हिंदूी सिनेमामध्ये एक सिनेमा सुपरहीट ठरला की लगोलग त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला लगेचच दुसरा चित्रपट मिळतो. सुपरहीट सिनेमाचा बोलबाला असेपर्यंत त्याचा फायदा उठविणे असा व्यावसायिक हेतू यामागे असतो. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे तीन खान, तसेच फरहान अख्तर, विधु विनोद चोप्रा, रितेश सिधवानी, राजश्री फिल्म्स तसेच अनेक निर्माते-दिग्दर्शक-कलावंत मात्र वर्षांकाठी एखादा सिनेमा करतात. परंतु, त्याचा गाजावाजा मात्र बराच आधीपासून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मोजकेच पण ‘मनोरंजनाबरोबरच काही तरी सांगण्याचा प्रयत्न’ या पद्धतीचा सिनेमा करणारी दिग्दर्शक झोया अख्तर पुन्हा एकदा याच पद्धतीचा सिनेमा दाखविणार असा अंदाज तिच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर्सवरून करायला हरकत नाही. 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या २०११ साली आलेल्या मल्टिस्टारर आणि प्रचंड गाजलेल्या सिनेमानंतर झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ हा सिनेमा ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमाच्या चित्रीकरण सुरू झाले तेव्हापासूनच ‘चिवित्र’ अशा पंजाबी कुटुंबाची गोष्ट तिला सुचला होता, असे सांगितले जाते. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमाप्रमाणेच ‘दिल धडकने दो’मधून पंजाबी कुटुंबाची गोष्ट मांडताना झोया अख्तरने अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, राहुल बोस, शेफाली शहा, झरीना वहाब, परमित सेठी अशी बडय़ा स्टार कलावंतांना एकत्र आणले आहे. त्याचबरोबर ‘कबीर’ हे व्यक्तिरेखेचे नाव पुन्हा या सिनेमात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग हे दोन कलावंत बहीण-भाऊ म्हणून प्रथमच भूमिका साकारत आहेत हे या सिनेमाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणता येईल. फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांनी सिनेमाचे शीर्षक गीत ‘दिल धडकने दो’ गायले आहे. रीमा कागती आणि झोया अख्तर यांची पटकथा असून फरहान अख्तर आणि जावेद अख्तर यांनी संवादलेखन केले आहे.
कमल आणि नीलम मेहरा हे राजधानी दिल्लीच्या समाजात लोकप्रिय ठरलेले दाम्पत्य. त्यांच्या विवाहाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. विवाहाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जंगी सहलीचे आयोजन केले जाते. आपल्या वर्तुळातील जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबातील लोकांना घेऊन दहा दिवस युरोप दौरा एका आलिशान बोटीवर जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे मेहरा कुटुंबीय ठरवितात. एका ‘चिवित्र’ पंजाबी कुटुंबाची गोष्ट ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात मांडण्यात येणार आहे.
दिल्लीत राहणारे प्रतिष्ठित पंजाबी कुटुंब, स्वत:चा मोठा उद्योग-व्यवसाय असलेले कमल मेहरा आणि त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य, त्यांचे स्वभाव, त्यांचा मानभावीपणा, खोटा अहंकार, चेहरे आणि मुखवटे दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक झोया अख्तरने या सिनेमात केला असावा असा अंदाज आहे.
विवाहाला ३० वर्षे झाली म्हणून मोठय़ा उत्साहात वाढदिवस साजरा करण्यासाठी मेहरा कुटुंबीय आपल्या प्रियजनांसमवेत युरोप दौऱ्यावर जायला निघातात. आलिशान बोटीवर पोहोचल्यानंतर मेहरा कुटुंबातील सर्वाचे एकमेकांशी असलेले नाते खरे आहे का, समाजासमोर दाखविण्यासाठीचे वागणे एका बाजूला प्रत्यक्ष प्रत्येक सदस्याच्या मनात चाललेले व्यवहार दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे मेहरा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मनोमन जणू द्वंद्व सुरू असते, अशा प्रकारचे काही दाखवून त्यातून मानवी स्वभाव, प्रतिष्ठा, पद, पैसा याविषयीचे ग्रह आणि विपरीत वस्तुस्थिती असे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक झोया अख्तरने केला असावा असा अंदाज केला जात आहे.
मेहरा कुटुंबाचे प्रमुख कमल मेहरा ही भूमिका अनिल कपूरने साकारली आहे. दिल्लीच्या प्रतिष्ठित वर्तुळातील बिझनेसमन कमल मेहरा हा वास्तविक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभा आहे. त्याचे बायको नीलमसोबत असलेले संबंध ताणलेले आहेत. दोघेही एकमेकांना खूप काळ सहनच करू शकत नाहीत अशी स्थिती आहे. त्यांची मुलगी आयेशा हीसुद्धा बिझनेसवुमन आहे. तिचे तिच्या नवऱ्याशी पटत नाही. म्हणून घटस्फोट घ्यायचे तिच्या मनात आहे. मेहरांचा मुलगा कबीर आपल्या वडिलांनी उभी केलेली पण आता दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलेली कंपनी वाचविण्यासाठी धडपडतोय. त्यासाठी त्याला गर्भश्रीमंत सूद कुटुंबातील मुलीशी लग्न करण्याचा त्याचा विचार आहे. बोटीवर आल्यानंतर तिथे एक मजेदार माणूस मेहरा कुटुंबीयांना भेटतो. त्यांचे जग बदलून जाते, अशा स्वरूपाची या सिनेमाची गोष्ट आहे.
मुळातच हिंदी सिनेमा समजावून घ्यायचा असेल तर पंजाबी मानसिकता समजली पाहिजे अशी पूर्वअट जुने चित्रपट पाहताना होती असे म्हणायला हरकत नाही. पंजाबी मानसिकतेचा प्रचंड पगडा हिंदी सिनेमावर नेहमीच राहिला आहे. पंजाबी कुटुंब म्हणजे काय, ते कसे वागतात-बोलतात याची मोठय़ा प्रमाणात ओळख प्रेक्षकांना हिंदी सिनेमाने नेहमीच करून दिली आहे.
त्यामुळेच पंजाबी कुटुंबाची गोष्ट पडद्यावर पाहायला जाणे आणि त्यातही मल्टिस्टारर कलावंत असलेल्या सिनेमाविषयी निश्चितपणे प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सुनील नांदगावकर