05 July 2020

News Flash

दीपिकाच्या खांद्यावरून, चॉइस कुणाचा?

दीपिकाच्या ‘माय चॉइस’ या व्हिडीओवरून बरीच चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मार्केटिंग, ब्रॅण्डिग करण्यासाठीच असतात हे आपण लक्षात घेतलं

| April 10, 2015 01:39 am

दीपिकाच्या ‘माय चॉइस’ या व्हिडीओवरून बरीच चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मार्केटिंग, ब्रॅण्डिग करण्यासाठीच असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

‘हो.. हो.. आम्हाला आमचे हक्क मिळायलाच हवेत. माय चॉइस, माय डिसिजन. पुरुषप्रधान व्यवस्था बदलायलाच हवी. बदलायलाच हवी. उठा..जागे व्हा.. ती दचकून उठली. अंग घामाने निथळत होतं. दोन मिनिटं ती तशीच सुन्न बसून राहिली. सुन्न की स्वस्थ माहीत नाही. हळूहळू नेहमीच्या सवयीचा आवाज कानावर पडताच भानावर आली. तिचं लक्ष घडय़ाळाकडे गेलं. बाप रे. उशीर झालेला निघायला हवं. दिवसभर कसले तरी विचार करत बसतो आपण आणि मग पहाटे ही असली स्वप्न.. सगळं पटापट आवरून ती कामावर जायला निघाली. नेहमीप्रमाणे रोजच्या मैत्रिणींचा/ गलका तिला भेटला. रोजच्या प्रवास गप्पासाठी काहींना काही विषय तर असतोच. आज तो विषय होता. ‘‘पाहिलास का गं तू तो व्हिडीओ’’ ‘‘दीपिकाचा गं.. मला तरी आवडला बाई. इम्पॅक्टफूल होता एकदम’’ ‘‘हो गं.. काय मस्त मांडलंय.. होतेच ए गळचेपी स्त्रियांची.. बरोबर बोललीये ती..’’ तेवढय़ात तिसरी म्हणाली, ‘‘चांगला आहे व्हिडीओ. पण काही काही गोष्टी उगाच वाटल्या. मला.. जरा अतीच..’’ तिसरीची री पुढे ओढत चौथी म्हणाली, ‘‘हो ना.. तेच तर, त्यात मांडलेली मतं. उच्चभ्रू स्त्रियांना पटणारी आहेत. आपल्या मध्यमवर्गीय स्त्रियांना कुठला गं इतका ‘चॉइस’..’’ हो.. तेच तेच दाखवलंय ना मग यात की आपल्याला ‘चॉइस’ मिळतच नाही. ‘‘कसला चॉइस हवंय गं तुला?’’ एक्स्टर्नल अफेअरचा? हं? यावर सगळय़ाच फिदीफिदी हसल्या. ती पण हसली. उगाच कळलंच नाही तिला ती का हसली. तिने खरं तर तो व्हिडीओ नव्हता पाहिला. त्यामुळे चर्चेत सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता. पण ती ऐकत मात्र होती. ‘चॉइस’, ‘निवड’ असंच काहीसं बोलणं चाललेलं यांचं. तसं म्हटलं तर आहे की मला माझं निवड स्वातंत्र्य हव्या त्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य, नोकरी करण्याचं लग्न.. अं.. लग्नाचं स्वातंत्र्य जरासंच आहे, पण आहे. स्वत:च्या विनोदावर उगाच खुदकन सहली.. तोपर्यंत तिचं स्टेशन आलं. उशीर झाला होता म्हणून पटापट चालत होती.. आपल्याच धुंदीत.. ‘काय हवंय अजून आपल्याला! जे मिळालंय त्यात खूश आहे मी. पण असं म्हटलं की ती माझ्यावर चिडते. म्हणते.. कशी गं तू अशी माझी मैत्रीण.. हे एवढंच हवंय तुला आयुष्यात? बाकी कसलीच गरज नाही? तुझ्या अस्तित्वाचं काय? तुझ्या मनाचं काय, त्यात दडलेल्या सुप्त इच्छांचं काय. खरं तर ना चूक आपलीच आहे, या आपल्या स्त्री समाजाची. स्वत:ला यांना ओळखताच येत नाही. पुरुषांनी आखून दिलेल्या डबक्यात डुंबत राहायचं आयुष्यभर आणि म्हणायचं इतका मोठा समुद्र मिळाल्यावर आणि काय हवं. स्त्रीत्वाच्या मोठेपणाची जाणीव होणार कधी तुम्हाला.. तिच्या या संवादाचा शेवट कायम आई-बहिणीच्या उद्धारानेच व्हायचं. मी मात्र भेदरलेल्या, विस्फारलेल्या डोळय़ाने तिच्याकडे पाहत बसायचे. त्या काही मिनिटांपुरती प्रेमात पडायचे मी तिच्या. तिच्यात दडलेला पुरुषच असा बाहेर यायचा.. कोणत्या तरी स्त्रीवादी संस्थेसाठी काम करते ती.. तिशी उलटून गेली तरी लग्न नाही करायचं म्हणते. आई-वडिलांपासून वेगळी राहते तसंही त्यांना ‘जड’च झालेली ती, असं तीच म्हणते.. तिची चॉइस.. आणि त्यांची ही.’ बसस्टॉपवर आलीसुद्धा ती.. तिचं तिलाच कळलं नाही. रांगेत तिच्यापुढे असलेल्या मुली गप्पा मारत होत्या.. ‘‘का गं. तुला का नाही आवडत तो व्हिडीओ.. चांगला होता.. वेगळा थॉट मांडलाय..’’ दुसरी थोडा तात्त्विक चेहरा करून म्हणाली, ‘‘अगं.. असं नसतं.. आता ही दीपिका पदुकोन आणि तो व्होग ब्रॅड दोघंही ज्या क्षेत्रातून येतात म्हणजे फॅशन आणि ग्लॅमरचं क्षेत्र यात स्त्रीला एक प्रदर्शनीय वस्तू म्हणूनच दाखवलं जातं ना.. तिच्या कोणत्या फिल्ममध्ये तिने स्त्री सक्षमीकरणावर भर दिलाय किंवा तसं ती जगते तरी आहे का सध्या? चित्रविचित्र कपडे फॅशनच्या नावाखाली घालून, मेकअपचा थर चढवून पेज थ्रीच्या लाइमलाइटमध्ये फिरणं यात कसली एम्पॉवरमेंट आलीये? मुळात व्होग आणि दीपिका पदुकोन या दोघांनी या स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलणंच विरोधाभासाचं आहे.’ बाप रे.. किती भरगच्च बोलली ही मुलगी.. तिची मैत्रीणही तिच्याकडे अशाच काहीशा नजरेने पाहत होती. ‘हं. तेही बरोबर आहे.’ असं काहीसा भाव तिच्या मैत्रिणीने तिला दर्शवला, पण मनात कुठे तरी ‘इतकावाईट नाहीये तो व्हिडीओ’ असंच काही तरी घोळवत ती पुढे सरकली. काय आहे त्या व्हिडीओत? आत्ता ऑफिसमध्ये जाऊन पाहायलाच हवं. या सोशल नेटवर्किंग साइट्स नावाच्या गुहेने तर सगळय़ांच्या मनाचे दरवाजेच खुले केले आहेत. ही फक्त फसली? ओळखलं म्हणजे झालं. किती पटापट मांडता येतात ना आपले विचार आपल्याला. इथे काही घडले की दुसऱ्या क्षणी तिथे मांडायचं. सगळं कसं सोप्पं करून ठेवलंय. विसाव्याची जागच जणू.. दमूनभागून इथे या विचाराचं ओझं रिकामं करा.. आणि मोकळय़ा मनाने (आणि डोक्याने) चालते व्हा.. ज्या गोष्टी फॅन्टसी वाटतात त्या प्रत्यक्ष करतो आपण इथे.. जाड, खोटय़ा विचारांचा मुखवटा घालून आपण आपल्यालाच फसवू शकतो इथे. मस्त ना? 

‘‘हं बोला.. कुठं जायचंय?’’
‘‘अं??’’
क्षणभर तिला कळलंच नाही काही. ‘‘बोला पटापट कुठं जाणार?’’ तिने पटकन स्टॉपचं नाव आठवलं आणि सांगितलं.. मला चॉइस आहे पण तिचे काय? तिला आहे? अचानक तिचं मन गावच्या त्या ‘दूर’च्या बहिणीकडे पोहोचलं.. काही वर्षांपूर्वी आपल्या घरी आली तेव्हा किती लहान होती. नुसती भिरभिरत्या नजरेने सगळं काही पाहत होती. जणू हे सगळं परत कधी पाहायला मिळेल या भावनेने.. त्यानंतर दोनच वर्षांत लग्न केलं तिचं.. तिला कुठे मिळाला चॉइस? किंबहुना निवड वगैरे असं काही असतं हे माहिती तरी होतं का तिला? तिने तिची निवड बोलून दाखवली असती तर आगाऊ, वाया गेलेली आम्हाला काळं फासणारी असं काही तरी म्हटलं गेलं असतं ना. तिला होईल का कधी तरी जाणीव की तिलाही चॉइस आहे? नवऱ्याच्या हो ला हो करण्यातल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आहे बाकीच्या गोष्टीत बाप रे. मीही बनते वाटतं फेमिनिस्ट.. कचकन ब्रेक बसला. तिचा स्टॉप आला तशी उतरून चालायला लागली. तेवढय़ात समोरच्या माणसाने धक्का दिला आणि चालता झाला..
‘‘अरे काय ही फालतूगिरी.. एकेकाला ना मुस्काटात द्यायला पाहिजे चांगली.. अं.. पण चुकून लागू शकतो ना धक्का. कशावरून मुद्दामच दिला. घाईत असेल तो. कळतंही नसेल त्याला की कळून वळत नसेल? काही गोष्टींवर कसं रिअ‍ॅक्ट व्हावं हे कळतच नाही ना आपल्याला आणि त्यावर आपण इतका विचार करत बसतो की प्रतिक्रिया देण्याची वेळ केव्हाच निघून गेलेली असते आणि तीव्रताही.. आपण आज फारच विचार करतोय नाही?’ ऑफिसमध्ये आल्या आल्या कामात बुडून गेली ती. व्हिडीओ बघायचाच राहून गेला. मॅडमशी बोलायला हवं यावर असं मनाशी ठरवत ती मॅडमकडे गेली. ‘काय गं.. आज काय काम काढलंस.’
‘असंच. आज जरा बोलावंसं वाटलं. वेळ आहे ना तुम्हाला?’
‘आहे ना.. बोल की.’
‘काही नाही अहो.. असंच.. म्हणजे हल्ली किती जागरूकता वाढत चाललीये ना स्त्रियांमध्ये. स्त्रीला जाणीव होतेय तिची नव्याने. तुम्ही पाहिला असेल ना तो व्हिडीओ दीपिकाचा?’
स्मित करत त्या म्हणाल्या ‘अच्छा ते होय.. तो पाहिला ना.. तांत्रिकदृष्टय़ा फारच छान आहे. पण एक सांगू का.. या सगळय़ा टॅक्टिक्ट्स आहेत बिजनेसच्या. व्होग काय किंवा आपल्या नेहमीच्या सीरियल्स काय, उत्पादनाचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी भावनांना हात घातला की तुमचं अर्धे काम फत्ते आणि बायकांच्या भावनांना साद घालणं तुलनेनं अधिक सोपं. आता तुला या व्हिडीओबद्दल अनेक प्रतिक्रिया ऐकायला वाचायला मिळाल्या असतील.. याचा अर्थ त्यांचा हेतू यशस्वी झाला. एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. यालाच ब्रॅण्ड प्रमोशन म्हणतात. आपण सतत चर्चेत राहणं महत्त्वाचं.. कसं आणि कितीपेक्षाही महत्त्वाचं. तू नोटीस केलंस तर तुला कळेल की या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनेक ट्रेण्ड येतात. कोणती तरी सेलिब्रिटी व्यक्ती येते. काही मांडते, पत्रं वगैरे लिहितात, गाणं बनवतात. व्हिडीओ बनवतात. असतीलही जेन्यूइन, पण नाही म्हटलं तरी स्टंटच असतो गं हा.. पब्लिसिटी स्टंट.. तू पाहिलास का व्हिडीओ?’
‘अं? भानावर येत म्हणाले, ‘अं.. म्हणजे नाही बघितला. पण पाहायचाय मला. चॉइस असणं महत्त्वाचं आहे बाईला असंच काहीसं आहे ना त्यात?’’
‘‘हो.. पण तू स्वत: बघ, ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीवरून मत बनवू नकोस. इतरांच्या आवडी-निवडीवरून स्वत:ची आवड ठरवू नकोस.. शेवटी आवड ठरवण्याचा चॉइस तुझाच नाही का?’’
‘‘मॅडम, तुम्हाला तर किती क्लीअर असेल ना तुमचा चॉइस.’’ काहीसं हसत मॅडम म्हणाल्या, ‘‘अं, असंच काही नव्हतं. पण क्लीअर करत गेले चॉइसेस स्वत: बनवत गेले.’’
‘‘म्हणजे खूश आहात ना तुम्ही. तुम्हाला हवं ते निवडलंत?’’
‘‘हं.. आपल्या निवडीची जबाबदारीही आपल्यावरच असते आणि त्याचे परिणामसुद्धा.. चला उशीर झाला.. कामाला लागूया.’’ केबिनमधून बाहेर जाताना तिला ती स्त्री दिसली. थकलेली बरंच काही भोगलेली. तरीही उभी असलेली. इतकं काही गमवायला लागत असेल तर कशाला हवी चॉइस वगैरे.. गावातली बहीण सुरक्षित असेल तिच्या संसारात तिच्या नवऱ्याबरोबर.. उगाच निवड वगैरे झेपलंही नसतं तिला. आता तर पुरता गोंधळ माजलाय हा डोक्यात.. भडिमार होतोय विचारांचा.. स्त्रीला स्वातंत्र्य हवंय.. म्हणजे काय? स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट असते का? ती तर आपसूकच सर्वाना उपजत मिळते. मग आधीच मिळालेल्या गोष्टी मागायच्या का? आणि निवडीबद्दल बोलायचं झालं तर ती प्रत्येकालाच असावी ना.. सगळय़ा घराचा आर्थिक भार एकटय़ाने सांभाळणाऱ्या बाबांना ती नसावी? घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या दादालासुद्धा आहेच ना आणि हो नाही करता करता पाहिलाच तो व्हिडीओ आणि सकाळपासून सगळे संवाद आठवले. विचारांची साशंकता अजूनच वाढली. त्यावर चर्चिले गेलेले विचार आठवले. आधुनिक असण्यापेक्षा पाश्चात्त्य वाटले ते विचार मला.. आपली फेमिनिझमची कल्पना स्री पुरुष समानतेची आहे. नात्यांची तिथली वीण इथल्या नात्यांना घालायला गेलो तर कसे चालेल.. खूप काही वाटत होतं आणि तरीही काहीच नाही.. स्त्री म्हणून आपण कायमच एका चौकटीत विचार करतो आणि ती तोडायची म्हणून दुसऱ्या चौकटीत जातो.. चौकट बदलते. तिने बराच ऊहापोह केला. हाताशी काहीच आलं नाही.
शेवटी एखाद्या गोष्टीचा विचार करून सोडून देण्याचा चॉइसही मला आहे. नाही का.. ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:39 am

Web Title: deepika padukone my choice video 2
Next Stories
1 आक्षेप का असावा – चिन्मय मांडलेकर
2 स्वातंत्र्य असावं, स्वैराचार नसावा – युगंधरा वळसंगकर, गृहिणी
3 स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचं भान महत्त्वाचं
Just Now!
X