lp02या दिवाळीला तुम्हालाही नटायचंय- सजायचंय..? प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्यायचंय? मग तुम्हाला फॅशनच्या दुनियेत सध्या काय इन आहे ते माहीत असलंच पाहिजे.

शॉपिंग, फॅशन असे परवलीचे शब्द आले की, मोठमोठय़ा शॉपिंग बॅग्स हातात घेऊन मॉल, शॉपिंग स्ट्रीटवर फिरणाऱ्या मुली असं काहीसं चित्र सर्वाच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. कपडे खरेदी प्रत्येकाला आवडते. नवनवीन कपडे, अ‍ॅक्सेसरीज, दागिने घालायलाही सर्वाना आवडतं, तरी पण शॉपिंगवर पैसे उडवण्याची गोष्ट येते तेव्हा बिचाऱ्या मुलींना टार्गेट केलं जातं. इतकंच काय, तर फॅशन मॅगझीन, फोटोशूटची कात्रणं हा सर्व त्यांचाच ‘खर्चीक’ इलाखा आहे, असं सांगून सगळे मोकळे होतात; पण मनातल्या मनामध्ये प्रत्येकजण या सगळ्याकडे ओढला गेलेला असतो. कधीतरी घरातल्या मुलीच्या गैरहजेरीत तिची फॅशन मासिकं तपासणं, सहज बाहेर पडलं असता समोरच्या मॉलच्या दिशेने पावलं खेचली जाणं अशा गोष्टी ‘अचानकपणे’ होऊन जातात आणि पकडलं गेलं की, ‘मी काय सहज फेरफटका मारला, तुझ्यासारखं नेहमी नेहमी कुठे येतो,’ असं म्हणून मोकळे होतात.
आता तर दिवाळी जवळ येतेय. त्यामुळे घराघरातून शॉपिंगला उधाण येईल. अशा वेळी नवीन ट्रेंड, कलेक्शन्सची माहिती देणारा घरामधला तमाम मुलींचा वर्ग एखाद्या देवदूतासारखा वाटू लागेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आजीपासून दादापर्यंत प्रत्येकाच्या शॉपिंगला सुरुवात होईल. त्यामुळे तुमच्यासाठी यंदाच्या फेस्टिव्हल फॅशनचे खास ट्रेंड्स. हे ट्रेंड्स तुम्हाला माहीत असायलाच हवेत. जेणेकरून तुम्हाला घरातील ‘ताईमंडळींना’ फॅशनचे ट्रेंड्स पटवून द्यायला जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि तुमचं कामसुद्धा सहज होईल.
फेस्टिव्हल म्हटलं की नेहमीचे भडक रंग, पारंपरिक लुक्स यांपासून थोडं वेगळ्या मार्गाने जात यंदा आबालवृद्ध कपडय़ांमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसताहेत, असं अनेक फॅशनपंडितांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध डिझायनर स्वप्निल शिंदेच्या मते, ‘सेलेब्रिटीजपेक्षा आजचा तरुणवर्ग फॅशनच्या बाबतीत भरपूर प्रयोग करतो. कुर्तीसोबत लेगिंगच हवी किंवा मिक्स-मॅचचा नियम सर्वत्र लागू करायचा हट्ट सध्या ते करत नाहीत. सेलेब्रिटीजना सतत फॅशन पोलिसांच्या नजरेखाली राहावे लागते. छोटीशी चूकसुद्धा करून त्यांना lp03चालत नाही. त्यामुळे लुक्सच्या बाबतीत ते खूपसे सावधच असतात; पण तरुणांचं तसं नाही. त्यांना आपल्या कपडय़ांसोबत वेगवेगळे प्रयोग करून पाहायला नेहमीच आवडतं. मध्यंतरी माझ्या एका कलेक्शनमध्ये मी लेदरचं टेक्श्चर तयार केलं होतं. ते टेक्श्चर एका तरुणीला इतकं आवडलं की तिने मला तशाच टेक्श्चरचा ड्रेस बनवायला सांगितला. विशेष म्हणजे हा हट्ट तिने केला तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती आणि त्या अवस्थेत या टेक्श्चरमुळे तू लठ्ठ दिसशील असे मी तिला सांगून थकलो, पण ती ऐकायला तयारच नव्हती. पण ड्रेस घातल्यावर मात्र ती इतकी सुंदर दिसत होती की, मी तिचा गरोदरपणा, लठ्ठपणा पार विसरून गेलो.’
पण प्रयोगाची ही हौस केवळ तरुणांमध्ये आहे, असं समजून दादा आणि ताईलोक कॉलर टाइट करू नका. कारण घरातली मोठी माणसं याबाबतीत कमी नाहीत. ‘हायपरसिटी’ रिटेल शृंखलेच्या स्टायलिश अनाम चष्मावालाच्या सांगण्यानुसार, ‘सध्या तरुणाईला आणि प्रौढांना नेमकं काय हवंय ते समजणं फार कठीण झाले आहे. कारण कपडय़ांच्या बाबतीत तरुणांना छान, सुटसुटीत कपडे हवे असतात, पण ते ड्रेसिंग त्यांना मॅच्युअरही दिसायला हवं असतं. तर प्रौढांना असे कपडे हवे असतात, ज्यात ते त्यांच्या मूळ वयापेक्षा कमी दिसतील.
मिक्स-मॅच करण्याऐवजी हल्ली हटके प्रयोग होताना दिसतात. पूर्वी जर तुमचा कुर्ता लाल आणि लेगिंग काळी असेल तर दुपट्टा लाल नाहीतर काळा घेतला जायचा. पण आता तसं होतं नाही. लाल-काळ्या रंगाऐवजी दुपट्टय़ामध्ये तिसरा रंग भरण्याचा प्रयत्न ग्राहकांकडून केला जातो.’ ‘बिबा’ ब्राण्डच्या चेअरपर्सन मीना बिंद्राच्या म्हणण्यानुसार, ‘पूर्वी प्रौढ लोक साडी, सलवार-कमीज अशा पारंपरिक लुकमध्ये अडकून पडलेले होते; पण आता मात्र चित्र पालटलेलं आहे. खासकरून साठीच्या वयोगटातील लोकांच्या पेहरावात बरेच बदल lp04दिसून येत आहेत. आता त्यांना त्यांच्या कपडय़ांमध्ये वैविध्य हवं आहे. एसिमेट्रिक गारमेंट्स, लो-वेस्टलाइन किंवा हाय-वेस्टलाइन कट यांना ते जास्त पसंती देतात. फ्युजन स्टाइलसोबत खेळायला आता तेही उत्सुक आहेत.’ त्यामुळे सगळ्यांनाच ‘कुछ हटके’ हवंय हे नक्की.
सुरुवात करू या रंगांपासून. डिझायनर रितू कुमारने यंदाच्या सीझनसाठी र्बगडी, बॉटल ग्रीन, ब्राऊन, पर्पल अशा खास अर्थी शेड्सना पसंती देतानाच त्यांच्यासोबत सॅफ्रन, लाल, पिवळ्या रंगाची काससुद्धा सोडू नका, असं सांगितलं आहे. ‘यंदा नॅचरल कलर्स लोकांवर जास्त प्रभाव टाकतील’ असं त्यांचं म्हणणं आहे. मीना बिंद्रा यांनीही या विधानाला पुष्टी देत ‘यंदा लोकांचा कल भारतीय कलांकडे वळण्याचा असेल’ असं सांगितलं आहे. ‘पीच, लाल, नारंगी अशा विविध रंगांची उधळण या दिवाळीत पाहायला मिळेल. दिवाळीचा संबंध लाल रंगाशी लावला जातो. त्यामुळे लाल रंगांच्या विविध शेड्सनी बाजारपेठा खुलून जातील. फुलकारी, शिबोरीसारख्या एम्ब्रॉयडरी टेक्निक्स यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळतील.’ त्यामुळे मस्त ब्राइट रंगांमध्ये तुम्ही यंदा रंगून जाणार, हे नक्की. अनाम चष्मावालाने दिलेल्या माहितीनुसार, ‘तरुण मुलांना अजूनही लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी असे भडक रंग आकर्षित करतात; पण प्रौढांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना क्रीम, लाइट पिवळा, पोपटी, आकाशी अशा लाइट शेड्स जास्त पसंत आहेत.’ मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडे सोबर रंग या सीझनमध्ये पाहायला मिळतील. जांभळा, राखाडी, क्रीम, बेज यांसारख्या अर्थी टोन्स तुमच्या वॉडरोबमध्ये राज्य करतील. काळा रंग सीझनमध्ये हिट आहे, हे विसरू नका. मागच्या भागात त्याच्या मोहिनीबद्दल आपण बोललोच होतो. पुरुषांसाठी सोबर रंगाची कलर पॅलेट असल्यामुळे दादापासून आबांपर्यंत कोणालाही रंगांची चिंता करायची गरज नाही.
कपडय़ांच्या एकूणच स्टाइलविषयी बोलताना मीना बिंद्रा सांगतात, ‘या सीझनमध्ये कोणतेही विशिष्ट ट्रेंड राज्य करणार नाहीत. प्रत्येकाला कपडय़ांमध्ये विविधता हवी आहे. त्यामुळे बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे कपडे पाहायला मिळतील. अनारकलीज, जॅकेट्स, लेहेंगाज, प्रिंटेड ट्राउझर्स असे विविध स्टाइलचे कपडे तुम्हाला यंदा पाहायला मिळतील. या सीझनमध्ये तुमच्या बॉटम वेअरमध्ये बरीच व्हारायटी असेल. नेहमीच्या लेगिंग्स, सलवार, चुडीदार यांना ब्रेक देत पलॅझो, घागरा पँट, घागराज ट्राय करायला हरकत नाही. विविध प्रकारचे कट्स यंदाच्या सीझनचे मुख्य आकर्षण असेल.’ मध्यंतरी आपण फॅशनमधील सायकलबद्दल lp05बोललो होतो. या सीझनमध्ये ७०च्या दशकाचा काळ परत येणार असल्याचं मत अनाम चष्मावालाने व्यक्त केलं आहे. ‘फ्युजन ड्रेसिंग या सीझनचा मंत्र आहे. त्यामुळे लुकच्या बाबतीत नेहमीच्या सीमा मोडायची तयारी यंदा प्रत्येकजण करताना दिसेल.’ पण म्हणून तुम्हाला जुन्या, पारंपरिक लुकला विसरून चालणार नाही. रितू कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ‘यंदा बस्टियर, जॅकेट्स, कॉर्सेट यांचा समावेश तुमच्या वॉडरोबमध्ये करायला काहीच हरकत नाही. यांच्यामुळे तुमच्या पारंपरिक लुकलासुद्धा मॉडर्न ट्विस्ट येतो. साडी नेसायचा शौक तुम्हाला असेल तर साडी लेहेंगा ट्राय नक्की करा. घेरदार स्कर्टसोबत साडी ड्रेप करून नवीन लुक मिळवता येईल.’ पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यंदा कुर्त्यांची लांबी मोठी झालेली तुम्हाला दिसेल. तुमच्या बॉटम वेअरमध्येसुद्धा यंदा बरेच बदल दिसतील. कुर्त्यांसोबत सलवार, धोती घालून तुमच्या लुकला ट्विस्ट देता येईल. यासोबत शर्ट्स आणि ट्राउझर्समध्ये स्ट्रेट फिट पाहायला मिळेल. चेक्स वापरून पाहायला या सीझनमध्ये हरकत नाही. जॅकेट्सचे वेगवेगळे प्रकार यंदा तुम्हाला पाहायला मिळतील. यात लेदर जॅकेट्सपासून खास नेहरू जॅकेट्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. सध्या मोदींचं जॅकेट्ससुद्धा बरंच गाजतंय.
अ‍ॅक्सेसरीजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यातही प्रयोगांची कमतरता नाही. मागचा सीझन कमरबंदने गाजवला होता. यंदाच्या सीझनमध्ये बाजूबंद भाव खाऊन जाणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बाजूबंद सध्या बाजारात उपलब्ध आहेत. जर तुमचा दंड बारीक असेल तर मोठय़ा आकाराच्या कडय़ाचा वापरसुद्धा बाजूबंद म्हणून तुम्ही करू शकता. यशिवाय लटकनसुद्धा बाजी मारतील. नेहमीचे मोत्यांचे, खडय़ांचे लटकन घेण्यापेक्षा पोपट, चिमणीच्या आकारातील लटकन तुम्ही घेऊ शकता. यशिवाय ओव्हरसाइज लटकन यंदाच्या सीझनमध्ये सत्ता गाजवतील. जर तुम्हाला स्वत:ला लटकन बनवायला आवडत असतील तर सोने पे सुहागा. मोठय़ा इअरिरग्जचा ट्रेंड पुन्हा गोल फिरून आला आहे. मध्यंतरी स्टेटमेंट नेकपीसेसवर छोटे कानातले घातले जात होते; पण आता पुष्कळशा ब्लाऊज, अनारकलीजच्या नेकवर एम्ब्रॉयडरी करण्यात येते, त्यामुळे नेकपीसला रजा देत मोठे इअरिरग्ज घालायचा ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळेल. त्यातही इअरकफ्सची सध्या बरीच चलती आहे. एका कानात मोठे इअरकफ्स आणि दुसऱ्या कानात छोटासा स्टड घातल्यास तुम्हाला इतर कोणत्याही ज्वेलरीपीसची गरज भासणार नाही. पारंपरिक दागिन्यांना नव्याने मुलामा दिलेला या सीझनमध्ये पाहायला मिळेल. पारंपरिक ठुशी, मोहनमाळ, लक्ष्मीहार, चोकर नव्या रूपात तुमच्यासमोर पेश केले जातील. यामध्ये मोठय़ा प्रमाणात हिऱ्यांचा वापर केलेला दिसून येईल. हिऱ्यासोबत रंगीत खडय़ांची मागणीसुद्धा जोर पकडू लागली आहे. मोत्यांना तर ‘एव्हरग्रीन’चा टॅग मिळाला आहे. पांढरे lp06असो किंवा रंगीत, मोती कोणत्याही आउटफिटवर मस्त मॅच होतील. कुंदनचा वापर यंदा जरा कमीच दिसेल.
पुरुषांच्या बाबतीतसुद्धा ब्रोचेसना मागणी वाढू लागली आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रोच सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळतील. याशिवाय कानातील भिकबाळीचा ट्रेंड हल्ली गाजतोय, तीही ट्राय करायला हरकत नाही. पिअर्सिंग केलेल्यांसाठी खास ट्रॅडिशनल लुकमधील स्टड्स बाजारात पाहायला मिळतील.
फुटवेअरच्या बाबतीत हिल्सऐवजी चपला, बॅलरिनाज या सीझनमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतील. मुलांसाठी आणि मुलींसाठी कोल्हापुरी चपलांची व्हेरिएशन्स सध्या बाजारात पाहायला मिळतील. या वेळी चपलांमध्येसुद्धा बोल्ड, शिमिरग रंगांचा वापर केलेला तुम्हाला दिसून येईल. कपडय़ांमधील फ्लोरोसंट रंग चपलांमध्ये उतरलेला आहे. फ्युजन प्रिंट्ससुद्धा या चपलांवर विराजमान झालेली आहेत. मुलांसाठी नेहमीच्या लेदर शूजमध्ये बरेच पर्याय आले आहेत. कॅनव्हासच्या शौकिनांसाठी तर हा सीझन म्हणजे पर्वणीच आहे. कारण ग्राफिटी प्रिंटपासून ते थेट शिमर गोल्ड, सिल्व्हर शेडमधील शूज तुम्हाला यंदा पाहायला मिळतील.
मेकअप आणि हेअरस्टाइलच्या बाबतीत यंदा प्रयोग केलेले दिसतील, पण त्याचं लुक ‘लार्जर दॅन लाइफ’ नसेल. हेअरस्टायलिश जावेद हबीबच्या मते, ‘यंदा फेस्टिव्हल सीझनमध्ये हेअरस्टाइलबद्दल अमुक एखादा lp07असा ट्रेंड राहणार नाही. पूर्वी तरुणाई बॉलीवूडमधील नायक-नायिकांच्या लुकनुसार स्वत:ची हेअरस्टाइल ठरवायचे. पण आता इंटरनेटमुळे जग जवळ आलंय आणि त्यांना जगभरातील ट्रेंड्सबद्दल माहिती आहे. आता त्यांना त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार नक्की कोणता लुक चांगला दिसेल हे ठाऊक आहे.’ त्यामुळे एखादा विशिष्ट ट्रेंड फॉलो करण्याऐवजी तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा लुक निवडण्याचा सल्ला ते देतात. सध्या बाजारात टिआरा, हेअरबॅण्ड्स, हेअरक्लिप्सची मोठी व्हारायटी आली आहे. त्यांचा वापर करून तुमच्या आवडीची हेअरस्टाइल तुम्ही करू शकता; पण यंदा केस मोकळे सोडण्यापेक्षा साइड बन, सागरवेणीचा प्रभाव जास्त आहे. मांगटिकासारखा दागिना वापरणार असाल तर बांधलेले केस उत्तम. तुमच्या नेकलेस किंवा पेंडंट्सचा वापर हेअर अ‍ॅक्सेसरी म्हणून नक्कीच करू शकता.
मेकअपच्या बाबतीत आयमेकअपवर जास्त भर दिलेला यंदा पाहायला मिळेल. शिमर आय, कॅट आय या सीझनचं आकर्षण असेल. याशिवाय लिपस्टिकमध्ये लाल, नारंगी रंग राज्य करतील. नेलपेंट्सच्या बाबतीत नेल आर्ट किंवा शिमर नेल्सचा ऑप्शन ट्राय करू शकता.
तर हा आहे यंदाच्या फेस्टिव्हल ट्रेंड्सचा लेखाजोगा. आता काय, चर्चा करा आणि लागा तयारीला. पण या सगळ्यात एक लक्षात असू द्या की, दिवाळी दाराशी आली आहे, त्यामुळे प्रयोग करायचेत किंवा हटके कपडे हवेत म्हणून डोक्याला जास्त त्रास करून घेऊ नका, नाहीतर शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या शॉपिंगची यादी संपणार नाही.

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या