ओट्स ब्राऊन राईस इडली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :
१ वाटी उडीद डाळ
२ वाटय़ा ब्राऊन राईस
२ वाटय़ा रोल्ड ओट्स
चवीपुरते मीठ

कृती :
१)उडीद डाळ आणि ब्राऊन राईस पाण्यात साधारण ६ ते ७ तास भिजत घालावे.
२)६-७ तासांनंतर पाणी निथळून टाकावे. आणि दोन्ही वेगवेगळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना थोडे पाणी घालावे.
३)डाळ-तांदूळ वाटून झाले की रोल्ड ओट्स १० मिनिटे वाटीभर पाण्यात भिजत घालावे. १० मिनिटांनी बारीक पेस्ट करून घ्यावे.
४)मोठे खोलगट स्टीलचे किंवा काचेचे भांडे घ्यावे. त्यात वाटलेला तांदूळ, वाटलेली डाळ आणि वाटलेले ओट्स घालावे. एक टीस्पून मीठ घालावे.
५)वाटलेले मिश्रण झाकून उबदार जागी आंबण्यासाठी ठेवावे. साधारण १० ते १२ तासांत पीठ आंबेल.
६) मिश्रण आंबले की किंचितशी चव पाहून मिठाचा अंदाज घ्यावा. लागल्यास मीठ घालावे. मिक्स करावे. पीठ जर खूप दाट वाटत असेल तर थोडेथोडे पाणी घालून सारखे करावे.
७)इडलीपात्राला तेल लावून घ्यावे. त्यात इडलीचे पीठ घालून स्टँड तयार करावा. इडली कुकर घेऊन त्यात तळाला २ इंच भरेल इतपत पाणी घालावे.
८)पाणी उकळायला लागले की इडली स्टँड आत ठेवावा. झाकण लावून १२ ते १५ मिनिटे मोठय़ा आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करावा आणि ५ ते ७ मिनिटांनी इडली स्टँड बाहेर काढावा. चमच्याने किंवा सुरीने इडल्या सोडवून घ्याव्यात.
अशा प्रकारे उरलेल्या पिठाच्या इडल्या बनवून घ्याव्यात.
गरम इडल्या सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर सव्र्ह कराव्यात.

ओट्स उपमा
साहित्य :
१ वाटी ओट्स
२ वाटय़ा गरम पाणी
१ लहान कांदा, बारीक चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, बारीक चिरलेला
१/४ वाटी गाजर, मध्यम तुकडे
२ चमचे स्वीट कॉर्न
१/४ वाटी मटार

फोडणीसाठी –
२ चमचे तेल, १/२ चमचा उडीद डाळ, १ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ हिरव्या मिरच्या, ६-७ कढिपत्ता पाने
१/४ चमचा किसलेले आले
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती :
१) कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ घालून गुलाबी होईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, कढिपत्ता, आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
२)फोडणीत कांदा, मटार आणि गाजर घालून कांदा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर टॉमेटो आणि स्वीट कॉर्न घालून मिनिटभर परतावे.
३)ओट्स घालून नीट मिक्स करावे. मंद आचेवर ठेवावे. नंतर दीड कप गरम पाणी आणि मीठ घालून मिक्स करावे. अजून थोडे पातळ हवे असल्यास १/२ वाटी गरम पाणी घालावे. मंद आचेवर १-२ मिनिटे शिजवून घ्यावे. कोथिंबिरीने सजवून सव्र्ह करावे.

टीप :
१) पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकतो. साधारण दुप्पट पाणी गरजेचे असते कारण ओट्स पाणी शोषून घेतात.

ओट्स डोसा

साहित्य :
१ वाटी तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
अडीच वाटय़ा रोल्ड ओट्स (क्विक कुकिंग ओट्स)
१/२ चमचा मेथी दाणे
चवीपुरते मीठ
तेल डोसे बनवताना

कृती :
१)उडीद डाळ आणि तांदूळ ५ ते ६ तास पाण्यात वेगवेगळे भिजवावे. मेथी दाणे उडीद डाळीबरोबरच भिजवावे.
२)डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी १० मिनिटे ओट्स भिजवावे. साधारण २ वाटय़ा पाण्यात १० मिनिटे भिजवावे.
३)तांदळामधील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गरजेपुरते पाणी घालून वाटावे. खूप जास्त पाणी घालू नये.
४)उडीद डाळीमधील पाणी काढून टाकावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटावी. वाटलेल्या डाळीत भिजवलेले ओट्स घालून परत एकदा वाटावे.
५)वाटलेला तांदूळ आणि वाटलेली डाळ एकत्र करून त्यात मीठ घालावे. थोडेथोडे पाणी घालून दाटपणा अडजस्ट करावी. झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. ८ ते १० तास मिश्रण आंबवावे.
६)मिश्रण आंबले की त्यातील २ कप मिश्रण बाजूला काढावे. जर मिश्रण घट्ट असेल तर थोडे पाणी घालावे. इडलीच्या पिठापेक्षा डोशाचे पीठ थोडे पातळ असावे म्हणजे डोसे पातळ व कुरकुरीत होतात. अशा प्रकारे लागेल तसे मिश्रण घेऊन पातळ करावे आणि मग डोसे घालावे.
७)तवा तापवून त्यावर थोडे तेल घालावे आणि काळजीपूर्वक पेपर टॉवेलने पुसून टाकावे. तव्यावर पाण्याचा हबका मारावा. आच मंद करून डावभर मिश्रण घालून डोसे घालावे. आच मोठी करून कडेने तेल सोडावे. डोसा लालसर झाला की कालथ्याने काढून चटणी आणि सांबारबरोबर सव्र्ह करावा.

डोसा इडलीसाठी टिप्स
टिपा :
१) पीठ आंबवताना नेहमी मोठे भांडे घ्यावे. म्हणजे ज्यात मिश्रण घातल्यानंतर वरती एक वीत जागा राहिली पाहिजे. मध्यमसर भांडे घेतले तर मिश्रण आंबून भांडय़ाबाहेर उतू जाते.
२)पिठावर जड झाकण ठेवावे तसेच ते सारखे काढू नये. त्यामुळे ऊब धरत नाही आणि आंबायची क्रिया मंदावते.
३)इडल्या आधी करून ठेवल्या तरी चालतात. गरम करताना थोडा पाण्याचा हबका मारावा. मायक्रोवेव्हसेफ भांडय़ात इडल्या ठेवून वर मायक्रोवेव्हसेफ झाकण ठेवून १ ते २ मिनिटे गरम कराव्यात.
४)तांदूळ न वापरता नुसत्या उडीद डाळ आणि ओट्सच्या इडल्या खूप जड होतात आणि फुलत नाहीत. त्यामुळे ओट्सच्या बरोबरीने साधा तांदूळ किवा ब्राऊन राईस वापरावा.

मराठीतील सर्व रुचकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delicious food recipes
First published on: 29-05-2015 at 01:30 IST