शिष्टमंडळाबरोबर आलेल्या प्रगत देशांतल्या काही वार्ताहर पाहुण्यांना कुष्ठरोगाबद्दल प्रचंड कुतूहल असलेलं राजेशला जाणवलं. काही वार्ताहरांनी तिथे आलेल्या काही कुष्ठरोग्यांचे फोटोही काढून घेतले. अशी प्रसिद्धी राजेशला नको होती. संधी मिळाल्याबरोबर तो त्याच्या काही सहकाऱ्यांसह तिथून गायब झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाग १

डॉ. आपटय़ांचा फोन आला तेव्हा राजेश त्याच्या क्लिनिकमध्ये एका तरुण पेशंटकडून पायाचे व्यायाम करवून घेत होता.

डॉ. आपटे, असा डॉ. आपटय़ांचा खणखणीत आवाज फोनवर आला तेव्हा राजेशला जरा आश्चर्यच वाटलं. म्हणजे डॉ. आपटे विश्वस्त असलेल्या कुष्ठधाम संस्थेशी तसा तो कित्येक वर्षे संबंधित होता. पहिली काही वर्षे रुग्ण म्हणून आणि नंतरची जवळपास वीस वर्षे कार्यकर्ता आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून. पण आजवर त्याला डॉ. आपटय़ांचा कधी फोन आला नव्हता. तो समोरून गेला तरी ते त्याला नक्की ओळखतीलच अशी राजेशला खात्री नव्हती. म्हणून एकदम फोनबिन म्हटल्यावर त्याच्या भुवया ताणल्या गेल्या आणि खांदे आपसूक उडवले गेले.

‘‘माझं जरा तुमच्याकडे महत्त्वाचं काम होतं. तुम्ही आत्ता कामात आहात का?’’ सौजन्यानं आपटय़ांनी विचारलं.

क्लिनिकमध्ये मी कामच करतो चकाटय़ा नाही पिटत असं राजेशच्या मनात आलं. तरी आपटय़ांच्या पदाचा आणि त्यांच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा मान राखत तो म्हणाला,

‘‘हा, म्हणजे आत्ता माझ्या क्लिनिकमध्ये चार पेशंट थांबले आहेत. पण बोला ना.’’

‘‘केव्हा भेटता येईल आपल्याला? जरा र्अजट काम होतं.’’

‘‘उद्या दुपारी साडेतीन वाजता संस्थेच्या ऑफिसात येऊ?’’

‘‘चालेल. उद्या भेटू.’’

दुसऱ्या दिवशी राजेश बरोबर साडेतीन वाजता डॉ. आपटय़ांच्या ऑफिसात हजर झाला. पाणी घेऊन येणाऱ्या शिपायानं राजेशला बसायला सांगितलं. डॉक्टर आपटे संस्थेच्या परिसरातच कुठल्या तरी कामात गुंतले होते आणि लगेच येतीलच हा निरोपही त्यानं दिला. आपटय़ांच्या केबिनमध्ये यायची वेळ राजेशवर फारशी कधी आली नव्हती.

साधंच पण उच्च अभिरुचीचं मोजकं फर्निचर तिथे होतं. पुस्तकाच्या कपाटालाच शोकेससारखं रूप दिलं होतं नि त्यावर दोन-चार स्मृतिचिन्हं ठेवली होती. भिंतीवर कुष्ठरोग्यांशी संवाद करतानाचा बाबा आमटय़ांचा मोठा फोटो होता. त्याशेजारीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपटय़ांना कसलं तरी मानपत्र देतानाचा फोटो होता. लिहिण्याच्या टेबलाच्या बरोबर मागे डॉ. आपटय़ांना टाटा इन्स्टिटय़ूटकडून मिळालेलं डॉक्टरेटचं प्रशस्तिपत्र फ्रेम करून लावलेलं होतं.

फिरत्या खुर्चीसमोरच्या टेबलावर गुळगुळीत, रंगीत कागदाची माहितिपत्रकं होती.

‘‘सॉरी, तुम्हाला फार वेळ थांबायला नाही लागलं ना? मी जरा एका कामात गुंतलो होतो.’’ आत शिरता शिरता आपटय़ांनी दिलगिरी व्यक्त करत प्रश्न विचारला.

‘‘नाही. फार नाही, दहा मिनिटं झाली मला येऊन.’’ दिलगिरीनं न दिपून जाता, राजेशनं अगदी रोखठोक उत्तर दिलं.

‘‘आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. सरळ मुद्दय़ाचंच बोलतो. येत्या डिसेंबरात दिल्लीला कुष्ठरोगासंबंधी एक आंतरराष्ट्रीय परिषद घेताहेत. आपल्या संस्थेला बोलावणं आहे. ही त्या परिषदेसंबंधीची ब्रोशर्स.’’ टेबलावरच्या आकर्षक कागदांचा गठ्ठा राजेशच्या हातात देत आपटे म्हणाले. राजेश ते कागद चाळायला लागला.

‘‘सावकाशीनं तुम्ही ते सगळं वाचलंत तरी चालेल. आता मुद्दा असा आहे की, या निमित्तानं आपल्या संस्थेचं इतक्या वर्षांचं काम लोकांपुढे मांडायची आपल्याला संधी मिळतेय. तुमच्यासारखे आपल्या संस्थेत राहून बरे झालेले आणि संस्थेच्या प्रोत्साहनानं आयुष्यात बरंच काही करून दाखवू शकलेले लोक या परिषदेसाठी न्यावेत असा आमचा विचार आहे. तुमच्यासारख्या लोकांकडून प्रेरणा घेऊन आणखी काही कुष्ठरुग्णांना सकारात्मक दृष्टिकोन द्यायची ही नामी संधी आहे अशी माझी धारणा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकाल का, हे विचारण्यासाठी मी बोलावलं होतं.’’

‘‘मला यायला नक्कीच आवडेल. तिथे चार लोकांशी ओळखी होतील. माझे अनुभव इतरांशी वाटून घेता येतील. तारखा काय आहेत? ते कळलं म्हणजे मला इतर कामं अ‍ॅडजस्ट करायला बरं.’’

राजेशला दिल्लीला जायला मिळणार याचा खराखुरा आनंद झाला. आंतरराष्ट्रीय जर्नल्समधे त्याचे तीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. दोन वेळा तो शोधनिबंध वाचायला परदेशी गेला होता. पण संस्थेनं त्याची फारशी दखल घेतली नव्हती याची त्याला मनातनं सूक्ष्म ठुसठुस होती. आज जर डॉ. सिंगरू असते तर त्यांनी नक्कीच यापेक्षा जास्त दाद दिली असती, असं कैक वेळा त्याला वाटलं होतं. पण ‘देर है लेकिन अंधेर नही’ असा विचार करून तो फुशारला.

‘‘अठरा, एकोणीस, वीस अशा तारखा आहेत. आत्ताच नावं कळली म्हणजे तिकिटं आणि तिथे राहण्याची बुकिंग्ज करायला बरं पडेल.’’

‘‘मी येईन. माझ्याखेरीज आणखी कोणा कोणाची निवड झालीय? मी नावं सुचवणं बरोबर आहे की नाही मला माहीत नाही. पण मला वाटतं, मनोहर काजळे आणि शीला पिटके यांच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ आहे. प्रचंड नैराश्यावर मात करून त्यांनी त्यांची आयुष्यं घडवली आहेत. इतरांसाठी काम केलं आहे.’’

‘‘त्यांचा विचार आम्ही करतो आहोतच, पण नावं अजूनी पक्की झाली नाहीत. तुम्ही मात्र तयारीला लागा. या वेळी पहिल्यांदाच असं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतंय हे लक्षात घ्या. तुमची आजवरची कामगिरी, संस्थेने तुमच्यासाठी निर्माण केलेलं वातावरण, दिलेलं प्रोत्साहन याविषयी हजारेक शब्दांत राइटअप तयार करा.’’

पुढचे काही दिवस या कामात राजेशनं लक्ष घातलं. हजार शब्दांत आपल्या रोगाविषयी, त्यानंतरच्या काळातल्या पडझडीविषयी, अडचणींविषयी, संशोधनाविषयी आणि पुढच्या यशाविषयी लिहायचं म्हणजे अवघड काम होतं. ते सर्व सोप्या आणि बिनचूक इंग्रजीमध्ये मांडायचं म्हणजे तर तारेवरची कसरतच होती. पाच-सहा वेळा त्यानं मसुदे तयार केले त्यात सुधारणा केल्या आणि नंतर अंतिम मसुदा टाइप करून घेतला. कल्पनानं त्याला त्या कामात बरीच मदत केली. राजेशला एवढा बहुमान मिळणार म्हणून कल्पना आणि मुलं खुशीत होती.

आपल्या सांगण्याप्रमाणे मनोहर काजळे आणि शीला पिटके या दोघांची निवड संस्थेनं केली म्हणून राजेशला बरं वाटलं. तेवढी तरी आपल्या शब्दाला इथे किंमत आहे, असं वाटून. एकूण पाच जणांची कॉन्फरन्ससाठी निवड झाली होती. हे कुष्ठरोगातातून बरे झालेले रुग्ण दिल्लीला त्या कॉन्फरन्समध्ये आपले अनुभव मांडणार होते. शीलाची पुणं सोडून लांब जायची ही पहिली वेळ होती. त्यामुळे ती खूपच आनंदली होती. तिला आणि मनोहरला त्यांच्या माहितीचं टिपण करायला राजेशनं मदत केली होती. त्यांना झेपेल अशा शब्दांत आणि त्यांच्या कामगिरीला पूर्ण न्याय मिळेल अशा तऱ्हेनं राजेशनं त्यांचे मसुदे करून दिले होते. आपली माहिती आकर्षक स्वरूपात सादर कशी करायची याचा त्यांना बिचाऱ्यांना काहीच अनुभव नव्हता. साहजिकच ते राजेशवर मदार ठेवून होते. बहुधा सर्वाच्या वतीनं एक-दोघांना प्रत्यक्ष बोलायची वेळ येईल, असा राजेशचा कयास होता. म्हणजे तसं त्याला आपटय़ांनी किंवा इतर कोणी स्पष्ट शब्दात सांगितलं नव्हतं. पण तसा सूर दिसत होता.

समजा आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलायची वेळ आली तर काय, कोणी काय बोलायचं याची आखणी त्यांनी केली होती. पूर्वी कॉन्फरन्सेसना जाऊन आल्यामुळे राजेशला तशी सवय होती, पण बाकीचे चौघे असल्या परिषदांना अगदीच नवखे होते. व्यासपीठावर जायची त्यांना धाकधुक वाटत होती तरी त्या अनुभवाला सामोरं जायला मात्र ते उत्सुक होते. राजधानीच्या गावी जायचं म्हटल्यावर दिल्ली शहरात थोडं तरी िहडावं, फिरावं असे त्यांचे बेत चालले होते.

हां हां म्हणता तीन महिने निघून गेले. दिल्लीला जायची वेळ आली. वेळ वाचवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विमानानं जाणार होते. ते बरोबरच होतं. बाकीचे लोक आगगाडीनं जाणार होते. आपटे आणि इतर दोन पदाधिकारी कॉन्फरन्स हॉलजवळच्या मोठय़ा हॉटेलात राहणार होते. विदेशी पाहुण्यांची सरबराई करण्याची आणि त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था या अधिकाऱ्यांना पाहायची होती. इतरांची सोय एका त्रितारांकित हॉटेलात केली गेली होती. कारणं काहीही असोत, पण थोडक्यासाठी केलेला हा पंक्तिप्रपंच राजेशच्या मानी मनाला झोंबला होता. कल्पनानं त्याची कितीही समजूत घातली तरी त्याला हे पटत नव्हतं.

शेवटी त्याच्या फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइड असलेल्या शेणोलीकरांनी जेव्हा त्याला दटावलं आणि अंतिम ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला सांगितलं तेव्हा तो थोडा शांत झाला. कोणत्याही संस्थेकडे अगदी मर्यादित निधी कसा असतो, त्याचा वापर करण्यावर कशी बंधनं असतात, तो जनतेचा पैसा असतो अशा गोष्टी सांगून त्यांनी राजेशला चुचकारलं. राजेशनं त्यांच्याशी वाद घातला नाही पण त्याला ते पटत नव्हतं. दिल्लीला जाण्यापूर्वीच तो थोडा नाराज झाला.

‘‘डॉक्टर, मला मोठय़ा, पॉश हॉटेलात उतरायचं आहे म्हणून मी रागावलो नाही. मला हा भेदभाव आवडत नाही. सर्वच जण संस्थेचे कार्यकर्ते आहेत. कुष्ठरोगानं जेव्हा आम्हाला आयुष्यातून उठवलं होतं तेव्हा संस्थेनं आम्हाला त्या वेळी आधार दिला, या पदाधिकाऱ्यांनी नाही.’’

चिडला की राजेश त्याचा विद्रूप झालेला पंजा इतरांपासून लपवायचं पार विसरून जायचा आणि हातवारे करून बोलायचा. तसाच आत्ता तो घशाच्या शिरा ताणून बोलत होता.

‘‘खरंय, मला समजतंय तुला काय वाटत असेल ते. पण सर्व लोक इतका विचार नाही करत. त्यांना बरोबर घेऊनच संस्थेला कामं पुढे न्यावी लागतात. तुला मी हे सांगायची जरुरी नाही. तू सगळं पाहिलं आहेस,’’ राजेशच्या डोक्यात गेलेली तिडीक शांत करायला डॉ. शेणोलीकर त्याला समजावायला गेले.

‘‘आपटय़ांसारखी आम्ही टाटा इन्स्टिटय़ूटसारख्या मोठय़ा संस्थेची डॉक्टरेट मिळवली नाहीये. पण आम्ही पाचही जणांनी अ‍ॅक्चुअल फील्डमध्ये आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेवढं काम केलंय त्याच्या एक शतांशही या पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं नाही. आपटय़ांनीही नाही. तरी नेहमी श्रेय घ्यायची वेळ आली की हे लोक पुढे असतात. त्याचा मला राग येतो. आतासुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्री आणि उपपंतप्रधान उद्घाटनाला येतील तेव्हा ही मंडळी पुढे असणार आहेत, हे मला ठाऊक आहे.’’

‘‘तुझा राग मला कळतो पण, जरा प्रॅक्टिकली विचार कर. आज संस्थेसाठी निधी कोण आणतंय? या लोकांच्या ओळखी, नावं, पदव्या आपल्या उपयोगी पडताहेत. त्यांच्यामुळे आपल्याला देणग्या मिळतात. यांनी जर निधी मिळवला नाही, तर आपली सर्वाची कामं बंद पडतील. तुम्ही-आम्ही जे काही थोडंफार करतोय ना, ते या पैशाच्या पाठबळावर. सर्व सेवाभावी संस्थांमध्ये थोडंफार हे असंच चालतं. तू काय किंवा मी काय, श्रेय मिळावं, नाव मिळावं म्हणून कधीच काम केलेलं नाही. आपला मतलब आहे कामाशी, राइट? तेव्हा मोकळ्या मनानं, खुल्या दिलानं या प्रकाराकडे पाहायला शीक. तुलाच कमी त्रास होईल.’’

शेणोलीकरांच्या बोलण्यात तथ्य होतं हे राजेशला मान्य करावंच लागलं. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी फंिडगशिवाय कोणतंच काम होणार नाही आणि या लोकांच्या ओळखींशिवाय फंडिंग मिळणार नाही ही वस्तुस्थिती होती.

०*

दिल्लीला पोचल्यावर राजेश आणि त्याचे सहकारी त्यांची व्यवस्था केलेल्या हॉटेलात गेले. तिथून कॉन्फरन्स हॉल बराच दूर होता. दिल्लीच्या रहदारीतून वेळेवर पोहोचायचं तर रिक्षा केल्याशिवाय पर्याय नव्हता. आपली कधीही मदत लागली, गरज वाटली तर आपण पडेल ते काम करायला तयार आहोत, असं राजेशनं पुण्यात असतानाच आपटय़ांना सांगितलं होतं. म्हणूनच दिल्लीला पोचल्यावर कदाचित आपटे आपल्यावर काही काम सोपवतील असं राजेशला वाटलं होतं. पण त्यांच्याकडून काहीही निरोप आला नाही. त्यानं फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन एक तर व्यस्त किंवा बंद असायचा. सरतेशेवटी तो आपल्या सहकाऱ्यांबरोवर हॉटेलजवळ असलेली दिल्लीतली प्रेक्षणीय स्थळं पाहायला गेला. गरज वाटली तर आपण केव्हाही मदतीला तयार असल्याचा एसएमएस आपटय़ांना पाठवायला तो विसरला नाही. पण तसा निरोप आला नाही.

कॉन्फरन्ससाठी बावीस देशांचे प्रतिनिधी आले होते. त्यातले बरेचसे पौर्वात्य देशातले होते. अमेरिका आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीसारख्या युरोपीय देशात लेप्रसीची समस्याच राहिलेली नव्हती. त्यामुळे पुढारलेल्या पाश्चिमात्य देशांतले प्रतिनिधी कमीच होते. पाहुण्यांमध्ये वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे चार उच्च पदस्थ आले होते. त्यांच्या सरबराईची जबाबदारी आपटय़ांनी स्वत:कडे घेतली होती. अगदी विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत करण्यापासून ते हॉटेलात त्यांची नीट व्यवस्था लागली आहे की नाही हे पाहण्यापर्यंत आपटे जातीने लक्ष घालत होते. वास्तविक अशा जाणकार पाहुण्यांशी बोलायला राजेशला आवडलं असतं. त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण करायला राजेश उत्सुक होता. पण तशी वेळच आली नाही.

शिष्टमंडळाबरोबर आलेल्या प्रगत देशांतल्या काही वार्ताहर पाहुण्यांना कुष्ठरोगाबद्दल प्रचंड कुतूहल असलेलं राजेशला जाणवलं. अगदी रोगट वाटेल असं. विदेशी पाहुण्यांच्या खास विनंतीवरनं संयोजकांनी दिल्लीच्या परिसरातल्या वीस-पंचवीस रुग्णांना मुद्दाम तिथे उपस्थित केलं होतं. रोगानं विद्रूपता येते म्हणजे काय, विद्रूप झालेले रुग्ण दिसतात कसे, आपले जायबंदी झालेले अवयव वापरतात कसे हे त्यांना स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचं होतं. काही वार्ताहरांनी त्यांचे फोटोही काढून घेतले. कुष्ठरोगातून बरे झालेले काही लोक परिषदेसाठी आले आहेत असं कळल्यावर त्यांच्यावरही कॅमेरे रोखले गेले. त्यांना आडवे-तिडवे प्रश्न विचारले गेले. पाहुण्या वार्ताहरांनी फोटो काढले म्हणून मग आपल्या मीडियावाल्यांनीही थोडा वेळ स्वत:चे कॅमेरे माजी रुग्णांवर रोखले. हे असलं प्रदर्शन आणि असली प्रसिद्धी राजेशलाच काय त्याच्या कोणत्याच सहकाऱ्यांनाही नको होती. संधी मिळाल्याबरोबर ते तिथून गायब झाले.

(पूर्वार्ध)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donation
First published on: 12-12-2014 at 01:18 IST