावतारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेणींमध्ये शिवाच्या तांडवनृत्याचा शिल्पपट अप्रतिम पद्धतीने साकारला आहे. शिल्पांमध्ये देवतांच्या हातातील आयुधे, शस्त्रे, साहित्य, चेहऱ्यांवरील भाव इ. अनेक गोष्टींचा अर्थपूर्ण वापर दिसून येतो व या सगळय़ा गोष्टी शिल्पाला अधिक जिवंत बनवण्यात यशस्वी ठरतात. नृत्यकला व शिल्पकला पुरातन काळापासून एकमेकांस पूरक अशा स्वरूपात विकसित झाल्या आहेत व शिल्पांवरून त्या काळातील समाजस्थिती, शास्त्र, नर्तनातील विकास याचाही अंदाज लावणे सोपे जाते, तसेच नृत्यकला जिवंत ठेवण्यात मूळ स्वरूपाचे दर्शन घडवण्यात शिल्पकलेचा मोठा हातभार आहे, हे निश्चित! आधुनिक काळातही विविध शिल्पे व नृत्यकला याचाच प्रत्यय देत आहेत. काळानुरूप नृत्यकलेत, त्याच्या साहित्यात झालेल्या बदलांप्रमाणेदेखील आधुनिक शिल्पकारांनी आधुनिक शिल्पे साकारली आहेत. गुंफा, लेणी, मंदिरे, काष्ठ, मेण इ. अनेक स्वरूपांत शिल्पकला जिवंत आहे.
नृत्यकला आणि शिल्पकला यातील घनिष्ठ संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तरी जितके या विषयाचा अभ्यास करू तितकी त्याची व्याप्ती आणि खोली वाढतच जाते, याचा वेळोवेळी प्रत्यय येतो!
तेजाली कुंटे

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा