lp43संगीत, प्रकाशयोजना, वेषभूषा हे नृत्य संरचनेचे महत्त्वाचे घटक आहेत. नृत्य संरचनेसाठी संगीत तयार करताना त्या विषयानुसार कुठल्या वाद्यांचा वापर करावा हे ठरवले जाते. परंतु काही वेळा एखाद्या वाद्याचा वापर अपरिहार्य असतो. उदा. कृष्णावर आधारित एखादं गाणं करायचं असेल तर साहजिकच बासरीचा उपयोग केला जातो. म्हणजेच गाण्याच्या भावावस्थेनुसार विविध वाद्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे एखादा दु:खी भाव दाखवायचा असेल तर तोडी राग वापरता येतो. नृत्य संरचनेसाठी संगीत देताना ती संरचना समोरून कशी दिसेल याचाही विचार करावा लागतो. काही वेळा संरचनेमध्ये नर्तकांची संख्या जितकी जास्त असते तितके संगीतही जास्त वाद्य वापरून तयार केले जाते. त्यामुळे जास्त भराव येतो. एकल किंवा युगुल संरचनेसाठी संगीत करताना दोन किंवा तीन वाद्यांचा वापर शक्यतो केला जातो. एखाद्या वेळी कमी वाद्य असताना इतर वाद्यांचा प्रभाव देण्यासाठी प्रत्येक वाद्याची शैली लक्षात घेऊन, राग बदलून तो प्रभाव आणता येतो. उदा. संवादिनीवर बासरीचा आभास देता येऊ शकतो. तसेच संगीत देताना कालावधीचाही विचार करावा लागतो. म्हणजेच मुख्य प्रसंग केंद्रित करून त्याला साजेसे संगीत तयार करणे जरुरीचे असते. 

प्रसारमाध्यमांच्या प्रसाराने गायन, वादन, नृत्य आदी कला सर्वसामान्य प्रेक्षक, श्रोत्यांच्या घराघरात पोहोचल्याने वेशभूषेचा सर्वागीण विचार आवश्यक ठरतो. आधुनिक काळात संरचना ही संकल्पना आल्यावर अनेक नवीन विषय हाताळले गेले. पौराणिक विषयांबरोबरच सामाजिक विषयही आले. त्यामुळे विषयानुरूप, नर्तकाला सोयीचे असे परंतु परंपरेला बाधा न आणणारे असे नवीन पोशाख वापरात येऊ लागले. म्हणजेच नृत्याची बांधणी अधिक आकर्षक करण्यासाठी विषयानुरूप वेशभूषेची निवड केली जाऊ लागली. नृत्य संरचनेची वेशभूषा करताना ती नृत्यापेक्षा प्रभावी ठरणार नाही याचा विचार करणे गरजेचे असते. तसेच कपडय़ांचे रंग हेसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु त्याचा रचनेशी आणि सूत्रांशी संबंध असायला हवा. चुकीचे रंग वापरले तर निर्मितीच्या हेतूलाच बाधा पोहोचू शकते. गेल्या २५ वर्षांत नृत्य संरचनेमध्ये वेगवेगळ्या विषयांची हाताळणी झाली. विषय जास्त प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेशभूषेवरही अधिक भर दिला जातो. रंगमंचाच्या दृष्टीने आजवर गडद रंग वापरले जात होते. सुरुवातीला लाल, निळा, पिवळा हे मूलभूत रंग आणि हिरवा, जांभळा, केशरी हे दुय्यम रंग वेशभूषेसाठी निवडले जात होते. परंतु आताच्या काळात करडा, टरक्वाइज ब्ल्यू, गुलाबी असेही रंग नृत्य संरचनेसाठी वापरले जातात. आता तर पांढरा आणि काळा हेही रंग वेशभूषेसाठी वापरले जातात. म्हणजेच जसे विषय बदलले तसे रंगही बदलत गेले, असे म्हणता नक्कीच येईल.
नृत्य संरचना करताना आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रकाशयोजना. कुठल्याही कार्यक्रमासाठी प्रकाशयोजना करावयाची असल्यास त्याच्या मूळ संकल्पनेचा विचार करावा लागतो. नृत्य संरचनाकाराने ज्या कलाकृतीची बांधणी केली आहे त्याला अनुसरून प्रकाशयोजना करून ती कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा प्रकाशयोजेनेचा मूळ विचार आहे. नृत्यसंरचना आली की, भावावस्था आली, विषय आला, त्याला अर्थ आला, त्यामुळे त्या त्या अर्थाचे, भावनांचे, विषयांचे रंग वापरावे लागतात. प्रकाशयोजना ही नक्कीच आश्चर्यकारक प्रभाव पाडू शकते. प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार हर्षवर्धन पाठक यांच्या मते, ‘‘नृत्याची तालीम का बघायची? तर नृत्य काय ताकदीने बसवलंय हे बघायचं आणि मग आपली किती ताकद लावायची हे प्रकाशयोजनाकाराने ठरवायचं. संपूर्ण तीन तासांच्या कार्यक्रमामध्ये प्रकाशयोजनेचे काम केवळ २० टक्के असते, ज्यातून त्याला १०० टक्के परिणाम साधायचा असतो. त्याचप्रमाणे रंगाच्या प्रेमात न पडता रंगाचा परिणाम प्रभावीपणे पोहोचवणे यातच त्याचे कौशल्य आहे.’’ फार पूर्वी प्रकाशयोजनेचे तंत्र विकसित नव्हते. पूर्वीच्या संरचनांमध्ये प्रकाशयोजनेचा वापर दिसून येत नाही. परंतु गेल्या पंचवीस वर्षांत हे तंत्र विकसित झाल्यामुळे नृत्य संरचनांमध्ये प्रकाश-योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
आधुनिक काळात नृत्य सादरीकरणाबरोबरच आपले व्यक्तिमत्त्वही खुलून दिसावे याविषयी नर्तकांमध्ये जागृती झालेली दिसते. सर्वसामान्यपणे चेहऱ्यावरील उणिवा झाकण्यासाठी नृत्य कलाकारास रंगभूषेची गरज असते. उणिवा नाहीशा करून चेहऱ्यावरील महत्त्वाच्या अवयवांना उठाव देऊन आणि चेहरा आकर्षक बनवून नर्तकीमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम आधुनिक काळात रंगभूषेने केलेले आहे. ज्या माध्यमासाठी (दूरदर्शन, रंगमंच, फिल्म) संरचना करणार आहोत त्याप्रमाणे रंगभूषा बदलते. रंगमंचावरील रंगभूषा ही थोडी गडद असते. तर चित्रपट किंवा मालिकेची रंगभूषा ही थोडी सौम्य असते.
नृत्य संरचनेमध्ये ‘लेव्हल्स’चा नेपथ्य म्हणून उपयोग केला जातो. अर्धा फूट ते दोन फूट उंचीच्या लेव्हल्स नृत्य संरचनेसाठी वापरल्या जातात. एखाद्या वेळी विषयाप्रमाणेही लेव्हल्सची उंची ठरविली जाते. तसेच गरजेप्रमाणे चौकट (फ्रेम), पडदे वापरले जातात. स्वातंत्र्योत्तर काळात नृत्य संरचनेमध्ये हळूहळू आधुनिक तंत्राचा वापर होऊ लागला. रंगमंचावर वेगवेगळे स्तर दाखवण्यासाठी तसेच एखादे विशिष्ट स्थळ दाखवण्यासाठीही ‘लेव्हल्स’चा उपयोग केला जाऊ लागला. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामाने नृत्य संरचना अधिकाधिक आकर्षक आणि उठावदार होऊ लागल्या.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!