मागील लेखात आपण नृत्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोशाख आणि वेशभूषेबद्दल चर्चा केली. कलाकृती अधिक आकर्षक करण्यासाठी नृत्यात विविध माध्यमांचा आधार घेतला जातो. वेशभूषा, रंगभूषा, रंगमंच व्यवस्था या सगळ्याबरोबर एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ‘डान्स प्रॉप्स’- म्हणजेच नृत्यात वापरली जाणारी वस्तुसामग्री. प्रथमदर्शनी हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा वाटत नसला तरी त्याचं नृत्यातील महत्त्व जाणवल्यावर त्याचं गांभीर्य जाणवतं. ‘मायकल जॅक्सन’ म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? त्याच्या मूनवॉकइतकीच फेमस असणारी त्याची हॅट! त्याच्या हॅटचा त्याने नृत्यात खूप विविध प्रकारांनी उपयोग केला होता. त्यामुळे ती ‘हॅट’देखील चांगलीच ‘हिट’ झाली होती. तसंच चार्ली चॅप्लिन म्हटलं की त्याची मिशी, हॅट आणि काठी डोळ्यांसमोर येते. अशा प्रकारे विविध कलाकारांच्या जणू अशा वस्तू ओळख बनून जातात. तशाच विविध नृत्यप्रकारांतही त्या सामग्री महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर ‘चीअर लीडर्स’ जे नृत्य करतात, त्यासाठी देखील त्यांच्या हातातल्या पॉम-पॉम्स (झिरमिळ्या)ना विशिष्ट स्थान आहे. या वस्तूबरोबर त्यांचं आणि ‘चीअर लीडर्स’बरोबर ‘पॉम-पॉम्स’चं घट्ट समीकरण बनलं आहे.
‘डान्स-प्रॉप्स’ या गोष्टीला डान्समध्ये इतकं महत्त्व आहे की विविध रियालिटी शोज्मधील काही एपिसोडमध्ये ‘डान्स-प्रॉप्स’ हे विशेष थीम (विषय)म्हणून वापरले जातात. नृत्यामध्ये या वस्तुसामग्रीमुळे विविधता आणली जाते, नृत्याच्या आविष्काराची रंगत वाढवली जाते. नृत्यामध्ये मुख्यत्वे खुर्ची, हॅट, हुलालुप रिंग, काठी, ओढणी इ. विविध गोष्टी वापरल्या जातात. काही नृत्यप्रस्तुतीमध्ये नृत्यसामग्री सर्वात महत्त्वाची असते, ज्याशिवाय ते नृत्य करताच येत नाही. उदाहरणार्थ सध्या बऱ्याच नृत्यप्रस्तुतीमध्ये ‘रोप मल्लखांब’, ‘एरिअल अ‍ॅक्ट’ केले जातात, ज्यासाठी मल्लखांबाची दोरी, मल्लखांब किंवा ‘एरिअल अ‍ॅक्ट’साठी ट्रापेझ, एरिअल सिल्क इ. गोष्टी आवश्यक असतात. नृत्यात योग्य त्या ‘प्रॉप’ची गरज ओळखून त्याप्रमाणे प्रॉप निवडणं आणि नृत्यदिग्दर्शनात व संरचनेत त्याचा योग्य वापर करणं फार महत्त्वाचं असतं. नृत्यात जर वस्तुसामग्रीचा अनावश्यक वापर केला, तर नृत्य खुलवण्याऐवजी त्याचा अडथळा बनू शकतो; याची खबरदारी नर्तकाने घ्यायला हवी. मुख्यत्वे आजकाल पाश्चिमात्य नृत्यप्रकारात वस्तुसामग्रीचा वापर अधिक आढळत असला, तरी भारतीय पारंपरिक लोकनृत्यातसुद्धा याचा संदर्भ दिसतो. जसं की, राजस्थानी ‘कालबेलिया’ नृत्यात तलवार, काचा तर ‘चिरमि’ नृत्यात डोक्यावर हंडय़ांचे रचलेले थर पाहायला मिळतात. कुचीपुडी या शास्त्रीय नृत्यातही ‘परात’ प्रोप म्हणून वापरली जाते. तसेच पंजाबी ‘भांगडय़ामध्ये’ चिमटा, रुमाल, साप(छीक्का) अशा विविध वस्तूंचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील कोळीनृत्यात टोपलीचा वापर केला जातो, तर अगदी आपल्या ‘मंगळागौरीच्या’ खेळांमध्येसुद्धा लाटणे, गोफ, सूप अशा रोजच्या वापराच्या वस्तूंचा वापर खूप छान प्रकारे केला आहे. तसेच विविध ‘मार्शल आर्ट्स’ वापरल्या जाणाऱ्या नृत्यात भाले, तलवार, ढाल, बनेटी, दांडपट्टा अशा गोष्टींचा वापर शिताफीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने केला जातो.
वस्तुसामग्री नृत्याला पोषक असायला हवी. जेव्हा वस्तुसामग्रीसोबत नृत्य करायचं असतं, तेव्हा विविध गोष्टींचं विशेष भान ठेवायला लागतं. नृत्याचं दिग्दर्शन करताना, त्या वस्तूचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे पाहावं लागतं, तसंच वस्तूचा वापर करण्याच्या नादात नृत्याकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. जास्त वापरात असणारे काही प्रॉप्स असले तरी इतर वस्तू वापरूनही खूप चांगली नृत्यप्रस्तुती करता येऊ  शकते, याची अनेक उदाहरणं विविध कार्यक्रमात आणि ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये पाहायला मिळतात. यातून विविध कल्पनादेखील सुचतात, ज्याचा आपल्या नृत्यात वापर करता येऊ  शकतो. टॉर्च, सुटकेस (पिशवी), पलंग, टोपली, आरसा, लाइट बल्ब, ओढण्या, कागद, अगदी टिश्यू पेपर वापरूनही अत्यंत आकर्षक नृत्यप्रस्तुती केलेली पाहायला मिळते. ‘डान्स इंडिया डान्स’ मध्ये प्रिन्स आणि मग ‘फैसल’ने ‘टिश्यूू पेपर’चा वापर करत केलेला डान्स खूप लोकप्रिय झाला होता. इतक्या छोटय़ा गोष्टीचाही नृत्यात कसा पुरेपूर आणि समर्पक वापर करता येऊ  शकतो, याचं ते उत्तम उदाहरण होतं. विविध दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमातील गाणी, पुरस्कार सोहळ्यातील नृत्य यातील नृत्यसामग्रीचा मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर आणि त्यासाठी होणारा अफाट खर्च पाहिला तरी या गोष्टीचं महत्त्व निश्चितच लक्षात येईल!! केवळ एका मिनिटाच्या गाण्यासाठी लाखभर रुपये नृत्यसामग्रीवर मोजले जातात. बरेचदा पुरस्कार सोहळ्यात तारे-तारका वरून खाली येत आहेत असं दाखवतात, त्याच्या बाजूने आगीचे फवारे उडवतात, विविध मनोऱ्यांवर चढून ते नृत्य करतात, हे सगळंदेखील नृत्यसामग्रीचाच भाग आहे व त्याचं प्रचंड स्वरूप पाहता त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा तुम्ही नक्कीच अंदाज बांधू शकता. प्रत्येक वेळी ही सामग्री विकत आणायला हवी असं नाही, भाडय़ानेसुद्धा ती आणता येते. वेशभूषेसाठी जे भाडय़ाने वस्तू देतात, त्यांच्याकडे बरेचदा नृत्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूदेखील उपलब्ध असतात किंवा स्व:ताच्या गरजेप्रमाणे आपण नृत्यासाठी लागणारी सामग्री बनवूसुद्धा शकतो, जेणेकरून कमी खर्चात जास्त आकर्षक प्रस्तुती करता येऊ शकते.lp93
जेव्हा एखाद्या वस्तूबरोबर नृत्य करायचं असतं, तेव्हा त्याबरोबर पुरेसा सराव होणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण प्रॉपबरोबर नृत्य करणं जितकं दिसतं तेवढं सोपं नसतं. त्या वस्तूची हाताळणीदेखील काळजीपूर्वक आणि विशिष्ट पद्धतीने करावी लागते. प्रॉप हातातून सुटू न देता, योग्य त्या नृत्याच्या स्टेप्स त्याबरोबर करणं; आणि हे करत असताना आत्मविश्वासाने ते साकारणं ही खरी कसोटी असते. नृत्याचा तो अविभाज्य भाग असल्याप्रमाणे सराव करावा लागतो. तसेच पलंग, खुर्ची, मल्लखांब, बार इत्यादी गोष्टींच्या साहाय्याने नृत्य करताना वेगळी काळजी घ्यावी लागते. या गोष्टींबरोबर खूप सराव करून जणू त्या वस्तूंबरोबर एक प्रकारची मैत्री करावी लागते आणि नृत्याच्या माध्यमातून या वस्तूदेखील जिवंत केल्या तर त्या प्रेक्षकांना अधिक पसंत पडतात. जणू ही वस्तुसामग्री नर्तकासाठी सहकलाकार म्हणून कामगिरी बजावत असते.
ज्याप्रमाणे नृत्यप्रस्तुती मध्ये ‘डान्स प्रॉप्स’ चा वापर केला जातो, तसंच ‘नृत्योपचारामध्ये’सुद्धा या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. रिबीन, फुगे, वर्तमानपत्र अशा विविध वस्तूंचा उपयोग अंगाची लवचीकता वाढवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे विविध गोष्टींशी विविध भावना, आठवणी जोडलेल्या असतात; त्यांचा उपयोग ‘नृत्योपचारामध्ये’ विविध भावना जाणून घ्यायला, त्यांचं व्यक्तीसाठी असलेलं महत्त्व जाणून घ्यायला, त्याचबरोबर त्याचा वापर करून विविध समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
त्यामुळे ‘नृत्यसामग्री’ ही अगदी छोटी दिसणारी गोष्ट असली, तरी त्याचं महत्त्व लक्षात घेता तिच्याकडे दुर्लक्ष करून मात्र अजिबात चालत नाही! नृत्यप्रस्तुती अधिक रंगतदार करण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा वापर करता येणं हेदेखील नर्तकाचं कौशल्य म्हणायला हवं.. ‘डान्स प्रॉप्स’बरोबर विविध प्रयोग करण्यासाठी आता तुम्ही पण तयार झालात का?
तेजाली कुंटे- response.lokprabha@expressindia.com