lp27लोकसत्ता दिवाळी २०१४
‘लोकसत्ता’ म्हटलं की वाचनीय मजकूर आणि गंभीर विषयाची साक्षेपी चर्चा हे समीकरण ठरलेलं आहे. या वर्षीचा ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंकही या परंपरेला जागणारा आणि एकदम सज्जड आहे. कमालीच्या वेगवान अशा आजच्या जगण्यामध्ये तितकीच विसंगती आहे. अवघ्या साठ वर्षांपूर्वी अहिंसेसारख्या मूल्याची कास धरून स्वातंत्र्यलढा दिलेला समाज तो हाच का असा प्रश्न पडावा अशी आजची परिस्थिती आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये मूल्यांचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे समाजाला चार गोष्टी सुनावण्याचा अधिकार असलेला आवाजही क्षीण होत चाललेला आहे. मुळात असा आवाज उमटतच नाहीय. तसा धाक असलेली माणसंही समाजात दिसत नाहीत. तेव्हा समाजातला ‘विवेकाचा आवाज हरवलाय का’, असा प्रश्न उपस्थित करणारा, त्याची चर्चा करणारा एक महत्त्वाचा विभाग अंकात आहे. त्यात वसंत आबाजी डहाके, गिरीश कुबेर, राजेश्वरी देशपांडे आणि डॉ. भारत पाटणकर यांचा सहभाग आहे. ‘राजकीय दहशतीचा उदयास्त’ या विभागात स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, सुहास सरदेशमुख, दिनेश गुणे आणि मार्कुस डाबरे यांनी अनुक्रमे सोलापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग आणि वसई म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या सत्तेचा कसा अस्त होत गेला याचा आढावा घेतला आहे. प्रताप आसबे यांनी महाराष्ट्र सामाजिक यादवीच्या उंबरठय़ावर कसा उभा आहे, याचं विश्लेषण केलं आहे. ‘चिन्ह आणि चेहरे’ या विभागात गुलजार यांनी त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींवर लिहिलेली काव्यात्म शब्दचित्रं आहेत. त्यात मार्सिया बासू, विमलदा, नासीरुद्दीन शहा, सलील चौधरी, मीनाकुमारी, पंचमदा, अमजद खान, अतुल कुलकर्णी यांच्यावरच्या गुलजार यांच्या मितभाषी कविता आहेत. त्यांचा अनुवाद किशोर मेढे यांनी केला आहे. तर नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांच्या आगामी कादंबरीतलं ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ हे प्रकरण कादंबरीबद्दल उत्सुकता वाढवणारं आहे. विजय पाडळकर यांनी ‘लेखक आणि ग्रेट डिप्रेशन’ या लेखात वीसच्या दशकातील जागतिक मंदीच्या काळात कॉनराड रिक्टर हा लेखक जगण्यासाठी काय काय करतो याची कहाणी सांगितली आहे. ‘मराठी टू हिंग्लिश थिएटर’ या लेखात किशोर प्रधान यांनी आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासाचं वर्णन केलं आहे. ‘टिंग्या’चे दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी ‘द बायसिकल थीफ आणि टिंग्या’ या लेखात तर नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’च्या विरोधाभासी प्रेरणा या लेखात आपल्या सिनेमानिर्मितीच्या प्रेरणांविषयी लिहिले आहे. धर्मकीर्ती सुमंत यांनी ‘गुरुदत्त कुठे गेला’ या छोटेखानी लेखात गुरुदत्तचा वेगळ्या अंगाने शोध घेतला आहे. मीठ म्हटलं की आपल्याला आठवतो गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह. एरवी मीठ ही आपल्या दैनंदिन जीवनातली इतकी अपरिहार्य गोष्ट आहे की तिचं वेगळेपण आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळेच ‘मिठालाही इतिहास आहे’ या लेखात वीणा गवाणकर यांनी घडवलेलं मिठाचं विश्वदर्शन अत्यंत वाचनीय आहे. ‘संगीत शारदा’ नाटकामधून दिसणारा स्त्रीशक्तीचा उद्गार राजीव नाईक यांनी उलगडून दाखवला आहे. रॉल्फ नेव्हानिलना हा गणितामधला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या गणितज्ञ सुभाष खोत यांची संहिता जोशी यांनी मुलाखत घेतली आहे. प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं नेहमीप्रमाणे चिमटे काढणारी आहेत. देवदत्त पाडेकर यांचे मुखपृष्ठचित्र आकर्षक आहे.
संपादक : गिरीश कुबेर
पृष्ठे : १९२; किंमत : १२० रुपये.
साप्ताहिक साधना

lp31बालकुमार दिवाळी
साधना साप्ताहिक गेली सात वर्षे मुख्य अंकाबरोबरच बालकुमार दिवाळी अंक प्रसिद्ध करत आहे. त्या अंकाला मिळालेले यश आणि नव्या वाचकसमूहाची गरज लक्षात घेऊन साधनाने या वर्षी युवा दिवाळी विशेषांकही प्रसिद्ध केला आहे. बालकुमार दिवाळी अंकात अनिल अवचट यांनी लिहिलेल्या ‘कोसळलेल्या बसमधला माणूस’ या लेखातून माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यावर सुंदर भाष्य आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांचा ‘तीन मुली आणि एक कुत्रा’ हा स्वानुभवावर आधारित लेख बालमित्रांना आवडेल असा आहे. शाळेतले दिवस या लेखात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सगळं चांगलं चाललेलं असताना शिक्षकांमधल्या राजकारणामुळे आपली शेवटची वर्षे कशी गढुळली याबद्दल लिहिलं आहे. रोझा सुंदर या बंगलोरमध्ये इन्व्हेंचर अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घेतलेली ‘द हिंदू’ या दैनिकाचे तत्कालीन मुख्य संपादक सिद्धार्थ वरदराजन यांची मुलाखत माध्यमांबद्दल मुलांना माहिती देणारी आहे. जयंत नारळीकर यांचा एक ‘संस्मरणीय मोहीम’ हा फलज्योतिष आणि विज्ञानावर भाष्य करणारा लेख नेहमीप्रमाणे वाचनीय झाला आहे. भारत सासणे यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली ‘वेल डन समशेर’ ही कथा चांगली आहे.
संपादक : विनोद शिरसाठ
पृष्ठे : ३६; किंमत : २५ रुपये.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

lp32युवा दिवाळी
साधनाच्या युवा विशेषांकात मनमोहन सिंग यांच्या तीन मुलींवर एक लेख आहे. हा लेख या तीन मुलींपैकी एकीने म्हणजे दमन सिंग हिने लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल’ या पुस्तकातला एक भाग आहे. डॉ. शैला दाभोळकर यांनी ‘आणि वाट सापडली’ या लेखात डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबरचे सहजीवन उलगडले आहे तर मीना कर्णिक यांचा ‘आयबीएन लोकमतपूर्वीचा निखिल’ हा लेख निखिल वागळे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा आहे. संतोष पवार यांनी लिहिलेली ‘बहादूर थापा’ ही कविता हृदयस्पर्शी आहे. ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांचा ‘अल्लादीनचा दिवा’ हा लेख आजच्या पिढीने वाचावाच असा आहे. ‘माझ्या आठवणीतलं न्यूयॉर्क’ हा अच्युत गोडबोले यांचा लेख न्यूयॉर्कची सफर घडवून आणतो. चिन्मय दामले यांच्या एका सेक्युलर कॉलेजची गोष्ट’ हा लेख म्हणजे मन्सूरअली कमरुद्दीन या अवलियाची सत्यकथा आहे. ‘या जीवनाचं काय करू या?’ हा डॉ. अभय बंग यांचा लेख विचारप्रवृत्त करणारा आहे. तर ‘फँड्री’ सिनेमामुळे या वर्षी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या नागराज मंजुळे यांनी आपल्या बालपणीचे वाया जाण्याचे दिवस आणि नंतर बदलत गेलेल्या आयुष्याचा घेतलेला आढावा वाचनीय आहे.
संपादक : विनोद शिरसाठ
पृष्ठे : ५८; किंमत : ४० रुपये.

lp28मौज
दिवाळी अंकामध्ये ज्याची आवर्जून वाट पाहिली जाते अशा अंकामधला एक अंक म्हणजे मौज. जे अंक वाचल्यावर समाजमनात काय चाललंय याचा अंदाज घेता येतो असा हा अंक. मौजचा यंदाचा अंकही दरवर्षीच्या परंपरेला साजेसा आहे. ‘चित्रपटातला समाज, समाजातील चित्रपट’ या परिसंवादात गणेश मतकरी, परेश मोकाशी, चित्रा पालेकर आणि सचिन कुंडलकर यांनी भाग घेतला आहे. या परिसंवादातून सिनेमासारख्या लोकाभिमुख कलेचा समाजाशी, समाज-वास्तवाशी असलेला परस्परसंबंध विविध अंगांनी तपासला आहे. समीर कुलकर्णी, मधु मंगेश कर्णिक, स्टिफन परेरा, विजया राजाध्यक्ष यांच्या कथा, तर आशा बगे यांच्या लघुकथा आहेत.

लेखक आणि त्याची निर्मिती यांच्यामधलं नेमकं नातं शोधणारा महेश एलकुंचवार यांचा लेख आवर्जून वाचलाच पाहिजे असा आहे. सुबोध जावडेकर यांनी ‘प्राण्यांना बुद्धी असते का’ या लेखात प्राणीविश्वाचा आगळावेगळा धांडोळा घेतला आहे. बाळ फोंडके, वर्षां गजेंद्रगडकर यांनी ‘शाश्वत विकासाची भारतीय संकल्पना’ या लेखात विकास या संकल्पनेची चर्चा केली आहे. निळू दामले यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आप पार्टीचा लेखाजोखा मांडला आहे.

ललित लेखांच्या विभागात ‘विश्राम बेडेकर दूरस्थ.. जवळचे’ या लेखात विजय कुवळेकर यांनी बेडेकरांसारख्या शब्दांत पकडायला अवघड अशा व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या संपादक राम पटवर्धन यांच्यावर विकास परांजपे यांनी लिहिलेल्या लेखात पटवर्धनांचं माणूसपण, त्यांचा बुद्धिवादीपणा आणि बहुश्रुतपणा नेमका टिपला गेला आहे. प्रकाश खांडगे यांचा ‘भीतीचे वर्तुळ’ हा लेख त्यांच्या आगामी आत्मचरित्रातील एक भाग आहे. ‘नेव्हरमोअर नेव्हरमोअर’ हा जयंत गुणे यांचा लेख एक वेगळीच अनुभूती देतो. कांचनमृग पाहिलेला माणूस या लेखात विजय पाडळकर यांनी मुग्युएल दी सर्वातीस या स्पॅनिश कादंबरीकाराच्या ‘द इंजिनीयस जंटलमन डॉन किहोते द ला मांचा’ या कादंबरीतील डॉन या व्यक्तिरेखेवर लिहिले आहे. ‘शान्ताबाई’ हा श्रीनिवास विनायक कुलकर्णी याचा लेख वाचनीय आहे. ‘माझे क्रिकेटचे दौरे’ हा माधव आपटे यांचा लेख त्यांच्या आगामी आत्मकथनातील एक भाग आहे. ‘रक्ताची गोष्ट’ हा अनिल अवचट यांचा, तर ‘हरवलेले पंचशील’ हा आल्हाद गोडबोले यांचा लेख वाचनीय आहे. कवितांच्या विभागात मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर, प्रवीण बांदेकर, हेमंत जोगळेकर, प्रभा गणोरकर, प्रज्ञा पवार, नलेश पाटील, दासू वैद्य इत्यादींच्या कविता आहेत. अंकाच्या मुखपृष्ठासाठी पाब्लो पिकासोचे चित्र वापरले असून पिकासोवर प्रभाकर कोलते यांनी लिहिले आहे.
संपादक : मोनिका गजेंद्रगडकर
पृष्ठे : २६४; किंमत : १२० रुपये.

lp29वयम्
लहान मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधता येणं ही मोठी अवघड गोष्ट असते. आपल्याकडे हा संवाद साधू पाहणारी जी दोन-चार नियतकालिकं आहेत त्यांत वयम्चा उल्लेख करायला हवा. मुलांना आजच्या काळातल्या विविधांगी घटकांची माहिती मिळेल आणि त्यांचं मनोरंजनही होईल हा दुहेरी हेतू वयम्च्या दिवाळी अंकातून साध्य झाला आहे. नुकत्याच झालेल्या मंगळमोहिमेबद्दल मुलांच्या मनात अपार कुतूहल असणार हे गृहीत धरून ‘मंगळयान’ असा एक डॉ. बाळ फोंडके आणि मोहन आपटे यांचा विभाग अंकात आहे. ‘यल्लो’ सिनेमामुळे सगळ्यांसमोर आलेली गौरी गाडगीळ आणि ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’सारख्या सिनेमांतून सगळ्यांसमोर आलेल्या केतकी माटेगावकर, तसंच हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदे यांची मुलाखत आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, मुकुंद टांकसाळे यांनी छोटय़ांशी संवाद साधला आहे. सुबोध जावडेकर, डॉ. आनंद शिंदे, राजीव तांबे, मंजुश्री गोखले यांनी मुलांसाठी गोष्टी लिहिल्या आहेत. हर्षवर्धन गोखले या छोटय़ा मित्राने वर्षभर शाळेत न जाताही तो काय काय शिकला त्याची भन्नाट गोष्ट सांगितली आहे. जपान, इस्रायल, नेदरलँड्स, स्वीत्र्झलड, जर्मनी, सिंगापूर या प्रगत देशांतील शाळांबद्दल वेगवेगळ्या अनुभवी मंडळींनी लिहिलं आहे.
संपादक : शुभदा चौकर; पृष्ठे : १६४; किंमत : ९० रुपये

lp30स्थलांतरितांचं भावविश्व
स्थलांतर हा जीवनाचा स्थायीभाव आहे. नोकरीधंद्यासाठी करावं लागलेलं असो अथवा फाळणीसारख्या घटनांमुळे जबरदस्तीने कराव लागलेलं असो; त्यात संघर्ष हा अध्याहृत असतो. सवयीचा प्रदेश, माणसं सोडून दुसरीकडे गेल्यानंतर केवळ जुळवून घेण्याबरोबरच नव्या विश्वात यशस्वी होण्याचे आव्हानदेखील असते. अर्थात स्थलांतरितांचा दु:खाच्या सोबतीनेच एका संघर्षांतून दुसऱ्या संघर्षांत प्रवास सुरू असतो. हा सारा संघर्ष ॠतुरंगच्या दिवाळी अंकात पानोपानी दिसून येतो.

१९४७ च्या भारत-पाक फाळणीच्या पाश्र्वभूमीवर घडलेल्या प्रसंगांचा समावेश अंकात प्रामुख्याने करण्यात आला आहे. कुलदीप नय्यर यांचं सियालकोटहून दिल्लीला हे प्रकरण वाचताना आपण आपसूकच फाळणीच्या काळात जातो. आसिफ नुराणी, नरेंद्र मोहन, याच्या अनुभवांनी फाळणीची शल्य जाणवू लागतं. गुलजार, सादत हसन मंटो, महीप सिंह यांच्या कथांचा अनुवाद फाळणीचं भीषणत्व आणखीनच गडद करतो.

नोकरी व्यवसायासाठी झालेलं स्थंलातर काहीसे सुखावह असले तरी परदेशात आलेले अनुभव हे धडपडय़ांसाठी प्रेरणादायी असतात. प्रभाकर नाईक साटमांनी या प्रवासाचे मांडलेले चित्र असेच आहे. सुनील देशमुख, सुधीर देवरे, प्रमोद नवाथे यांच्या यशोगाथांचा समावेश या अंकात आहे. अर्थात स्थलांतरणाच्या या प्रश्नाला असणारे अनेक पैलूदेखील अंकात उलगडण्यात आले आहेत. मिलिंद चौबळ, दिनकर गांगल, डॉ. द. भि. कुलकर्णी, दीपक करंजीकर, रवींद्र पांढरे यांनी हे पैलू चिकित्सकपणे मांडले आहेत. मानवाबरोबरच जीवसृष्टीतील इतर सजीवांचं स्थलांतर आणि त्यांचे प्रश्न माधव गाडगीळ यांनी मांडले आहेत.
संपादक : अरुण शेवते; पृष्ठ : २१६; किंमत : १५० रुपये.

lp33इंटरनेटवरच्या पाराचा वेध
सोशल नेटवìकग हा आजच्या तरुणाईचाच नाही तर आबालवृद्धांचा परवलीचा शब्द बनून राहिला आहे. एकेकाळी गावातील पाराचं हे वैश्विक स्वरूप. अर्थात पारावरच्या गावगप्पांचा समावेशदेखील यात आहेच. पण त्यापलीकडे जाऊन आज आपल्या सर्वाच्याच जगण्याचा भाग कसा झाला हे पाहणं रंजक आहे. सोशल नेटवर्किंग हे वैश्विक रूप शब्दरुचीच्या यंदाच्या दिवाळी अंकात उलगडण्याचा प्रयत्न दिसून येतो.

धनंजय गांगल यांनी या नेटवर्कचं नेमक सामथ्र्य मांडले आहे, तर माधव शिरवळकर यांनी या महाजालातील सर्च लाइफवर प्रकाश टाकला आहे. गेल्या काही वर्षांतील सोशल मीडियाच्या बदलातून राजकारणात त्याचा वाढता प्रभाव, इंटरनेटवरील उचलेगिरी, अ‍ॅनिमेशनचे जग, ई-बँकिंग अशा या सोशल नेटवर्किंगच्या इतर पैलूंवर प्रज्ञा शिदोरे, अपर्णा पाटील, गणेश देवकर, तनुश्री राणे, मोहन टांकसाळे यांनी प्रकाश टाकला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असला तरी मुख्य प्रवाहातील रेडिओसारख्या माध्यमातील बदल आणि नवी आव्हाने मेधा कुळकर्णी यांनी मांडली आहेत.

सोशल नेटवर्किंगच्या मुख्य थिमशिवाय अंकातील ललित वैचारिक लेखातून अनेक वेगळे विषय हाताळण्यात आले आहेत. डॉ. उज्ज्वला दळवी यांनी विदूषकांच्या दुनियेचा वेध घेतला आहे, तर ज्ञानोबा उत्पात, व्यंगचित्रकार प्राण, ना. घ. देशपांडे यांच्या मेहेकर हे अनुक्रमे अरुण पुराणिक, प्रभाकर वाईरकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांचे लेख विशेष आहेत.
संपादक : सुदेश हिंगलासपूरकर; पृष्ठे : २३०; किंमत : १०० रुपये.

lp34आम्ही उद्योगिनी
स्त्रीचा संबंध फक्त घर, संसार, नोकरी इतकाच नसतो; तर ती एक यशस्वी उद्योजिकाही बनू शकते, हे पटवून देणारा दिवाळी अंक म्हणजे ‘आम्ही उद्योगिनी.’ या अंकात केवळ एखादी गृहिणी उद्योजिका कशी बनू शकते इतकंच सांगितलं नाही तर यशस्वी उद्योजिकांच्या मुलाखती, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची यशोगाथा हे सारं काही या दिलं आहे. अनेक गृहउद्योग यशस्वीरीत्या चालवणाऱ्या महिलांची माहितीही यामध्ये दिली आहे. असं म्हणतात, की दोन बायका एकत्र आल्या की काम होणं कठीणच. पण, काहींनी हा आरोप खोटा ठरवत ‘सांज क्रिएशन’च्या चार मैत्रिणींनी ज्यूटच्या बॅग्जचा व्यवसाय कसा सुरू केला हे या अंकात उत्तम प्रकारे मांडलं आहे. रुखवतातल्या वस्तू तयार करण्यामध्ये महिलांचा वाटा अधिक असतो. पण, ही हौस, आवडही आपला व्यवसाय बनू शकते हे सांगणारा लेखही यामध्ये आहे. पिढीजात फक्त पंरपरा, संपत्ती याचाच वारसा येत नाही तर घरातल्या माणसांच्या कलागुण, कौशल्याचाही वारसा चालवणारे लोक असतात. हे पटवून घेण्यासाठी या अंकातील परांजपे कुटुंबाविषयीचा ‘तीन पिढय़ांचे भरतकाम’ हा लेख वाचायलाच हवा. गॅरेज किंवा गाडय़ांसंबंधी व्यवसाय करणे ही पुरुषांची मक्तेदारी मोडून काढणाऱ्या सविता राणे यांची कहाणीही यात आहे. लोणावळ्याजवळ सविता त्यांचं गॅरेज चालवत आहेत. या अंकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यातील प्रत्येक लेख छोटा असून त्यातली माहिती मुद्देसूद आहे. याशिवाय, पदार्थ, साडय़ा, शोभेच्या वस्तू, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांमध्ये असलेल्या विविध महिलांचे योगदान यामध्ये नमूद केले आहे.
संपादिका : मीनल मोहाडीकर; पृष्ठे : ५६; किंमत : ८० रुपये.

lp37आरोग्य ज्ञानेश्वरी
‘आरोग्यम् धनसंपदा’ असं आपण म्हणतो. पण, अनेकदा छोटय़ा दुखण्यांकडे आपण दुर्लक्षही करतो तर कधीकधी त्यांचा नको तेवढा बाऊही केला जातो. या सगळ्याकडे नवा दृष्टिकोन देणारा दिवाळी अंक म्हणजे ‘आरोग्य ज्ञानेश्वरी.’ यामध्ये शरीराच्या अगदी छोटय़ा कुरबुरींपासून मोठय़ा त्रासांपर्यंतच्या सगळ्या दुखण्यांची लक्षणं, उपाय, ते होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी असं सगळं आहे. अंकाच्या सुरुवातीलाच ‘नाटुकले’ असा छोटाच पण महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये विशिष्ट पात्रांचे काही ठरावीक आजारांवर संवाद आहेत. एक त्या आजाराविषयी आपला त्रास व्यक्त करतो तर दुसरा त्याबाबत नव्या दृष्टिकोनातून बघायला सांगतो. विशेष म्हणजे या संवादातूनच उपायही सांगितले आहे. याबरोबरच लठ्ठपणा, मधुमेह, दातांचे आजार, कोलेस्टरॉल, कावीळ अशा अनेक आजारांवर यामध्ये वेगवेगळ्या शैलीत लेख दिलेले आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती तर मिळतेच पण, व्यक्तीचा दृष्टिकोनही बदलतो. आहाराविषयीची माहितीही यामध्ये आहे. केवळ शारीरिक आजारांविषयीचे लेखच यात नसून मानसिक ताणतणाव दूर करण्यांसंबंधीही यामध्ये आवश्यक माहिती दिली आहे. लहान मूल आणि अभ्यास याबाबत नेहमीच त्यांचे पालक तक्रार करत असतात. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा ‘कमी वेळात जास्त अभ्यास करायची जादू’ हा लेख विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरेल. या अंकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये काही आजारांविषयी असलेल्या वाचकांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन अगदी सोप्या भाषेत केलं आहे. याशिवाय उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ आणि व्यायाम किती आवश्यक आहे हेही पटवून देणारा लेख यामध्ये आहे. अन्नाची विषबाधा हा प्रत्येकाच्याच काळजीचा एक विषय असतो. पण, याबाबत सखोल ज्ञान मात्र फारसं कोणालाही नसतं. ‘अन्नाची विषबाधा कशी आणि केव्हा’ हा या अंकातील लेख महत्त्वपूर्ण ठरतो. विशिष्ट तक्त्यांच्या मांडणीतून हा विषय वाचकांना अगदी सोपा करून सांगितला आहे.
संपादक : डॉ. हेमंत जोशी, डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. अर्चना जोशी; पृष्ठे : १६०; किंमत : १२० रुपये.

lp35मैत्रीण
आपापल्या कार्यक्षेत्रात उच्च स्थानी पोहचल्यावरदेखील आपल्या छंदासाठी अथवा अन्य काही विषयांसाठी वेळ काढणं हे महाकर्मकठीण काम. पण लता मंगेशकर, आशा भोसले, स्वरूप संपत, स्मिता जयकर, निवेदिता जोशी सराफ यांनी जोपासलेल्या वेगळ्या वाटा हा यंदाच्या मैत्रीण दिवाळी अंकातील नवा पैलू उलगडणारा आहे. लता मंगेशकरांची फोटोग्राफी, पेंटिंग, ज्वेलरी डिझाइनिंगची आवड मांडणारा जयश्री देसाईंचा लेख, सुधीर गाडगीळ यांनी उलगडलेली आशा भोसले यांची पाककला, स्वरूप संपत यांचं विशेष मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेणं हा वैजयंती आपटे यांचा लेख. हे लेख विशेष वाचनीय आहेत.

चाकोरीच्या वाटा सोडून वेगळ्या वाटांवर कार्यरत होत एका वेगळ्या विषयाला समाजासमोर मांडण्याचा ध्यास घेणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे लेख प्रेरणादायी आहेत. आदिवासी पाडय़ांवरील संगीताचा वेध घेणाऱ्या प्राची दुबळे यांच्या जगावेगळ्या प्रकल्पाचा वेध वाचनीय आहे.

प्रवीण दवणे, सलील कुलकर्णी, डॉ. संदीप केळकर, चंद्रशेखर कुलकर्णी यांचे विशेष लेख आवर्जून वाचण्यासारखे आहेत. रत्नाकर मतकरी आणि अन्य लेखकांच्या विशेष कथा आणि अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कथा ही मैत्रीणची दिवाळी भेटच म्हणावी लागेल.

मकरंद करंदीकर यांच्या दिव्यांच्या संग्रहाचा प्रकाश कामत यांनी घेतलेला वेध एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देतो.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठसंख्या : १६४, किंमत : रु. १२०/-

lp36अद्भुत भटकंतीचा खजिना
सामान्यत: पर्यटन हे प्रसिद्धी मिळालेल्या, गाजलेल्या ठिकाणांच्या भोवतीच धोपट मार्गाने होत असते; पण या धोपट मार्गापेक्षादेखील सृष्टिसौंदर्याचा अनुपम खजिना असणारी, मानवी प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार दाखविणारी काही पर्यटन स्थळे आपली वाट पाहत असतात. अशाच अद्भुत, अविस्मरणीय अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांचा वेध या ‘मस्त भटकंती’च्या दिवाळी अंकात घेण्यात आला आहे.

कोलोरॅडोपासून अगदी जवळ असणाऱ्या २४ कोटी वर्षांपासून लाल खडकाळ अस्तित्व दाखवणाऱ्या सुळक्यांच्या गार्डन ऑफ गॉड्सचा विजय पाडळकर यांनी घेतलेला वेध, उमा हर्डीकर यांनी दाखविलेल्या युरोपातल्या अपरिचित वाटा, पुष्पा जोशींनी उलगडलेला अफाट वाळूंच्या प्रदेशातील अनोखा खजिना, परीकथेत शोभावं असं जर्मनीतील कॉबलेंझ, पवनचक्क्य़ांचं हॉलंडमधील अनोखं गाव झानशान, चीन आणि तिबेट यांना जोडणारी स्काय ट्रेन अशी आंतरराष्ट्रीय पर्यटनाची मेजवानी अंकात देण्यात आली आहे.

तर देशांतर्गत अद्भुत स्थळांमध्ये हंपीजवळील दारोजी अस्वल अभयारण्य आणि गेंडय़ासाठीचं गुवाहाटीजवळील पाबितोरा अभयारण्यावर मिलिंद आमडेकर यांनी प्रकाश टाकला आहे. काबिनी वन्यजीव संवर्धन केंद्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील वारसास्थळे, म्हाताऱ्या सूर्याचं मंदिर, अग्निपंखी कुंभारगाव यांची सफर घडवली आहे.

तसेच पर्यावरणासाठी झटणाऱ्या आणि मोठमोठी जंगलं निर्माण करणाऱ्या- संवर्धन करणाऱ्या व्यक्तींवर ग्रीन हिरोज् या विभागात प्रकाश टाकण्यात आला आहे.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठसंख्या : १६४, किंमत – रु. १२०/-