0shitalबरेचदा आपण अनुभवलं आहे की, एखादा विषय खूप चांगला असतो परंतु तो विषय शिकवणारा शिक्षक अथवा त्याची शिकवण्याची पद्धत फार कंटाळवाणी असते. त्यामुळे त्या विषयात रस वाटेनासा होतो. शेवटी त्या विषयाचा अभ्यास बाजूला राहतो आणि त्या विषयात विद्यार्थ्यांला कमी गुण मिळतात. कोणतीही कला शिकतानासुद्धा याचा अनुभव येतो. तुम्ही आपल्या विद्यार्थिनींना नृत्य शिकवताना कशा पद्धतीनं शिकवताय? ते त्यांना नीट समजतंय का? त्यांच्याशी तुमचं नातं कसं आहे? नृत्यवर्गातील वातावरण कसं आहे? त्यांना तुमच्याविषयी आदरयुक्त भीती आहे की भीतीयुक्त आदर आहे हेही महत्त्वाचे आहे. उत्तम नृत्यशिक्षक असूनही मुलांवर खूप दबाव टाकला तर त्यांच्या मानसिकतेवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. या सर्वामुळेच अध्यापनशास्त्र हीसुद्धा एक कला आहे हे आता सर्वमान्य होतंय. त्यामुळेच आता बऱ्याच विद्यापीठांत नृत्य विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका सत्राला ‘अध्यापनशास्त्र’ हा विषय अंतर्भूत केला आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सर्वसामान्यपणे पालकांना शाळेतील अभ्यासाचे विषय आणि नृत्य या दोन्हींत शिकवण्याच्या दृष्टीने काही फरक आहे हेच लक्षात येत नाही. त्यांना असे वाटते की नृत्य शिकवणे फारच सोपे आहे. परंतु वास्तवात तसे अजिबातच नाही. नृत्य शिकवणे, त्याची आवड निर्माण करणे आणि त्यातून चांगले कलाकार घडवणे हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे या माझ्या मताशी सर्वच नृत्यशिक्षक सहमत असतील याची मला खात्री आहे. म्हणूनच काही वेळा नृत्य शिकवण्यापेक्षा ‘सादर’ करणे जास्त सोपे असते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे नृत्य शिकवणे हे आव्हानात्मक का आहे? कारण जेव्हा आपण नृत्य शिकवतो तेव्हा समोर असलेल्या विद्यार्थ्यांला त्या विषयाची ओळख आपण करून देत असतो, त्या विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांला रस कसा निर्माण होईल याची खबरदारी घेत असतो. तसेच नृत्याकडे विद्यार्थी अधिक आकर्षति कसे होतील याचेही आपले भान असते. यामध्येही एक भाग असा असतो की बॉलीवूड डान्स शिकवताना ज्या गाण्यांवर नृत्य बसवले जाते ती गाणी मुलांना तोंडपाठ असतात. त्यातही त्या त्या गाण्याची जी प्रसिद्ध ‘अ‍ॅक्शन’ असते ती मुलांनी बघूनच शिकलेली असते (ती बरोबर की चूक, लयीत-तालात असते की नसते हा मुद्दा इथे येत नाही) म्हणूनच बॉलीवूड डान्स शिकवताना ‘कसे शिकायचे?’ ही ‘समस्या’ भेडसावत नाही. परंतु शास्त्रीय नृत्य शिकवताना त्याची पुरेशी काळजी शिक्षकाला घ्यावी लागते. मुळात आधी शास्त्रीय नृत्य शिकणं थोडं कठीण आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत तांत्रिक भागावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. म्हणूनच लहानपणीच जर विद्यार्थ्यांना चुकीच्या ‘टेक्निक’ने शिकवले तर मुलांचे फार नुकसान होते. त्यातही ज्या मुलांना नृत्यामध्ये करिअर करायचे असते त्यांना तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. कारण नृत्य शिकताना आपण काही चुकीचे शिकतोय ह्य़ाची त्यांना कल्पनाच नसते. सतत त्याच चुकीच्या तंत्राने नृत्य करून अंगही त्याच पद्धतीने वळू लागते. विचारही त्याच पद्धतीने केला जातो. म्हणून शास्त्रीय नृत्य शिकवताना नृत्याबरोबरच इतर संस्कार होणे फार गरजेचे असते.
मी शाळेत नृत्यशिक्षिका म्हणून काम करत होते तेव्हा त्या शाळेमध्ये कथ्थक नृत्य सगळ्यांना बंधनकारक होते. परंतु काही वेळा मुलांना कंटाळा येत असे. अशा वेळी मी पाच-पाच मुलांचे समूह करून त्यांचे खेळ घ्यायचे. ज्यामध्ये तीनतालाचा ठेका म्हणणे, हस्तमुद्रा करून दाखविणे अथवा त्या ओळखणे, हस्तमुद्रांचे उपयोग सांगणे, तालमालेवर एखाद्या तालाची सम ओळखणे, वेगवेगळे हस्तक शिकवले होते ते करून दाखविणे ह्य़ा गोष्टी त्यात समविष्ट केल्या होत्या. जो समूह चांगली प्रस्तुती करीत असे त्यांना भरपूर गुण मिळत असे. त्यामुळे मुलांच्या उत्साहाला उधाण यायचे. त्या निमित्ताने विद्यार्थी नृत्याचा अभ्यास घरून करून येत असे. मुलांना हे खेळ एवढे आवडायचे की बरेचदा असे खेळ घेण्याचा आग्रह विद्यार्थी करत असत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक चुरस निर्माण होते आणि दुसऱ्या बाजूला त्या निमित्ताने त्या विषयाचा अभ्यासही होतो. म्हणजेच नृत्य शिकवताना मुलांना अधिक रस वाटण्यासाठी वेगवेगळ्या लकबी शोधून काढून त्याचा प्रयोग मुलांवर करायला हवा. कोणत्या पद्धतीमुळे विद्यार्थी अधिक लक्ष देऊन नृत्यशिक्षण घेऊ इच्छितात याचा अभ्यास शिक्षकांनी केला पाहिजे. अर्थात लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टी या शाळेत जे नृत्य शिकवले जाते किंवा नृत्यवर्गात लहान मुलांना जे नृत्य शिकवले जाते अशाच विद्यार्थ्यांना लागू आहे. कारण नृत्यामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती ही फार वेगळ्या स्वरूपाची असते.
म्हणूनच या सगळ्यावरून मला असे वाटते की, नृत्य तर खूप विद्यार्थी शिकतात. नृत्यामध्ये भरपूर पदव्या प्राप्त करतात, पण म्हणून ते सगळे विद्यार्थी उत्तम शिक्षकही होतील असे नाही. ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड असेल त्यांनी नृत्यामधील ‘अध्यापनशास्त्र’ ह्य़ा विषयाकडे लक्ष केंद्रित केलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल.
शीतल कपोले response.lokprabha@expressindia.com

scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!