मागच्या महिन्यात २१ जून २०१५ ला ‘जागतिक योग दिन’ मोठय़ा दिमाखात जगभरात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने सर्वच वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या अशा अनेक प्रसारमाध्यमांनी या दिनाच्या निमित्ताने घडलेल्या कार्यक्रमांची चांगलीच दखल घेतली. जगभरात योगाच्या सुदृढ आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांवर अनेक चर्चासत्रे झाली. बऱ्याच ठिकाणी ‘सामूहिक योगासनांची’ प्रात्याक्षिके सादर केली गेली. दिल्ली येथील राजपथावर तर एकाच वेळी ३५९८५ लोकांनी एकाच वेळी योगासने करून नवा जगविक्रम भारताच्या नावावर नोंदवला!! त्याचप्रमाणे या दिनाचे औचित्य साधून अनेक नर्तकांनी ‘नृत्य आणि योगा’ या विषयावर आधारित कार्यक्रम सादर केले व अशा अनोख्या प्रयोगांनी ‘नृत्ययोग’ या विषयावर नव्याने विचार झाला, नृत्ययोगाची जाणीव अधिक सक्षम व्हायला मदत झाली!
योग व नृत्य या दोन्ही खरे तर संलग्न संकल्पना आहेत. नृत्याचे आदिदैवत असलेल्या भगवान शिव म्हणजेच नटराजाचे वर्णन ‘नृत्ययोगी’ असे केले जाते. कुर्मपुराणांत स्वत: शिवाने स्वत:चे वर्णन, ‘मी गिरिकंदात राहणारा योगी आहे आणि नादांत नृत्य साकारणारा नर्तकही आहे’ अशा समर्पक शब्दांत केले आहे; यावरूनच नृत्य व योगाची संकल्पना नृत्याच्या आद्यनर्तकापासूनच अस्तित्वात आहे याची प्रचीती येते. ‘युज्यते इति योग:’ अशी योगाची साधी व्याख्या आहे. ‘युज’ या धातूपासून बनलेल्या ‘योग’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जोडणारा, बांधून ठेवणारा’ असा होतो. मनाला शरीराशी, आत्म्याला परमात्म्याशी, कलेला भक्तीशी, कलाकारांना प्रेक्षकांशी जो जोडून ठेवतो, त्या सर्वामध्ये ‘योग’ सामाविष्ट आहे. सर्वसामान्य लोक बऱ्याचदा योगाकडे फक्त योगासनं, कठीण व्यायाम, प्राणायाम एवढय़ापुरतंच पाहतात. पण योग म्हणजे आपण आपल्या शरीर, मन, आत्म्याशी एकरूप होणं! त्यामुळे योग ही सर्वव्यापी संकल्पना आहे; योगासन, प्राणायाम हे केवळ ‘योग’ साधण्याचे काही मार्ग आहेत. त्याचप्रमाणे ‘नृत्य’ हादेखील योगाची अनुभूती देणारा एक उत्तम मार्ग आहे.
भौतिक आणि शारीरिकदृष्टय़ा तर नृत्य व योग यांमध्ये बऱ्याच अंशी समानता आढळते. साचेबंद, लयदार शारीरिक हालचाली, शरीरावर व श्वासावर ठेवावे लागणारे नियंत्रण, विविध शारीरिक आकृतीबंध (पॉस्चर) अशा अनेक गोष्टी नृत्य व योगामध्ये आवश्यक असतात. परंतु या बाह्य़ समानतेच्या पलीकडे मानसिक व आध्यात्मिक पातळीवर नृत्य व योग यांमध्ये कमालीचे साधम्र्य आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योगामुळे आणि नृत्यामुळे मिळवता येतं; परंतु योगाचा खरा उद्देश किंवा फायदा आहे की, शरीर व मनाच्या मर्यादा, समस्यांवर मात करून त्यावर विजय मिळवणं!!.. योग स्वत:ला या मर्यादांपलीकडे जाण्याची इच्छा, बळ द्यायला मदत करतो.. तसंच नृत्यामध्ये देखील बऱ्याचदा शारीरिक, मानसिक मर्यादांवर मात करून नर्तक स्वत:ला अजमावतो व एका वरच्या पातळीवरच्या आनंदाची अनुभूती मिळवतो.. योग ही करण्याची गोष्ट नाही आहे तर ‘बनण्याची’ गोष्ट आहे. आपल्या प्रत्येक कामात योग साधणे शक्य आहे. ‘योग’ ही केवळ क्रिया नाही, तर तो आपल्या अंगी बाळगायला हवा असा एक गुण आहे. योगासनं नियमित करणं, ‘योग्य’ प्रकारे करणं, चांगला विचार आणि आचार करणं असे अनेक योग साधण्याचे मार्ग आहेत. त्याचप्रमाणे ‘नृत्य’ करणं हादेखील एक सक्षम मार्ग आहे; ज्यामुळे जे ‘योग’ या संकल्पनेत अभिप्रेत आहे अशी मनाची, शरीराची व आत्म्याची एकरूपता, मनाला व शरीराला लागणारी शिस्त, नृत्यातून म्हणजेच शरीराच्या माध्यमातून प्रकट केलेला चांगला विचार आपण साधू शकतो.
योगामध्ये देखील पंचेंद्रियांवर ताबा मिळवणे हे एक ध्येय असते; तसेच नृत्यातूनदेखील पंचमहाभूतांनी बनलेल्या आपल्या शरीरावर, पंचेंद्रियांवर ताबा मिळवता येऊ शकतो. जेव्हा आपल्याला ‘योग’ साधता येतो, तेव्हा आपण आपोआपच मनाने स्थिर, वाईट विचारांपासून दूर होतो. एखाद्या गोष्टीकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्य केंद्रित करता येऊ शकते आणि आत्मिक आनंदाची प्रचीती येते. त्याचप्रमाणे नृत्यामध्ये भान विसरून आपण जेव्हा तल्लीन होतो तेव्हा याच आत्मिक आनंदाची अनुभूती नर्तक/ नार्तिका तसेच नृत्यात तल्लीन झालेल्या प्रेक्षकांना मिळते!!
नृत्य व योग यांमधील साधम्र्यामुळे ‘नृत्ययोगाच्या अवलंबाने मोक्षा’पर्यंत जाण्याची कल्पना यांवर आधारित विविध कार्यक्रम योग दिनाच्या निमित्ताने सादर झाले. ‘संस्कार भारती’ या संस्थेने ‘मोक्ष’ या नावाने पुणे, डोंबिवली, नाशिक इ. ठिकाणी अनेक नर्तकांना घेऊन नृत्याचे कार्यक्रम सादर केले आणि असा अनोखा उपक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.. पुण्यामध्ये बालगंधर्व नाटय़गृहात ७ गुरू व त्यांच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कथ्थक नृत्यांगना ‘नेहा मुथियान’ यांनी त्यांच्या अनुभवाविषयी सांगताना म्हटले की, ‘या कार्यक्रमाच्या निमित्ताने नृत्ययोग या संकल्पनेवर सर्वानी विचार करून विविध प्रकारे सादरीकरण केले. ‘मन, शरीर व आत्म्याला एकरूप करून सर्वोच्च स्थिरतेची, आनंदाची पातळी गाठणं म्हणजेच योग’ या संकल्पनेवर बहुतांशी सादरीकरणं केली गेली. आम्ही ‘केओस टू कोरस’ असा विषय घेतला होता. आजकालच्या जमान्यात, इतक्या स्पर्धात्मक युगात ‘केओस’ म्हणजेच सर्व गोंधळातून जर कोरस म्हणजे शरीर, मन, आत्म्यातील एकरूपता, मनाची स्थिरता साधायची असेल तर कुठल्याही गोष्टीचा ध्यास, साधना आणि आराधना महत्त्वाची ठरते. शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून कसं या स्थितीपर्यंत पोहोचता येऊ शकतं, हे दाखवण्याचा आम्ही आमच्या नृत्यसादरीकरणातून प्रयत्न केला. तसेच या कार्यक्रमांत रूप-रंग नसलेल्या आत्म्याला, ठरावीक रंग-आकार असलेल्या शरीराशी एकरूप करताना मनावर नियंत्रण असणं कसं आवश्यक ठरतं असादेखील एक विचार मांडला गेला. तसेच मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी रथरूप शरीर, पंचेंद्रिये म्हणजे वाहक आणि मनाला ‘सारथी’ केलं तर त्यांच्या साहाय्याने कसं हे साध्य होऊ शकतं असा विचारही नृत्यप्रस्तुतीतून मांडला गेला. यानिमित्ताने शास्त्रीय नृत्यशैलींच्या सादरीकरणातून असे प्रगल्भ विचार व कलाकृती सादर झाले. तसेच ‘संस्कार भारतीच्या’ डोंबिवली विभागाच्या नृत्य विभागप्रमुख असलेल्या कथ्थक नृत्यांगना वृषाली दाबके यांनीदेखील डोंबिवलीमध्ये ६ गुरू व एकूण ४० नर्तकांना घेऊन ‘मोक्ष’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘नृत्ययोग’ व ‘मोक्ष’ या संकल्पनेबद्दल आणि कार्यक्रमाच्या अनुभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ‘नृत्य आणि योग या दोन्हीला सक्षम आध्यात्मिक बैठक आहे. योगामध्ये नमूद केलेले भक्तियोग, क्रियायोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग हे चारही प्रकार नृत्यसाधनेतून साधता येतात. नृत्यात सादर केल्या जाणाऱ्या विविध भक्तीपर आधारित भजनं, काव्य, प्रार्थना यातून भक्तियोग, गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानातून ज्ञानयोग, नृत्य करताना जागृत झालेल्या सर्व आतंरिक चक्रांतून मिळालेल्या ऊर्जेचा वापर करून क्रियायोग आणि ‘नृत्य’ म्हणजेच शारीरिक हालचालींतून आनंदप्राप्ती करून देणारा कर्मयोग अशा चारही योग-प्रकारांची अनुभूती नृत्यातून येते आणि जेव्हा या चारही योगांचा मिलाफ होतो तेव्हाच मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग दिसायला लागतो. तसेच ‘गुरुतत्त्व’ हादेखील नृत्य व योगामधील भक्कम पाया आहे. जो आपल्याला या चारही योग-प्रकारांकडे व अंतिमदृष्टय़ा ‘आनंदयोगाकडे’ जाण्यास आवश्यक ठरतो. योग म्हणजे मन, काया आणि वाचा यांचे संतुलन! नृत्यातूनदेखील नृत्यसाधक हेच संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. नृत्ययोग म्हणजेच ‘नृत्य व नर्तकाची’ एकरूपता- अनेक ज्येष्ठ नृत्यगुरू नृत्याशी इतके एकरूप होतात की नृत्य हा त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनतो आणि तेव्हा ‘नृत्ययोग’ साध्य होतो असे म्हणता येऊ शकते. तसेच ‘लयतत्त्व’ हेदेखील नृत्य व योगामध्ये समान आहे. जर ही लय बिघडली तर आयुष्याचे तंत्र बिघडते, तसेच नृत्यात लय सांभाळता आली नाही की नृत्य ‘बेताल’, निरस होऊन जाते.. ‘मोक्षप्राप्तीसाठी’ अष्टांग योगाचा अवलंब कशा प्रकारे करता येऊ शकतो, या मूळ संकल्पनेवर आधारित शास्त्रीय नृत्यशैलींच्या माध्यमातून विविध सादरीकरणं झाली’. खऱ्या अर्थाने नृत्याचं आराध्य दैवत असलेल्या, योगेश्वर, नृत्ययोगी ‘नटराजाला’ या सर्व नर्तकांनी नृत्यपुष्पे अर्पण केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
नृत्य आणि योगामध्ये काही मानसिक, शारीरिक नियमांचे पालन करणंही आवश्यक असतं, ज्याचा उपयोग आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला आणि आयुष्यात विविध बाबतीत सुसूत्रता आणण्यास होऊ शकतो. खरं तर नृत्यसादरीकरणामध्ये नेहमीच नृत्य आणि संगीत एकत्रित पाहिलं जातं; परंतु नृत्य आणि योग या दोन्ही गोष्टी बाह्य़ संगीताच्या आधाराशिवायही केल्या जाऊ शकतात. कारण श्वासाच्या लयीबरोबरच एक आंतरिक संगीत नृत्य आणि योगामध्ये आपली साथ देत असतं; त्याच्या तालावर आपण लयबद्ध हालचाली करू शकतो. आणि हे करत असताना एका आंतरिक, आत्मिक आनंदाचा-आनंद्योगाचा आपण अनुभव घेऊ शकतो. या सर्वच गोष्टी बघता नृत्य आणि योग या संकल्पनांचा घनिष्ठ संबंध दिसून येतोच आणि ‘नृत्ययोगाची’ संकल्पना अधिक व्यापक व स्पष्ट होण्यास मदत होते. जसा योग हा विचार आहे, केवळ कृती नाही.. तोच विचार नृत्ययोगामध्ये साधण्याचा नृत्यसाधकाने प्रयत्न केला पाहिजे. ‘योग दिन’ सादर करणं ही स्तुत्यच गोष्ट आहे, परंतु जर त्याचा अवलंब दैनंदिन वापरात केला तरच त्याला अर्थ प्राप्त होईल आणि ‘योग’ ही एक जीवनशैली बनवणं शक्य होईल. त्याचप्रमाणे नृत्यसाधकाने नृत्याची, कलेची साधना, आराधना नियमित आणि नित्यनेमाने, संपूर्ण एकाग्रतेने आणि चित्त केंद्रित करून केली तर ‘नृत्ययोग’ साधता येऊ शकतो.. केवळ एक दिवस करण्याची ही गोष्ट नसून नियमित विचारात, आचरणात आणण्याचं हे ‘नृत्ययोग तत्त्व’ आहे जे सात्त्विक आनंद आणि समाधानापर्यंत आपल्याला घेऊन जातं..’
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा