05 July 2020

News Flash

मध्यंतर : तुझं-माझं जमेना

घटस्फोटाचा आघात जवळजवळ जिवलगाच्या मृत्यूइतकाच जिव्हारी लागतो. पहिल्या घावानंतर कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांत जखमेवर मीठ चोळणं चालूच राहातं. मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होतं.

| July 4, 2014 01:16 am

घटस्फोटाचा आघात जवळजवळ जिवलगाच्या मृत्यूइतकाच जिव्हारी लागतो. पहिल्या घावानंतर कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांत जखमेवर मीठ चोळणं चालूच राहातं. मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होतं.

‘‘तो काहीच करत नाही. कमावत तर नाहीच आणि घरातलंसुद्धा काही बघत नाही. नुसतं डोकं धरून बसतो! असला नवरा काय कामाचा? त्यापेक्षा एकटीच मजेत राहीन मी!’’
ऋता तडातडा बोलून मोकळी झाली. ऋता-यतीनचं प्रेम शाळेपासूनचं. लग्न वयाच्या विशीत झालं. त्याचा बिझिनेस, तिची वकिली यांची यशस्वी वाटचाल त्यांच्या सुखी संसाराच्या सोबतीनेच झाली. यतीनला बिझिनेसमध्ये मोठी खोट येईपर्यंत सगळीच आबादीआबाद होती. त्यानंतरही ऋताची कमाई सुखी संसाराला पुरेशी होतीच. पण यतीनचं बस्तान पुन्हा पूर्ववत बसेना. तो हताश झाला. त्यात ऋताने वेगळाच अवतार धारण केला. तिने त्या ‘कुचकामाच्या’ नवऱ्याकडून घटस्फोट मागितला. आधी यतीनचा त्यावर विश्वासच बसेना. काही काळ त्याला अपराधीही वाटलं. पण मग तो दुखावला, संतापला. काही दिवस घरात आकांडतांडव माजलं. शेवटी यतीनने ऋताचा निर्णय स्वीकारला. घर ऋताच्याच नावावर होतं. तिने यतीनला घराबाहेर काढलं.
एका यतीनला आयुष्यातून बाद केला की बाकी सगळं पूर्ववत चालू राहील ही तिची अपेक्षा मात्र पुरी झाली नाही. मोठी मुलगी बापाबरोबर घराबाहेर पडली. नऊ वर्षांच्या ऋषीची यतीननेच समजूत घातली म्हणून तो आईबरोबर राहिला. पण कुढत राहिला. त्याचं हसणं-खेळणं बंद झालं. दोन्हीकडचे आजीआजोबा केवळ ऋषीसाठी येत राहिले. ऋता-यतीनचे बरेचसे दोस्त शाळेपासूनचे होते. बहुतेकांनी यतीनची बाजू घेतली, ऋताला वाळीतच टाकलं. भोवतालचं समाजमन भारतीय होतं. ऋताकडे बघायची लोकांची नजर बदलली. त्याचाही तिला अप्रत्यक्ष जाच झाला. ‘मजेत एकटी राहीन’ म्हणणारी ऋता बिचारी एकटी पडली.
तरीही वेळीच पड खाणं, चूक कबूल करणं ऋताच्या मानी स्वभावाला पटलं नाही. तिने उत्तम वकिलांच्या मदतीने घटस्फोट तडीला नेला. संसाराच्या ठिकऱ्या उडाल्या. आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या ऋताला संसारात सतत मजाच हवी होती. हाताला चटके बसल्याबरोबर तिने तव्याचा नादच सोडला. साथीदाराचा कठीण काळ जाणून, त्याला खंबीरपणे आधार देताना स्वत:चेच पाय अधिक बळकट होतात हा संसाराचा फंडा तिला उमगला नाही. ‘मी फारच पोरकटपणा केला’ ही कबुली तिने दहा वर्षांनी दिली! तोवर लेकीच्या समजूतदार साथीमुळे यतीन सावरला होता. त्याचा व्यवसायातही उत्तम जम बसला होता. त्याने ऋताला माफही केलं. पण जुनं नातं पुन्हा सांधणं शक्य नव्हतं.
अपरिपक्व जोडप्यांत लहानसहान गोष्टींवरून वाद होतात, खटके उडतात. मग वादविवादाची, भांडणाची सवय होते. अॅमिग्डाला हा आपल्या मेंदूच्या बुडाजवळचा एक छोटासा भाग. पाली, साप यांचा मेंदू मुख्यत्वे अॅमिग्डालाचाच बनलेला असतो. जिवाच्या संरक्षणासाठी सतर्क राहाणं हे त्याचं काम. सभोवतालच्या वातावरणात खुट्ट झालं, पाचोळा हालला किंवा पाखरू उडालं तरी अॅमिग्डाला सावध होतो आणि ‘लढा किंवा पळा’ असा आदेश देतो. माणसामध्ये त्या भागाचं मेंदूच्या गाभ्यातल्या भावनाकेंद्राशी नातं जुळलेलं आहे. त्यामुळे तो भावनिक इशाऱ्यांनीही जागा होतो. पण त्याच्या सतर्कतेवर मानवी मेंदूतल्या अतिप्रगत अशा विवेकी भागाचा ताबा असतो. कुठल्या इशाऱ्यांशी झगडायचं ते विचारी मेंदू ठरवतो. पण जेव्हा भांडायची सवय होते तेव्हा विचारी मेंदूचा ताबा कमी होतो. छोटय़ा भावनिक ठिणग्यांनीही मोठे स्फोट व्हायला लागतात.
आपल्या मेंदूची जडणघडण आपल्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. रोज रेमेडोक्याचं काम करणाऱ्याचा मेंदू अनघड राहतो. रोज बौद्धिक आव्हानं स्वीकारणाऱ्याचा मेंदू अधिकाधिक तल्लख बनत जातो. मेंदूचा तो घडाऊपणा मोठेपणीही टिकून राहतो. लहानसहान कारणांवरून भांडणं व्हायला लागली की भांडण्यासाठी आवश्यक असलेले मेंदूचे भाग अधिक सक्षम बनत जातात आणि त्यांच्यावर टेस्टोस्टेरॉनसारख्या कलह-रसायनांचा परिणाम वाढतो. टेस्टोस्टेरॉन हे मुख्यत्वे मर्दानी हॉर्मोन असलं तरी त्राटिकांच्या त्राग्यालाही तेच कारणीभूत होतं. एकदा का कलहकेंद्राची ताकद वाढली की हल्ल्याला प्रतिहल्ला चालूच राहातो. कित्येकदा भांडण्याचं कारण स्वत:चं स्वत:लाही समजत नाही. पण वेड लागल्यासारखे कचाकचा वाद घातले जातात.
समोरच्याला जांभई आली की आपल्यालाही येते. समोरच्याच्या हाताला चटका बसला की आपल्यालाही हात नकळत मागे घ्यावासा वाटतो. प्रत्यक्षात घडली नाही तरी मनातल्या मनात ती क्रिया घडतेच. ती घडवणारे मिरर-न्यूरॉन्स किंवा दर्पण-पेशी आता संशोधकांना सापडल्या आहेत. त्यांच्यामुळे समोरच्याच्या वागण्याचं नकळत अनुकरण केलं जातं. एकाने ‘तू-तू-मी-मी’ केलं की दुसऱ्यालाही हमरीतुमरीवर यायची जी अनावर इच्छा होते तिच्यामागेही त्या दर्पणपेशींची करामत असते.
सर्पबुद्धी, टेस्टोस्टेरॉन आणि दर्पणपेशी एकजुटीने भांडणाच्या आगीत तेल ओततात. पक्षपाती स्मरणशक्ती नको त्याच आठवणींना उजाळा देते. विचारी मेंदू हतप्रभ होतो. खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी क्षुल्लक बाबींचाच बाऊ होतो आणि पावलं कोर्टाची वाट चालायला लागतात.
पण खुद्द घटस्फोट मात्र क्षुल्लक नसतो.
घटस्फोटाचा आघात जवळजवळ जिवलगाच्या मृत्यूइतकाच जिव्हारी लागतो. पहिल्या घावानंतर कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांत जखमेवर मीठ चोळणं चालूच राहातं. मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होतं. कटुता, नराश्य, हतबलता वाढत जातात. मग कधी खाल्लंच नाही तर कधी बकाबका खाल्लं; भकाभका सिगारेटी फुंकल्या; तासन्तास टीव्ही बघितला असं करण्यात दिनचर्या भरकटत जाते. वजन वाढतं. मधुमेह, हृदयविकार, दमा वगरे दुखणी पाठी लागतात. काही जण दारूच्या आहारी जातात आणि लिव्हर खराब करून घेतात. अलीकडच्या सर्वेक्षणांत तर असं समजलं आहे की घटस्फोटितांना चलनवलनाचे त्रासही अधिक होतात. जिने चढणं-उतरणं, दूरवर चालत जाणं हे त्यांना कष्टाचं वाटतं. शिवाय सतत मनात ठुसठुसणारं दुख त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करतं. त्यांना सर्दी-पडसं वारंवार होतं. चेंगट पोटदुखीसारखे आजारही त्यांना सुखी-संसारी माणसांहून अधिक प्रमाणात होतात.
घटस्फोटाचा मुलांच्याही मनावर परिणाम होतो. त्यांचं शिक्षणात लक्ष लागत नाही. कुणाशीही आपुलकीचं दृढ नातं जोडणं त्यांना फार कठीण जातं. त्या मुलांमध्ये पुढल्या आयुष्यात आत्महत्येचं प्रमाणही सर्वसामान्यांपेक्षा बरंच जास्त असतं.
म्हणून एकदा लग्न केलं की आयुष्यातला तो सर्वात महत्त्वाचा ठेवा जिवापाड जपायला हवा. आíथक, सामाजिक समस्या, आजारपणं वगरे संकटं येतातच. त्यावेळी विचारी मेंदूला सतत जागं ठेवायला हवं. माफ करत, माफी मागत संवाद साधून चुका वेळीच निस्तरायला हव्यात. कधीकधी मनातला गोंधळ कागदावर मुद्देसूदपणे उतरवला की गुंता सुटतो. ते साधत नसेल तर कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी सल्ला घ्यावा. जवळच्या नातेवाईकांचा सल्ला निष्पक्षपाती असतोच असं नाही. म्हणून व्यावसायिक कौन्सेलरची मदत घ्यावी. तशा जाणकाराने एकेकटय़ाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना स्मरणशक्तीने अडगळीत ढकललेले अनेक मुद्दे नव्याने नजरेत येतात. त्यांच्यावर अलिप्तपणे विचार करावा लागतो. स्वत:च्या चुका कळतात. जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली दृष्टिकोन बदलताना कमीपणा वाटत नाही. दोघांचाही दृष्टिकोन बदलला तर बऱ्याच गोष्टी सुकर होतात, संवाद साधता येतो. घटस्फोटाची गरज खरोखर असलीच तर तेही स्पष्टपणे कळतं.
बाहेरख्यालीपणा, व्यसनाधीनता, शारीरिक अत्याचार आणि मोठय़ा लंगिक समस्या ही घटस्फोटाची योग्य कारणं आहेत. आता बाहेरख्यालीपणाचं डीएनएमधलं कारण समजलं आहे. त्यामुळे त्याच्यावरचं औषधही निघण्याची शक्यता आहे. व्यसनमुक्तीची केंद्रं उत्तम काम करताहेत. पण जोवर उपाय होत नाही तोवर हाल सहन करत संसार चालू ठेवल्याने स्वत:वर आणि मुलांवरही मोठा अन्याय होऊ शकतो.
सुनीता-शेखरचा प्रेमविवाह जातीचं बंधन झुगारून, आईवडिलांचा विरोध सोसून झाला. सुरुवातीची प्रेमाची रंगत संपल्यावर शेखरने खरे रंग दाखवले. दारू पिऊन सुनीताला झोडपणं, रोज नवी बाई घरी आणणं, घरखर्चालाही पसे न देणं असा सारा बेताल कारभार सुरू झाला. आत्यंतिक प्रेमामुळे सुनीता ते सारं सोसत राहिली. त्यातच दोन मुलंही झाली. शेखरने धाकटय़ा मुलावर काठी उगारली तेव्हा मात्र तिने कंबर कसली आणि नोकरी शोधली. तरीही ती मुलांकडे शेखरबद्दल काहीही वाईट बोलली नाही. आईवडील, सासूसासरे, मित्रमंडळी वगरेंना कसलीही कुणकुण लागू न देता तिने त्या सगळ्यांशी सलोख्याचे संबंध जोडले. नोकरीच्या निमित्ताने मुलांना आजीआजोबांची सवय लावली. आईचा खंबीरपणा त्या नकळत्या मुलांनाही समजला. त्यांचा कावरेबावरेपणा कमी झाला.
मग सुनीताने कौन्सेलरचा व्यावसायिक सल्ला घेतला आणि आपला निर्णय बरोबर असल्याची खात्री करून घेतली. शेखरशी संवाद साधणं, त्याला कौन्सेलरकडे नेणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. पण प्रयत्नांची शर्थ करून तिने त्याच्याशी भांडण टाळलं. ऑफिसकडून क्वॉर्टर मिळवून तिने नव्या मायेच्या घरात मुलांना स्थिरस्थावर केलं आणि त्यानंतर, शेखरच्या आईवडिलांना विश्वासात घेऊनच त्याला घटस्फोटाचे कागद पाठवले. त्या धक्क्याने आणि धाकाने शेखर बराच ताळ्यावर आला. पुढचं सारं सामोपचाराने घडू शकलं.
दोन्हीकडच्या आजीआजोबांच्या मदतीने मुलांचं संगोपन सुकर झालं. मुलं जरा मोठी झाल्यावर सुनीताने एक समंजस जोडीदार निवडला. शेखर अजून फारसा सुधारला नाही. पण आता मुलांना भेटायला येताना तो पूर्ण शुद्धीत असतो.
सुखात वा दु:खात, स्वास्थ्यात वा आजारपणात, श्रीमंतीत वा गरिबीत, ‘धम्रे च अथ्रे च कामे च. नातिचरामि’ हे व्रत अनेक धर्मामध्ये, लग्नाच्या वेळी आवर्जून स्वीकारावं लागतं. भारतीय समाजात बहुतेक जण तो वसा आजन्म पाळतात. ते सोपं नसतं. ‘प्रेम गली अति साँकरी जामें दो न समाहि’ असं असल्यामुळे ‘तुझं’-‘माझं’ विसरून प्रत्येक गोष्टीला ‘आपलं’ म्हणत एकरूप व्हायचं असतंच, पण त्याच वेळी दुसऱ्याचं स्वातंत्र्य जपण्याइतपत अलिप्तही राहायचं असतं. पदराखाली निखारा झाकून ‘पदर त पेटला नाय पायजे, निखारा त इझला नाय पायजे’ अशी आयुष्याच्या वादळातली वाटचाल ज्यांना जमते त्यांना प्रपंच साधतो. त्यासाठी सतत सजगपणे कष्ट घ्यावे लागतात. तो मोठा खेळ जिंकण्यासाठी छोटय़ा डावपेचांत बिनशर्त हार मानावी लागते. हे बहुतेकांना जमतं.
रेशीमगाठी पक्क्या होतात.
कधीकधी रेशीमगाठींचाही गळफास बसतो. पण प्रयत्न केला तर सुनीतासारखा तोही हळुवारपणे सोडवता येतो, फारशी जखम होऊ न देता!

एकदा लग्न केलं की आयुष्यातला तो सर्वात महत्त्वाचा ठेवा जिवापाड जपायला हवा. आíथक, सामाजिक समस्या, आजारपणं वगरे संकटं येतातच. त्यावेळी विचारी मेंदूला सतत जागं ठेवायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2014 1:16 am

Web Title: divorce
टॅग Lifestyle
Next Stories
1 स्पेिलग-स्मरणक्ऌप्त्या
2 डोक्यावर घेणे
3 किशोरांचं वास्तव : गणित कधी आणि कसं चुकलं?
Just Now!
X