News Flash

कथा : देणगी

संस्थेने पाठवलेल्या परिषदेसाठी राजेश दिल्लीला गेला तेव्हा त्याच्या मनात कितीतरी गोष्टी होत्या. पण..

| December 19, 2014 01:16 am

संस्थेने पाठवलेल्या परिषदेसाठी राजेश दिल्लीला गेला तेव्हा त्याच्या मनात कितीतरी गोष्टी होत्या. पण..

भाग २
उद्घाटन समारंभ डोळे दिपतील असा झाला. उपराष्ट्रपती, आरोग्यमंत्री, राजकीय नेते, त्यांचा लवाजमा, प्रशासकीय अधिकारी आणि दिल्लीमधले अनेक मान्यवर आलेले पाहून राजेशला बरं वाटलं. मान्यवरांमध्ये स्त्रियाही होत्या. दागिन्यांनी मढलेल्या, सेंटच्या भपकाऱ्यात वावरणाऱ्या अतिविशाल महिला या समारंभात मुळीच शोभत नव्हत्या. विद्रूप झालेल्या लोकांना पाहायला येताना, त्यांच्याविषयी चाललेल्या गंभीर चर्चेसाठी येताना कोणती काळजी घ्यावी याचा साधा विचार करण्याची संवेदनशीलता त्यांच्यापाशी नसावी याचं राजेशला आश्चर्य वाटलं. पण काही का असेना, पूर्वी कुष्ठरोगाला जसं उपेक्षित स्थान होतं तसं आता राहिलेलं नाही हे पाहून मात्र त्याला मनापासून बरं वाटलं. त्याचा भ्रमनिरास व्हायला फार वेळ लागला नाही. 

कोणत्याही परिषदेत उद्घाटन हा एक औपचारिक सोहळा असतो हे एव्हाना राजेशला माहीत झालं होतं. विदेशी पाहुणे आलेले असल्यामुळे भारतीय सांस्कृतिक वारशाचं थोडं प्रदर्शन करणं ओघानेच आलं. दीपप्रज्वलन, संस्कृतातून ईशस्तुती, िहदीतलं स्वागतगीत, पाहुण्यांना समजावं म्हणून त्या गीताचा आंग्लाळलेल्या उच्चारात इंग्रजी अनुवाद इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतरच्या नृत्याची मात्र काहीही गरज नव्हती. परिषदेच्या विषयाशी त्या नृत्याचा कणभरही संबंध नव्हता. या सर्व गाष्टींमुळे राजेशचा पारा हळूहळू चढायला लागला.
कुठल्याही प्रकारच्या देखाव्याचा, भपक्याचा त्याला तिटकारा होता. उद्घाटन समारंभात त्याखेरीज दुसरं काहीच आढळलं नाही. त्याच्या बरोबर आलेले सहकारी त्या भपक्याला भुलले, खूश झाले. पण कुष्ठरोगासाठी जमवलेला निधी असा खर्च व्हावा हे राजेशला रुचलं नाही. त्या पैशात काही रुग्णांना कृत्रिम अवयव देता आले असते. भाषणांमध्येही आपण ज्या कारणासाठी जमलो आहोत त्या कारणाविषयी, समस्येविषयी गांभीर्यानं कोणी बोललं नाही. नेते मंडळी तर टाळ्यांची वाक्यं पेरत, ठरीव छापाचं भंपक भाषण ठोकून मोकळी झाली.
उद्घाटनानंतर उपस्थित परिषदेला आलेल्या प्रतिनिधींसाठी आणि मान्यवरांसाठी शामियान्यात खान्याची व्यवस्था केली होती. मान्यवरांसाठी शामियान्याच्याच बंदिस्त जागेत व्यवस्था होती. राजेश, शीला, मनोहर यांसारख्या आम लोकांसाठी वेगळी व्यवस्था होती. तिथे जेवणासाठी माणसांची झुंबड उडाली होती. परदेशच्या प्रतिनिधींबरोबर चार शब्द बोलायला मिळण्याची आशा त्यामुळे मावळली. रांगेत उभं राहून त्या पाच जणांना जेवण मिळेपर्यंत होती-नव्हती ती टेबलं भरली. एका कोपऱ्यात ते पाच जण कसेबसे दाटीवाटीनं उभे राहून जेवले. त्यांच्यासारख्या अपंग झालेल्या माणसांना तसं उभ्या उभ्या जेवताना किती त्रास होत असेल याचा विचार करायला कुणालाही सवड नव्हती.
संध्याकाळी विदेशी पाहुण्यांना दिल्लीदर्शन घडविण्याचा कार्यक्रम ठरला होता. तो थाटामाटात पार पडला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विदेशी पाहुण्यांनी त्यांचे अनुभव आणि त्यांच्या संस्थेचं काम याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स केली. दुपारच्या सत्रात भारतातल्या सेवाभावी संस्थांना वेळ दिला होता. डॉ. आपटे आपल्या संस्थेविषयी प्रभावी आणि मुद्देसूद भाषण करतील, असा राजेशचा कयास होता. किंबहुना, ते काम राजेशवर सोपवलं गेलं असतं तर त्यानं ते उत्तम रीतीनं पार पाडलं असतं. कारण त्यानं अगदी तळापासून रुग्णात राहून काम केलेलं होतं. शिवाय एखादा रुग्ण प्रगतीची केवढी झेप घेऊ शकतो त्याचं प्रत्यक्ष दर्शन लोकांना झालं असतं. पण राजेशवर ते काम सोपवलं गेलं नाही. आपटय़ांचं भाषण वरवरचं वाटलं. त्यांच्या भाषणात काही तपशीलही चुकीचे दिले गेले.
आपल्या संस्थेत राहून बरे झालेले आणि कुष्ठरोगाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेले पाच रुग्णही आपण आपल्याबरोबर या परिषदेसाठी संस्थेच्या खर्चानं आणले आहेत, असं आपटय़ांनी जाहीर केलं. त्यानंतर श्रोत्यांची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी तीस-पस्तीस सेकंद ते थांबले. नाटकीपणानं. अपेक्षेप्रमाणे टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या कामाचा नीट विचार करून आपल्या संस्थेला वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भरघोस मदत द्यावी, असं शेवटी आपटय़ांनी आवाहन केलं. ते करताना नम्रपणे कमरेत वाकून त्यांनी पाहुण्यांसमोर मान झुकवली.
मग व्यासपीठावरच्या एका विदेशी पाहुण्यानं पुण्याहून परिषदेसाठी आलेल्या माजी रुग्णांना व्यासपीठावर बोलावून घेण्याची कल्पना सुचवली. संयोजकांपैकी एक-दोघांनी तिथेच त्याविषयी एकमेकांशी चर्चा केली. विदेशी पाहुण्यांनी, विशेषत: जे निधी देणार आहेत अशा विदेशी पाहुण्यांनी केलेली विनंतीपर सूचना डावलणं शक्य नव्हतं. पंधराव्या रांगेत बसलेले राजेश आणि त्याचे सहकारी उठले. राजेश आणि शीला या दोघांच्या पायांची बोटं झिजून गेली असल्यानं त्यांना सर्वसामान्य माणसांसारखं भरभर चालता येत नव्हतं. चालताना ते किंचित लंगडत होते. सर्व लोकांच्या नजरा आपल्यावरच खिळल्या आहेत या कल्पनेनं त्यांना चमत्कारिक वाटत होतं. तो पाचही जण व्यासपीठावर पोचले आणि टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांना मानवंदना दिली. दोन पाहुण्यांनी आणि वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपटय़ांच्या संस्थेसाठी भले मोठे धनादेश जाहीर केले.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या चहापानाच्या मध्यंतरात पाच-सहा विदेशी पाहुणे राजेश आणि कंपनीशी बोलायला मुद्दाम आले. चहापान होईपर्यंत त्यांची थोडीशी बातचित झाली. पण आपल्याला व्यासपीठावरून बोलायची संधी मिळणार आहे हे लक्षात घेऊन राजेश आपल्या सहकाऱ्यांविषयी त्यांच्याशी जास्त बोलला. स्वत:च्या कामाविषयी, संशोधनाविषयी त्यानं तिथे काहीच सांगितलं नाही.
तिसऱ्या सत्रात उरलेल्या संस्थांचे प्रतिनिधी बोलू लागले. काहींनी त्यांना दिलेल्या वेळेचं बंधन पाळलं नाही. अखेर राजेशला किंवा इतर कोणत्याही माजी रुग्णाला आपलं मनोगत श्रोत्यांपुढे मांडता येणार नाही असा रागरंग दिसू लागला. तशा त्या गर्दीत घुसून राजेशनं आपटय़ांना गाठलं आणि एका बाजूला नेलं.
‘‘बोला. काय बोलायचंय ते लवकर बोला. मी अतिशय गडबडीत आहे. मिस्टर मॉरिसन तिकडे माझी वाट पाहताहेत,’’ कपाळावर आठी घालत आपटे म्हणाले.
‘‘डॉक्टर, इथली भाषणं संपतच नाही आहेत. त्या लोकांना कुणी तरी आवरतं घ्यायला सांगायला हवं. आम्ही आमची माहिती केव्हा द्यायची? आमच्या इतक्या लांब येण्याचा उपयोग काय?’’ राजेशनं आपली खंत बोलून दाखवली. हे बोलताना त्याचा आवाज चढला होता. चेहरा रागेजला होता.
‘‘हे पाहा, आवाज आधी जरा खाली करा. लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधलं जायला नकोय,’’ दबक्या आवाजात पण जरबेनं आपटे म्हणाले.
‘‘अ‍ॅम सॉरी,’’ राजेश गुरकावल्यासारखा म्हणाला. त्यानं व्यक्त केलेल्या दिलगिरीत त्याला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटत असल्याची कोणतीच खूण नव्हती.
‘‘दॅट्स बेटर. आमचे तीन-चार माजी रुग्ण आपलं मनोगत सांगणार आहेत असं आम्ही संयोजकांना कळवलं होतं. पण त्यांच्या स्केडय़ूलमध्ये त्यांना ते बसवता आलं नाही. त्याला माझा इलाज नाही.’’ राजेशची नजर चुकवत आपटे म्हणाले. खरोखर त्यांनी कळवलं होतं का? आणि खरोखरच त्यांचा नाइलाज झाला होता का?
अशा बाबतीत नाइलाज झाला की माणसं नाराज होतात, त्यांच्या आवाजात थोडी आगतिकता दिसते तसं काहीच आपटय़ांच्या बोलण्यात राजेशला जाणवलं नाही. आपण काय काय प्रयत्न केले, ते कसे व्यर्थ गेले असं काही तरी तावातावानं माणूस सांगतं. यातलं काहीच आपटय़ांनी केलं नाही. राजेशबरोबरचं हे संभाषण संपवायची त्यांना प्रचंड घाई झाली होती.
संध्याकाळचे सहा वाजले तरी भाषणं संपली नाहीत. मग व्हायचं तेच झालं. संयोजकांपैकी कोणी तरी येऊन राजेशकडे दिलगिरी व्यक्त केली. सूप वाजण्यापूर्वी डॉ. आपटय़ांनी दोन मिनिटं मागून घेतली. तिसरा दिवस पाहुण्यांच्या साइटसीइंगसाठी राखून ठेवलेला असल्याने आणि आजचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा लांबल्याने आपल्याबरोबर आलेल्या माजी रुग्णांना आपले अनुभव सांगायसाठी वेळ राहिला नाही, असं त्यांनी जाहीर केलं. दोन दिवस त्या सभामंडपात दहा-दहा तास थांबूनही राजेश, मनोहर, शीला इत्यादी मंडळी उपेक्षितच राहिली.
तिसऱ्या दिवशी परिषदेसाठी जमलेले कार्यकर्ते फक्त उरले होते. विदेशी पाहुणे, संभाव्य अनुदानदाते, देणगीदार आणि संस्थांचे प्रमुख साइटसीइंगसाठी गेले. पाहुण्यांच्या अनुपस्थितीत या कार्यकर्त्यांनी आपापल्या कामांची ओळख सांगण्यात समाधन मानून घेतलं.

दिल्ली दौरा आटोपून राजेश परत आला तो भडकूनच. आपल्यासमोर कोणी दिवे ओवाळावेत अशी त्याची किंवा त्याच्या सहकाऱ्यांची अपेक्षा नव्हती. आपल्याबद्दल कोणी कीव दाखवावी असंही त्याला वाटत नव्हतं. किमान माणुसकीच्या नात्यानं आपली नुसती दखल घेतली जायला हवी होती, असं मात्र त्याला ठामपणे वाटत होतं. झाला प्रकार कधी एकदा कल्पनाशी बोलतोय असं त्याला झालं होतं. डॉ. शेणोलीकरांच्या कानावरही तो हे सगळं घालणार होता.
राजेश संस्थेमध्ये जेव्हा गेला तेव्हा तिथं आनंदीआनंद चालला होता. डॉ. आपटय़ांच्या प्रयत्नांमुळे संस्थेला युरोपीय देशांकडून आणि विशेषत: वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून घसघशीत देणग्या मिळाल्याची बातमी येऊन पोचली होती. त्याबद्दल त्यांना अभिनंदनाचे फोन येत होते. त्यांचा उदोउदो चालला होता. देणगी नि अनुदानासंबंधीच्या औपचारिकता पुऱ्या करण्यासाठी एक-दोन महिन्यांत आपटय़ांना बहुधा परदेशदौरा करावा लागणार होता.
ते सर्व ऐकलं आणि राजेशच्या डोक्यात दणादण घण पडायला लागले. कानशिलावरच्या शिरा ताडताड उडायला लागल्या. तशाच अवस्थेत तो डॉ. शेणोलीकरांच्या केबिनमध्ये गेला आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीत दाणदिशी आदळला. डॉक्टरांनी त्याच्याकडे चमकून पाहिलं. राजेशचं काही तरी प्रचंड बिनसलंय हे त्यांच्या ध्यानात आलं. कोणताही प्रश्न विचारला तरी तो भडकणार असल्याची ही लक्षणं होती. म्हणून ते गप्प राहिले.
‘‘आपल्या संस्थेला मोठ्ठी देणगी मिळाली म्हणे. द ग्रेट डॉ. आपटे डिड इट.’’ शेणोलीकर काहीच विचारत नाहीत, बोलत नाहीत असं पाहून राजेशच बोलला.
‘‘हं, असं ऐकलंय मी. कॉन्फरन्स कशी झाली?’’ डोळ्यांवरचा चष्मा काढत शेणोलीकरांनी विचारलं.
‘‘ज्या कारणासाठी आपण तिथे गेलो होतो ते काम झालं. संस्थेला घबाड मिळालं. बास.’’
‘‘मग तू का चिडलाहेस?’’
शेणोलीकरांच्या तोंडून हा प्रश्न बाहेर पडायचाच अवकाश! कॉन्फरन्समधला भपकेबाजपणा, भंपक भाषणं, रुग्णांची फोटो सेशन्स, रुग्णांना आणि माजी रुग्णांना मिळालेलं दुय्यम स्थान, आपटय़ांचा दुटप्पीपणा सगळं सगळं राजेशनं भडाभडा सांगितलं. आणि हताशपणे दमून तो क्षणभर गप्प झाला. पुण्याहून गेलेल्या एकाही माजी कुष्ठरोग्याला व्यासपीठावर जागा मिळाली नाही हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी चमकलं. ते शेणोलीकरांपासून लपविण्यासाठी राजेशनं मान खाली घातली. शेणोलीकरांनी राजेशच्या मनगटावर हात ठेवला. राजेशनं वर पाहिलं आणि म्हणाला,
‘‘मला जगन्नाथपुरीच्या देवळासमोर हात पसरून बसलेल्या महारोग्यांची आठवण आली. त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? ते अन्नासाठी हात पसरतात आणि आम्ही..’’ देवळासमोर आपली थोटकी बोटं नाचवणाऱ्या भिकाऱ्यांची रांग राजेशच्या डोळ्यांसमोर दिसत होती.
‘‘नको असा विचार करूस, त्यानं तुला फक्त त्रास होईल.’’
‘‘हे असं होणार आहे हे तुम्हाला माहीत होतं डॉक्टर?’’
‘‘नाही मला माहीत नव्हतं. पण झाल्या गोष्टीचं मला आश्चर्य नाही वाटलं.’’
‘‘म्हणजे, तुम्हाला याची कल्पना होती.’’
‘‘नाही, कल्पना नव्हती. असं काही तरी होऊ शकेल अशी भीती वाटत होती.’’
‘‘डॉक्टर, मुंबईत पोटासाठी वणवणतानासुद्धा मी कधी कोणापुढे हात पसरला नव्हता. मी ते करूच शकलो नव्हतो. पण आज या लोकांनी मला भिकाऱ्यांच्या रांगेत नेऊन बसवलं. माझ्या व्यंगाचा, विद्रूपतेचा वापर करून दयेपोटी भिक्षा मिळवली.’’
दोन्ही कोपरं टेबलावर ठेवून, हातांच्या ओंजळीत आपलं डोकं खुपसून राजेश बसून राहिला. काही वेळ डॉ. शेणोलीकर शांत राहिले. यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच त्यांच्यापाशी.
थोडय़ा वेळानं त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातून एक लिफाफा काढला. तो राजेशसमोर धरत ते म्हणाले,
‘‘हे कागद घे. तुझ्यासाठी माझ्या मेल आयडीवर मेल आलीय. त्याचा हा प्रिंटआऊट. दिल्लीला असं काही तरी होऊ शकेल अशी भीती वाटली म्हणून तुझा राइटअप मी स्वत: वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधल्या माझ्या ओळखीच्या माणसाकडे पाठवला होता. त्यांनी तो वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इथे आलेल्या शिष्टमंडळाच्या मुख्याकडे पाठवला. अतिशय व्यग्र वेळापत्रक असल्यानं त्यांना या वेळी तुला भेटायला जमलं नाही. पुढच्या भारतभेटीत मात्र तुझं कृत्रिम अवयव बनवणारं छोटंसं युनिट आणि इतर काम पाहायला त्यांची टीम येणार आहे.’’
भरल्या गळ्यानं ‘थँक्स’ असे शब्द उच्चारताना राजेशला आपलं उभं आयुष्य आठवलं. प्रत्येक वळणावर डॉ. शेणोलीकर त्याच्या आणि कल्पनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते.
पुन्हा एकदा डॉ. शेणोलीकर राजेशचा आत्मसन्मान सांभाळायला पुढे आले होते.
(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:16 am

Web Title: donation
टॅग : Story
Next Stories
1 संघटित, प्रतिष्ठित चोर विरुद्ध मी भुरटा
2 लाटांचा रिअ‍ॅलिटी शो
3 प्रेमाला वय नसावे का?
Just Now!
X