lp79आपल्या नृत्याच्या अदाकारीने आणि अभिनय कौशल्याने अनेक चाहत्यांना भुरळ पाडणारी ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित एका आगळ्यावेगळ्या माध्यमातून लोकांसमोर आली आहे. तिने नुकतंच लाँच केलेलं ‘डान्स विथ माधुरी’ हे आगळेवेगळे ‘अ‍ॅप’ नृत्यप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. हे ‘अ‍ॅप’ म्हणजे ‘ई-लर्निंग’ पद्धतीने नृत्य शिकण्याचा एक मंच आहे. ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना घरबसल्या नृत्य शिकता येणार आहे!! अ‍ॅपच्या दुसऱ्या भागामध्ये विविध नृत्यशैली शिकायला मिळणार आहेत. जवळपास २०० हून अधिक देशांमधून या अ‍ॅपला दोन लाखांहून अधिक ‘फॉलोअर्स’ मिळाले आहेत. सर्व लोकप्रिय व मोठमोठय़ा गुरूंकडून ऑनलाइन घरबसल्या नृत्य शिकण्याची ही सुवर्णसंधी या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वाना मिळणार आहे. सरोज खान, टेरेंस लुईस, रेमो डिसुझा, पं. बिरजू महाराज अशा अनेक दिगज्जांकडून नृत्य शिकण्याचं अनेकांचं स्वप्न यामुळे निश्चितच पूर्ण होईल. ९३ नृत्याचे वर्ग, ५० हून अधिक तास आणि १८०० नृत्याचे धडे असे खूप मोठय़ा प्रमाणावर नृत्याचे धडे व माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. सर्वसामान्यांना या अ‍ॅपचा जास्तीत जास्त फायदा करून घेता यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नृत्याची माहिती, शिक्षण पोहोचावे या उद्देशाने हे अ‍ॅप सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे. iOs  आणि सर्व अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. RnM Moving Pictures आणि रोबोसोफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या सहायाने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. माधुरी दीक्षितचे यजमान, डॉ. श्रीराम नेने यांचा या अ‍ॅपच्या निर्मितीमध्ये खूप मोठा वाटा आहे. DANCE WITH MADHURI ही संकल्पना अस्तित्वात येणे हे माधुरीचे खूप जुने स्वप्न होते. माधुरीची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. नेने यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून अमूल्य मदत केली आहे, म्हणूनच हे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. १५ मे हा माधुरीचा वाढदिवस!! आजवरच्या आयुष्यातील मिळालेली वाढदिवसाची ही सर्वागसुंदर भेट आहे, असं माधुरीचं म्हणणं आहे. ‘लर्न, मूव्ह, युनाइट’ हा ‘डान्स विथ माधुरी’चा फंडा आहे. ज्यामध्ये ‘लर्न’ म्हणजे विविध डान्सच्या सुपरस्टारकडून शिकण्याची संधी मिळणार आहे, ‘मूव्ह’ म्हणजेच निरोगी राहण्यासाठी नृत्याचा वापर करता येऊ शकतो, ज्यामध्ये फिटनेस गुरू लीना मोगरे फिटनेसचे धडे देणार आहेत. १५ मिनिटांमध्ये ४०० कॅलरीज झिजवता येतील असे नृत्याशी निगडित व्यायाम यामध्ये सामावले आहेत. तर ‘युनाइट’ म्हणजे सगळ्या विविध प्रकारच्या नृत्यशैली करणाऱ्या कलाकारांनी एकत्र येण्यासाठी या ऑनलाइन मंचाचा वापर होणार आहे. आपण शिकून आपला व्हिडीओ अपलोड करायचा व त्यावर नृत्यातील तज्ज्ञ सूचना देणार, अशा रीतीने ही ऑनलाइन नृत्य शिकायची सोय तंत्रज्ञानाच्या सहायाने उपलब्ध करण्यात आली आहे. 

फिटनेस, नवरात्री, बॉलीवूड, कंटेंपररी, शास्त्रीय नृत्य, शादी असे अनेक विभाग या अ‍ॅपमध्ये सामावलेले आहेत. आपापल्या आवडी व गरजेप्रमाणे प्रत्येक जण या संधीचा लाभ घेऊ शकेल. शिवाय व्हिडीओ परत परत बघून चांगला सरावदेखील करता येऊ शकतो, हे या अ‍ॅपचं वैशिष्टय़ आहे. नृत्यप्रेमी, नर्तक/ नर्तिका किंवा नृत्यशाळा अशा वेगवेगळ्या प्रकारे या अ‍ॅपवर लॉगिन करता येऊ शकते. म्हणजेच आपल्यातील अंगभूत कलागुणांना वाव तर मिळेलच, शिवाय आपली कला संपूर्ण जगासमोर सादर करण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली की, ‘या अ‍ॅपच्या माध्यमातून उत्तमोत्तम गुरूंकडून घरबसल्या नृत्य शिकण्याबरोबरच कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. शास्त्रीय नृत्यशैलींच्या बाबतीत बेसिक पातळीसाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरू शकेल, पण नृत्यातील बारकाई किंवा काटेकोरपणासाठी गुरूंशी संपर्क साधून साधक पुढील शिक्षण नक्कीच घेऊ शकतो. या अ‍ॅपच्या सहायाने जगभरातील कलाकार एकत्र यावेत, हे आमचं ध्येय आहे.’ सर्व नृत्यप्रेमींनी या अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करून, नृत्याचा प्रसार आणि प्रचार करावा, असं आवाहन माधुरीनं केलं आहे. अधिक माहितीसाठी http://www.DanceWithMadhuri.com, http://www.madhuridixit-nene.com, या वेबसाइटवर संपर्क साधता येऊ शकेल.
तेजाली कुंटे, शीतल कपोले