lp04 मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरीत १ ते १० मार्च या कालावधीत प्रयोगशील, ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धनांच्या पेंटिंग्ज, स्केचेस आणि ड्रॉइंग्जचे प्रदर्शन आहे. त्यानिमित्त त्यांची विशेष मुलाखत-

नचिकेत पटवर्धनांच्या पेंटिंग्ज, स्केचेस आणि ड्रॉइंग्जचे प्रदर्शन मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरीत १ ते १० मार्च या कालावधीकरता भरत आहे हे कळल्यावर खूप कुतूहल, उत्सुकता वाटली. नचिकेत-जयू पटवर्धन नावाचा अमिट ठसा गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मनावर आहे. भारतीय कलात्मक चित्रपटांच्या मांदियाळीतल्या दोन महत्त्वाच्या, कल्ट चित्रपटांशी हे नाव जोडले गेलेले आहे. त्यापैकी एक त्यांची निर्मिती-दिग्दर्शन असलेला ‘२२ जून १८९७.’ दुसरा ‘उत्सव.’ ज्यातील अभिजात कला दिग्दर्शन, अतीव देखणी, काळाशी सुसंगत रंगसंगती, वस्त्रप्रावरणे आणि दागिने चित्रपट अभ्यासक आणि रसिक आजही विसरू शकत नाहीत.
मात्र हे चित्रपट नचिकेत-जयू पटवर्धनांच्या एकंदर प्रदीर्घ आणि अनेक पदरी कला-कारकीर्दीतील फक्त दोन टप्पे आहेत, त्यांचा प्रवास त्याही आधी सुरू झाला, आजतागायत तो चालू आहे.
वास्तुरचना, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, संहिता लेखन, सेट डिझाइन, कॉस्च्युम डिझाइन, इलस्ट्रेशन, पेंटिंग, स्केचिंग, अ‍ॅनिमेशन अशा अनेक वाटांनी त्यांचा हा कला-प्रवास बहरला.
त्यांनी वास्तुरचना केलेली घरे नैसर्गिक वातावरणात सामावून गेलेली डौलदार, मोकळी. पारंपरिकता आणि आधुनिकतेच्या डिझाइनमध्ये सुयोग्य मेळ साधत, राहाणाऱ्याच्या गरजा, आवड, बजेटचा विचार करत बांधलेली. प्रत्येक घर सुंदर कलेचा नमुना. त्यांनी लॅण्डस्केप्स डिझाइन केली. इंटीरियर डिझाइन केले. म्युझियम्स रचली. आणि हे सगळे कायमच माध्यम प्रसिद्धीच्या गलबल्यापासून स्वत:ला दूर ठेवत. त्यांनी कधीही मुलाखती दिल्या नाहीत, भपकेबाज मासिकांमध्ये प्रसिद्धीकरिता फोटो दिले नाहीत.
प्रदर्शनासंदर्भात जाणून घेण्याकरिता जयू पटवर्धनांना फोन केला तेव्हा फोनवरून बोलायला अपेक्षेप्रमाणेच त्यांनी नकार दिला. पुण्याला येऊन प्रत्यक्ष भेटा असे सुचवले. ते मला हवेच होते. एक तर पेंटिंग्ज आणि स्केचेस आर्टिस्टच्या स्टुडिओत प्रत्यक्ष बघण्यातच केव्हाही मजा असते आणि दुसरे जास्त महत्त्वाचे कारण नचिकेत-जयू पटवर्धनांशी गप्पा झाल्या असत्या आणि त्यात आजवरच्या माझ्या मनातल्या अनेक कुतूहलांना उत्तरे मिळण्याची शक्यता होती.
आजूबाजूला भिंतींवर ऑइल्स आणि अ‍ॅक्रिलिकमधली नचिकेत पटवर्धनांची पेंटिंग्ज. कॅनव्हासवर वर्चस्व आहे ते रंगांचे. हिरवा, पिवळा, लाल, केशरी, निळा आणि काळा रंग आपल्या जन्मजात गर्द आदिम छटांमधून ज्या ताकदीने त्याच्या मूळ परिसराशी नाते जोडत मातीवर, वस्त्रप्रावरणांवर उमटतात तसेच ते या कॅनव्हासवर मनमुराद घरंगळलेले. स्वैर पण भडकपणा नाही. अभिजात सौंदर्याची पातळी त्यांनी जराही सोडलेली नाही. रंगात पोहणारे प्रवाही आकार, काही आदिवासी प्रतीके, भौमितिक तुकडे. पाण्यावरचे रंग, पाण्यातले जलचर, वनस्पती, अवकाशात तरंगणारे आकार, पॅगोडांचे कळसही.. रंगांमधून साकारलेले आणि रंगांमध्येच विलीन होणारे आकार. मग एखादा तीव्र फटकारा, धारदार रेषेसारखा. आजूबाजूच्या अनाग्रही, गाफील रंगछटांच्या लेपांमधून आकस्मिक सामोर येणारा. घायाळ करणारा..
lp07
कॅनव्हासवर नैसर्गिक कापडाचे पोत, टेक्सटाइल मोटिफ्सची आठवण करून देणारे काही आकारही आहेत का? की ते त्यांच्या व्यावसायिक पाश्र्वभूमीची माहिती असल्याने माझ्याच नजरेत रेंगाळले असावेत?
पेंटिंग्ज बघत असतानाच जयू मला नचिकेत पटवर्धनांची स्केचेस आणि ड्रॉइंग्ज बघायचा आग्रह करतात. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ही पहिल्यांदाच प्रदर्शित होणारी स्केचेस आणि ड्रॉइंग्ज आहेत.
‘‘ही स्केचेस लोकांनी बघायलाच हवी असे वाटले. पण ती खूप आहेत. सगळी फ्रेम करता येणे शक्य नाही. म्हणून मग एका कंटिन्यूअस लूपमध्ये ती स्क्रीनवर दाखवली जातील.’’ जयू पटवर्धन सांगतात.
खूप आहेत म्हणजे किती?
तर एकूण ४५ डायऱ्या आहेत स्केचेसने पूर्ण भरलेल्या. हिशेबांच्या खातेवह्य असतात तशा मोठय़ा चौकोनी लाल डायऱ्या. याव्यतिरिक्तही स्केचेस असतात. निमंत्रण पत्रिकांची मागची बाजू. कागदांचे चौकोन, कार्ड पेपर्सचे तुकडे, कशावरही काढलेली.
पिकासोच्या मते स्केचेस ही कलाकाराने लिहिलेली दैनंदिनी असते.
गेल्या जवळपास चार दशकांच्या काळातील नचिकेत पटवर्धनांचे आयुष्य या स्केचेसमध्ये आहे. देश-विदेशात प्रवासात, वास्तव्यात, रस्त्यांवरून जाताना, वाटावळणांवर भेटलेली माणसे, निसर्ग, पर्यावरणासकटचे जग यात आहे. सुहृद, आप्तस्वकीय आहेत. त्यामध्ये त्यांचे घर आहे, घरातल्या वस्तू अगदी पुस्तकांपासून भांडी, कपापर्यंत आहेत. कुटुंब आहे, शाळकरी मित्र-मैत्रिणी आहेत. ट्रॅफिकमधला पोलीस आहे, ऑस्ट्रेलियाला भेटलेला चित्रकार आहे, गिरीश कासारवल्ली आहेत. उत्सवचे सेट्स आहेत. पीटर ब्रूक्सच्या महाभारताच्या तालमींच्या वेळी अंग मुडपून झोपलेला युधिष्ठिरही आहे. यातही अलंकारिक आकृत्या, नक्षी आहेत. इतकी लोभस की उचलून कपडय़ांवर, स्टोलवर मिरवण्याचा मोह व्हावा. त्यांच्यातला वास्तुविशारदही यात दिसतो, पण आपले अस्तित्व तो वरचढ होऊ देत नाही.
स्केचेसमधले जग वास्तव आहे. पेंटिंग्जमधल्या अमूर्त जगाहून जवळचे, खरे. भूतकाळात हरवून जाण्याचा धोका असणारे अनेक क्षण, व्यक्ती, प्रसंग वेचून या स्केचेसमध्ये शाबूत ठेवले आहेत. हे पटवर्धनांचे जग. त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलेले. तरीही हे कोणाच्याही आयुष्यातले, रोजच्या जगण्यातले क्षण असू शकतातच.
lp06
पुढील संपूर्ण एक दिवस मी नचिकेत-जयू पटवर्धनांसोबत घालवला.
नचिकेत आपल्या शांत, विचारपूर्वक, स्पष्ट, काहीशा फटकळ वाटणाऱ्या शैलीत आपल्या पेंटिंग्ज आणि स्केचेसबद्दल, चित्रपटांबद्दल बोलतात. आर्ट आणि आर्किटेक्चरच्या समन्वयाबद्दल, कलेची मूल्ये, बदललेला दृष्टिकोन यावरही ते बोलतात. सविस्तर. त्यांचा बराचसा कला-प्रवास मला त्यातून जाणून घेता येणे शक्य होत जाते.
‘‘पेंटिंग सुरू होताना माझ्या मनात पहिला विचार फक्त रंगांचा असतो. रेषा आणि आकार मागोमाग आले तर येतात. काही वेळा ते सभोवतालातून येतात. पण अगदी निकटच्या परिसरातले असतीलच असेही नाही. अनेक अनुभवांचे, दृश्यांचे ते रिकॉल्स असतात. मग त्यात फॅब्रिक असेल, फिल्म्स् असतील, शिूटगदरम्यानची लोकेशन्स, सेट्स असतील. कधी कधी रंगवताना वापरलेल्या मटेरियलच्या तंत्रानुसारही चित्राची शैली बनत जाते, बदलत जाते. स्केचेस करताना मी आíकटेक्चरल पेन वापरतो तेव्हा काही वेळा डिझाइनशी नाते जोडणारे आकार स्केचेस आणि ड्रॉइंग्जमध्ये येत राहातात. पेंट आणि ब्रश वापरताना साहजिकच जास्त फ्ल्युईड फॉम्र्स उतरतात.
नेणिवेत अनेक प्रभाव असतात. त्यातले नेमके कोणते उतरतात रंगवताना सांगता येत नाही. जाणीवपूर्वक ते आणता येत नाहीत. कुठून येतात हेही सांगता येत नाही. फार विचार करून त्याचा शोध लावणे मला महत्त्वाचे वाटत नाही. मला वाटते पेंटिंग बघताना ते आवडले तर का आणि काय, हे प्रश्न बघणाऱ्याने स्वत:लाच विचारायला हवे. चित्रकाराच्या दृष्टिकोनाशी उत्तर ताडून बघण्याची काहीच गरज नाही.
ड्रॉइंग- पेंटिग मी अगदी लहानपणापासून करत आहे. माझी आई शांतिनिकेतनमध्ये राहून चित्रकला शिकली होती. ३९-४०चा तो काळ. तिथे तेव्हा टागोर होते, बिनोदबिहारी मुखर्जी, रामकिंकर बैज, नंदलाल बोस सगळेच होते. चित्रकलेची अशी पाश्र्वभूमी घरात असतानाही मी आर्किटेक्चरला गेलो. कारण नेहमीचंच. पीअर प्रेशर.
आर्किटेक्चर शिकायला मी बडोद्याला गेलो. तिथे आमचे पहिल्या वर्षांचे क्लासेस थोडय़ा उशिरा सुरू व्हायचे. म्हणून फाइन आर्टच्या वर्गात सकाळी जाऊन शिकायला मला आमचे डीन शंखो चौधरी होते, त्यांनी परवानगी दिली. तिथे मणी सर, के. जी. सुब्रमण्यन असे पेंटिंग टीचर्स होते. ते प्लास्टर कास्ट आणून ठेवायचे. आणि दोन तास फक्त तेच ड्रॉ करायला सांगत. पोझिशन बदलण्याची मुभा असे. मग दोन तास तुम्ही समोरून, बाजूने, वरून, खालून असं फक्त चितारत राहायचं. म्हैस असेल बांधली तर दोन तास फक्त तीच काढत राहायची. आठवडय़ाच्या अखेरीला स्केचबुकची सगळी पानं भरली गेली पाहिजेत. जराही कोरी जागा शिल्लक राहाता कामा नये. हे सोपं नाही. त्यामुळे मग विद्यार्थ्यांच्या हातात कुठेही, बसस्टॉपवर, कॅन्टीनमधे स्केचबुकच दिसे. त्यावेळी लागलेली सवय कायम राहिली. हे एक आवश्यक ड्रील आहे. प्रत्येक व्यवसायाला असं एक ड्रील असतं. त्याचा सराव रोजच्या रोज व्हायला हवा. पण आता ही शिस्त राहिलेली नाही.
आता चांगलं आणि वाईट यावर विचार फार कमी होतो. चांगलं आणि वाईट फक्त कलेच्या संदर्भातच नाही. संपूर्ण मानवजातीच्या हिताच्या दृष्टीने काय चांगलं, वाईट हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवलं गेलं पाहिजे. ही मूलभूत मूल्ये मग कलेत उतरतातच. पण आता हे मुलांना न सांगितले गेल्याने त्यांना जे विकलं जातं ते चांगलं, जे नाही ते वाईट असं प्रामाणिकपणे वाटायला लागलं आहे. त्यातून मग जे विकलं जातं असतं ते आपण आपल्या कलेमधे आणायलाच हवं ही भावना जन्म घेते. तसं करण्यात त्यांची खूप ऊर्जा नष्ट होते ज्यातून ते स्वत:चं काही निर्माण करू शकले असते.
बडोद्याला आम्हाला गुलाम शेख, भूपेन खक्कर शिकवायला- डेमो द्यायला यायचे. आर्किटेक्चर शिकताना आम्हाला सगळ्याच कलांचा अनुभव घ्यायला प्रोत्साहन दिलं जायचं. कुमार गंधर्व, मलिकार्जून, मन्सूरपासून अनेक गायक ऐकले. त्यावेळी स्टेज, मंडप तयार केला. फाइन आर्टचा कला मेळा असला की आम्ही मदतीला जायचो. माधव आचवल आमचे एचओडी होते. त्यांना कविता, ललित साहित्य सगळ्यात खूपच रस. त्यांनी आमचा सौंदर्यवादी दृष्टिकोन विकसित केला. वास्तुकला हे वर्गात बसून शिकण्यासारखे नाहीच असं ते म्हणत.
lp02
अनेकांना वाटतं की आर्किटेक्चरमध्ये उत्तम ड्रॉइंग असणं खूप महत्त्वाचं आहे. पण तसं अजिबात नाही. आर्किटेक्चरच्या संकल्पना पूर्ण करण्यापुरत्याच ड्रॉइंग स्किल्स त्याला पुरेशा असतात. उत्तम आर्किटेक्चरमधल्या डिझाइन स्किलचं महत्त्व कागदावर काढलेल्या सुंदर ड्रॉइंगपेक्षा कितीतरी जास्त असतं. म्हणूनच अनेकदा चांगले आर्किटेक्टस होपलेस ड्राफ्टस्मन असू शकतात. चांगलं ड्रॉइंग काढता येणं म्हणजे चांगला आर्किटेक्ट ही चुकीची समजूत आहे. त्यापेक्षा संगीत, अर्थशास्त्र, भूगोल यातलं प्रावीण्य, समजूत जितकी जास्त तितका तो उत्तम आर्किटेक्ट. दुर्दैवाने आर्ट आणि आर्किटेक्ट यामधे ही चुकीची जोडणी झाली आहे.
माझ्यातली ड्रॉइंग, पेंटिंगची कला आर्किटेक्ट होण्यासाठी मदतीची, गरजेची किंवा कॉम्प्लिमेन्टरी ठरली असंही मी अजिबात म्हणणार नाही. माझ्यातील आर्किटेक्टशी माझ्या ड्रॉइंग आणि पेंटिंग्जचा थेट संबंध नाही. माझ्यातले हे सर्व कलाप्रकार स्वतंत्रपणे विकसित झाले.
माझी पेंटिंग्ज आणि स्केचेसही पूर्ण स्वतंत्र कलाकृती आहेत. त्यांचा एकमेकांशी थेट संबंध काहीच नाही.
मी पेंटिंग्ज फक्त स्टुडिओत करतो आणि स्केचेस बाहेरच्या जगात. लोकेशनवर जाऊन लॅन्डस्केप्स वगैरे कधीच नाही केली. अबूला जाऊन आल्यावर तिथल्या लेकचं पेंटिंग केलं स्टुडिओत आल्यावर तेव्हा त्या लेकचं मनावर उमटलेलं रंगांचं इम्प्रेशनच फक्त कॅनव्हासवर उतरलं.
रंगांच्या बाबतीत सांगायचं तर जयूला जो उपजत कलर सेन्स आहे तो मला नाही. सेटवर रंग ठरवणं, फॅब्रिक, कॉस्च्यूमचे रंग निवडणं, विषयाच्या गरजेनुसार रंग निवडणं याबाबतीत मला तिच्यावर अवलंबून रहायला लागतं. मात्र माझ्या पेंटिंगच्या बाबतीत मी कलर छान, सहज वापरू शकतो, ठरवू शकतो.’
चित्रपटांमधली कारकीर्द सुरू झाली आम्ही फिल्म आर्काइव्हच्या परिसरात राहात होतो तिथेच.
गिरीश कर्नाड, मणी कौल आमच्या शेजारी राहायचे. अनेक देशी-परदेशी फिल्म्स आम्ही एकत्र बघितल्या. त्यावर बोललो. जेव्हा फिल्म्स दाखवायचे तेव्हा त्या फिल्मशी संबंधित कोणी तरी महत्त्वाचा माणूस मग तो टेक्निकल असेल किंवा लेखक, अभिनयाशी संबंधित, उपस्थित असे. कन्स्ट्रक्टिव चर्चा होत. फिल्ममधलं काही आवडलं, मग ते संगीत असेल, फोटोग्राफी असेल, अभिनय, कथा, संवाद, दिग्दर्शन, सेट असेल, तर ते का आणि आवडलं नाही तर का नाही या प्रश्नांची उत्तरं चर्चेच्या मार्गातून आम्ही शोधत गेलो. मग गिरिश फिल्म करायला लागला. मणी कौलने घाशिरामवर आधारित फिल्म केली, त्यावेळी फिल्ममेकिंगची सगळी प्रोसेस जवळून पाहिली. आम्ही त्यात सहभागीही झालो.
त्यावेळी लक्षात आलं ही प्रोसेस आर्किटेक्टला समांतरच आहे. स्वत:चं आर्किटेक्चरचं रेडिमेड फॉम्र्यूलेशन नसतं. कारण कुठलाही क्लायन्ट आणि त्याची जमीन वेगवेगळी असते. बजेट, गरजा, जमिनीचा शेप, रस्ता कुठे, पाऊस किती हे जाणून घेतल्यावरच तुम्हाला त्यावर रचना करता येते. तसंच सिनेमाच्या बाबतीत आहे. गोष्ट काय, ती फॅन्टसी आहे की वास्तववादी, आजची आहे की काही शतकांपूर्वीची याचा अभ्यास करून त्यानुसार काम करायचं. आम्हाला हे करणं जड गेलं नाही. उलट नैसर्गिकच वाटलं.
त्यानंतर आम्ही ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘खेळिया’ अशा नाटकांचे कॉस्च्यूम्स, सेट केले. जयू स्वत: कॉस्च्यूम्स शिवून द्यायची तेव्हा. आमच्याकडे वेळ होता. वय लहान होतं. उत्साह भरपूर होता आणि आर्किटेक्टची मोठी कामं मिळत नव्हती. वर्षांतून दोन-चारच कामं मिळायची. त्यामुळे मग ही कामं करता येणं शक्य होतं.
आम्हाला चित्रपटांची कामं करणं सोपं गेलं त्याचं महत्त्वाचं कारण आमच्या बडोद्याच्या कॉलेजात आम्हाला मिळालेलं अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर गोष्टींचं एक्स्पोजर. डिझाइन आस्पेक्टमधला आत्मविश्वस त्यातूनच आला. बेसूरपणा, असमतोल, विसंगती कळायची जाण पक्की झाली होती.
आम्ही एकूण बारातेरा फिल्म्स केल्या. काहींची निर्मिती, काहींचं कला-दिग्दर्शन, कॉस्च्यूम्स वगैरे.
आमच्या ‘२२ जून १८९७’ ला खूप पुरस्कार, मान-सन्मान मिळाले. महत्त्वाचं म्हणजे पहिलं आर्ट डिरेक्शन अ‍ॅवार्ड या चित्रपटापासून मिळायला सुरुवात झाली. त्या आधी या पुरस्कारांमधे ही कॅटेगरीच नव्हती. त्यामुळे आचरेकरांसारख्या गुणी सेट डिझायनरला कधी रेक्ग्निेशन मिळालं नाही.
लोकेशनवर आर्ट डिरेक्शनची गरज असू शकते हेही तोवर कुणाला जाणवले नव्हते. सेट उभारण्यापुरता आर्ट डिरेक्टर असं मानत. आजही अनेक जणांना पीरियड फिल्म्सना आर्ट डिरेक्टरची, कॉस्च्युम डिझायनरची गरज आहे असं वाटतं. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये विषयाचा सर्वागीण अभ्यास करून मग काम करावं अशी इच्छा बाळगणारे मुळातच अगदी कमी. त्यात एखादा तसा असलाच तर त्याला स्वतंत्रपणे, मनासारखं काम करायला मिळण्याची शक्यता कमी. ग्लॅमर हवं, चकचकीतपणा हवा असं सुचवणारे अनेक असतात टीममध्ये. त्यांचं ऐकलं जातं. मला वाटतं हिंदी सिनेमाच्या पडद्यावरून अभिजातता, काव्यमयता, सटलिटीची अपेक्षा आता ठेवता कामा नये. भडक, सवंग, स्वस्त मालाचा जमाना आहे हा.
lp01
‘उत्सव’ ही फिल्म आमच्याकडे आली गिरीश कर्नाडांमुळे. ते शशी कपूरला म्हणाले, ही फिल्म यांच्याशिवाय होऊच शकणार नाही. माझ्या मते, उत्सव वेगळा होऊ शकला, कारण शशी कपूरने आम्हाला प्रत्यक्ष शूटिंगच्या आधी तयारीकरता दिलेला वर्षभराचा वेळ. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. उत्सवचं शूटिंग वर्षभर एकूण पंधरा ठिकाणी झालं. भरतपूर, केरळ, कर्नाटकातले जुने वाडे.. अनेक ठिकाणी शूट झालं. पडद्यावरून पाहताना वातावरणातला जराही फरक कुठे जाणवू न देणं, त्यानुसार कंटिन्यूटी राखणं खूप आव्हानात्मक होतं. हा सिनेमा करताना मुंबईचे लोक आम्ही असोसिएशनचे मेंबर्स नव्हतो म्हणून खूप त्रास द्यायचे. कामाला माणसंच मिळू न देण्यापासून, सेटवरच्या कामावर रंग फासून ठेवणे असे अनेक प्रकार. शशी कपूर म्हणाले की, या त्रासामुळे हे लोक पळून जातील पुन्हा पुण्याला, अशी भीती वाटते. कर्नाड म्हणाले, असं अजिबात होणार नाही. त्यांची याबद्दल पैजच लागली होती. अर्थात ही गोष्ट आम्हाला शूटिंग संपल्यानंतर कर्नाडांनी सांगितली.
‘उत्सव’ करत असताना शशी कपूर खूप सढळ होता. त्याच्या पर्सनॅलिटीतही कपूर खानदानाचा शो ऑफचा भाग आहेच. ‘ही रिजनल फिल्म नाही तीन लाखांत बनणारी. पैसे खर्च कसे करायचे ते शिका’ असं मजेने म्हणायचा. त्याच्याकडे आणि मुख्य म्हणजे त्याच्या बायकोकडे अतिशय उपजत सिनेमा माध्यमाच्या चांगल्या-वाईटाची जाण होती.
कलेमध्ये तुमची दृष्टी बनवायला, कंडिशनिंगला खूप काळ जाऊ द्यावा लागतो. त्याची सुरुवात आमच्या बाबतीत फार लवकर झाली. फॅशन येते-जाते, अभिजातता टिकून राहते. आम्ही डिझाइनमधली अभिजातता महत्त्वाची मानतो. आपल्याकडे असं कंडिशनिंग होऊ द्यायलाच अनेकांच्या मनात अंतर्विरोध असतो.
महाराष्ट्रात पैठणीचा अपवाद सोडता आर्टफॉर्मचा ओरिजिनल उगम नाही. आदिवासी कला आहे, पण ती आपण आता व्यावसायिकतेच्या अतिरेकात मारून टाकली आहे. डेक्कन प्लॅटू हार्ड, रूक्ष आहे. ही जमीन इतर प्रांतांसारखी भरघोस उत्पन्न देणारी, सुपीक नाही. मुख्य प्रश्न पोट भरण्याचा असल्याने कला वगैरे दुय्यम. राजाश्रयाने कला फुलते. त्याचीही इथे वानवा. वेरुळ, अजिंठा राजाच्या धनाश्रयातून खोदली गेली. नंतर असा राजा झाला नाही. कोल्हापूर हाच अपवाद फक्त. बाहेरच्या लोकांनी इथे येऊन कला निर्माण केली, तीही आपण जपली नाही. पुण्यात संगीत, नाटक फुलले. पण चित्रकला नाही.
आर्ट इज फॉर्म ऑफ सेलेब्रेशन. जगण्याच्या उत्सवातून ते येतं. तो उत्सव आपण नाकारला आहे. सवंग, भडक स्वरूपात आता तो आपल्यात रुजत आहे ते जास्त धोकादायक. मुळात जगण्याला प्रेरणा देणारा, भरभरून जीवन जगण्यातला उत्सवच आपण नाकारला तर कलेपर्यंत पोचणारच कसे?
कलेचा रियाझ हा बघणे आहे हे कळत नाही लोकांना. कला कशी ‘बघावी’ याचं प्रशिक्षण अगदी लहान वयापासून द्यायला हवं. अमूर्त चित्रकलेतही लोक आकार शोधायला जातात. आपली शक्ती त्यात वाया घालवतात. नुसते रंग, आकार बघताना वेळ फुकट गेल्यासारखे वाटते त्यांना. सतत पाहायला हवं, बाहेरच्या प्रांतांमध्ये, देशांमध्ये जाऊन तिथेही बघायला हवं. बऱ्याचशा प्रेरणा प्रवासातून मिळतात. वेगळी माणसं, घरं, जगणं त्यातून कळत जातं. तुमची ओरिजिनॅलिटी मग त्यातून विकसित होते. आपल्याकडचे प्रयत्न नक्कल या स्वरूपातच राहतात. स्वत:चं काही फार निर्माण करूशकत नाहीत, शकले नाहीत. हा प्रॉब्लेम शाळेपासून आहे आणि सर्व स्तरांत आहे. ते फार दु:खदायक आहे.
काही लोकांना इंटरेस्ट असतो. तो वाढवायला हवा. त्याकरता चांगलं काय वाईट काय यावर खुल्या चर्चा व्हायला हव्यात. सातत्याने त्यावर बोलायला, लिहायला हवं. मॉडर्न आर्ट, कलेतले नवे प्रवाह यावर खूप प्रश्न पडले पाहिजेत. आर्टिस्टला जाऊन ते विचारायला हवे.
मॉडर्न आर्टच्या नावाखाली आता काहीही आणलं जातं. त्यामागे विचार असतोच असं नाही. विचार नंतर लादला जातो अनेकदा. अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडची कला परंपरा खरंतर प्रचंड समृद्ध आहे. पण त्याकडे न वळता नवी पिढी जे त्यांचं नाही त्यामागे आंधळेपणाने जाते आहे असं अनेकदा जाणवतं. उदा. इन्स्टॉलेशन हा फॉर्म. आपण तो आपल्या संस्कृतीच्या संदर्भातून वापरला तर किती तरी उंचीवर नेऊ शकू. कारण इन्स्टॉलेशन हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. आपण एका विशिष्ट विचारातून मांडतो, रचतो, उभारतो, बांधतो. ही सगळी इन्स्टॉलेशन्सचीच मूलभूत तत्त्वे आहेत.
पाश्चात्त्य जगात रंग, आकारांच्या बाबतीत नैसर्गिकरीत्याच एकसुरीपणा खूप आहे. तुम्हाला जाणीवपूर्वक रंगाचा, वेगळ्या आकाराचा वापर करून तो एकसुरीपणा भेदायचा प्रयत्न करायचा असतो. आपल्याकडे उलट आहे. इतकी विविधता आहे की त्यात एकजिनसीपणा आणायची गरज कलावंताला जाणवायला हवी. पण असे मूलभूत, सूक्ष्म भेद कलानिर्मितीत फार कमी लक्षात घेतले जातात.
२००९ साली मी आर्किटेक्चरचं ऑफिस बंद केलं. त्यानंतर जास्त वेळ पेंटिंगला देता आला. मुलगा अबिर स्कल्प्टर आहे. खडकवासला लेकजवळ त्याचा स्टुडिओ आहे. तिथे मी तीन-चार तास आठवडय़ातून जातो. सगळी मोठय़ा साइझची पेंटिंग्ज मी तिकडे करतो. मोठी जागा आहे. तीन-चार जण काम करू शकतील अशी. तिकडे काही डिस्ट्रॅक्शन्स नाहीत. टीव्ही, इंटरनेट काही नाही. कधी दोन दोन महिने हातही लागत नाही कॅनव्हासला. स्केचिंग मात्र सातत्याने सुरू असतात. जेवताना, बाहेर गेल्यावर, प्रवासात, काही बघताना.
सध्या कर्नाटकात ऐहोलेला आम्ही एक प्रोजेक्ट करत आहोत. एक जुनी हवेली आहे. पाचशे वर्षांपूर्वीची. त्याच्या रिस्टोरेशनचे ते काम आहे. असं स्पेशल काही काम असेल तरंच आता मी ते करतो. त्यात आनंद वाटायला हवा इतकंच.
०००
lp05
नचिकेत-जयू पटवर्धनांच्या कलात्मक आणि मोकळ्या, आलेल्याला सहज सामावून घेणाऱ्या घरात आनंदी, सकारात्मक, प्रगल्भ ऊर्जा भरून असते. त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचंच एक्स्टेन्शन असलेलं हे घर मुलाखत संपत असताना मला अधिकच आवडायला लागतं.
कलाकृतींमधून कलाकाराचे व्यक्तिमत्त्व सादर होते असे म्हणणे धाडसाचे असते. फार तर त्याची जीवनविषयक दृष्टी आपल्याला त्यातून निरखता येऊ शकते. विशेषत: नचिकेत पटवर्धनांसारखे कलाकार, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक नाही अनेक कलांची दालनं वास करून असतात.
नचिकेत-जयू पटवर्धनांच्या मतांना त्यांच्या चार दशकांहून अधिक व्यावसायिक-कलात्मक कारकिर्दीतल्या अनुभवांचं अस्तर असतं. तरीही ती मांडताना ते कुठेही आग्रही बनत नाहीत. मात्र कलेच्या बदलत्या, ढासळत्या मूल्यांबद्दलची खिन्नता, सिस्टीमच्या अनागोंदी, अप्रामाणिक कार्यपद्धतीबद्दलची नाराजी, कलेला जाणून घेताना दाखवली गेलेली अनास्था या सगळ्याबद्दल एक विफल राग मनातल्या एका कोपऱ्यात घेऊन ते वावरत आहेत कदाचित.
नचिकेत पटवर्धनांची पेंटिंग्ज, त्यातले रंग, आकार, स्केचेसमधलं जग, प्रसंग हे सौंदर्यवादी, सुखद, आल्हाददायी नाही. अशा अनुभवाच्या खूप पलीकडे ते जाते. अमूर्ततेत सामावलेले, विरघळलेले आकार, रचना, आकृत्यांची मुळं का आणि कशी शोधायची असतात? बघणाऱ्याच्या संवेदनशीलतेची, सहवेदनेची पातळी एक झाली तर ते आपोआप त्याच्यातही रुजतात, एखाद्या अंकुराशी त्याचे नाते जुळते. संवेदनशीलतेनं परिसराशी, वातावरणाशी जोडल्या गेलेल्या मनातले हे पडसाद. मिळवलेलं, गमावलेलं, तुटलेलं, जोडलं गेलेलं, जवळ आलेलं, दुरावलेलं, परतण्याची आस जागवणारं हे विश्व आहे. त्यात निरोप आहे, स्वागतही आहे. अजून विस्तारायला हवं असं वाटणारा आशय आहे, आणि स्वत:तच संकोचलेला अवकाश आहे. अस्वस्थतेचे, आव्हानांचे फटकारे, बोचरेपण, जवळ येऊनही हातून सुटत गेलेल्या मौल्यवान क्षणांना गमावण्यातली विफलता आहे.
प्रत्येकालाच आपल्या प्रवासात हे सगळं अनुभवायला लागलेलं असतं कदाचित.
शर्मिला फडके

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी