दिवाळीतील चंगळ…

श्रावणापासून सुरू असलेला व्रतवैकल्यांचा काळ संपून आता सणांचा मनमुराद आनंद लुटण्याचे दिवस आले आहेत.

faral-diwali
आपल्या कृषिप्रधान देशात सारेच सण-उत्सव शेतीच्या वेळापत्रकाशी म्हणजे थोडक्यात निसर्गाशी जोडलेले आहेत.

रुचकर आणि शॉपिंग विशेष
तुषार प्रीती देशमुख – response.lokprabha@expressindia.com

श्रावणापासून सुरू असलेला व्रतवैकल्यांचा काळ संपून आता सणांचा मनमुराद आनंद लुटण्याचे दिवस आले आहेत. आपल्या कृषिप्रधान देशात सारेच सण-उत्सव शेतीच्या वेळापत्रकाशी म्हणजे थोडक्यात निसर्गाशी जोडलेले आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीला येणारी दिवाळी म्हणजे वर्षांतला मोठा सण. विविध प्रकारचे जिन्नस कल्पकतेने वापरून हिवाळ्यासाठी शरीराची तयारी करून घेणारे, कलात्मक आणि चविष्ट पदार्थ आता घरोघरी केले, खाल्ले जातील. पण नेहमीच्या लाडू, चकली, करंजीला नवं रूप द्यायचं असेल आणि फराळातला तोचतोचपणा टाळून त्यात नावीन्य आणायचं असेल, तर पुढे दिलेले पदार्थ नक्की करून पाहा.

बेसन वडी

कढईत पाव वाटी तुपात (साजूक/डालडा) १ वाटी बेसन पीठ मंद आचेवर पिठाचा रंग बदलेपर्यंत व पिठाला छान सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यावं. पीठ सतत ढवळत रहाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, नाहीतर पीठ करपतं त्याला विशिष्ट वास येतो आणि पदार्थ बिघडतो.

दुसरीकडे भांडय़ात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ वाटी साखर, १ चिमूटभर मीठ, ५ काडय़ा केशर घालून पाणी उकळवून घ्यावं. हे पाणी कढईतल्या मिश्रणात हळूहळू घालावं नाहीतर हातावर उडतं. त्यात हवं तो व हवा तितका किसलेला सुका मेवा घालावा व पुन्हा घोटत रहावं मिश्रण जाडसर होऊ द्यावं. गॅस बंद करून त्यात वेलचीपूड घालून एकत्र करून घ्यावं. लगेचच एक थाळीला तुपाचा हात लावून त्यामधे मिश्रण घालून थापून घ्यावं. गरम असतानाच सुरीने काप पाडावेत.

२० – २५ मिनिटांतच वडी तयार होते.

गव्हाची चकली

१ वाटी गव्हाचे पीठ एका कापडात बांधून ती पुरचुंडी चाळणीमध्ये ठेवून कुकरमध्ये २ पेले पाणी घालून वर ती चाळणी ठेवावी (चाळणी छोटी असेल तर कुकरमध्ये उभे भांडे ठेवून त्यावर चाळणी ठेवावी) मोदकपात्र असल्यास उत्तम, कुकरची शिट्टी काढून झाकण लावून २० मिनिटे वाफवून घ्यावे. कापडातून पीठ लगेच काढावे त्याचा घट्ट गोळा होतो. पीठ फोडून घ्यावे व त्यात गुठळ्या नसाव्यात.

परातीत पीठ घेऊन त्यात २ चमचे लाल मिरची पावडर, १ टीस्पून हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, १ टीस्पून कुस्करलेला ओवा, १ चमचा भाजलेले तीळ, १ चमचा मीठ घालून पीठ एकत्र करून अर्धी वाटी पाणी घेऊन त्यातील थोडे थोडे पाणी घालत पीठ जाडसर मळून घ्यावे. शेवटी १ चमचा तेल घालून पुन्हा मळावे (पाणी व तेल गरम करून घेऊ नये.)

सोऱ्याला तेल लावून त्यात मावेल तितके पीठ भरून चकल्या पाडून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून चकली तळून घ्यावी.

गव्हाची खुसखुशीत चकली तयार.

पापुद्री त्रिकोण

परातीत १ वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १ टी स्पून हिंग, १ टी स्पून हळद, अर्धा चमचा हातावर कुस्करून घेतलेला ओवा, १ चमचा जिरे, १ चमचा मीठ, ४ चमचे तेल हे सर्वप्रथम एकत्र मळून घ्यावे. त्यात पाव वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी घेऊन पीठ मध्यम जाडसर मळून घाव्ये.

एका वाटीत ४ चमचे तूप व २ चमचे तांदूळ पीठ फेटून साठा तयार करून घ्यावा.

कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन तांदूळ पिठावर पातळ पोळी लाटून त्यावर साठा लावून पोळीचा घट्ट रोल तयार करावा. रोलचे सुरीने छोटे तुकडे करून हलक्या हाताने दाबून पुन्हा गोल पातळ लाटून त्यावर साठा लावून दुमडून पुन्हा साठा लावून दुमडून त्रिकोण करावा. पुन्हा हलक्या हाताने लाटून घ्यावे.

कढईत तेल गरम करून मंद आचेवर सर्व लालसर रंगावर तळून घ्यावेत.

हे त्रिकोण खमंग, खुसखुशीत होतातच शिवाय त्यांना छान पापुद्रे सुटतात.

तिखट शेव

१ वाटी चण्याचे पीठ, १ चमचा तांदूळ पीठ, ३ चमचे लाल मिरची पावडर, १ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, १ टीस्पून लसूण पावडर, १ चमचा मीठ, २ टीस्पून ओवा, पाव वाटी पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यावे. लगेच सोऱ्यात घालावे कढई गरम तेलात शेवेचा घाणा घालून तळून घ्यावा.

फ्युजन बाइट्स

नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन-सर्व पिठे प्रत्येकी पाव वाटी (एकूण सव्वा वाटी पिठे ), पाव वाटी तांदूळ पीठ, दीड चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, १ चमचा मिक्स हब्र्ज, १ चमचा मीठ, २ चमचे गरम तेल, २ चमचे बटर, अर्धी वाटी पाणी हे सर्व एकत्र करून पीठ मध्यम जाडसर मळून घ्यावे. तांदळाच्या पिठावर पोळपाटावर पोळीपेक्षा थोडी जाडसर पोळी लाटून कातणीने त्रिकोणी, लांबट, षटकोनी, गोल – हवे तसे आकार कापून कढईत तेल गरम करून त्यात हे तुकडे मध्यम आचेवर तळावेत, म्हणजे आतून शिजतात. (नाहीतर तुकडे वरून लालसर होतील पण आतून कच्चेच राहतील.)

खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत ‘फ्यूजन बाइट्स’ तयार.

टीप : बटर, मिक्स हब्र्ज व चिली फ्लेक्समुळे मुले आवडीने हा पदार्थ खातात. पालकही खूश, कारण मुलांच्या आहारात पौष्टिक पिठे जातात.

दुकानात मिक्स भाकरी पीठ मिळते.

भाजणी चकली

चकली भाजणीचे प्रमाण : तांदूळ ४ वाटय़ा, चणाडाळ २ वाटय़ा, मूग डाळ १ वाटी, उडीद डाळ अर्धा वाटी, पोहे अर्धी वाटी, धणे व जिरे पाव वाटी, ८ कळी मिरी दाणे हे सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावेत, जास्त भाजू नयेत चकली तुटते

हे सर्व एकत्र करून दळून घ्यावे (खूप बारीक पावडरसारखे दळू नये.)

चकलीची कृती :

भांडय़ात १ वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून हळद, अडीच चमचे लाल मिरची पावडर, १ टी स्पून हिंग, २ चमचे तेल व १ चमचा मीठ घालून बुडबुडे येईपर्यंत उकळवून घ्यावेत. गॅस बंद करून त्या पाण्यात १ वाटी दळलेलं भाजणी पीठ घालून एकत्र करून त्यावर झाकण ठेवून १५ मिनिटं ठेवावं. पीठ मध्यम जाडसर मळून घ्यावं.

सोऱ्याला तेल लावून त्यात मावेल तेवढय़ा मळलेल्या पिठाचा गोळा भरून चकल्या तयार करून घ्याव्यात. कढईत तेल व्यवस्थित गरम करून त्यात चकली सोडून मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

फराळ उत्तम होण्यासाठी..

चकली तळताना तेल कडकडीत गरम असणे गरजेचे आहे, नाहीतर चकली तेलात विरघळते किंवा फुटते.

कुरमुऱ्यांचा चिवडा करताना त्यात मेतकूट घालावे. चिवडा चविष्ट होतो.

कडबोळी हाताने पाटावर वळून मंदाग्नीवर तळावीत. आतून शिजतात व पुष्कळ दिवस टिकतात.

पोह्य़ांचा चिवडा करताना पातळ पोहे वापरावेत व ते मंद आचेवर चिमूटभर मीठ घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. चिवडय़ात अगदी थोडा गरम मसाला वापरावा, चिवडा चविष्ट होतो.

तिखट शेवेचे पीठ भिजवताना त्यात मोहन घालू नये. पीठ भिजवल्यावर लगेचच शेव पाडून, गरम तेलात तळावी. पीठ फार घट्ट झाल्यास, शेव पाडताना खूप जोर लावावा लागतो.

साटोऱ्या करताना खव्याचे सारण रव्या-मैद्याच्या पिठात भरून गोळा बंद करून मैद्याच्या पिठावर घोळवून, हलक्या हाताने पोळी लाटून साटोऱ्या तयार करून घ्याव्यात. तव्यावर मंदाग्नीवर भाजून थंड करून मग तळाव्यात.

अनारसे तयार करायच्या वेळी तयार पिठात पाव चमचा दुधाची साय घालून, पीठ मळावे. एका बाजूला खसखस लावून भरपूर तुपात मंदाग्नीवर तळावेत. अनारसे उलटवून तळू नयेत, खसखस लावेलेली बाजू वर असावी व त्यावर झाऱ्याने तूप हलक्या हाताने उडवत तळावे.

शंकरपाळी करण्यासाठी पीठ घट्ट भिजवावे. मळलेले पीठ तासभर तरी झाकून ठेवून मगच त्याची पोळी लाटून शंकरपाळे कापावेत. कढईत तेलात मंदाग्नीवर तळावेत. शंकरपाळे फार खुसखुशीत होतात.

चिकन खिमा पकोडा

साहित्य :

चिकन खिमा,

आलं-लसूण-मिरची पेस्ट,

दही, काळीमिरी पावडर,

लाल मिरची पावडर,

गरम मसाला, हिरवे वाटाणे,

कांदा,  काजू, किसमिस,

पुदिना पेस्ट, कोथिंबीर,

धने-जिरे पावडर, मीठ,

पातीचा कांदा, मिक्स हर्ब्स.

कृती :

खिमा मॅरिनेट करण्यासाठी त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट, दही, काळीमिरी पावडर, लाल मिर्ची पावडर, गरम मसाला, पुदिना पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पावडर, मिक्स हर्ब्स घालून किमान दोन तास ठेवा.

एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, पातीचा कांदा, हिरवे वाटाणे, मीठ घालून परतून घ्या. यात मॅरिनेट केलेला खिमा घालून वाफेवर चांगला शिजून घ्या. तूप गरम करून त्यात काजू तळून घ्या. हे काजू त्या तुपासहित खिम्यामध्ये घाला. सोबत किसमिसही घाला. पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाका. आता या खिम्याचे पकोडे तयार करा. अंडय़ाचे बलक, तांदळाचे पीठ यात घोळवून पकोडे तळून घ्या. गरमागरम चिकन खिमा पकोडे स्टिकला लाऊन सॉस किंवा चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

फिश कॅनेपीज

साहित्य :

पापलेट/ बासा फिश,

आलं-लसूण-मिरची पेस्ट,

अंडय़ाचा बलक, तांदळाचं पीठ,

रवा, केनेप, कांदा, टॉमेटो,

कोथिंबीर, पुदिना,

आंबट-गोड चटणी, शेव,

चाट मसाला, मीठ

कृती :

माशांना आलं-लसूण-मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ लाऊन मॅरिनेट करून घ्या. एका कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे, अंडय़ाचा बलक, तांदळाचे पीठ रव्यात घोळवून तळून (डीप फ्राय) घ्या. मग केनेपमध्ये आंबट-गोड चटणी, फ्राय केलेले फिश, बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर, पुदिना, शेव, चाट मसाला आणि मीठ घालून सव्‍‌र्ह करा.

नवरत्न पुलाव

साहित्य :

१ वाटी शिजवलेला भात,

१ वाटी उकडलेली फरसबी,

१ वाटी उकडलेला गाजर,

१ वाटी उकडलेला फ्लॉवर,

अर्धी वाटी बारीक चिरलेला पेर,

अर्धी वाटी बारीक चिरलेला सफरचंद,

अर्धी वाटी बारीक चिरलेला अननस,

अर्धी वाटी डाळींबाचे दाणे,

अर्धी वाटी काळी द्राक्ष,

अर्धी वाटी संत्र्याच्या फोडी,

४ चमचे फ्रेश क्रीम,

अर्धा चमचा शहाजिरे,

२ चमचे पिठी साखर, २ चमचे तूप,

बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ.

कृती :

प्रथम कढईत तूप गरम करून त्यात शहाजिरे, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी घालून परतून घ्या. नंतर त्यात संत्र्याच्या फोडी, सफरचंद, पेर, अननस, काळी द्राक्ष, डाळींबाचे दाणे घालून परतून घ्या.

फ्रेश क्रीम, पिठी साखर आणि मीठ घालून एकजीव करा. तयार मिश्रणात शिजवलेला भात घालून परतून घ्या. पुन्हा त्यात फ्रेश क्रीम घालून ५ मिनिटे शिजू द्या. तयार राईस एका प्लेटमध्ये काढून सव्‍‌र्ह करा.

चिकन टँगी पुलाव 

१ वाटी तांदूळ स्वच्छ धुऊन २० मिनिटं पाण्यात ठेवा. नंतर भांडय़ात तांदूळ घेऊन त्यात दुप्पट पाणी, चिमूटभर मीठ आणि अर्ध लिंबू पिळून भात शिजवून घ्या.

बोनलेस चिकनचे मध्यम आकाराचे २०० ग्राम तुकडे स्वच्छ धुऊन घ्या. त्याला ३ टेबलस्पून आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट लावून ठेवा. भांडय़ात ४ टेबलस्पून तेलावर १ टीस्पून शहाजिरे, पाव टीस्पून हिंग, २ अख्खी तमालपत्र, १ तुकडा दालचिनी, २ उभे चिरलेले कांदे, ४ टॉमेटोची पेस्ट, १ टीस्पून लाल मिरची पावडर, हळद आणि मॅरीनेटेड चिकनचे तुकडे, चवीनुसार मीठ व १ छोटा पेला पाणी घालून शिजवून घ्या. त्यात शिजवलेला भात घालून पुन्हा परतवून घ्यावा. चिकन टँगी पुलाव तयार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali festival special food and sweets recipes dd

Next Story
उत्तराखंडचा इशारा…