पाकिस्तानचा अव्वल फिरकीपटू सईद अजमलवर आयसीसीने संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानिमित्त संशयास्पद फेऱ्यात अडकलेल्या गोलंदाजीचा आणि गोलंदाजांचा आढावा-

खेळ म्हटलं की जिंकणंही आलं आणि हरणंही आलं. त्यासाठी नियम आले. सध्या क्रिकेटमध्ये एका नियमांवरून चर्वितचर्वण सुरू आहे आणि तो नियम म्हणजे गोलंदाजी शैलीचा. गोलंदाज काहीतरी वेगळे करण्याच्या नादात काही वेळा आपल्या शैलीमध्ये काही बदल करतात. तर काही गोलंदाजांची शैलीच वादग्रस्त असते. पण कोणती शैली योग्य आणि कोणती अयोग्य, हे सांगण्यासाठीदेखील नियम आहेतच. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा अव्वल फिरकीपटू सईद अजमलवर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे ती संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळेच. पण वादग्रस्त शैली म्हणजे नेमके काय, त्यासाठी नियम कोणते, कधीपासून वादग्रस्त शैली पाहायला मिळते आहे, यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा एक प्रयत्न.

साधारण दोन-अडीचशे वर्षांपूर्वी क्रिकेटला सुरुवात झाली असं म्हटलं जातं, सुरुवातीला ‘अंडरआर्म’ क्रिकेट खेळलं जायचं, त्यावेळी गोलंदाज धावत न येता जागेवरून साधारण गुडघ्याच्या उंचीवरून चेंडू टाकायचे. साधारण १८६४ साली वगैरे ‘ओव्हरआर्म’ क्रिकेटला सुरुवात झाली. गोलंदाज धावत येऊन खांद्यावरून चेंडू टाकायला लागले. त्यावेळी गोलंदाज काही चेंडू जलद टाकण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यांची गोलंदाजी अवैध ठरवली जायची. त्यावेळी नियम नव्हते.

१८८५ साली लँकाशायरकडून खेळणाऱ्या जॅक क्रॉसलँड आणि जॉर्ज नॅश यांची गोलंदाजी संशयास्पद वाटली. तेव्हा लॉर्ड हॅरीस यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्यावर कारवाई केली. पण लॉर्ड हॅरीस यांच्या कारवाईचा खेळावर काहीसा विपरीत परिणाम होऊ लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इर्नेस्ट जोन्स हा संशयास्पद शैलीचा पहिला बळी ठरला. ऑस्ट्रेलियाचे जॉन फिलिप हे सर्वात कडक पंच समजले जायचे. त्यांनी १८९६ साली ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना जोन्स यांच्यावर कारवाई केली. तेव्हाही काही नियम वगैरे नव्हते.

संशयास्पद शैलीमुळे सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे श्रीलंकेचा फिरकीचा अनभिषिक्त सम्राट असलेला मुथय्या मुरलीधरनचे. साल १९९५, ‘बॉक्सिंग डे’चा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना. मुरली गोलंदाजीला आला आणि काही वेळातच पंच डॅरेल हेअर यांनी संशयास्पद शैलीबाबत मुरलीला ताकीद दिली. त्यानंतरही मुरली गोलंदाजी करत राहिला आणि हेअर यांनी त्याच्या तीन षटकांमध्ये सात ‘नो बॉल’ दिले. हेअर आणि कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा मैदानात वाद सुरू झाला. त्यावेळी रणतुंगा वैतागले आणि त्यांनी मुरलीसह मैदान सोडलं. काही वेळ शांतता पसरली. नेमकं काय चाललं आहे हे कळेना. हेअर मैदानातच होते, प्रेक्षक हा सारा खेळ पाहत होते. काही वेळाने संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून रणतुंगा पुन्हा मैदानात आले आणि त्यांनी मुरलीला गोलंदाजी दिली. दडपणाखाली मुरलीची गोलंदाजी बहरली नाही आणि त्यामुळेच त्याची गोलंदाजी रणतुंगाला थांबवावी लागली. हे प्रकरण त्यावेळी प्रसारमाध्यमांनी चांगलंच उचलून धरलं होतं. मुरलीच्या गोलंदाजीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्या वेळी गोलंदाजी शैलीबाबत पहिला ठोस नियम बनवल्याचं सांगितलं जातं. त्या वेळी आयसीसीच्या तांत्रिक समितीवर भारताचे माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज सुनील गावस्कर होते व त्यांनी याबाबत नियम बनवण्यास सुरुवात केली.

गोलंदाजी शैलीच्या पहिल्या नियमानुसार वेगवान गोलंदाजांनी १० अंशांपर्यंतच गोलंदाजी करताना कोपऱ्याचा वापर करावा असं म्हटलं होतं. तर मध्यमगती गोलंदाजांनी ७.५ आणि फिरकी गोलंदाजांनी ५ अंशांपर्यंत कोपरा असावा, असं म्हटलं गेलं. पण हा नियम बऱ्याच जणांच्या पचनी पडला नव्हता. या नियमानुसार बरेच गोलंदाज अवैध ठरू शकत होते. त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यासाठी आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये बरंच संशोधन केलं. त्यासाठी काही र्वष लागली. नवीन नियम बनवण्यासाठी २००३ साली आयसीसीने काही माजी क्रिकेटपटूंची समिती बनवली. या समितीमध्ये वेस्ट इंडिजचे माजी महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग, इंग्लंडचे अँगस फ्रेझर, श्रीलंकेचे अरविंद डीसिल्व्हा, दक्षिण आफ्रिकेचे डेव्हिड रिचर्ड्सन, ऑस्ट्रेलियाचे टीम मे आणि टोनी लुईस यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने गोलंदाज चेंडू टाकत असताना जेव्हा त्याचा हात खांद्याजवळ जातो तेव्हा तो १५ अंशांच्या बाहेर असू नये, हा नवीन नियम बनवला आणि तो लागू करण्यात आला. सध्या विश्वचषक तोंडावर आला असून आयसीसीने या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये काही गोलंदाज सापडले.

मुरलीधरननंतर तसे बरेच गोलंदाज संशयास्पद शैलीच्या जाळ्यात सापडले, पण त्यांच्यावर बंदी आणण्याची वेळ आयसीसीवर आली नाही. गोलंदाजी शैली संशयास्पद वाटली तर मैदानावरील पंच किंवा सामनाधिकारी गोलंदाजाला ताकीद देतात. ही बाब ते गोलंदाजाबरोबर कर्णधार, संघ व्यवस्थापन आणि आयसीसीच्या निदर्शनास आणून देतात. त्यानंतरही गोलंदाज खेळत राहिला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करत ठरावीक अवधी दिला जाते. त्या अवधीमध्ये त्याने आपल्या शैलीतील दोष दूर करून आयसीसीच्या चाचणीला सामोरे जायचे असते. चाचणीला सामोरे गेल्यावर समिती त्याच्याबाबत निर्णय घेऊन आयसीसीला कळवते. त्यानंतर आयसीसी त्या गोलंदाजाबरोबर देशाच्या क्रिकेट मंडळाला कळवते. गोलंदाजाला किंवा त्या देशाच्या मंडळाला आयसीसीच्या समितीचा अहवाल पटत नसेल तर ते आयसीसीकडे दाद मागू शकतात. मग पुन्हा एकदा समितीपुढे हे प्रकरण ठेवलं जातं आणि समितीतील व्यक्ती पुन्हा एकदा चाचपणी करून त्यावर निर्णय देतात. कोणत्याही देशाच्या गोलंदाजांवर अन्याय होऊ नये, ही आयसीसीची यामागची भावना आहे.

मुरलीनंतर बरीच प्रकरणं प्रकाशझोतामध्ये आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा समावेश होता. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचाही यामध्ये समावेश होता. पाकिस्तानचा माजी महान फिरकीपटू साकलेन मुश्ताकने ‘दुसरा’ वापरायला सुरुवात केली आणि तोदेखील यामध्ये अडकला. सध्याच्या घडीला अजमल हा मुश्ताक यांच्याकडूनच नवीन शैलीबाबत सल्ले घेत आहे. पीसीबीने मुश्ताक यांना विनंती करत अजमलच्या शैलीतील दोष दूर करण्यासाठी नियुक्त केले आहे. अजमलला जेव्हा आयसीसीने निलंबित केलं, तेव्हा पीसीबीने अजमल काही दिवसांमध्येच आयसीसीच्या चाचणीला सामोरा जाईल, असं म्हटलं होतं. पण त्यांनी अजून १५ दिवसांचा अवधी वाढवला. आयसीसीपुढे जाताना कोणतीही कसर शिल्लक न ठेवता अजमल चाचणीमध्ये उर्तीण व्हावा आणि त्याला आागामी विश्वचषकात खेळता यावं, हा त्यामागचा उद्देश आहे. बांगलादेशचा सोहाग गाझी आणि झिम्बाब्वेचा प्रॉस्पर उत्सेया यांनाही आयसीसीने ताकीद दिली आहे.

चॅम्पियन्स लीगमधील पाकिस्तानच्या संघातील मोहम्मद हफिझसह एका गोलंदाजाची शैली संशयास्पद जाणवली होती. याच स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजचा कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा फिरकीपटू सुनील नरीन यालाही संशयास्पद शैलीचा फटका बसला आणि त्यामुळेच त्याला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीला मुकावे लागले. या स्पर्धेनंतर वेस्ट इंडिजचा भारत दौरा असला तरी नरीन मायदेशी परतला तो शैली सुधारण्यासाठी.

भारताबाबत बोलायचं तर १९६८ साली न्यूझीलंड दौऱ्यामध्ये आबिद अली यांची गोलंदाजी शैली अवैध ठरवण्यात आली होती. त्यानंतर राजेश चौहान आणि हरभजन सिंग यांनाही आयसीसीने संशयास्पद शैलीप्रकरणी ताकीद दिली होती. भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांनी फिरकीपटूंना चांगलेच खडे बोल सुनावले होते. ‘चकिंग’ हा सट्टेबाजीपेक्षा मोठा गुन्हा आहे, हे सांगतानाच त्यांनी मुरलीधरन, साकलेन, हरभजन यांना ‘चकर’ ठरवलं होतं. या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यावर काही जणांनी मुरलीधरनची शैली संशयास्पद ठरवणाऱ्या पंच हेअर यांना गाठलं. ते म्हणाले की, ‘‘हे नियम त्यावेळी नव्हते आणि नियम बनवल्यावर कडक अंमलबजावणीही झाली नाही. नाहीतर मुरलीधरन, साकलेन, हरभजन हे सर्व गोलंदाज ‘चकर’ ठरले असते.’’

तर आता मुरलीधरन म्हणतो, ‘नियम हे खेळाच्या भल्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे नियमांमध्येच राहून गोलंदाजी करायला हवी.’ मुरलीचं हे वक्तव्य सूचक आहे. कारण कोणतेही नियम हे खेळाडूंना त्रास देण्यासाठी नक्कीच बनवलेले नसतात. खेळाचा दर्जा चांगला रहावा, सर्वाना खेळाचा खेळभावनेने आनंद लुटता यावा, यासाठी हे नियम बनवलेले असतात. नियम नसते तर खेळाला काहीच अर्थ उरला नसता. सध्या नियमांमध्ये अडकलेल्या किंवा घाबरलेल्या गोलंदाजांनी ‘नियम हे खेळाच्या भल्यासाठीच असतात’ हे समजून घेतलं तर त्यांना हे सारं पचवणं कठीण जाईल. दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसेलच. कारण आयसीसीच्या नियमांमध्ये सारेच सारखे आहेत.