वास्तववादी – ‘द दारिओ फो शो’

मुंबईत नुकतीच इटालियन नाटककार दारिओ फो यांची ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली. रवी शर्मा दिग्दर्शित हे दीर्घाक दिल्लीच्या नाटय़भारती या संस्थेने हिंदी भाषेत सादर केले.

मुंबईत नुकतीच इटालियन नाटककार दारिओ फो यांची ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली. रवी शर्मा दिग्दर्शित हे दीर्घाक दिल्लीच्या नाटय़भारती या संस्थेने हिंदी भाषेत सादर केले.

भ्रष्ट समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारी आणि वास्तवाला भिडणारी नाटकं ते रचतात. एक मजेशीर उघडा-नागडा, काही वेळा असभ्य वाटेल असा विनोदी फार्स आपल्यासमोर सादर करतात. बुद्धिवाद्यांबरोबरच त्यांची नाटकं सर्वसामान्यांनाही कळणारी असतात. १९९७ साली साहित्यातलं नोबेल पारितोषिक मिळवणारे असे हे इटालियन नाटककार म्हणजे दारिओ फो. १९५८ ते २००९ अशी अर्धशतकी कारकीर्द गाजवणारे ते केवळ लिहीत नाहीत तर-ते नट आहेत, विदूषक सोंगाडय़ा, दिग्दर्शक, नाटककार आहेत आणि क्रियाशील कार्यकर्तासुद्धा. जगात सगळ्यात जास्त रंगमंचावर सादर झालेल्या नाटककारांपैकी ते एक आहेत. सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य करणारी फार्सिकल नाटकं त्यांनी लिहिली. त्यांची बायको (नटी-लेखिका-कार्यकर्ती) प्रँका रॅमे हिच्या साथीनेही त्यांनी महिलांविषयी खूप लिहिलंय. ते दोघे मिळून इटलीत एक छोटीशी नाटक कंपनीही चालवत असत. त्यांच्या बायकोचं २०१३ साली निधन झालं आणि फो हे आता ८९ वर्षांचे आहेत. वयोमानानुसार आता ते कार्यरत नसले तरी त्यांनी केलेलं लिखाण अद्यापही नाटककारांना आणि प्रेक्षकांनाही भुरळ घालतं.   
नुकतीच मुंबईत ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली. रवी शर्मा दिग्दर्शित हे दीर्घाक दिल्लीच्या नाटय़भारती या संस्थेने हिंदी भाषेत सादर केले.  
कॉमिडिया डेलआर्टे हा इटलीमध्ये १६ व्या शतकात उदयास आलेला नाटय़प्रकार. चेहऱ्यावर मुखवटे चढवून यातील पात्रे नाटकातील प्रसंग फुलवतात. या नाटय़प्रकाराचा प्रभाव फ्रेंच पॅन्टोमाइम आणि आधुनिक स्लॅपस्टिक कॉमेडीवरही दिसून येतो. दारिओ फोची नाटकं ही तो कुठेही सादर करत असे, रंगमंचावर आणि पार्कीगच्या जागेतसुध्दा. परंतु, सादर करत असे म्हणण्यापेक्षा ती कुठेही सादर होऊ  शकतात, असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. त्यामुळे या नाटकांमध्ये कमीतकमी नेपथ्याचा वापर करून मोकळ्या जागेचा किंवा रंगमंचाचा जास्त वापर केला जातो. तसेच प्रकाशयोजनेचाही मर्यादित वापर यामध्ये पाहावयास मिळतो. दारिओ फोच्या नाटकांना साधारणपणे तो लाइव्ह संगीत देतो. म्हणजे कधीकधी रंगमंचावरील पात्रच काही वाद्यं वापरतात. ‘वच्र्युअस बग्लर’सारख्या नाटकात ते तो करत असे. परंतु येथे सादर झालेल्या प्रयोगामध्ये लाइव्ह संगीत नसलं तरी पाश्चात्त्य धाटणीचं संगीत आहे. त्यामुळे त्यातील प्रसंग आणखीन रंगत आणतात. यातील पात्रेही अपेक्षेपेक्षा जास्त शारीरिक हालचाली आणि हावभाव करतात. स्टाइलाइज कॉमेडीचाच हा एक प्रकार. त्यामुळे हा नाटय़प्रकार कालसुसंगत वाटतो. ‘द ओपन कपल’चा विषय आणि बाज वेगळा असला तरी यामध्येही संगीत, प्रकाश आणि नेपथ्याचा वापर मर्यादितच आढळतो.
Untitled-1‘वच्र्युअस बग्लर’ हे नाटक दारिओ फो यांनी १९५८ साली लिहिलं. तो एक फार्स आहे. एक चोर शहरातील प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करायला शिरतो. आपण ज्या घरात आलो आहोत तिथूनच फोन करून तो आपल्या बायकोशी गप्पा मारतो. चोर असला तरी आपण कुठे जातो, काय करतो हे न लपवता सर्व माहिती बायकोला देत असतो. आत्ताही फोनवरून बायकोला सर्व सांगत असताना, त्या घराचा मालक तिथे येतो आणि चोर लपण्यासाठी एका घरातील जुन्या घडाळ्याचा आधार घेतो. मालकासोबत त्याची प्रेयसी असते. मालक आणि प्रेयसीमधील संभाषण सुरू असताना घडय़ाळाचे टोले वाजतात आणि त्या जुन्या घडाळाचा पेंडोलमचा मार लागल्याने चोर बाहेर येतो. त्याला पाहून मालक आणि प्रेयसी घाबरतात. आता आपली चोरी पकडली जाणार आणि बायकोला सगळं कळणार म्हणून मालक हे प्रकरण लपवण्यासाठी चोराला विविध प्रलोभनं देत असताना चोराच्या बायकोचा पुन्हा त्याला फोन येतो. फोनवर स्त्रीचा आवाज आल्यामुळे तिचा नवऱ्यावर संशय येतो. आपल्या नवऱ्याचे कुणा परस्त्रीसोबत संबंध आहेत आणि तो आपल्यापासून ते लपवत आहे यावरून ती नाराज होते. इतक्यात अचानक घरी मालकाचीच बायको तिथे दाखल होते. आता बायकोपासून आपलं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी चोर आणि प्रेयसी हे नवरा-बायको असल्याची थाप मालक बायकोला मारतो. त्यावर मालकाच्या बायकोचा विश्वास बसतो न बसतो तोच चोराची बायकोही तिथे दाखल होते आणि गोंधळ आणखीनच वाढतो. आता ही दुसरी स्त्री कोण, असा प्रश्न मालकाच्या बायकोला पडला असताना, चोराला दोन बायका असल्याचं मालक आपल्या बायकोला पटवून देतो. एकमेकांपासून ही सर्व लपवाछपवी सुरू असतानाच एक नवीन अडचण उभी राहते. मालकाच्या बायकोचा प्रियकरही तिथे दाखल होतो. आता हे नवीन लफडं चोराच्या लक्षात येतं. तेव्हा हा माझा प्रियकर नाही हे सिद्ध करण्यासाठी मालकाच्या बायकोची जी केविलवाणी धडपड चालते ती हसवणारी आहे आणि अस्वस्थ करणारीही. इतका वेळ चोरासोबत कठोर वागणारी मालकाची बायको अचानक नरमते आणि घरातील मौल्यवान वस्तू आपणहून चोराच्या बॅगेत भरते. परंतु एका क्षणी एकामागोमाग घरात दाखल झालेली ही सर्व पात्रे समोरासमोर येतात आणि एकच गोंधळ उडतो. प्रत्येक नव्या गोष्टीबरोबर ते जास्त उघडे पडत जातात, अडकत जातात. या गोंधळात चोर आणि त्याची पत्नी आपल्याला या प्रतिष्ठित लोकांच्या भानगडीत पडायचेच नाही असं ठरवून चलाखीने घराचे दिवे बंद करून कसलीच चोरी न करता तिथून पळ काढतात. पण त्या गडबडीत एक दुसरा चोर तिथे शिरतो. घरातील मौल्यवान वस्तूंनी भरलेली आयती बॅग पाहून तो खूश होतो, पण त्याचा आनंद फार काळ टिकत नाही. मालक, त्याची बायको आणि त्यांचे अनुक्रमे प्रेयसी व प्रियकर यांच्या तावडीत तो नवीन चोर सापडतो. एक चोर तर पळून गेला पण आता हा दुसरा चोरसुद्धा आपल्या संबंधांची वाच्यता बाहेर जाऊन समाजात करणार या भीतीने प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे गोंधळलेला चोर स्वत:ला गोळी मारून घेऊन आत्महत्या करतो आणि नाटक तिथेच संपतं. सत्य कायमचं दडपलं जातं. तासभर धिंगाणा घालणाऱ्या दीर्घाकाचा हा असा-सुन्न करणारा शेवट होतो. नाटकात थिल्लरपणा आहे. तरीदेखील डोकं घरी ठेवून बघण्याचं हे नाटक नव्हे. या नाटकात समाजातील विषमतेवर, स्त्री-पुरुष बाह्य़ संबंधांवर भाष्य आहे, वरच्या समाजात असलेला दांभिकपणा आहे, म्हणूनच वरवर विनोदी वाटणारं हे नाटक विचार करायला भाग पाडतं. नाटकातील पात्रांना दिलेल्या मुखवटय़ांमुळे आणि विशिष्ट वेशभूषेमुळे नाटकाची रंगत आणखीनच वाढते. मुखवटय़ांमुळे चेहऱ्यावरील कुठल्याही भावनांचा अर्थ समोरच्याला लागत नाही, हीच गत सध्या आपल्या समाजाची झाली आहे. आपण वागत असतो एक आणि आपल्या मनात काहीतरी वेगळंच असतं. पाच दशकांपूर्वी लिहिलेलं हे नाटक आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतं. पण ते कटू सत्य कुठलीही भाषणबाजी न करता आपल्यासमोर माडण्यात ते यशस्वी होतं, हे विशेष.   
‘द ओपन कपल’ हे १९८३ साली लिहिलेलं नाटक. हा दिर्घाक, पुरुष आणि स्त्रीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. स्त्री-पुरुषांचे विवाहबाह्य़ संबंध हा फार पूर्वीपासूनच चवीने चर्चीला जाणारा विषय. नाटकातील नवरा आपल्या बायकोचा सर्व प्रकारे आदर करतो. परंतु आपली शारीरिक गरज भागवण्यासाठी तो नेहमीच नवनवीन स्त्रियांच्या शोधात फिरत असतो. विशेष म्हणजे स्वत:पेक्षा वयाने बऱ्याच लहान असणाऱ्या. या गोष्टीला विरोध करणाऱ्या आणि सतत आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीलाही तो ‘ओपन कपल’ ही संकल्पना अंगीकारण्यास सांगत असतो. परंतु तिला ते पटत नसतं. एका ठरावीक काळानंतर त्यांच्या मुलाला आई-वडीलांमधील ही गोष्ट माहीत पडते. तो वडिलांना याबाबत काही बोलत नाही, परंतु खूप मोकळेपणाने आपल्या आईला स्वत:साठी नवीन साथीदार शोधण्याचा सल्ला देतो. खूप विचाराअंती आणि नकळत ती एका तरुण अणुवैज्ञानिक शास्त्रज्ञाच्या प्रेमात पडते. तो तरुण, हुशार, कलेशी बांधिलकी सांगणारा असतो. त्याच्या सर्व गोष्टींना ती भुलते. केवळ शारीरिक ओढीच्या पुढे एक वेगळं नातं त्यांच्यात निर्माण होतं. एक दिवस हे सर्व ती आपल्या पतीला सांगते तेव्हा मात्र त्याला ते पचनी पडत नाही. तो अस्वस्थ होतो. आपल्या पत्नीला मिळालेल्या सर्वगुणसंपन्न साथीदाराबाबत त्याच्या मनात द्वेश निर्माण होतो. आपल्या हातून बायको निसटतेय हे त्याला सहन होत नाही आणि तो तिच्याकडे अचानक शारीरिक संबंधांची मागणी करायला लागतो. पण आता बायको या गोष्टीला तयार नसते. या गोष्टीचा त्याला राग येतो आणि तो बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या करण्याची धमकी देतो. बायको घाबरते आणि हे सर्व खोटं, कवीकल्पित असल्याचं सांगते. यावर नवरा खूश होऊन आपणही खोटी धमकी देत असल्याचं सांगतो. परंतु अचानक पत्नीचा तोच प्रियकर घरी येऊन ठेपतो आणि नवऱ्याला मोठा धक्का बसतो. तो बाथरूममध्ये जाऊन खरोखरच आत्महत्या करतो. या प्रसंगावर नाटक संपतं.
स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या अतिशय प्रभावी नाटकांमध्ये याचा समावेश होतो. नाटकातील बायको ही नवऱ्याशी, कधी स्वत:शी तर कधी प्रेक्षकांशी संवाद साधते. सुरुवातीला आपल्या बायकोला मागास ठरवणारा नवरा स्वत:वर तो प्रसंग ओढवताच मात्र सर्व त्राण गमावून बसतो. इतके दिवस आपला नवरा असंख्य स्त्रियांसोबत असताना तिच्या मनाला काय वाटत असेल याची काडीचीही पर्वा न करणारा नवरा आपली बायको एकासुद्धा परपुरुषासोबत आहे हे स्वीकारण्यास मात्र तयार होत नाही. या पुरुषी मानसिकतेमध्ये तीन दशकांनंतरही बदल झालेला नाही. नाटक लिहिलं गेलं तेव्हा ‘ओपन कपल’ ही संकल्पना कदाचित बोल्ड वाटली असेल पण आजही पुढारलेल्यांना ती कितपत मान्य होईल याबाबत शंकाच आहे. म्हणूनच दारिओ फो यांचं लिखाण काळाच्या पुढचं ठरलं आणि त्याला जगमान्यताही मिळाली.  
जगातील विकसित देशात आणि भारतीय समाजातही या सर्व गोष्टी सर्रास चालतात. पण त्यावर खुलेपणाने भाष्य केलं जात नाही. स्वत:ला मॉडर्न म्हणवणारेही आतून तेच बुरसटलेले विचार घेऊन जगत असतात. म्हणूनच या दोन दीर्घाकांच्या माध्यमातून हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी शर्मा यांनी केला आहे. अलीकडे आलेलं ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’, हे नाटक लोकांना आवडलं. त्यामुळे या दबलेल्या गोष्टींवर आपल्या देशातही मोकळेपणाने बोलायला सुरुवात झालेली आहे, हे इथे नमूद करायला हवं. अशी नाटकं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टींवर खुलेपणाने चर्चा होण्यास हातभारच लागेल यात शंका नाही.

प्रयोगशील दिग्दर्शक
रवी शर्मा हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. गेली चाळीस वर्षे रंगभूमी, चित्रपटांत काम करणारे शर्मा मायकल चेकाव्ह, अ‍ॅस्टाला यांची अभिनय पद्धती शिकवतात. या दोन नाटकांच्या तालमीत आणि वर्कशॉपमध्ये कानपूर, कॅनडा आणि इंग्लंडमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. जगप्रसिद्ध ‘हॅम्लेट’चं उर्दूमध्ये रुपांतर त्यांनी केलं असून ते पारसी फॉर्ममध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. शेक्सपीअरला पारसी स्टाइलमध्ये फार कुणी केलेलं नाही, त्यामुळे हा प्रयत्न वेगळा आणि प्रयोगशील ठरेल व नाटय़प्रेमीना तो आवडेल असा त्यांना विश्वास आहे.
‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ या दोन्ही नाटकांच्या मुंबईतील पहिल्याच प्रयोगाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तरीही अधिकाधिक प्रयोग करण्याची शर्मा यांची इच्छा आहे. मुंबईत प्रयोगशील नाटकासाठी जागा मिळणं ही कठीण गोष्ट असल्याची खंतही शर्मा बोलून दाखवतात. दिल्ली, चंदिगड, पटियाला, कुरूकक्षेत्र, उदयपूर येथे होणाऱ्या या नाटकांच्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांना आशा आहे.

 

– प्रशांत ननावरे

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dario fo plays

Next Story
कलाजाणीव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी