25 February 2021

News Flash

संसर्गाची सवयच भारतीयांच्या पथ्यावर – डॉ. शेखर मांडे

डॉ. शेखर मांडे सरकारच्या कोविड-१९ संबंधीच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत.

डॉ. शेखर मांडे

टीम इंडियन एक्सप्रेस – response.lokprabha@expressindia.com

सार्वजनिक अस्वच्छता हा आपला राष्ट्रीय स्वभाव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांच्या शक्यता निर्माण होत असल्या तरी त्यातून आपली प्रतिकारशक्ती वाढत गेली आहे आणि तिनेच आपल्याला कोविडकाळात संसर्ग आणि मृत्यूपासून बऱ्यापैकी वाचवले आहे, हे म्हणणे आहे ‘सीएसआयआर’ म्हणजेच ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ च्या महासंचालकांचे, डॉ. शेखर मांडे यांचे. ‘सीएसआयआर’ अंतर्गत भारतातल्या ३७ संशोधन प्रयोगशाळांचे जाळे काम करते. संस्थेचे महासंचालक या नात्याने

डॉ. शेखर मांडे सरकारच्या कोविड-१९ संबंधीच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्याशी ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पत्रकारांनी बातचीत केली. पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अमिताभ सिन्हा यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

डॉ. शेखर मांडे : कोविड-१९ च्या संसर्गासारखी जागतिक पातळीवरची आणीबाणी गेली काही वर्षे अपेक्षितच होती. ती नेमक्या कोणत्या स्वरूपात येईल हे माहीत नव्हते, पण गेली २०-२५ वर्षे असे भाकीत केले जात होते की पुढची महासाथ कधीही येऊ शकते. आणि ही महासाथ संपल्यानंतरसुद्धा आणखी एक महासाथ नजीकच्या काळात कधीही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण त्यासाठी तयार असले पाहिजे.

आपल्या देशात गेल्या वर्षी ३० जानेवारी रोजी कोविड-१९ चा पहिला रुग्ण नोंदवला गेला. ‘सीएसआयआर’च्या सर्व प्रयोगशाळांच्या संचालकांच्या २५-२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत आम्ही या प्रश्नाची चर्चा केली. त्यानंतर जवळजवळ १५ दिवसांनी म्हणजे ११ मार्च रोजी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने कोविड-१९ ची महासाथ आल्याचे जाहीर केले. तोपर्यंत ही साथ हाताळण्यासंदर्भातली आमची धोरणे निश्चित झाली होती आणि मार्चच्या मध्यापर्यंत ती जाहीरही करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक गोष्टी करायच्या होत्या. सगळ्यात पहिली होती दक्षता घेणे. ती आपण आजही घेत आहोत. त्याशिवाय हवेचे नमुने गोळा करण्यासाठी सर्वेक्षणे करायची होती. त्यातून विषाणूचा प्रसार किती दूपर्यंत झाला आहे याचा अंदाज आला असता. दुसरा हेतू होता निदान करणे. तुम्ही कदाचित ऐकले असेल की ‘फेलुदा’ टेस्ट किट ‘सीएसआयआर’ने आणले. आम्ही ड्राय स्व्ॉब पद्धत आणली. तिच्यामुळे आरटी पीसीआर टेस्टचे शुल्क निम्म्याने कमी झाले. ड्राय स्व्ॉब पद्धतीला ‘आयसीएमआर’ (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)नेही संमती दिली आहे.

आम्ही करायची तिसरी गोष्ट होती हस्तक्षेप, मध्यस्थी. आम्ही लस आणि औषध या दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष घालतो आहोत. ‘सिप्ला’ सध्या फॅविपिरावीरची विक्री करत आहे. त्याची सगळी प्रक्रिया ‘सीएसआयआर’मध्ये झाली. आपल्याकडच्या पारंपरिक ज्ञानाचीही आम्ही दखल घेतली आहे आणि आयुष मंत्रालयाबरोबरही काही चाचण्या सुरू आहेत.

चौथा मुद्दा आहे वैद्यकीय उपकरणांचा. त्यामध्ये आपल्याकडे अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, इ्रढअढ स्वच्छ वायू व्हेंटिलेटर. ज्यांची प्रकृती अतिशय नाजूक नाही पण त्यांची प्राणवायूची पातळी वाढवण्याची गरज आहे अशांसाठी हा व्हेंटिलेटर आहे. आम्ही आत्तापर्यंत असे १२०० व्हेंटिलेटर दिल्ली सरकारला पुरवले आहेत. फिरती रुग्णालये सुरू केली आहेत. ती दुर्गम भागात कुठेही गरजेनुसार पटकन हलवता येतात. सध्या हिमाचल प्रदेशात अशी सहा रुग्णालये तयार आहेत.

या सगळ्या गोष्टी करताना आम्ही दोन तत्त्वे आचरणात आणली. एक म्हणजे या सगळ्यामध्ये उद्योग क्षेत्राचा सहभाग असायला हवा. जसा फॅविपिरावीरमध्ये ‘सिप्ला’चा होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, सगळ्या घटकांची निर्मिती  भारतात व्हायला हवी. त्यामुळे आपल्याला आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. या दोन तत्त्वांसह काम केल्यामुळे आता आपण अशा स्थितीला पोहोचलो आहोत की आपण जे करू त्याचा आपल्या समाजाला फायदा होणार आहे.

आपल्या देशात कोविड-१९ च्या संसर्गाचे प्रमाण उतरणीला लागले आहे असे तुम्हाला वाटते का, की अजूनही दुसऱ्या लाटेची भीती आहे? कोविड-१९ चा नवीन विषाणू आला आहे त्याबद्दलही थोडे सांगाल का? भारतामधली कोविडची साथ संपली असे म्हणता येईल का?

डॉ. शेखर मांडे : आपल्या देशामधली कोविड-१९ ची महासाथ संपली आहे का, याबद्दल मी असे सांगेन की हा आशावाद असला तरी त्याबाबत खूप सावधपणे बोलणे आवश्यक आहे. कोविड-१९ च्या संसर्गाचे प्रमाण खूप कमी होत चालले आहे. अमेरिकेत दरदिवशी २.२० ते २.४० लाख रुग्ण येत होते तेव्हा आपल्याकडे दरदिवशी १६ ते २० हजार रुग्ण होते. आता हे प्रमाण त्यावरूनही खूप खाली आले आहे. पण तरीही आपण आजही सावध पवित्रा घेतला आहे. कारण कोविडची महासाथ अजूनही संपलेली नाही. आपण सावधानता बाजूला ठेवली तर मात्र दुसरी लाट खात्रीने येऊ शकते. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे असे म्हणताना आपण अतिशय सावध असण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या बाबतीत खूप वेळेवर, खूप आधी केलेली टाळेबंदी हा घटक इतर विकसित देशांच्या तुलनेत फार महत्त्वाचा ठरला. या टाळेबंदीमुळे आपल्याला या महासाथीचे धोके लोकांना समजावून सांगण्याची संधी मिळाली. आणि ही महासाथ हाताळण्यासाठी तयारी करता आली. लोकांचीही तयारी करून घेता आली. ‘जेव्हा जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा मुखपट्टी विसरू नका’, ‘कशालाही हात लावलात तर तुमचे हात धुवा’, ‘शारिरीक अंतर पाळा’ याबाबत आपल्याला लोकांचे शिक्षण करता आले. आणि त्या सगळ्याचा खूप उपयोग झाला. अत्यंत विकसित अशा देशांमध्येही हे सगळे झालेले तुम्हाला दिसणार नाही.

करोनाच्या नव्या प्रकाराबद्दल सांगायचे तर प्रत्येक विषाणू स्वत:ला विकसित करत असतो. मानवी शरीर आणि हे विषाणू यांच्यामध्ये सातत्याने परस्परक्रिया होत असते. विषाणू मानवी शरीराला संसर्ग देण्याचा प्रयत्न करत असतो, तर शरीर त्या संसर्गापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते. जसजसा विषाणू स्वत:त बदल करून स्वत:चं सामथ्र्य वाढवायचा प्रयत्न करतो तसतशी आपली प्रतिकारशक्ती त्या विकसित झालेल्या विषाणूपासून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते. अन्यथा त्याच वेळी त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत गेली असती. इंग्लंडमधील नवा विषाणू त्यांच्या प्रोटिन उंचवटय़ामधून स्वत:मध्ये १७ परिवर्तने (म्युटेशन्स) घडवून आणू शकतो. म्हणजे तेवढय़ा वेळा तो बदलू शकतो. कोणत्याही विषाणूच्या परिघात लाखो अणू आच्छादलेले असतात आणि आपण त्यातली फक्त १७ म्युटेशन्स पाहू शकतो. पण आपली प्रतिकारशक्ती कोविड-१९ च्या या नव्या प्रकारच्या विषाणूपासून आपली सुटका करून घेऊ शकते यावर अभ्यासकांचा विश्वास आहे.

विषाणूचा नवीन प्रकार इंग्लंडमध्ये तयार झालेला असो किंवा दक्षिण आफ्रिकेत तयार झालेला असो, आपल्या देशात त्याचा प्रसार होऊ नये म्हणून तो शोधणं आणि त्याचा प्रसार थांबवणं यासाठी आपलं सरकार काय करतं आहे ? त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचं काय? उदाहरणार्थ काही प्रकार अधिक धोकादायक आहेत का?

डॉ. शेखर मांडे :  जगभरातली सगळी सरकारे चाचण्या करणे, माग ठेवणे, मूळ शोधणे याच पद्धतीने काम करत आहेत. आम्ही इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहोत. संसर्ग झालेली एखादी व्यक्ती इंग्लंडहून आलेली आहे हे समजले की त्या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी त्या व्यक्तीचे विलगीकरण करायचे असे धोरण सरकार राबवते आहे. आम्ही विमानतळावरच लोकांच्या स्व्ॉबचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यातून पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा वेळ आणि दिवस कमी होऊ शकतील. ‘स्पाइस हेल्थ’ देशातल्या वेगवेगळ्या विमानतळांवर हे काम करणार आहे. (‘स्पाइस हेल्थ’ ही ‘स्पाइस जेट’ची एक उपकंपनी आहे)

विषाणूचा नवा प्रकार अधिक धोकादायक आहे का हे अजून सिद्ध झालेले नाही. पण तो  किती संसर्गजन्य आहे हे आपल्याला आता समजले आहे. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला विषाणूचा संसर्ग होण्याच्या शक्यतेला आर नंबर (R-number) असे म्हणतात. इंग्लंड तसेच दक्षिण आफ्रिका इथे आढळलेले विषाणूचे नवे प्रकार ६० ते ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहेत असे आढळले आहे. पण ते अधिक जीवघेणे आहेत किंवा नाहीत याविषयी अद्याप समजलेलं नाही.

कोविड १९ वर पूर्णपणे प्रभावशाली ठरेल असे एकही औषध अजूनपर्यंत का उपलब्ध होऊ शकलेले नाही?

डॉ. शेखर मांडे :  कोणतेही औषध विकसित व्हायला १० ते १२ वर्षे लागतात. त्यामुळे जेव्हा कोविड १९ ची महासाथ सुरू झाली तेव्हा उपलब्ध आहेत तीच औषधे वापरणे (रिपर्पजिंग) हा सगळ्यात सोपा मार्ग होता. जी औषधे बाजारात उपलब्ध असतात ती सुरक्षित मानली जातात. याला ‘ग्रास’ (generally regarded as safe) म्हणतात. एखादे विशिष्ट आजारासाठीचे औषध एखाद्या वेगळ्या आजारावर देखील उपयोगी ठरू शकते. माणसांवरच्या उपचारांसाठी बाजारात सर्वसाधारणपणे तीन हजार औषधे उपलब्ध आहेत. त्यातल्या कशाचा कोविड १९ च्या उपचारांमध्ये उपयोग करता येईल अशा चाचण्यांमधून फॅविपिरावीर आणि इतर औषधे कोविडवरच्या उपचार पद्धतीत समाविष्ट झाली आहेत. कोविडवर नवे औषध उपलब्ध व्हायला चार ते पाच वर्षे लागतील.

कोविड १९ च्या जव़ळजवळ ५५ लाख लसींचे डोस हे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन दिले जाणार आहेत. ‘भारत बायोटेक’च्या लसीच्या एकंदर प्रभावक्षमतेची (efficacy) माहिती आपल्याकडे नाही. आता ज्या शास्त्रीय तत्त्वाचा आधार घेतला गेला आहे ते दीर्घकाळ टिकणारे आहे असे तुम्हाला वाटतं का?

डॉ. शेखर मांडे : रोज हजारो लोकांचे जीव जात आहेत हे खरे आहे ना? असे समजा की पुढच्या तीन-चार महिन्यांत रोज १०० लोकांचे मृत्यू झाले. म्हणजे एका महिन्यात तीन हजार आणि पुढच्या तीन-चार महिन्यांत दहा हजार मृत्यू. तरी ही आकडेवारी कमी संख्या गृहीत धरून मांडण्यात आली आहे. जास्त संख्या धरून आकडेवारी काढली तर ती ५० हजारापर्यंत जाऊ शकते. आता लसीबद्दल बोलू या. पहिल्या टप्प्यात क्लिनिकल चाचण्यांमध्ये, त्याशिवाय त्याआधीच्या प्राण्यांवरच्या चाचण्यांमध्ये संबंधित लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीला आपली प्रतिकारशक्ती प्रतिसाद देत असल्याचे आढळले आहे. या लसीला प्रतिसाद देणारी आपली प्रतिकारशक्तीच विषाणूकडे बघून घेईल अशी आशा आहे.  तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या होईपर्यंत म्हणजे आणखी चार महिने आपण थांबायला हवे होते अशी टीका होते आहे. पण असे करण्यामुळे आपण दहा ते ५० हजार लोकांचे जीवन धोक्यात घालतो आहोत. दुसरा धोका असा की जगभरात सगळीकडेच कोविड १९ च्या विषाणूचा नवा प्रकार वेगाने उद्भवतो आहे. तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण आणायचे असेल तर तुम्ही काय कराल?  विषाणूच्या त्या नव्या प्रकाराला फोफावू द्याल की जिच्या परिणामकारकतेबद्दल फार माहीत नाही, पण जी सुरक्षित आहे, जिला आपली प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते आहे असे आढळले आहे त्या लसीचा वापर कराल? ५० हजार जीव वाचवायलाच प्राधान्य द्याल ना?

हे पाहा, संबंधित लसीचे कोणतेही धोकादायक परिणाम आढळून आलेले नाहीत. तिच्यापासून कुणाला काही उपद्रव झाला आहे असे आढळलेले नाही. ती घेणाऱ्यांवर कोणताही प्रतिक्षिप्त परिणाम झाल्याचे दिसलेले नाही. तिच्यामुळे कुणालाही कोणताही गंभीर आजार झाल्याचे आढळलेले नाही. मूलत: लस जर या विशिष्ट विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती विकसित करत असेल तर ते चांगलेच आहे. पण तिच्यामुळे अशा पद्धतीने प्रतिकारशक्ती विकसित होणार नसेल तरी काही नुकसान तरी होत नाहीये. त्यामुळे तिच्यापासून कसलाच धोका  नाहीये हे निश्चित आहे.

या आधीच्या मुलाखतींमध्ये तुम्ही लसीची एकंदर प्रभावक्षमता (efficacy) आणि परिणामकारकता  (effectiveness) मध्ये फरक आहे, असे म्हणाला होतात. ते जरा स्पष्ट करून सांगाल का?

डॉ. शेखर मांडे :  ज्यांना लसीचा प्रत्यक्ष डोस दिला आहे, किंवा प्लेसबो (प्रत्यक्ष लस न देता तसा द्रवपदार्थ इंजेक्ट करणे) दिला आहे त्यांच्या क्लिनिकल चाचण्यांमधून एकंदर प्रभावक्षमता (efficacy) तपासली जाते. लस देणारा आणि लस घेणारा या दोघांनाही ती प्रत्यक्ष लस आहे की प्लेसबो आहे ते माहीत नसते. काही महिन्यांनंतर संबंधित अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला लस दिली होती की प्लेसबो हे संबंधित व्यक्तीला समजते. उदाहरणार्थ ‘मॉडर्ना’च्या चाचण्यांमध्ये ३० हजार लोकांना लस किंवा प्लेसबो दिली गेली. त्यांच्यापैकी १९६ जणांना काही महिन्यांनंतर कोविड १९ चा संसर्ग झाला. अर्थात त्यापैकी १८५ जणांना प्लेसबो दिले गेले होते आणि ११ जणांना ‘मॉडर्ना’ची लस दिली गेली होती. त्यामुळे ‘मॉडर्ना’च्या लसीची एकंदर कार्यक्षमता झाली ९५ टक्के.

लसीच्या एकंदर प्रभावक्षमतेनुसार सामान्य माणसांच्या लसीकरणाला मंजुरी द्यायची की नाही हे ठरवले जाते. आता हे सामान्य लोक म्हणजे कोण तर जे लसीकरणाच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी झालेले नसतात असे लोक. त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजार असलेले लोक असतात, ७० वर्षे वयाच्या पुढचे लोक असतात. त्यामुळे आता संपूर्ण लोकसंख्येवर परिणाम काय होतात ते बघायचे असते. ही असते परिणामकारकता (effectiveness). तिच्यामध्ये आणि एकंदर प्रभावक्षमतेमध्ये (efficacy) अगदी सूक्ष्म फरक आहे. लसीकरणानंतर त्याचे निरीक्षण केले जाते. औषधनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी पुढची दोन वर्षे या सगळ्याचे खूप बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे.

कमी तसेच मध्यम उत्पन्न गटातल्या देशांमध्ये कोविड १९ च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी कसे आहे यावर बरीच चर्चा झाली. त्यामागे ‘हायजिन हायपोथिसिस’ हे एकमेव कारण आहे की बीसीजी लसीकरणाचाही त्याच्याशी दुरान्वयाने का होईना काही संबंध आहे? भारताच्या संदर्भात बोलायचे तर कोविड १९ च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आपल्याकडे खरोखरच कमी आहे का?

डॉ. शेखर मांडे : ‘करंट सायन्स’ नावाच्या जर्नलमध्ये माझा या विषयाचा शोधनिबंध लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या एक चतुर्थाश आहे. पण कोविड १९ च्या संसर्गामुळे तिथे झालेल्या मृत्यूची संख्या भारताच्या दुप्पट आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक या दोन्ही गोष्टी उच्च दर्जाच्या असलेल्या देशांमध्ये दर दहा लाख लोकांमागे मृतांचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय विसंगत आहे. सगळ्या जगासंदर्भातच हे खरे आहे. तुम्ही कोविड १९ च्या महासाथीत आफ्रिका तसेच दक्षिण आशियाई लोकांच्या मृत्यूचे प्रमाण पाहिले तर ते सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक उच्च दर्जाचा असलेल्या देशांमधील मृत्यूंच्या तुलनेत खूप कमी आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की या म्हणजे आफ्रिकी तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये ते प्रमाण कमी आहे कारण ते कमी नोंदवले आहे. पण ते कमीच नोंदवले असेल तरी भारतात (अमेरिकेच्या तुलनेत) दर दहा लाख लोकांमागे आठ ते १० पट जास्त मृत्यूंची नोंद व्हायला हवी होती. आपण (भारत) कमी मृत्यूंची नोंद  केली असती तर आपल्या देशात जवळपास १५ लाख लोक कोविड १९च्या संसर्गाला बळी पडले असते. भारतात कोविड १९ च्या संसर्गामुळे जवळपास १५ लाख लोक मरण पावले आहेत यावर कुणी विश्वास ठेवेल असे मला वाटत नाही. त्यामुळे नोंदच न करणे हे कारण नाहीये. आफ्रिकेमध्ये कोविड १९ च्या संसर्गामुळे हाहाकार माजला असता. धारावीसारख्या परिसरात मोठी उलथापालथ झाली असती. पण तसे झालेले नाही.

दुसरा मुद्दा असा की मानवी विकासाचा निर्देशांक उच्च असलेल्या देशांमध्ये वृद्धांचे प्रमाण खूपच जास्त आहे. अशा देशांमध्ये माणसे जगण्याचे प्रमाण किंवा जीवनाचा कालावधी आपल्यासारख्या देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथले सरासरी वय जास्त आहे. आणि कोविड १९ चा विषाणू वृद्धांवर जास्त परिणाम करतो हे आपल्याला माहीतच आहे.

आता इतर आजारांच्या प्रसाराकडे बघा. सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक उच्च दर्जाचा असलेल्या देशांमध्ये टीबी, मलेरिया आणि कॉलरासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अगदीच कमी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक कमी असलेल्या देशांमध्ये या आजारांचे प्रमाण खूपच जास्त आहे. दुसरीकडे मधुमेह, अस्थमा, सोरायसिस यासारखे संसर्गजन्य नसलेल्या आजारांचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक उच्च दर्जाचा असलेल्या देशांमध्ये खूप जास्त आहे तर सकल राष्ट्रीय उत्पादन आणि मानवी विकासाचा निर्देशांक निम्न दर्जाचा असलेल्या देशांमध्ये या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूपच कमी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन कमी असलेल्या देशांमध्ये सांडपाणी व्यवस्था, यंत्रणा अगदी  कुचकामी दर्जाच्या असतात. सकल राष्ट्रीय उत्पादन उच्च असलेल्या देशांमध्ये या व्यवस्था चांगल्या असतात, पण तिथे स्वप्रतिरक्षित (auto-immune disorders) आजारांचे प्रमाण वाढते, असे आढळले आहे. ‘हायजीन हायपोथिसिस’नुसार आपल्या लहानपणापासून आपण वेगवेगळ्या विषाणूंना तोंड देत असू तर आपल्या प्रतिकारशक्तीला त्यांची सवय होते. या सगळ्याला तोंड देण्याचे तिचे प्रशिक्षण होते. ‘करंट सायन्स’ या नियतकालिकातील शोधनिबंधात आम्ही हेच मांडले आहे की लहानपणापासून आपले शरीर वेगवेगळ्या विषाणूंना तोंड देत असते. त्यांची आपल्या शरीराला सवय झालेली असते आणि या सवयीनेच आपल्याला वाचवले आहे.

ही काही आपण अनुभवत असलेली शेवटची महासाथ नाही. आपण केलेली या महासाथीची हाताळणी, घेतलेला तिचा अनुभव पाहता पुढे येईल ती महासाथ आपल्या दृष्टीने या महासाथीपेक्षा वेगळी कशी असेल? आपण या महासाथीमधून काय शिकलो आणि कोणती संस्थात्मक उभारणी केली जेणेकरून भविष्यातल्या कोणत्याही महासाथीला आपण वेगळ्या आणि अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ?

डॉ. शेखर मांडे : सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य निरीक्षण करणारी पायाभूत यंत्रणा. कोविड १९ च्या बाबतीत तिचा प्रतिसाद अतिशय वेगवान होता. चिनी अधिकाऱ्यांना न्यूमोनियासदृश आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले, त्यांनी लगेचच जागतिक आरोग्य संघटनेला कळवले. चौथ्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची टीम वुहानमध्ये परिस्थितीची पाहणी करायला पोहोचलेली होती. हे सगळे करोना व्हायरस नावाच्या विषाणूमुळे घडलेले आहे हे आपल्याला सातव्या दिवशी माहीत झालेले होते. यासंदर्भातले शीघ्र कृती दल आपल्याकडे सध्या आहे ही चांगली गोष्ट आहे. त्या संदर्भात आपण सध्या चांगल्या पद्धतीने काम करत असलो तरी त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या बीएसएल फोर (biosafety level-4) लॅबची गरज आहे. त्यामध्ये आपल्याला संसर्गाला कारण ठरणाऱ्या वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास करता येईल. प्राण्यांमधून माणसामध्ये संक्रमित होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा (zoonosis) अभ्यास करण्याची गरज आहे. प्राण्यांमध्ये सातत्याने आढळणारे वेगवेगळे विषाणू, परजीवी यांचे सतत नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी प्राण्यांचे नियमितपणे निरीक्षण करणारी यंत्रणा विकसित केली पाहिजे. त्यांच्याकडून कोणते आजार आपल्यापर्यंत येऊ शकतात यावर लक्ष ठेवले पाहिजे.

दुसरे म्हणजे निदान, औषधे, आवश्यक उपकरणे, डॉक्टर्स, नर्सेस हे सगळे वेळेवर उपलब्ध होईल यासाठीची साखळी विकसित केली पाहिजे. त्यासाठीची दळणवळण यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे. तरच उद्या कोणतीही आणीबाणीची, तातडीची परिस्थिती उद्भवली तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण या सुविधा कमीतकमी वेळात पोहोचवू शकू.

‘इंडियन इन्स्टिटय़ूटच्या सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’च्या प्रो. रोहिणी गोडबोले यांना नुकताच ‘ऑर्डर नॅशनल दी मेरिट’ हा फ्रान्स सरकारचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स या म्हणजेच ‘स्टेम’ क्षेत्रांमध्ये अधिकाधिक स्त्रियांनी यावे यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतो?

डॉ. शेखर मांडे : आपण सगळ्यात पहिल्यांदा ही वस्तुस्थिती मान्य करू या की कुठे तरी काही तरी गळती होते आहे. शाळेच्या पातळीवर सगळ्यांनाच सारखी संधी असते. आपण जसजसे वर जायला लागतो तसतसे स्त्रिया मोठय़ा संख्येने कमी व्हायला लागतात. तुम्ही नोकरीच्या बाजारपेठेत येता तोपर्यंत त्यांची संख्या आणखी कमी झालेली असते. वरिष्ठ पातळीवर तर त्या नगण्यच असतात. तर या चारही क्षेत्रांत त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करायचे, त्यांना कसे प्रोत्साहन द्यायचे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मान्य करायला हवे की या संख्येच्या बाबतीत आपण फारसे काही चांगले करू शकलेलो नाही. त्या संदर्भात सातत्याने सार्वजनिक ठिकाणी कुणालाही सत्य कितीही कटू वाटले तरी चर्चा झाली पाहिजे. दुसरीकडे व्यवस्थापकीय पदांवर बसण्याची संधी मिळालेल्या माझ्यासारख्या लोकांनी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘सीएसआयआर’मध्ये आम्ही सर्व प्रकारच्या समित्यांवर स्त्रीपुरुष सारख्याच संख्येने असतील यासाठी प्रयत्न करतो. वरिष्ठ पदांच्या बाबतीतदेखील असेच असावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे खूप मोठे आव्हान आहे. मी दोन वर्षांपूर्वी ‘सीएसआयआर’मध्ये आलो तेव्हा आमच्या ३७ पैकी एकाही प्रयोगशाळेत महिला संचालक नव्हत्या. आज आमच्या चार प्रयोगशाळांच्या संचालकपदी महिला आहेत. ही संख्या अगदी कमी आहे आणि ती निम्म्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

‘सीएसआयआर’चे बजेट किती आहे आणि त्यापैकी प्रायोजित किंवा मागणीनुसार केल्या जाणाऱ्या संशोधनावर किती खर्च केले जाते?

डॉ. शेखर मांडे : दहा वर्षांपूर्वीपर्यंत धुक्यामुळे दिल्लीच्या विमानांना टेक ऑफ आणि लॅण्डिंगला खूप उशीर व्हायचा. आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे. देशातल्या १०० विमानतळांवर ट्रान्समिसोमीटर बसवले गेले आहेत. ते व्हिज्युअल रेंज निश्चित करतात. या ट्रान्समिसोमीटर्सना दृष्टी असे म्हणतात आणि ते ‘नाल’ म्हणजे ‘नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरी’ने विकसित केले आहेत. ही प्रयोगशाळा ‘सीएसआयआर’चाच भाग आहे.

सरकार ‘तेजस’ एअरक्राफ्ट खरेदी करत असल्याचे तुम्ही वाचले-ऐकले असेल. ‘तेजस’च्या वजनाचा ७० टक्के भाग कार्बन फायबरपासून बनलेला आहे. हे कार्बन फायबर कुणी तयार केले? ‘सीएसआयआर’ आणि ‘नाल’ने. ‘तेजस’ नौदलाच्या जहाजांवर उतरते आणि तिथूनच आकाशात झेपावते. त्याला ते सहज शक्य व्हावे यासाठी त्याला टेक ऑफ आणि लॅण्डिंगसाठी अगदी मोजकी, नेमकी, अचूक ठरेल अशी जागा लागते. तिथे अध्र्या मीटरपेक्षा जास्त चूक होऊन चालत नही. पायलट ते सगळे कसे करतात? ‘तेजस’ एअरक्राफ्टमध्ये हेड अप डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले वैमानिकाला अचूक टेक ऑफ आणि अचूक लॅण्डिंग करायला मदत करतो. हा हेड अप डिस्प्ले कुणी तयार केला? तर चंडीगड येथे असलेल्या ‘सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रमेंट्स ऑर्गनायझेशनने’. ही संस्थादेखील ‘सीएसआयआर’चाच भाग आहे. मी अशी किती तरी उदाहरणे देऊ शकतो. आम्ही अशा पद्धतीने अनेकांबरोबर सहयोग करतो. ‘तेजस’साठी ४८ हजार कोटी रुपयांची ऑर्डर दिली गेली तेव्हा सगळ्यांनी ‘डीआरडीओ’चे कौतुक केले. पण कुणालाही हे माहीत नव्हते की ‘तेजस’ची सगळी नियंत्रण यंत्रणा ‘सीएसआयआर’ने तयार केली होती. ‘तेजस’चे बरेच तंत्रज्ञान हे ‘सीएसआयआर’ची निर्मिती होती. ‘सीएसआयआर’, ‘डीआरडीओ’ आणि ‘एचएएल’ यांच्यामध्ये अतिशय गौरवास्पद असा सहयोग आहे, हे अनेकांना माहीत नसते.

(‘इंडियन एक्स्प्रेस’मधून)

(अनुवाद- वैशाली चिटणीस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 7:15 am

Web Title: dr shekhar mande interview on coronavirus pandemic and vaccine coverstory dd70
Next Stories
1 ‘प्रभारी’ लय भारी!
2 पाठलाग ही सदैव करतील !
3 #ट्रेण्डिंग २०२१
Just Now!
X