News Flash

तंत्रज्ञान : कोविड कण्टेंटला डिजिटल सेन्सॉरशिप

समाजमाध्यमांवर करोनाबाबतची कोणतीही माहिती पोस्ट करताना सर्वानाच आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

फेसबुक तसेच इतर माध्यमांनी जगभरात करोनाबाबतच्या माहिती आणि पोस्टबाबत नियम अधिक कडक केले असून केंद्र शासनही सातत्याने याबाबत सूचना देत आहे.

आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com

समाजमाध्यमांवर करोनाबाबतची कोणतीही माहिती पोस्ट करताना सर्वानाच आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. फेसबुक तसेच इतर माध्यमांनी जगभरात करोनाबाबतच्या माहिती आणि पोस्टबाबत नियम अधिक कडक केले असून केंद्र शासनही सातत्याने याबाबत सूचना देत आहे. त्यामुळे कोविडबाबतची कोणतीही माहिती चुकीची किंवा संशयास्पद वाटली तर पोस्ट डिलीट केल्या जात आहेत. यामुळे नेटकऱ्यांमध्ये मात्र चांगलीच नाराजी असून ही एकप्रकारची दडपशाही असल्याची चर्चा होत  आहे. येणाऱ्या काळात हा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत. मात्र याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत योग्य ती काळजी घेऊन मगच समाजमाध्यमांवर करोनाबाबत पोस्ट करावी लागणार आहे हे निश्चित.

हल्ली फेसबुकवर कोविडसंदर्भात कोणतीही माहिती पोस्ट केल्यावर अनेकांना ‘युवर पोस्ट गोज अगेन्स्ट कम्युनिटी स्टॅण्डर्ड्स’ (४१ ढ२३ ॅी२ ंॠं्रल्ल२३ उे४ल्ल्र३८ र३ंल्लिं१२ि) असा मेसेज दिसतो. तातडीने कार्यवाही करून फेसबुककडून पोस्ट डिलीट केली जाते. आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध होणार नाहीत याकडे फेसबुक बारकाईने लक्ष देत आहे. केवळ फेसबुकच नाही तर ट्विटर, इन्स्टाग्राम, यूटय़ूब यांचेही असेच धोरण असून कोविडसंदर्भातील चुकीची माहिती, संदर्भ नसलेल्या पोस्ट, जाहिराती तसेच सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट यामुळे या माध्यमांवर प्रसिद्ध होताच डिलीट केली जात आहे. त्याचबरोबर सातत्याने अशा प्रकारे पोस्ट होत राहिल्यास थेट युजरवर कारवाई करून त्याचे अकाऊन्ट डिसेबल करण्याचा पर्यायसुद्धा या माध्यमांनी निवडला आहे.

यामुळे एकीकडे अयोग्य माहितीला आळा बसत असला तरी बऱ्याचदा योग्य माहिती असलेली पोस्टसुद्धा तांत्रिक कारणांमुळे, नियमांमुळे डिलीट होताना दिसत आहे. त्यामुळे फेसबुक आणि इतर माध्यमांबाबत नाराजी आहे. कम्युनिटी स्टॅण्डर्डच्या नियमानुसार गेल्या वर्षभरामध्ये फेसबुकने जवळपास ७० लाख पोस्ट काढून टाकल्या आहेत.

फेसबुकने जाहीर केलेल्या माहितीनुसार अचूक माहिती पुरवणे, चुकीच्या माहितीला योग्य वेळी रोखणे तसेच संशोधनासाठी माहितीचा वापर अशा त्रिसूत्रीवर कार्यवाही केली जात आहे. यासाठी युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, विविध देशांचे आरोग्य विभाग यांच्या संपर्कात राहून फेसबुक काम करत आहे. या प्रमुख यंत्रणांना माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत जाहिरात करण्याची संधीसुद्धा दिली जात आहे. या यंत्रणांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये न बसणारी माहिती कोणीही पोस्ट करत असेल तर फेसबुक ती काढून टाकत आहे.

भारतामध्येही आरोग्य मंत्रालयाद्वारे वारंवार सर्व माध्यमांना सूचना दिल्या जात आहेत. अलीकडेच त्यांनी जवळपास १०० पोस्ट काढून टाकण्याची फेसबुककडे मागणी केली होती. याच पद्धतीने ट्विटरलासुद्धा काही अकाऊन्ट्स काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने सूचना केली होती. शासनाचा हा हस्तक्षेप मात्र युजर्सना आवडत नसून त्याबद्दल आक्षेप नोंदवला जात आहे.

योग्य माहिती शेअर व्हावी या विचाराने फेसबुक नवीन मोहीम लवकरच हातात घेत आहे. भारतातील नऊ स्थानिक भाषांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम, ओरिया, कन्नड, गुजराती, बंगाली या भाषांमध्ये कोविडची सद्य:स्थिती, त्यातील उपलब्ध माहिती, उपचारपद्धती यांबाबत सत्य परिस्थिती फेसबुकच्या मायक्रोसाइटच्या माध्यमातून शेअर केली जाणार आहे. फोटो, व्हिडीओ, ब्लॉग यांसारख्या माध्यमांतून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यासाठी खास जाहिरातीसुद्धा तयार करण्यात येणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. याचबरोबर चुकीची माहिती कशी ओळखायची, माहितीबाबत काय खबरदारी घ्यायला हवी याचेही धडे देण्यात येणार आहेत.

अशी होते पोस्ट डिलीट

माहिती फेसबुकवर पोस्ट होत असतानाच तपासली जाते. यासाठी फिल्टर्स कार्यान्वित केलेले आहेत. कोणत्याही पोस्टमध्ये चुकीची माहिती पोस्ट होत आहे असे वाटले किंवा अफवांचा संशय आला तर फेसबुकच्या अँटी स्पॅम सिस्टीम या ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे ही कारवाई केली जाते आणि तातडीने पोस्ट डिलीट केली जाते. लोकांसमोर चुकीची माहिती जाऊ नये हा यामागचा प्राथमिक हेतू आहे. याशिवाय तुमची पोस्ट कोणी रिपोर्ट केली तर त्याकडे लक्ष देऊनसुद्धा फेसबुक कारवाई करत आहे. मात्र बऱ्याचदा ही संपूर्ण प्रक्रिया ऑटोमेटेड असल्याने यामध्ये योग्य पोस्टसुद्धा काही वेळा डिलीट होत आहेत. फेसबुकच्या अँटी स्पॅम सिस्टीममधील अल्गोरिदमनुसार आपोआप या पोस्ट हटवल्या जातात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील ‘रिझाइन मोदी’ या शीर्षकाखालील बऱ्याच पोस्ट फेसबुककडून अशाच हटविण्यात आल्या होत्या. मात्र तांत्रिक कारण आणि नजरचुकीने ही कारवाई झाल्याचे कारण देत फेसबुकने त्या पोस्ट पुन्हा रिपोस्ट केल्या होत्या. फेसबुकद्वारे पोस्ट डिलीट झाल्यानंतर माहिती योग्य असेल तर त्यासाठी रिवूचा पर्यायसुद्धा देण्यात येतो. काही वेळा ऑटोमेटेड यंत्रणांमुळे चुकून पोस्ट डिलीट होऊ शकतात. त्याबद्दल योग्य माहिती हेल्प सेंटरकडे शेअर केल्यास अपील करता येते. मात्र यानंतर ती पोस्ट पुन्हा शेअर करायची की नाही याचा अंतिम निर्णय फेसबुकने आपल्याकडे राखून ठेवलेला आहे.

जाहिरातींसाठी नवीन पॉलिसी

जाहिरातींसाठीसुद्धा फेसबुकने स्वतंत्र धोरण ठरवले आहे. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयांचा समावेश जाहिरातीमध्ये नसावा असे धोरण ठरवण्यात आले आहे. याचबरोबर कोविड प्रतिबंधात्मक औषधे, मास्क, टेस्ट किट याबद्दलच्या जाहिरातींना र्निबध असणार आहेत. फेसबुकच्या माध्यमातून करोना लशींच्या विक्रीचा प्रयत्न किंवा त्याबाबत जाहिराती करण्यावर र्निबध लादण्यात आलेले आहेत. याचबरोबर जाहिरातदारांनी ठरावीक भागामध्येच जाहिरात करावी अशा सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आमच्या उत्पादनांचा वापर करून कोविडपासून संरक्षण मिळते किंवा कोविड उपचारामध्ये फायदा होतो अशा आशयाच्या जाहिरातींना फेसबुकवर मनाई करण्यात आली आहे. वारंवार चुकीच्या जाहिराती आणि माहिती शेअर केल्यास फेसबुक पेज, अकाऊन्ट डिसेबल करून कारवाई केली जाईल, असा इशारा फेसबुकने दिला आहे. इन्स्टाग्राम, यूटय़ूब, ट्विटर यांनीसुद्धा अशाच पद्धतीची पॉलिसी जाहीर केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात नाराजी

कोविडवर आयुर्वेद, होमियोपॅथी या उपचारपद्धतींच्या माध्यमांतूनही उपचार केले जात आहेत. रुग्णांना त्या संदर्भात येणारे अनुभव अनेक जण शेअर करतात. फेसबुकच्या नव्या नियमांमुळे या पोस्ट हटवल्या जात आहेत. त्यामुळे या वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये नाराजी आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक भाषांमध्ये माहिती पोस्ट करण्याचा मार्ग अंगीकारला जात आहे. त्याचबरोबर कोविड असा थेट उल्लेख न करता पर्यायी शब्दांचा वापर करून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. फेसबुक लाइव्ह, व्हिडीओ यांच्या माध्यमातून आपले विचार संबंधित मांडत आहेत.

इतर पर्यायांचा वापर

फेसबुक आणि इतर माध्यमांसंदर्भात येणाऱ्या या अडचणींमुळे आता युजर्ससुद्धा स्मार्ट झाले आहेत. इतर माध्यमांचा वापर करून आपली माहिती लोकांसमोर पोहोचावी असा त्यांचा प्रयत्न असतो. नुसत्या मेसेजमधील आक्षेपार्ह आशय पटकन सापडत असल्याने आशयाऐवजी प्रतिमा किंवा व्हिडीओच्या माध्यमातून अपेक्षित आशय शेअर केला जात आहे. त्याचबरोबर ब्लॉग, टेलिग्राम, वेबसाइट या माध्यमांचासुद्धा वापर मोठय़ा प्रमाणावर लोक करत आहेत. ब्लॉगवर सविस्तर माहिती लिहून नंतर त्याची लिंक फेसबुक आणि अन्य ठिकाणी शेअर करण्याला सध्या पसंती दिसून येते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • फेसबुकवर किंवा कोणत्याही माध्यमांवर माहिती पोस्ट करताना अचूक माहिती शेअर करा.
  • शक्य असेल तेथे योग्य संदर्भ शेअर करा.
  • फसव्या ऑफर्स किंवा विक्रीला चालना मिळेल अशा गोष्टी कोविडचा संदर्भ देऊन शेअर करू नका.
  • एखादी पोस्ट डिलीट झाली तर पुन्हा पुन्हा पोस्ट करू नका.
  • पोस्टमधील माहिती योग्य असल्यास हेल्प सेंटरशी संपर्क साधा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:27 am

Web Title: digital censorship on covid 19 content tantratnyan dd 70
Next Stories
1 आदरांजली : संपादक आणि मित्र
2 राशिभविष्य : दि. २१ ते २७ मे २०२१
3 Twitter मोफत वापरता येणार नाही, ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार पैसे
Just Now!
X