05 July 2020

News Flash

चर्चा : शिवचित्राची चिकित्सा

‘लोकप्रभाच्या’ १८ जुलैच्या अंकात ‘शिवचित्रांचा बाजार’ या लेखात सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या शिवचित्राच्या चौर्यकर्मावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. कामत यांच्या त्याच शिवचित्राबाबत चर्चा...

| November 7, 2014 01:27 am

‘लोकप्रभाच्या’ १८ जुलैच्या अंकात ‘शिवचित्रांचा बाजार’ या लेखात सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या शिवचित्राच्या चौर्यकर्मावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. कामत यांच्या त्याच शिवचित्राबाबत चर्चा…

‘शिवचित्रांचा बाजार’ ही ‘लोकप्रभा’तील (१८ जुलै) कव्हरस्टोरी वाचली. पैकी संपादकीय व मुख्य लेख हे कलाप्रांतातील नैतिकतेचा तात्त्विक ऊहापोह करणारे व चौर्य प्रवृत्तीची निर्भर्त्सना करणारे असे समर्पकच आहेत. मला त्यातील चित्रकार वासुदेव कामत यांचा लेख महत्त्वाचा वाटला. त्यात त्यांनी चित्राची निर्मिती प्रक्रिया सांगितली आहे. तशीच चित्रनिर्मितीतील स्वत:ची तत्त्वे व कल्पनाही सांगितली आहे. ‘लोकप्रभा’च्या या अंकापूर्वी काही दिवस अगोदर हे चित्र ‘लोकसत्ता’मध्ये बातमी म्हणून छापून आले होते. त्या वेळीच या चित्राचा वेगळेपणा नजरेत भरला होता. परंतु ते लहान असल्याने स्पष्ट असे दिसत नव्हते. त्याबद्दलची उत्सुकता ‘लोकप्रभा’ने खास विषय घेऊन स्पष्ट चित्रछपाई करून पुरी केली याबद्दल धन्यवाद! आता माझ्या सवयीप्रमाणे चित्राचे सांगोपांग निरीक्षण करून व चित्रनिर्मितीसंबंधी चित्रकार कामत यांनी निर्मितिकल्पनांचा संदर्भ घेऊन माझ्या मनात जे विचार आले ते अगदी सहज रसग्रहण म्हणून लिहीत आहे.

त्याआधी थोडे विषयांतर म्हणजे डच चित्रकाराने काढलेल्या श्रीशिवछत्रपतींच्या चित्राच्या घटनेवरून एक गमतीदार प्रश्न मनात आला तो म्हणजे, या व्यापारी डचमंडळींबरोबर किती डच चित्रकार त्या काळी हिंदुस्थानात आले होते? कारण आज येथे शिवाजी महाराजांची तीन चित्रे उपलब्ध आहेत. ‘लोकप्रभा’मध्ये छापलेले, वा. सी. बेंद्रे यांनी इंग्लंडहून आणलेले डच चित्रकाराने काढलेले एक. दुसरे महाराष्ट्र सरकारने (मला वाटते राज्यनिर्मितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षी) काढलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सुंदर चित्रसंचात एक मिळाले. त्याखाली मूळ चित्र ब्रिटिश म्युझियम, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या सौजन्याने असे लिहिले आहे. हे चित्रसुद्धा डच चित्रकाराचे असावे. तिसरे मला सात-आठ वर्षांपूर्वी वर्तमानपत्रातील बातमीत मिळाले. त्याच्याखाली ‘‘एका अज्ञात डच चित्रकाराने १६६४ साली रेखाटलेले शिवाजी महाराजांचे चित्र’’ असे आहे. म्हणजे ते इतिहासकालीन असावे असे मानायला हरकत नाही. ते चित्र इतर उपलब्ध चित्रांपेक्षा अगदी वेगळे वाटल्यामुळे व ते बरेचसे अस्पष्ट असल्यामुळे मी त्याची प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त प्रमाणित अशी प्रतिकृती केली त्याची ही झेरॉक्स प्रत. तिन्ही चित्रे एकाच बाजूने चितारली असली तरी त्यांच्या तपशिलात फरक आहेच. म्हणजे ही चित्रे एकाच चित्रकाराची नसून त्यांचे निरनिराळे चित्रकार असावेत, असा रास्त तर्क काढायला हरकत नाही.

आता नामवंत चित्रकार वासुदेव कामत यांच्या शिवाजी महाराजांच्या या चित्राविषयीचे माझ्या मनात काहीसे प्रश्नात्मक आलेले विचार- वासुदेव कामत यांना पोट्र्रेट आर्टिस्ट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहेच. महाराजांना सीटिंग देऊन आपण त्यांचे चित्र काढावे अशी एक रम्य कल्पना त्यांच्या मनात होती. त्याप्रमाणे हे चित्र पोटेर्र्टच झाले आहे. चित्रातील महाराज चित्रकाराने जसे सांगितले तसे जाणीवपूर्वक ठाकठीक बसले आहेत. कामतांच्या पद्धतीप्रमाणे हे चित्र नेत्रसुखद आहे हे निश्चित. राज्याभिषेक सोहळय़ावेळी महाराज सिंहासनावर बसून समोरून येणाऱ्याचा मुजरा स्वीकारीत आहेत, अशीही एक कल्पना आहे. सिंहासन म्हणजे नक्की कोणते आसन? उच्च बैठकीच्या पुढील बाजूच्या खुरांना सिंहाचे मुखवटे लावले की त्या बैठकीला सिंहासन म्हणतात, की राजे लोक खास प्रसंगी दरबारात ज्या भव्यदिव्य आसनावर बसतात त्याला (सिंहाचे मुखवटे नसले तरीही) सिंहासन म्हणतात?

या दुसऱ्या प्रकारची आसने पौराणिक, ऐतिहासिक चित्रांतून, दूरदर्शन मालिकांमधून सरसकट दिसून येतात. या आसनांना पाठीमागच्या बाजूनेही नक्षीदार भाग डोक्यांपर्यंत असतो, म्हणजे ते पूर्ण आसन होते. या चित्रात पाठीमागे चौकोनी आकाराचा उंच लोड (?)आहे. हे सिंहासन म्हणता येईल का? बैठक तर चौकोनी दिसत आहे. पुढे दिसते त्यापेक्षा मागची रुंदी कमी असावी. तर दोन्ही बाजूंचे मोठे लोड व त्यावरील गिरद्या व्यवस्थित बसणे कठीण वाटते, बैठकीच्या बाहेर थोडय़ा जातील.

मेघडंबरी किती कोनी असते? बहुतेक षट्कोनी किंवा अष्टकोनी दाखवतात. तिला जेवढे कोन तेवढेच खांब असतात. या चित्रात फक्त चारच खांब दिसतात. खांबांची रचना पाहिली तर तिला आणखी खांब आहेत असे वाटते, पण तसा अंदाज येत नाही. मेघडंबरी उंची-रुंदीत बरीच आटोपशीर दिसते. मेघडंबरीचा आकार पाहता व महाराजांची उंची, शरीरसौष्ठव पाहता त्यांना मेघडंबरीत काळजीपूर्वक आसनस्थ व्हावे लागेल असे वाटते. महाराज खुरमांडी घालून बसले आहेत म्हटले आहे. (खुरमांडी हा शब्द मी प्रथमच ऐकतो आहे) या बैठकीला आसनमांडी (बोलीभाषेत आसलमांडी) म्हणतात, योगाभाषेत सुखासन. ही बैठक नावीन्यपूर्ण असली तरी अशा प्रकारच्या खास सिंहासनावर विशेषप्रसंगी अशी मांडी घालून बसणे होईल का? खासगी बैठकीतच ते शक्य आहे. या प्रकारच्या आसनमांडीत डावा पाय आत व उजवा पुढे बाहेर घेण्याची सर्रास सवय असते. ती सर्वत्र दिसून येते. महाराजांच्या दोन्ही मांडय़ा झाकल्या आहेत. त्या अंगरख्याच्या घेराने हे त्या कापडावरील नक्षी नीट पाहिल्यावर कळते. एरवी चटकन ते धोतर वाटते. तलवारीची लांबी किती असावी? तलवार हे तत्कालीन क्षत्रियांचे मुख्य शस्त्र. ते सदैव सोबत असणे अगदी योग्य. कटय़ारीसारखे प्रसंगोपातच वापरले जाणारे दुय्यम शस्त्र दरबार प्रसंगी कंबरेस खोचून बसणे शक्य वाटत नाही. लाल गंधाची चंद्रकोरही इतर चित्रांत पाहिलेली आठवत नाही.

राज्याभिषेक सोहळय़ात महाराज मेघडंबरीमध्ये सिंहासनावर बसून समोरून येणाऱ्यांचा मुजरा स्वीकारीत आहेत. त्या वेळचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव चित्रकारांना चितारायचे होते. तसे पाहिले तर चित्रातील नजरेची दिशा तितकीशी पटत नाही. कारण सिंहासन नेहमीच दरबारी जमिनीच्या (फ्लोअिरग)पातळीपेक्षा बऱ्याच उंच पातळीवर असते. मुजरा करणारी व्यक्ती समोर जमिनीवर आणि तीही मुजऱ्यासाठी बरीच वाकलेली असते. सिंहासनाधिष्ठित महाराज त्या लीन व्यक्तींकडे सस्मित नजरेने पाहून, मधूनच उजव्या हाताची माफक हालचाल करून मुजरा स्वीकारल्याची खूण देणार म्हणजे तशी कल्पना केली तर नजर त्या प्रमाणात खालच्या दिशेने हवी. चित्रात महाराजांची नजर सरळ रेषेत दूरवर पाहणारी व काहीशी विचारात गुंतल्यासारखी वाटते. महाराज आजानुबाहू असल्यासारखेही वाटतात. महाराजांच्या जिरेटोपाच्या मागील तुऱ्याचा जो काही थोडासा भाग दाखवला आहे तो मानवत नाही. मी आजवर पाहिलेल्या महाराजांच्या चित्रांत (बहुतेक एका बाजूने चितारलेली होती.) हा तुरा जिरेटोपाच्या मागील टोकावर आडवा लोंबता दाखवला आहे. (छापलेल्या चित्रांप्रमाणे) तसेच महाराज हे वर लिहिल्याप्रमाणे सर्वसाधारण पातळीपेक्षा उंचावर बसलेले असल्यामुळे तुरा समोरून काही प्रमाणातही दिसेल असे संभवत नाही. या संदर्भात आठवलेली एक वेगळी जुनी घटना संगतो- महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर गेट वे ऑफ इंडिया येथे श्रीशिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवला आहे. त्याच्या शिल्पकारांनी हा तुरा जिरेटोपाच्या वर मध्यभागी जरा उंच असा लावला आहे. त्यावर नंतर कलाक्षेत्रात बरीच चर्चा होती. त्यावर शिल्पकारांनी खुलासा केला की, तो पुतळा समोरच्या समुद्रातील जहाजांवरूनही दिसणार आहे, तेव्हा तुराही दिसावा अशा हेतूने तसा लावला आहे.

चित्रकार वासुदेव कामतांचा मी एक चाहता आहे. त्यांचे रेखाटन, रंगपद्धती अत्यंत आकर्षक असते. चित्रात अत्यंत बारीकसारीक तपशील कल्पकतेने भरण्यात ते कुशल आहेत. याचा प्रत्यय- मेघडंबरीची कठीण अशी अप्रतिम कलाकुसर, महाराजांचे अलंकार, वस्त्रे, बैठकीचे लोड-तक्के, मागच्या कनाती, तलवारीची मूठ सिंह मुखवटय़ांच्या डोळ्यांतील पाचूरत्ने इतकेच नव्हे तर सहज सुंदरपणे ठेवलेल्या हातांच्या पृष्ठभागावरील स्पष्ट शिरा यांनी येतो. त्यांच्या वैशिष्टय़ाला मनापासून दाद देऊनही जरासे वाटते की, माझ्या ऐंशी उलटलेल्या हातावर ज्या शिरा उमटल्या आहेत, त्यापेक्षा पंचेचाळिशीतील महाराजांच्या हातावरील शिरा जरा जास्तच ठळक दिसतात.

वासुदेव कामतांची चित्रे पाहताना नजरेस एक शांतता मिळते. मी त्यांची दोन मोठी चित्रप्रदर्शने पाहिली. बऱ्याच वर्षांपूर्वी नेहरू सेंटरमध्ये व एक सुमारे पाच-सहा (अंदाजे) वर्षांपूर्वी जहांगीरमध्ये भरलेले संत परंपरेवरील भव्य प्रदर्शन. नेहरू सेंटरमधील प्रदर्शनातील एका मोठय़ा चित्रात भल्यामोठय़ा धनुष्याखाली हाताची उशी करून शांतपणे झोपलेला मनमोहन (व मनमोहकही) श्रीकृष्ण अद्याप माझ्या नजरेसमोर आहे. खास करून त्याची गुलाबी तळपावले. मी वारकरी संप्रदायातील असल्यामुळे जहांगीरचे प्रदर्शनही भावले. बहुतेक वेळा प्रदर्शनात माझ्यासोबत कुणीतरी प्रस्थापित चित्रकलाकार, कलारसिक असतातच. त्या कलाकृतींची मला भावलेली वैशिष्टय़े मी त्यांना सांगत असतो. त्यांनाही ती भावतात.

आज योगायोगाने वासुदेव कामत यांच्या चित्रावर लिहायला घ्यावे लागल्याने, त्यांची एक मागील आठवण झाली ती जरा लिहितो. गेल्या वर्षांपासून ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीमध्ये कलावंत व अन्य क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींची आत्मपरिचयपर विस्तृत निवेदने ‘मैफल’ शीर्षकाखाली येत आहेत. त्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वासुदेव कामत यांचाही बराच विस्तृत लेख आला होता. त्यात त्यांनी स्वत:ची जडणघडण, कलाकारकिर्दीची वाटचाल, निर्मितीमागची अंत:स्फूर्ती, मनन, चिंतन यांचा ऊहापोह केला आहे. चित्रकला प्रांतातील उदयोन्मुख मंडळींना तो फार उद्बोधक, मार्गदर्शक आहे. त्या लेखात कामत यांनी कलाविष्काराचा नमुना म्हणून तीन चित्रे दिली आहेत. त्यातील कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे ‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा’ या शीर्षकाचे जे भव्य चित्र आहे ते कला म्हणून चांगले आहे; परंतु भगवद्गीतेच्या अभ्यासकांना ते पटणारे नाही. शीर्षक आणि विश्वरूपदर्शन यांचा काहीही संबंध नाही. याला पूरक अशा तीन-चार ओव्या ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायात आहेत. चित्राचे रेखाटनही रणक्षेत्राच्या वास्तवाला अनुरूप नाही. दुसरे जे चोखामेळ्याचे (?) चित्र आहे. त्याच्याही रेखाटण्याच्या वास्तवाबद्दल थोडा संदेह आहे. तिसरे जे गजान्तलक्ष्मी (नक्की नाव आठवत नाही) म्हणून चित्र आहे तो मात्र चित्रकर्त्यांचा कलाविष्कार आहे. या विषयावर सप्रमाण विश्लेषणात्मक असे त्या वेळी लिहिणार होतो; परंतु आजारामुळे ते राहिले, नंतर त्या लेखाचे कात्रणही नजरेआड झाले. त्यामुळे राहून गेले ते गेलेच. आता बराच उशीर झाला आहे. विषयसुद्धा वाचकांच्या विस्मृतीआड झाला असणार आणि त्याचा एक स्वतंत्र लेखच होईल. आता ते शक्य वाटत नाही. आज निव्वळ योगायोगानेच लिहिले गेले इतकेच.

शेवटी ज्याच्यामुळे हे सर्व लिखाण झाले तो मूळ आणि मुख्य मुद्दा कलाचौर्याचा व कलेच्या बाजाराचा. हा प्रकार अत्यंत निंदनीयच आहे. याची चांगलीच चिरफाड लोकप्रभातील दोन लेखांत केली आहेच. चित्र पुरातन आहे की सद्य:कालीन आहे हे कलेची थोडीबहुत जाण असणाऱ्यांना समजू शकते. सर्वसाधारण माणसे श्रद्धेने किंवा मोहाने फसू शकतात, पण माननीय बाबासाहेब पुरंदरेंसारख्या चिकित्सक धुरीणांच्याही ते लक्षात आले नाही. मोठय़ा खुबीने हा चौर्यप्रकार व व्यापार झाला. तसे पाहायला गेले तर हा प्रकार तसा नवीन नाही. यापूर्वीही एकाचे श्रेय दुसऱ्याने चातुर्याने सहजपणे ढापणे असे प्रकार घडले आहेत. दिगंत कीर्तीचे चित्रकार एस. एम. पंडित यांनाही याचा फटका बसला होता.

मी हे सर्व लिहिले ते टीका म्हणून मुळीच नाही. हे एक तार्किक, वैचारिक प्रांजल मतप्रदर्शन आहे. चित्रकार वासुदेव कामत यांचा मी आदर करतो. त्यांची चित्रकल्पना, चित्ररचना, प्रसन्न रंगपद्धती मनमोहक व नेत्रसुखद असल्याचे मी पूर्वीच मान्य केले आहे. वास्तव चित्रकलेच्या सर्व प्रकारांतील त्यांची सिद्धहस्तता निर्विवाद मान्य करूनही असे म्हणावेसे वाटते की, हे सर्व व्यापूनही कामत हे पोट्र्रेट आर्टिस्ट म्हणून दशांगुळे उरतातच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2014 1:27 am

Web Title: drawing of shivchatrapati
टॅग Charcha
Next Stories
1 रचना : सावरकर स्मारकातील त्रिवेणी कलासंगम
2 सहकार जागर : विलंब आकार भरावा का?
3 तंत्रज्ञान : लेझर तंत्रज्ञान भारतातील म्युझियम्ससाठी नवे वरदान!
Just Now!
X