05 July 2020

News Flash

फेमिनिझमच्या बुरख्याआडचा मुखवटा

महिला सक्षमीकरणाचं नाव घेत ‘व्होग’ने प्रदर्शित केलेला दीपिकाचा व्हिडीओ म्हणजे फेमिनिझमचा बुरखा आहे.

| April 10, 2015 01:40 am

महिला सक्षमीकरणाचं नाव घेत ‘व्होग’ने प्रदर्शित केलेला दीपिकाचा व्हिडीओ म्हणजे फेमिनिझमचा बुरखा आहे. त्याआड दडलेला आहे तो, मार्केटिंग फंडे राबविणाऱ्यांचा, स्त्रीवादाच्या चुकीच्या कल्पना बाळगणाऱ्यांचा मुखवटा.

गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साइट्सवरून दीपिका पदुकोनचा ‘माय चॉइस’ हा व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. २८ मार्च २०१५ रोजी तो यूटय़ूबवरून व्हायरल झाला आणि दोन-तीन दिवसांतच तो लाखो लोकांनी बघितला. हा व्हिडीओ ‘व्होग मॅगझिन’ने आपल्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त व्होग एम्पॉवर या कॅम्पेनअंतर्गत प्रसिद्ध केला होता.
‘वुमेन एम्पॉवरमेंट’ म्हणजेच ‘स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर लोकांनी विचार करावा, बोलावं, कृती करावी या हेतूने व्होगने हा व्हिडीओ तयार केला आणि मग यूटय़ूबवरून प्रदर्शित केला आहे. गंमत म्हणजे या व्हिडीओत दीपिका पदुकोन एकटीच नाही, तर देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या, नाव कमावलेल्या ९९ जणी या दोन मिनिटं ३४ सेकंदांच्या या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओमध्ये आहेत. त्यात दीपिकाबरोबरच सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा, लंच बॉक्सफेम नमरीत कौर आहे, फरहान अख्तरची बायको अधुना अख्तर आहे, फरहानचीच बहीण आणि पटकथालेखक झोया अख्तर आहे, होमी अदजानियाची बायको अनिता श्रॉफ आहे. या सगळ्या जणी एकानंतर एक आयुष्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याबद्दलची आपली मतं सांगत जातात; पण आज तो ओळखला जातो आहे, दीपिकाचा व्हिडीओ म्हणूनच.
या व्हिडीओत दीपिका आणि बाकीच्या सगळ्या जणी म्हणतात,
माय लाइफ, माय चॉइस,
माझ्या आयुष्यात मी काय करायचं याचा निर्णय मी घेईन. मी साइझ झीरो असावं की साइझ पंधरा ते मी ठरवीन. लग्न करायचं की नाही ते मी ठरवीन. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवायचे, की लग्नबाहय़ संबंध ठेवायचे, की ठेवायचेच नाहीत, ते मी ठरवीन. कुणावर तात्पुरतं प्रेम करायचं, की कुणात कायमचं गुंतायचं ते मी ठरवीन. स्त्रीवर प्रेम करायचं की पुरुषावर, की दोघांवरही, ते मी ठरवीन. घरी पहाटे चार वाजता यायचं, की संध्याकाळी सहा वाजता हा माझा चॉईस आहे इत्यादी इत्यादी इत्यादी..
या व्हिडीओत जे म्हटलंय त्याच्याशी मी सहमत आहे, मला ते सगळं पटलंय, असं म्हणण्यापासून ते हा सगळा भंपकपणा आहे, हा स्युडो फेमिनिझम आहे, मार्केटिंग गिमिक आहे, ही चक्क शाम्पूची जाहिरात आहे, हा व्होगचा प्रसिद्धी स्टंट आहे, अशी त्यावर टीकाही होते आहे.
गंमत म्हणजे या व्हिडीओपाठोपाठ ‘मेल व्हर्जन ऑफ माय चॉइस’ असाही व्हिडीओ प्रदर्शित केला गेला आणि त्यात या ९९ स्त्रियांच्या व्हिडीओत जे काही म्हटलं गेलं त्याला काऊंटर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यात पुरुष म्हणतात, माय बॉडी माय चॉइस, मी मला आवडणारे कपडे घालीन, तुला (स्त्री) आवडणारे नव्हेत. मला हवं तेव्हाच मी घरी परत येईन, तुला आवडेल तेव्हा नव्हे. मी घराबाहेर खूप काळ असलो, फोन उचलला नाही याचा अर्थ मी तुला फसवतो असा घेऊ नकोस. शेवटी हा व्हिडीओ म्हणतो- स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा मान राखला पाहिजे. आम्ही फसवणुकीला आणि व्यभिचाराला पाठिंबा देत नाही, देणारही नाही.
याशिवाय ‘हजबंड व्हर्जन ऑफ माय चॉइस’ असाही एक व्हिडीओ प्रदर्शित केला गेला आहे. त्यात मंत्रा नावाच्या रेडिओ जॉकी आणि टीव्ही अँकरने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मूळ ‘माय चाइस’ची त्यात उपस्थित केल्या गेलेल्या काही मुद्दय़ांची खिल्लीही उडवली गेली आहे. त्यात पुरुषांच्या ज्या गोष्टींवर स्त्रिया नेहमी टीका करतात, त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या पुरुषांच्या ‘माय चॉइस’ कशा असतात हे मांडलं आहे. उदाहरणार्थ मूळ व्हिडीओ म्हणतो, हॅविंग सेक्स बिफोर मॅरेज, ऑर आऊटसाइड मॅरेज, माय चॉइस. यावर ‘हजबंड व्हर्जन ऑफ माय चॉइस’ म्हणतो, आय लाइक युवर चॉइस!
दीपिकाच्या या व्हिडीओवर तिच्याच क्षेत्रातून, बॉलीवूडमधूनही प्रतिक्रिया येणं साहजिकच होतं. मुख्य म्हणजे तिथली प्रतिक्रिया विरोधातली आहे. सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर ‘माय चॉइस’बद्दल म्हणतात, माझ्याकडे स्त्रीत्वाची ताकद आहे, हे ठसवण्यासाठी मी लग्नाच्या आधी, लग्नबाहय़ असे लैंगिक संबंध ठेवणं हा माझा चॉइस आहे, असं कशाला सांगायला हवं? कल्की कोचलीन म्हणते, पुरुषांवर टीका करणं, आपण पुरुषविरोधी आहोत असं दाखवणं ही काही खरी स्त्रीवादी भूमिका म्हणता येणार नाही.
या व्हिडीओमधले मुद्दे बरोबर असले तरी यामधून विनाकारणच स्त्री विरुद्ध पुरुष असा सामना रंगवला गेला आहे. खरं तर स्त्री सक्षमीकरणाला प्रोत्साहन द्यायचं असेल, तर स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलायला पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलण्यासाठी या व्हिडीओमध्ये पुरुषांचाही सहभाग असणं आवश्यक होतं, असंही काही जणांचं मत आहे.
दीपिका पदुकोण बॉलीवूडमधली आघाडीची हिरॉइन असल्यामुळे हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला. त्यातून द्यायचा होता तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या, हे सगळं खरं; पण हे सगळं नेमकं कशासाठी होतं? त्यातून नेमकं काय साधायचं होतं?
वास्तविक या व्हिडीओमधून जो संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे, तो नवीन अजिबातच नाही. ‘माझ्या शरीरावर माझा अधिकार’ ही स्त्रीवादी चळवळीची जुनीच घोषणा आहे. तिला पाश्र्वभूमी आहे, ती आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना सगळीकडेच मिळणाऱ्या दुय्यमच नाही, तर अमानुष वागणुकीची. लग्न होईपर्यंत वडिलांची, भावांची, लग्नानंतर नवऱ्याची ती मालमत्ता असते, अशीच वागणूक स्त्रियांना दिली जाते. कुणाशी लग्न करायचं याचं स्वातंत्र्य तिला नसतं. कधी लग्न करायचं, मुळात ते करायचं की नाही याचंही तिला स्वातंत्र्य नसतं. वडिलांच्या, घराच्या प्रतिष्ठेला अनुसरून तिचं लग्न करून दिलं जातं. कायद्याने मुलीचं लग्नाचं वय १८ असलं तरी ग्रामीण भागात मुलगी वयात आली की, लग्न उरकण्याकडे कल असतो. मग त्याची सामाजिक- सांस्कृतिक, आर्थिक कारणं काहीही असोत.
लग्नानंतरही मूल हवं की नको, कधी हवं, याचा निर्णय तर सोडाच, गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ ठेवायचा की नाही याचा निर्णयही सगळं कुटुंब घेतं. स्त्री भ्रूण असेल तर त्याचं काय होतं ते सध्या स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात ती तफावत आहे, त्याची आकडेवारीच सांगते.
कायद्याने तिला संपत्तीत वाटा दिला असला तरी त्याबाबत काय घडतं ते उघड सत्य आहे. या सगळ्या मोठमोठय़ा गोष्टी झाल्या. त्याशिवाय शिक्षण घ्यायचं की नाही, कपडे कसे घालायचे याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही बहुतांश मुलींना-स्त्रियांना मिळत नाही.
शिक्षण नाही किंवा अपुरं, लहान वयात लग्न, कोवळ्या वयातच लादली गेलेली बाळंतपणं, घरातल्या जबाबदाऱ्या, पुरुषप्रधान व्यवस्थेचा दबाव, आर्थिक स्वातंत्र्य नसणं, घरात आणि समाजात पावलोपावली अनुभवायला मिळणारी लैंगिक असमानता या सगळ्याला आपल्या देशात वेगवेगळ्या पातळीवरच्या स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देत असतात. समाजाच्या तळच्या थरातल्या स्त्रीला आपला रोजगार नेऊन नवऱ्याच्या हातात द्यावा लागत असेल, तर दीपिका पदुकोनसारख्या उच्चस्तरीय स्त्रीच्या पातळीवर पुरुष अभिनेत्याला जास्त मानधन आणि स्त्रीला त्याच्यापेक्षा कमी अशा पातळीवरच्या शोषणाला बळी पडावं लागत असेल. शेतमजुरी करणाऱ्या स्त्रीला थेट बलात्काराला बळी पडावं लागतं, तर कापरेरेट पातळीवर काम करणाऱ्या स्त्रीला ‘सेक्शुअल हॅरेसमेंट अ‍ॅट वर्कप्लेस’विरोधात उभं राहावं लागतं.
या सगळ्या विरोधातल्या भूमिकेचा भाग म्हणून स्त्रीवादी चळवळीने ‘माझ्या शरीरावर माझा अधिकार’ ही घोषणा दिली. त्यामुळे दीपिकाच्या ‘माय चॉइस’ या व्हिडीओमध्ये भूमिका म्हणून नवीन काहीच नाही. दीपिकासारखी प्रथितयश अभिनेत्री असं काही तरी म्हणते तेव्हा त्याकडे लोकांचं लक्ष वेधलं जातं, चर्चा होते. मार्केटिंगचा हा फंडा राबवताना ‘व्होग’ने, दीपिकाने आणि या सगळ्याच मंडळींनी स्त्रीवादाचा म्हणजेच त्यांच्या भाषेत फेमिनिझमचा चक्क वापर केला आहे. दीपिका जणू अशा पद्धतीच्या भूमिका मांडणारी, ब्रॅण्ड फेमिनिझम आहे, अशा थाटात तिला पेश केलं आहे; पण हीच दीपिका तिच्या चित्रपटांमधून जेव्हा अगदी तिच्या चॉइसने म्हणू या हवं तर अंगप्रदर्शन करते तेव्हा तो तिचा चॉइस असण्यापेक्षा ती पुरुषप्रधान व्यवस्थेची मागणी असते, गरज असते. भारतात सिनेमा हा मुळात पुरुषांसाठी तयार केला जात असल्यामुळे त्यांना हवं असतं तसंच तिला (अर्थात कोणत्याही हिरॉइनला) मांडलं जात असतं. ‘माय चॉइस’ असं सांगणाऱ्या दीपिकाला चॉइस कशाकशामध्ये हवे आहेत, तर लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवायचे की नाही, लग्नबाहय़ लैंगिक संबंध ठेवायचे की नाही, घरी पहाटे चार वाजता परत यायचं की संध्याकाळी सहा वाजता यामध्ये.
या सगळ्यामध्ये ‘व्होग’ला अपेक्षित असलेलं महिला सक्षमीकरण नेमकं कशामध्ये आहे? हाच मुद्दा असेल तर दीपिकाच्याच क्षेत्रात महिला कलाकारांना पुरुषांपेक्षा कमी मानधन मिळतं त्या असमानतेबद्दल तिनं बोलायला हवं. कास्टिंग काऊचमधून मुलींचं जे लैंगिक शोषण होतं त्याबद्दल बोलायला हवं. तसं होत नाही, कारण हा व्हिडीओ पुरुषप्रधान व्यवस्थेला हवं आहे तेच बोलतो. पुरुष रात्रीअपरात्री घरी येतात. लग्नबाहय़ संबंध जोडतात. ते सगळं आम्हीपण करू. ते केलं म्हणजेच आम्ही स्त्रीमुक्तीवादी अशी मांडणी करणं हेच मुळात चुकीचं आहे.
हा व्हिडीओ म्हणतो, साइझ झिरो किंवा साइझ १५ हा माझा चॉइस आहे; पण मुळात हा सगळा खटाटोप ज्या ‘व्होग’ने केला आहे, ते एक फॅशन मॅगझिन आहे. अनेकींच्या मनात स्त्री शरीराचा आकार, वजन, रूप या सगळ्याचा मापदंड तयार करवण्यात या आणि अशा मासिकांचाच मोठा हातभार असताना त्यांच्या व्हिडीओमध्ये असली वचनं येणं हे ‘सौ चुहे खाकर..’ या म्हणीसारखंच आहे.
पण दीपिकासारख्या सेलेब्रिटी व्यक्ती जेव्हा असा व्हिडीओ करतात तेव्हा त्यांना रोल मॉडेल मानणारी तरुण पिढी हाच स्त्रीवाद, हाच फेमिनिझम असं मानायला लागते. वास्तविक आपल्या देशात १९७२ मधल्या मथुरा बलात्कार प्रकरणानंतर आपल्याकडे स्त्रीवादी चळवळ सशक्त होत गेली. स्त्रियांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिलं गेलं, कायदे बदलले गेले, वेगवेगळ्या तरतुदी झाल्या, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं जायला लागलं. स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न प्राधान्यक्रमावर आले. या सगळ्यामुळे वातावरण बदललं. आजही परिस्थिती पूर्ण बदललेली नाही, आव्हानं आहेतच, पण त्यांची तीव्रता कमी झाली आहे. काही प्रमाणात स्त्रिया मोकळेपणा अनुभवत आहेत, स्वत:ला हवं त्या पद्धतीने जगत आहेत. स्त्रीवादी चळवळीच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून त्यांना हा अवकाश प्राप्त झाला आहे; पण त्याचं त्यांना भान आहे का, याचं उत्तर दीपिकाने केलेला हा व्हिडीओ आहे.
वाढते बलात्कार, कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण, स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया, स्त्री-पुरुष असमानता हे आणि अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया रोज सामोऱ्या जातात आणि ते सगळं सोडून हा व्हिडीओ ज्या मुद्दय़ांची चर्चा करतो ती सगळी तथाकथित उच्चभ्रूंच्या आयव्हरी टॉवरमधली दु:खं आहेत असंच म्हणावं लागेल. म्हणूनच फेमिनिझमचा बुरखा पांघरून वावरणाऱ्यांचे मुखवटे आपण लक्षात घेतले पाहिजेत.
वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:40 am

Web Title: deepika padukone my choice video
Next Stories
1 दीपिकाच्या खांद्यावरून, चॉइस कुणाचा?
2 आक्षेप का असावा – चिन्मय मांडलेकर
3 स्वातंत्र्य असावं, स्वैराचार नसावा – युगंधरा वळसंगकर, गृहिणी
Just Now!
X