08 July 2020

News Flash

भाजपाचा आपटीबार

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये शक्तिशाली भाजपा अगदी फुसका आपटीबार ठरली.

केजरीवाल यांनी सर्व स्थानिक मुद्दय़ांना प्राधान्य दिले होते.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

केंद्रातील सत्ता पाठीशी असताना आणि आहे – नाही ती सारी शक्ती पणाला लावलेली असतानाही एका महापालिकेएवढय़ाच आकाराच्या असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये शक्तिशाली भाजपा अगदी फुसका आपटीबार ठरली. मुळात महापालिकेसारख्या असलेल्या या निवडणुकीत सारी शक्ती पणाला लावण्याची वेळ भाजपावर यावी, यातच अरिवद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे यश दडलेले होते. या प्रचारादरम्यान गेल्या दीड महिन्यात केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांना उचकवण्याचे अनेकानेक प्रयत्न भाजपातील धुरीणांनीही करून झाले, त्यात अगदी पंतप्रधान मोदीही मागे राहिले नाहीत, हे विशेष. देशाच्या गृहमंत्र्यांनी तर थेट शाहिनबागेला धक्का बसेल असे मतदान करण्याचे आवाहन केले, प्रत्यक्षात धक्का बसला तो भाजपालाच. केजरीवाल यांना दहशतवादी, देशद्रोही सारे काही ठरवून झाले. पण ‘विकास’ या मुद्दय़ावर ही निवडणूक लढविण्यात भाजपाला आणि ‘विकासपुरुषा’लाही सपशेल अपयशच आले!

मोदी यांनी लोकसभेची पहिली निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर लढवली. दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विकासाच्या नावावर मते मागितली मात्र केंद्रस्थानी ठेवला तो राष्ट्रवादाचा मुद्दा. देशरक्षण आणि नवराष्ट्रवाद अर्थात धर्माच्या नावावर ध्रुवीकरण हीच खेळी राहिली. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर होता तर विरोधक मात्र चेहराहीन होते. भाजपाला तुफान बहुमत मिळाले आणि पुन्हा एकदा ‘विकासपुरुष’ ही मोदींची प्रतिमा राखण्यात भाजपाला  यश आले. मात्र गोची अशी की, नवी दिल्लीच्या निवडणुकीत मात्र विकास हा मुद्दा घेऊन निवडणुका लढविणे भाजपाला अशक्यच होते. केजरीवाल यांनी सर्व स्थानिक मुद्दय़ांना प्राधान्य दिले होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा वाढवून ती सामान्यांपर्यंत पोहोचेल हे कटाक्षाने पाहिले. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आणि वीज- पाणी यांना प्राधान्य दिले. सामान्यांच्या दृष्टिने पाहायचे तर केजरीवाल यांनी रोजच्या दैनंदिन समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. वीज- पाणी-नाले हे खरे तर पालिकेचे प्रश्न आहेत. त्याकडेच केजरीवाल यांनी लक्ष पुरवले. पंजाबमधील निवडणुकांच्या अपयशानंतर त्यांनी तोंड बंद ठेवून काम केले. सातत्याने होणाऱ्या टीकेला फारसे उत्तर देण्याच्या फंदात ते पडले नाहीत; सहकाऱ्यांनाही त्यापासून रोखले. परिणामी वाचाळतेमुळे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था तर भाजपावर आली. केंद्राची सत्ता हाताशी घेऊन गल्लीतली लढाई दिल्लीत लढण्याची नामुष्कीच भाजपावर आली. पंतप्रधानांनी यासाठी पायउतार व्हावे, एवढे महत्त्व या लढाईला नव्हतेच. पण त्यांनाही पर्याय नव्हता. कारण मोदी आणि नवराष्ट्रवाद एवढेच दोन पत्ते सध्या भाजपा नेटाने वापरते आहे. महाराष्ट्र, झारखंड दोन्ही ठिकाणी हे पत्ते सपशेल अपयशी ठरले. खरेतर यातून भाजपाने बोध घ्यायला हवा होता, पण तसे झाले नाही.. अखेरीस आपटीबार हेच भाजपाचे विधिलिखित ठरले!

महाराष्ट्रातील राजकारणाने दिलेली कलाटणी जशी महत्त्वाची ठरली आणि त्यातून विरोधी शिडात आत्मविश्वासाची हवा  भरली गेली, तद्वतच महत्त्व दिल्ली विधानसभा निवडणुकांना आहे. फारसे मोठे मुद्दे हाती नसले तरी प्रत्यक्षात लहान वाटणारी मात्र सामान्यांच्या दृष्टिने महत्त्वाची असलेली विकासकामेच तुम्हाला विजयश्री देऊ शकतात  आणि त्यासमोर धार्मिक ध्रुवीकरणही फोल ठरते हे या निवडणुकांनी दाखवून दिले. आता येणाऱ्या काळात पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू विधानसभा निवडणुका आहेत, तिथे विरोधकांना आता बळ मिळाले आहे. दिल्लीत मिळालेला धडा भाजपाने व्यवस्थित गिरवला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही आपटीबार ठरलेलाच असेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:06 am

Web Title: delhi election 2020 bjp couldnt win 2
Next Stories
1 भानावर आणणारे प्रतिबिंब
2 कृती पूर्वेकडे
3 सावधान!
Just Now!
X