तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

स्वत:ला सजवण्याची कला खरं तर प्राचीन काळापासूनच सुरू झाली. प्राचीन काळातच फुलं,  शिंपले, हाडे आणि दगड यांसारख्या गोष्टींचा वापर करून माणसाने दागिने तयार केले. कालांतराने हस्तिदंत, तांबे आणि अर्ध- मौल्यवान दगड आणि नंतर चांदी, सोने आणि मौल्यवान दगडांमध्ये वापरली जाणारी सामग्री असे बदल होत गेले. भारतीय आभूषणे भारतीय संस्कृती एवढेच जुने आहेत. भारतीयांच्या आवडीच्या गोष्टीमध्ये सोने-चांदी हे अग्रक्रमांकावर आहेत. त्यामुळे साहजिकच सणासुदीच्या वेळी सोन्याचांदीचे दागिने हे ओघानेच आले. गळ्यातल्या, हातातल्या दागिन्यांसह अशा अनेक सोन्याचांदीच्या  गोष्टी असतात ज्या आपण सणासुदीला मिरवू शकतो.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Heavy rain expected in the next 24 hours
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

एखादा सण जवळ आला की, चर्चा रंगू लागते ती पेहराव कोणता करायची याची. एकदा पेहराव ठरला की पुढच्या गोष्टी ठरवता येतात. या यादीत दागिने, केशरचना, टिकली, नेलपेंट असं सगळं येतं; पण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असतात दागिने! जे कपडे घालणार आहोत त्यानुसार दागिन्यांची निवड होते. दरवर्षी भारतीय परंपरेनुसार दसऱ्याला विशेष सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी होते. दरवर्षी नित्यनेमाने या दिवशी खरेदी करणारेही असतात. अशा वेळी दरवर्षी अशा ग्राहकांना नेहमीच काही तरी नवीन हवं असतं. अशाच काही नवीन आणि हटके गोष्टींबद्दल.

कफलिंक्स : कफलिंक्स पुरुषांच्या शर्टचे कफ सुरक्षित करण्यासाठी वापरल्या जातात त्या कफिलक्स. सोप्प्या शब्दात शर्टच्या कफला असलेली बटण म्हणजे कफलिंक्स. ग्लास, दगड, चामडे, धातू, मौल्यवान धातूसह विविध प्रकारच्या सामग्रींमधून कफलिंक्स तयार केली जातात. या कफलिंक्स सोन्यामध्येही उपलब्ध आहेत. सोन्याच्या धातूच्या कफलिंक्समध्ये मूलभूत आकार म्हणजे चौकोन, गोल, त्रिकोण, आयताकृती उपलब्ध आहेत. सोबतच नवीन डिझाईनमध्ये मिशाचे आकार, अक्षर लिहिलेले, बाटलीचा आकार, फुलाचा आकार, तराजू, राज्याचा मुकुट असे आकार ट्रेण्डमध्ये आहेत. यामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल किंवा व्यक्तिमत्त्वाचा कोणताही एक पैलू उठून दिसेल असेही कफलिंक्स घेण्यावर ग्राहकांचा भर आहे. हे कफलिंक्स तुम्ही हवं तेव्हा शर्टवरून काढून ठेवू शकता.

छल्ला : महिलांनी साडी नेसल्यावर कंबरेवर चार चाँद लावणारा दागिना म्हणजे छल्ला. छल्ला फार जुना दागिना आहे. हा दागिना हळूहळू लुप्त पावतोय. असं असलं तरी अनेक नवीन डिझाइनसह पुन्हा या दागिन्याला ट्रेण्डमध्ये आणण्यासाठी सोनार प्रयत्नशील आहेत. छल्ला हा मुळात चांदीपासून तयार केला जातो, कारण कंबरेखाली शक्यतो सोन्यासारखा धातू घालू नये असं म्हटलं जातं, परंतु आज छल्ला सोन्यामध्येही उपलब्ध आहेत. कंबरपट्टय़ासह असलेला छल्ला, एकच पेंडंट असलेला नाजूक छल्ला, वेगवेगळ्या रंगांचे स्टोन असलेला, खाली मण्यांचं लटकन  असलेला, भौमितिक आकार असलेला छल्ला ट्रेण्डमध्ये आहे. यासोबतच सोन्याचांदीचा  कंबरपट्टाही घातला जातो. अगदी नाजूक काम असलेला ते भरगच्च मोठी डिझाइन असलेला कंबरपट्टा पेहरावानुसार घातला जातो. यात धातूसोबत केलेली खडय़ांची डिझाइन उठून दिसते.

ब्रोचेस : पुरुषांच्या कुर्त्यांवर, जॅकेट्सवर आणि शर्टवर लावले जाणारे ब्रोचेस आता काही नवीन नाहीत. याचा वापर हटके स्टाईल करताना अगदी टोपी किंवा पगडीवरसुद्धा केला जातो. ब्रोचेसमध्ये असंख्य प्रकारच्या डिझाइन्स बाजारात आहेत. सोन्याचांदीमध्येही हे उपलब्ध आहेत. नाजूक डिझाईन ते अगदी भरलेली डिझाईन असे सारे काही ट्रेण्डमध्ये आहे. यात पिन आणि त्याला लटकणारी साखळी असे ब्रोच, एखाद्याचं नाव, एखादा प्रसिद्ध शब्द, फुलं, पानं, जहाज, वेल अशा डिझाईन्स ट्रेण्डी आहेत. यात रंगीबेरंगी रंगाचे खडेसुद्धा वापरले जातात.

केसांच्या अ‍ॅक्सेसरीज/ केसांचा शृंगार : अग्रफूल हे  सोन्याचे एक जोडफूल असते. वेणीचा शेपटा घातल्यानंतर केसांची टोके (अग्रे) या जोडफुलाच्या मधल्या पोकळ जागेत खोचून घ्यावयाची व खालून वर गुंडाळत गुंडाळत शेपटय़ाचे गोल वेढे अगदी वर शेपटय़ाच्या प्रारंभस्थानी आणून तेथे आकडय़ांच्या अथवा आगवळाच्या साहाय्याने पक्के बांधून खोपा तयार केला की हे फूल खोप्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूंनी दिसत राहते. हा  पारंपरिक दागिना मुळातच सोन्यापासून तयार केला जायचा. आजही यात अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. केसांसाठी सोन्याच्या सोबतीला चांदीच्याही अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. अग्रफुलांप्रमाणे कमळ हेसुद्धा ट्रेण्डमध्ये आहे. कमळ म्हणजे फूल. आपल्या अलंकारामध्ये फुलाच्या आकृतीचे अलंकार ‘कमळ’ अथवा ‘फूल’ अशा दोन्ही नावांनी ओळखले जातात. असे कमळ आकडय़ाच्या साहाय्याने डोक्यावर मागच्या बाजूच्या अंबाडय़ावर खोवण्याची प्रथा आहे.

वेडिंग कार्ड बॉक्स किंवा गिफ्ट बॉक्स : काही काळापासून हा बॉक्स ट्रेण्डमध्ये आला आहे. हवी तशी कलाकुसर करून घेत हे बॉक्सेस वापरले जातात. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये हे बॉक्स उपलब्ध आहेत. यामध्ये संपूर्ण बॉक्स सोन्याचांदीचा नसेल तरी त्यातला काही भाग या धातूचा करून मिळतो किंवा यात ठेवली जाणारी वस्तू अर्थात देवाची मूर्ती आणि त्याचा बॉक्स सोन्याचांदीचा असतो. वेडिंग कार्ड बॉक्समध्ये चांदीचा बॉक्स आणि आतमध्ये सोन्याची लग्नपत्रिका असते. नातेवाईकांनी, मित्रमंडळींसह अनेकदा हे बॉक्स वापरले जातात.

आपटय़ाचे पान : सोने किंवा चांदीचे आपटय़ाचे पान तयार करून घेण्याचा ट्रेण्ड सध्या दिसत आहे. आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी ही उत्तम भेट आहे. सोबतच पूजेच्या दिवशीही याचा वापर केला जातोय. यातही काही डिझाईन्स उपलब्ध आहेत. बारीक नक्षीकाम केलेली सोन्या आणि चांदीची पाने ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.

पेन : सोन्याचांदीच्या पेनच्या आठवणी अनेकजण सांगतात. सध्या हे पेन ट्रेण्डमध्ये नसले तरी काही जण आवर्जून त्याची मागणी करतात. या पेनच्या हॅन्डलला सुंदर खडा असलेले डिझाईन आजही अनेकांच्या पसंतीस उतरते. सोन्याचांदीचा मुलामा दिलेली, वरून भरगच्च किंवा सुटसुटीत नक्षीकाम केलेली पेन्स, सोन्याचांदीच्या मिश्र धातूपासून तयार केलेली पेन, हॅन्डलवर नाव कोरलेली पेन बाजारात उपलब्ध आहेत.

याखेरीज सोन्याचांदीची बिस्किटे, देवीदेवतांचे फोटो असलेली नाणी कॉईन्स,  देवघरात वापरायच्या पणत्यासुद्धा ट्रेण्डमध्ये आहेतच.