ती भावनाविवश झालेली पारो.. तो दु:खात आकंठ बुडालेला देवदास.. नात्याच्या ताटातुटीने आत्यंतिक दु:ख झालेले हे दोन जीव.. देवदास म्ह्टलं की दिलीप कुमार किंवा शाहरुख खानचा तो उदास भकास चेहरा आठवतो.. रडक्या कोमेजलेल्या चेहऱ्याने वावरणारी पारो आठवते. याच नाण्याची दुसरी बाजू किंवा संपूर्ण उलटं नाणं म्हणजे काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला ‘लव आज कल’ चित्रपट. त्यातील नायक-नायिका तर तुटलेल्या नात्याचे सेलिब्रेशन करताना दाखविले आहेत. आपल्या मित्रमैत्रिणींना ते ब्रेकअप पार्टी देतात. हे असं वागणं किती योग्य किंवा किती अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावं, पण इथे मुद्दा असा की बदल हा जगरहाटीचा स्थायिभाव आहे आणि नातीसुद्धा याला अपवाद नाहीत. 

‘पहला पहला प्यार है’ची हवा कॉलेजमध्येच लागते. (काहींना तर अगदी शाळेपासूनच) गुलाबी थंडीचे तीन महिने जसे पटकन निघून जातात, तसेच या गुलाबी प्रेमाची हवासुद्धा तितक्याच वेगात विरून जाते. आणि ब्रेकअपचा तो कठीण समय येतो. त्याच्या आठवणीत जग सुनंसुनं वाटायला लागतं. ‘छन से जो टूटे कोई सपना..’ आपली कॉलरटय़ून बनल्याचा भास उगाचच व्हायला लागतो. त्याचा एकेक मेसेज ‘दिल पे पत्थर’ ठेवून डिलीट केला जातो. त्याने दिलेल्या गिफ्ट्सना स्वत:पासून दूर करताना तिची अगदी ‘घायाळ हरिणी’ झालेली असते. फारच फिल्मी झालं ना.. आता काय देवदासच्या पारो आहोत का इतकं रडतकुढत बसायला.. म्हटलं ना.. नाती बदलताहेत आणि नात्यांचे बंधही..
कॉलेजच्या पहिल्याच वर्षी त्याने तिला ‘प्रपोज’ केलं आणि त्यांची लवस्टोरी सुरू झाली. एकमेकांशिवाय त्यांना जणू काही दिसतच नसे. अशीच काही वर्षे गेली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असताना प्रेमाचे ते गुलाबी ढग बाजूला सरू लागले. खऱ्या प्रेमाचे चटके दोघांनाही जाणवू लागले. त्याला कदाचित थोडे जास्त.. विषय काढला.. ब्रेकअपचा. तिने केला प्रयत्न त्याला समजावण्याचा.. नातं टिकवण्याचा, पण तो ठाम होता. तिच्या मैत्रिणींना वाटलं आता हिचं काही खरं नाही. ही काय सावरणार स्वत:ला.. त्याच्याशिवाय तर हिचं जगच नव्हतं.. आता? काही दिवसांनी या ‘आता’चं उत्तर तिनेच देऊन टाकलं. ‘वाटलं मला वाईट.. वाटायलाच हवं.. साहजिक आहे ना. रडलेसुद्वा काहीशी.. पण ‘होता है यार’.. अजून किती आयुष्य बाकी आहे. आणि मी काही सतीसावित्री नाहीये तो परत माझ्याकडे कधी येईल याची आयुष्यभर वाट बघायला.. आय मूव्ह्ड ऑन..
तेविशीच्या उंबरठय़ावर असणारे ते दोघेजण.. चार-पाच वर्षांपासून एकत्र होते. शिक्षण संपवून नोकरीच्या मागे लागलेले.. दोघेही जबरदस्त महत्त्वाकांक्षी. स्ट्रगलचा काळ दोघेजण एकत्र अनुभवत होते. प्रेमाचं मडकं आता कुठे आकारास येत होतं आणि कुठे माशी िशकली देव जाणे. चाक फिरायचं थांबलं. आकार येता येता अचानक ते बेढब व्हायला लागलं. तिला परदेशात नोकरीची संधी मिळाली. केव्हा परत येणार किंबहुना परत येणार का याची काही कल्पना नव्हती. तिने पुढाकार घेतला. ‘हे बघ लाँग डिस्टन्स रिलेशनशिपवर माझा काही फारसा विश्वास नाही. टिकल्याही असतील अशा.. नाही असं नाही.. मला नाही वाटत की आपल्याला किंबहुना मला हे जमेल. आणि सध्या मला माझं करिअर हे अत्यंत महत्त्वाचं आहे.. तुलाही आहेच ना.. आपण हवं तर ब्रेक घेऊ शकतो, म्हणजे एकमेकांशी कमिटेड नको राहू या, पण भविष्यात सेटल्ड झाल्यावर एकत्र येऊ. हां, मात्र तेव्हा आपल्या आयुष्यात काय उलथापालथ झाली असेल सांगता येत नाही. त्यापेक्षा नकोच ते.. आय होप तू समजून घेशील.’
लग्न करू या लग्न करू या या टप्प्यापर्यंत पोहोचलेले ते दोघे. दोघेही आपापल्या नोकरीत व्यवस्थित स्थिरावलेले. प्रेमाच्या एक अशा टप्प्यावर आलेले, जिथे प्रेम हे जगण्याचा भाग बनले होते. पण कुठेतरी चुकतंय, काहीतरी बिनसतंय असं दोघांनाही सतत वाटू लागलं. चूक तर कोणाचीच नाहीये, मग काहीतरी चुकीचं घडतंय असं का वाटतंय.. आपण दोघं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत नाही घालवू शकत याची काटेरी जाणीव दोघांनाही झाली. दोघांनीही यावर बोलून मार्ग काढायचा ठरवला आणि यातून एकच मार्ग निघाला.. ब्रेकअप.. ‘म्युच्युअल ब्रेकअप’.. पटत होतं. चुकीच्या व्यक्तीला साथीदार म्हणून निवडल्याचा आयुष्यभर पश्चात्ताप करून घेण्यापेक्षा आताच थोडासा त्रास झाला तरी वेगळं व्हायला हवं हा सरळ फंडा होता त्यांचा.
वरील तीनही उदाहरणांवरून लक्षात येतं की ‘ब्रेकअप’ या विषयाचा मुली फारसा उदोउदो करताना दिसत नाहीत किंवा ते दु:ख फार काळ कुरवाळतही राहत नाहीत. म्हणजे आजकालच्या तरुणी प्रेमाबाबतीत नात्यांबद्दल फारशा सीरिअस नसतात? असेलही.. नसेलही.. हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आजकाल एक मात्र झालंय.. प्रेमाला ‘प्रेऽऽऽऽऽऽऽऽम’ नावाची उदात्त भावना न समजता ‘प्रेम म्हणजे प्रेम’ इतकंच महत्त्व दिलं जातंय. मुलींचा नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन याबरोबरच बदलला. नाती ही जपायची असतात, पण त्याचबरोबर ती लादायचीही नसतात, हेही त्यांना उमगू लागलंय. आजच्या काळातली ‘स्मार्ट ती’ प्रेमात ‘हरवताना’ मी प्रेमात ‘हरत’ तर नाही आहे ना याचीही पुरेपूर काळजी घ्यायला लागली आहे.