रुचकर आणि शॉपिंग विशेष
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
‘काळ आणि फॅशन ट्रेण्ड्स’ हे कोणासाठी थांबत नाहीत, असं कोणीतरी म्हटलंच आहे. अर्थात त्यात काही खोटं नाही. टाळेबंदी असो, कोविड असो किंवा साधं ब्रेकअप लेटेस्ट ट्रेण्ड्स हे त्यांच्या नियमित वेळेवर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर ‘पॉप अप’ होतातच! मग हळूच तुम्हाला खुणवतात. सुरुवातीला तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. नंतर मनातच म्हणता ‘आता परत कधी घराबाहेर पडता येणार आहे, कुणास ठाऊक. मग कशाला हवेत नवे कपडे? तितकीच काय गुंतवणूक होईल.’ मग आपसूक तुम्ही बँकेचं खातं तपासता, उगाचच म्हणून म्युच्युअल फंड, शेअरसंदर्भातील एक-दोन संकेतस्थळं पाहता. तितक्यात पुन्हा एक ‘पॉप अप’ येतं, तुमच्या लाडक्या शॉपिंग अ‍ॅपवर मोठा सेल लागणार असल्याचं. मग सहज विरंगुळा म्हणून तुम्ही अ‍ॅपवर फेरफटका मारता तब्बल ३-४ तासांचं स्क्रोलिंग, मोबाइलची २० टक्क्यांच्या उंबरठय़ावर आलेली बॅटरी आणि क्रेडिट कार्डकडून आलेला ओटीपी टाकल्यावर तुमचा आत्मा शांत होतो. एवढय़ा वेळात तुमचं बँक खातं थोडं हलकं झालं असलं तरी मन मात्र समाधानाने तृप्त झालेलं असतं. त्यानंतरचे कित्येक दिवस तुमचे डोळे दारावर वाजणारी बेल आणि कुरियर घेऊन येणारा माणूस यांच्या वाटेवर लागून राहतात. सणसमारंभाच्या काळात तर असं वारंवार होत राहतं. त्यामुळे येत्या दिवाळीसाठी तुमच्या खरेदीची यादी तयार होण्याआधी नवीन फॅशन ट्रेण्ड्सवर एक नजर टाकूयात, म्हणजे तुमचा लुक ‘अप टू द मार्क’ असेल.   

गडद रंग आणि हटके लुक्स

रंगांच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘पेंटोन’ दरवर्षी ‘कलर ऑफ द इयर’ म्हणजेच वर्षभर गाजणारा रंग जाहीर करते. हा रंग किंवा विशिष्ट रंगाची छटा जाहीर करताना मागच्या वर्षीच्या घडामोडी, सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. या वर्षी त्यांनी ‘अल्टीमेट ग्रे’ आणि ‘इल्युमिनेटिंग’ (पिवळ्या रंगाच्या उजळ छटेला ‘पेंटोन’ने हे नाव दिले आहे.) या दोन रंगाची घोषणा केली होती. ग्रे किंवा राखाडी रंगाची छटा करोना आणि त्यामुळे ओढवलेल्या टाळेबंदीचं प्रतीक होती. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मधील ही राखाडी छटा अडकलेली, कोंदटलेली भावना व्यक्त करते. तर इल्युमिनेटिंग ही छटा अंधाऱ्या वाटेवरील प्रकाशाच्या एका किरणाचं प्रतिनिधित्व करते.

फॅशनच्या जगतात या रंगांचा वापर दिसून आला. विशेषत: पिवळ्या रंगाचा हँडबॅग, शूज, ज्वेलरीमध्ये प्रामुख्याने वापर झालेला दिसतो. एरवी प्रत्येक सिझनमध्ये एखादा रंग भाव खाऊन जातो आणि बाकीचे रंग त्याला साजेसे असतात. यंदा मात्र कोण्या एकाची मक्तेदारी असणार नाही. नाही म्हणता फिक्कट जांभळा किंवा ‘लव्हेंडर’ रंग आपला आब राखून असेल, पण त्याशिवाय गडद रंगांचा मान मोठा असणार आहे. गडद लाल किंवा मरून, मेहेंदी हिरवा, नेव्ही ब्ल्यू, ब्राऊन, राखाडी, गडद पिवळा, गडद नारंगी, गडद गुलाबी, कोबाल्ट ब्ल्यू, खाकी अशा रंगांवर डिझायनर्स भर देताना दिसतील. अर्थात यांची कॉम्बिनेशन्सपण वेगवेगळी असतील. गडद गुलाबी रंगासोबत कोबाल्ट ब्ल्यू, गडद हिरव्या रंगासोबत गडद नारिंगी रंग अशा प्रकारे दोन किंवा तीन गडद रंगाच्या छटा एकत्र दिसतील. यांना शोभून दिसण्यासाठी मोठय़ा, ठळक उठून दिसणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज असणारच! थोडक्यात यंदाचे लुक्स हे बेधडक असणार आहेत. त्यामुळे तुमच्या प्रयोगशील विचारशक्तीला चालना द्यायला हवी. तसचं पेस्टल छटासुद्धा या वेळी ट्रेण्डमध्ये असतील. आइस्क्रीम शेड्सच्या गटात मोडणाऱ्या फिक्कट हिरवा, गुलाबी, जांभळा, आकाशी, पिवळा या छटा ट्रेण्डमध्ये दिसतील.

रेट्रो लुकचा प्रभाव

ओव्हरसाइज कोट, छोटय़ा फ्रेमचे गॉगल, हायहिल्स, लांब बाह्यांचा ब्लाऊज, कुर्ता आणि शरारा, फ्लेअर डेनिम, बलून स्लीव्ह या स्वरूपातील कपडय़ांचा उल्लेख केला की ८०-९० चं दशक हमखास आठवतं. पण यंदा मात्र याच स्वरूपातील कपडय़ांचा नजराणा बाजारात पाहायला मिळेल. नेहमीच्या कुर्त्यांला लेगिंग किंवा सलवार, प्लाझोऐवजी शराराची जोड मिळाल्याने सणांच्या दिवसांमध्ये छान लुक दिसतो. विशेष म्हणजे एखाद्या फेस्टीव्ह स्टाइलच्या कुर्त्यांसोबत कॉन्ट्रास रंगांच्या शरारा, स्कर्ट किंवा प्लाझोची जोडणी केल्यास लुक्समध्ये वैविध्य आणता येईल. तसंच शरारालासुद्धा कुर्ता, क्रॉप टॉप, सॅटीन शर्ट, साडी ब्लाऊज अशा विविध कपडय़ांची जोड देता येऊ शकते. एखाद्या दिवशी साडी नेसताना परकरऐवजी शरारा नेसून बघा नक्कीच हटके लुक येईल. साडय़ांचा विषय निघालाच असेल, तर नेहमीच्या सहावारी साडय़ांऐवजी नऊवारी, बंगाली, गुजराती अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या साडय़ा नेसण्याकडे कल आहे. साडय़ा नेसण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती एकत्र करून  फ्युजन पद्धतीने साडी नेसण्याकडे सुद्धा यंदा कल आहे. लांब बाह्यांचा ब्लाऊज, लांब पदर, केसांचा छान अंबाडा, अंगावर पारंपरिक दागिने हा टिपिकल ९० च्या दशकातील लुक सध्या चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खणाच्या साडय़ांना प्रचंड मागणी आली आहे. विशेषत: त्यावर नथ, मोर, वारली अशा विविध मोटीफची कलाकुसर किंवा चित्रं काढलेली पाहायला मिळतात. या दिवाळीमध्ये तुम्ही या साडय़ांचा विचार करू शकता. सोबत चांदीचे किंवा मोत्यांचे दागिने खुलून दिसतील.      

करोनाचा प्रभाव

गेलं दीड वर्ष अख्खं जग करोनाच्या छायेखाली आहे. यापुढे आपलं दैनंदिन आयुष्य सुरू होईलच, पण पडसाद कायम राहतील. उदाहरण द्यायचं झाल्यास मुखपट्टी किंवा मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. दहा रुपयांचा साधा कापडी मास्क औषधांच्या दुकानातून घेण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज ट्रेण्डी मास्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. आजच्या घडीला नामवंत ब्रँड्स मास्कची निर्मिती करत आहेत. लग्नाच्या मौसममध्ये डिझायनर्स साडी किंवा लेहेंगाला सजून दिसणारे मास्क उपलब्ध झाले आहेत. हा ट्रेण्ड अजूनही काही काळ हमखास दिसतील. एखादा सुंदर नक्षीकाम किंवा प्रिंट असलेला मास्क असो किंवा प्लेन पण उंची ब्रँडचं प्रतिनिधित्व करणारा मास्क असो. तुमचा वॉडरोब मेडिकल मास्क पलीकडे जायला हवा हे नक्की. याशिवाय वर्क फ्रॉम होम संस्कृतीचा परिमाण म्हणजे कपडे आणि लुकमधील सुटसुटीतपणा. ओव्हरसाइज शर्ट, ढगाळ पँट, लूज कुर्ता, स्नीकर्स, डेनिमऐवजी कॉटनचा प्रभाव हे बदल यंदा आवर्जून पहायला मिळतील. सणांच्या दिवसांमध्येसुद्धा कपडय़ांचा सुटसुटीतपणा हा प्रामुख्याने दिसेल. एम्ब्रोयडरीऐवजी प्रिंट्स, हस्तचित्रे, बांधणी, लेहरीया यांचा प्रभाव दिसून येईल. ठेवणीतील हातमागावरच्या साडय़ासुद्धा पहायला मिळतील. अर्थात प्रत्येक वयोगटानुसार त्याच्या लुकमध्ये वैविध्य असेल.

के-पॉपचा प्रभाव

तरुणाईवर सध्याच्या घडीला कोरियन संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आहे. संगीत क्षेत्रातून ही संस्कृती हळूहळू तरुणाईमध्ये रुजत गेली ती आता सिनेमे, वेबसीरिज या मार्गाने मेकअप, स्कीनकेअर, कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज अशा वेगवेगळ्या स्वरूपात कपाटात विराजमान झाली आहे. त्यांचे फ्रेश रंगांचे कपडे, छोटेखानी हँडबॅग्ज, नाजूक हिल्स, आकर्षक दागिने अर्थातच मोहून टाकणारे असतात. आणि कितीही नाकारलं तरी आपल्या लुकला ‘यंग’ टच देणारे असतात. आपल्या नेहमीच्या पेहरावामध्ये या संस्कृतीचे काही भाग सहज मिसळून जातात. ढगळ जीन्सवर आखूड टी-शर्ट, मिनी स्कर्ट, फ्लोरल ड्रेस, बोल्ड रंगाचे जॅकेट्स तरुणाईच्या कलेक्शनचा भाग आहेतच. पण पारंपरिक लुकमध्ये मोत्यांचे दागिने घातल्यास कोरियन पद्धतीचा मोत्यांचा हेअरक्लिप छान खुलून दिसतो. त्यांच्या ज्वेलरी, शूज, बॅग तुमच्या पेहरावामध्ये लीलया मिसळतात.

छोटय़ा उद्योजकांचा प्रभाव

गेल्या वर्षभरात टाळेबंदीच्या काळात कित्येकांनी घरातून नवनवीन उद्योग सुरू केले. या प्रयोगाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यंदा बाजारातील नेहमीचे दागिने, कपडे यापेक्षा वेगळ्या स्वरूपातील प्रयोगांचा प्रभाव दिसून येईल. हॅण्डमेड दागिने आणि अ‍ॅक्सेसरीजचं वैशिष्टय़ म्हणजे यांचं उत्पादन मर्यादित असल्यामुळे यातील वेगळेपणा उठून दिसतो. बाजारातील उत्पादनांतील तोचतोचपणा इथे नसतो. तसेच तुमच्या आवडीनुसार माफक दरात वस्तू तयार करून मिळतात. गेल्या वर्षभरात या प्रयोगाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कित्येक तरुण यात प्रगती करत आहेत. समाजमाध्यमांच्या मदतीने ही मंडळी ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील संवाद, व्यवहारातील पारदर्शकता, वेगळेपणा अशा कारणांनी हा ट्रेण्ड सध्या तेजीत आहेत. कित्येक तरुण, उत्साही आणि कलात्मक दृष्टिकोन असलेल्या तरुणांना यामुळे कमाईचा वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. हटके डिझाइनचे कानातले डूल, सॅटीन हेअरबो, पेन्डन्ट यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. यंदाच्या ट्रेण्ड्सवर गेल्या वर्षभरातील वातावरणाचा सुस्तपणा आणि करोनानंतरच्या नव्या वाटचालीचा उत्साह या दोन्हीचा परिणाम पहायला मिळणार आहे. त्यामुळे या बदलाच्या वाऱ्यांचा अंदाज घेण्याची उत्सुकता सर्वानाच आहे.