अनिश पाटील – response.lokprabha@expressindia.com
सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थाच्या सेवनाप्रकरणी अटक झाल्यानंतर आता अनेक पालकांना त्यांच्या मुलांची काळजी वाटणे तसे स्वाभाविक आहे. नशेची ही झिंग आणि तस्करी फार पूर्वीची आहे. ‘मुंबईचे वर्णन’ या १८६३ सालच्या गोविंद नारायण माडगांवकर यांच्या पुस्तकात त्याचे उल्लेख येतात. ते सांगतात, ‘अट्टल तर्कटी लोकांची जूट पुष्कळ वर्षांपासून मुंबईत होती, हींस बंदरग्यांग असें म्हणत. हे सर्व मिळून सुमारे तीनशें लोंकांची टोळी होती. हींत कित्येक लाखो रुपयांचे धनीं होते.’ हे लोक काय करीत, तर ‘बाहेर गावांतून तंबाखू व दुसरा माल आणून बंदरांत उतरीत. आणि तो जकात भरल्यावांचून शहरांत आणून वखारींत भरून टाकीत. हें कृत्य साधायास त्यांनी कनिष्टेबल, हवालदार व पोलीसचे व कष्टम खात्यांतील कित्येक शिपायांस दरमहा ठरावून आपल्या हाताखाल करून ठेंविले होतें!’ हे तस्कर तेव्हाचे. तंबाखू तस्करीची जागा नंतर चरस, गांजाने घेतली. कोकेनच्या पैशांवर एकेकाळी अधोविश्व पोसले जात होते. रस्ते, पाणी आणि हवाई मार्ग.. तस्करांनी काहीच सोडले नाही. दाऊद टोळीने तर इक्बाल मिर्चीच्या मदतीने ड्रग्जच्या व्यापारातून रग्गड माया कमवली व त्याच्या बळावर अधोविश्वावर सत्ता गाजवली. कोकेन, हेरॉईनसारख्या ड्रग्जसोबत पुढे बाजारात सिन्थेटिक ड्रग्ज आले आणि रासायनिक कारखान्यांच्या माध्यमातून केटामाईन, एम्फेटामाईन, एफ्रिडीनसारख्या ड्रग्सची निर्मिती देशातच होऊ लागली. सध्या निर्मनुष्य तस्करीवर भर वाढला आहे. त्यातून डार्क नेट, आंतरराष्ट्रीय पोस्ट, कुरिअर सेवा, जहाजांवरील कंटेनरच्या माध्यमातून तस्करीवर भर दिला जात आहे. करोनाकाळात या निर्मनुष्य तस्करीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे तरुणांना सहजासहजी अमली पदार्थ मिळत आहेत. शिवाय बाजारात नशेची अनेक नवनवीन साधनेही उपलब्ध होत आहेत. एकुणात.. ड्रग्जचा विळखा वाढत चालला आहे!

चांगल्या-वाईट गोष्टींची पारख नसलेल्या आणि अनेकविध गोष्टी उत्सुकतेतून अनुभवण्याची परिसीमा असलेल्या वयात मित्रमंडळींच्या गराडय़ातून ड्रग्जच्या आहारी जाऊन अनेक तरुण-तरुणी जीवन उद्ध्वस्त करून घेतात. ही पावडर खाल्ली की अभ्यासात लक्ष लागते, झोप येत नाही, वजन वाढत नाही, त्वचा उत्तम राहते, अशा विविध भाकड कथांना बळी पडून अनेक तरुण ड्रग्जच्या आहारी जात आहेत. मित्रमंडळींच्या गराडय़ात नशा करणे हे ‘कूल’ असण्याचे लक्षण आहे, या गैरसमजालाही तरुणाई बळी पडल्याचे पोलिसांना तपासादरम्यान लक्षात आले आहे.

 एका बडय़ा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या महिलेला तिच्या मुलाच्या बदलत्या वागणुकीवर संशय आला. त्या वेळी तिने त्याचे पाकीट तपासले असता त्यात ड्रग्सच्या गोळ्या सापडल्या. विशेष म्हणजे याबाबतची विचारणा केली असता मुलाने उद्धटपणे तुला माझे पाकीट तपासण्याचा कोणताही अधिकार नाही असे सांगितले. आता पाणी डोक्यावरून गेले असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत मागितली. पोलिसांनी समुपदेशन केले. हा झाला प्रातिनिधिक अनुभव. मात्र हल्ली अनेक पालकांना अशाप्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागते आहे.

अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत ‘फिल हाय’ किंवा ‘ट्रान्स’मध्ये नेण्यासाठी कोकेन, केटामाईन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते. शहरातल्या बहुतांश पंचतारांकित हॉंटेल्समध्ये अमली पदार्थाचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठमोठय़ा ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अमली पदार्थ पार्टीत आणतात. त्यामुळे शहरातील पंचतारांकित हॉंटेल्स आणि इव्हेंट मॅनेजमेट आणि कुरिअर कंपन्या अमली पदार्थ विरोधी यंत्रणांच्या रडारवर आहेत. 

अमली पदार्थ विक्रेते ड्रग्सचे खोटे फायदे सांगतात, त्यामुळे अनेक जण या व्यसनाला बळी पडतात. मेफ्रेडॉनमुळे (एमडी) झिरो फिगर मिळते व ऊर्जा मिळते, असा अपप्रचार आहे, त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासन्तास नाचण्यासाठी बारबाला मोठय़ा प्रमाणात एमडीचा वापर करतात, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. रजनीगंधासारख्या पानमसाल्यात मिसळवून बारबालांकडून एमडीचे सेवन केले जाते.

सध्या मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय महाविद्यालयातील तरुण पिढीलाही जाळ्यात ओढण्यासाठी एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, एमडीमुळे त्वचा सतेज राहाते, असे गैरसमज मोठय़ा प्रमाणावर  पसरवले गेले आहेत. या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. त्यातील सुंदर मुलींना हेरून विक्रेते त्यांना मोफत एमडी पुरवतात. चार-पाचदा त्याचे सेवन केल्यानंतर त्यांना त्याचे व्यसन सहज लागते. त्यानंतर विक्रेते त्यांचा वापर ड्रग्जविक्रीच्या नेटवर्कमध्ये करतात. अशा विद्यार्थाच्या मदतीने इतर विद्यार्थ्यांनाही या नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. पश्चिम उपनगरातील अशाच एका उच्चभ्रू घरातील मुलगी या तस्करांच्या नादी लागली होती. त्यासाठी तिने घरातूनही पलायनही केले. मात्र केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) तिचे समुपदेशन केले.

शाळेतील मुलांना हेरण्यासाठी कँडी व चॉकलेट्समध्येही अमली पदार्थ भरून त्याला याचे व्यसन लावण्यात येते. काही ठिकाणी पानटपऱ्यांवरही अमली पदार्थ उपलब्ध होतात. भोला, कच्चा, पक्का, किमान सादा अशा  सांकेतिक भाषेत बोलले की, पानात टाकून नशेचे पदार्थ उपलब्ध होतात, अशी धक्कादायक माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.

अमली पदार्थ किंवा ड्रग्ज हे हळूवार काम करणारे विष आहे, सुरुवातीला शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटतेही, मात्र त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. एखाद्याचा त्यानंतर अगदी तडफडून मृत्यूही होतो. तसेच अधिक सेवन करणाऱ्याचे सेवन अचानक बंद झाले की, सुरुवातीला त्याचे हातपाय थरथरणं, डोकं दुखणं, संभ्रम, जीव कासावीस होणे आदी त्रास व्हायला सुरुवात होते. काहींना फिट्सही येतात, तर काहींचा मृत्यूही होतो. एमडी या अमली पदार्थाचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीचा तर दोन ते तीन वर्षांत मृत्यू होतो. तरुण पिढी सर्वाधिक एमडीचे सेवन करत आहे.

पाहणीनुसार मश्रूमच्या सुमारे दोन हजारांपैकी १४४ प्रजातींमध्ये नशा देणारा घटक असतो. त्यामुळे अमेरिका व अलीकडे पूर्व आशियात त्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या देशांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत मॅजिक मश्रूमवर बंदी आणली आहे. भारतात या मश्रूमवर बंदी नाही, पण त्यातील नशा करणाऱ्या पदार्थावर बंदी आहे.

तरुणाईला स्पाईसचे वेड

 युरोपात अनेक तरुण-तरुणींना आपल्या विळख्यात ओढल्यानंतर स्पाईस नावाच्या नव्या अमली पदार्थाने राज्यात प्रवेश केला आहे. कृत्रिम गांजा असलेल्या अमली पदार्थाचे अंश वैद्यकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे तरुणाई मोठय़ा प्रमाणावर तिच्या आहारी गेल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिसांकडे सध्या याबाबत एकही गुन्हा दाखल नसला, तरी या ड्रग्सचे सेवन करणारे तरुण-तरुणी वैद्यकीय उपचारांसाठी संबंधित तज्ज्ञांकडे येत आहेत, त्यावरून ही बाब पुरती स्पष्ट होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्पाईस, के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी या नावाने प्रचलित असलेले हे अमली पदार्थ ब्रिटनमध्ये प्रचलित झाले होते. त्यानंतर मुंबईतही अनेक तरुण-तरुणी या कृत्रिम गांजाला बळी पडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी याच्या आहारी गेली होती. तिच्या आईला संशय आल्यानंतर आईने विचारणा केली. त्या वेळी तिने आपण अमली पदार्थाचे सेवन करत नसून कोणत्याही चाचणीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. तिच्या आईने भायखळ्यातील मसिना रुग्णालयात नेले. तेथील मानसोपचार विभागातील डॉक्टरांना तिच्यामध्ये अमली पदार्थ सेवनाची सर्व लक्षणे दिसली, मात्र तिची वैद्यकीय चाचणी ‘निगेटिव्ह’ आली. त्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. पुढे अनेकवेळा त्या मुलीची चाचणी केल्यानंतरही ती निगेटिव्ह आली. मात्र तिच्या रक्तचाचणीत अमली पदार्थाचे अंश सापडले.  मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिने ‘स्पाईस’ या कृत्रिम गांजाचे सेवन केले होते. त्या घटनेच्यावेळी पहिल्यांदा हा नवा प्रकार सार्वजनिक स्वरूपात उघडकीस आला. त्यानंतर मसिना रुग्णालयात आणखी एका तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी नशा सोडवण्यासाठी दाखल केले.

स्पाईस हा गांजासारखा मात्र अधिक नशा देणारा अमली पदार्थ आहे. त्याचे दुष्परिणाम अधिक भयानक आहेत. अतिसेवन झाल्यास माणूस एखाद्या झोंबीप्रमाणे निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो. त्यामुळे हा पदार्थ ‘ड्रग्ज झोंबी’ म्हणून कुप्रसिद्ध आहे. याचे अतिसेवन करणाऱ्या व्यक्तीस वेडही लागू शकते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियांका महाजन यांनी सांगितले. चाचणीत याचा कोणताही अंश सापडत नसल्यामुळे गांजा सेवन करणारे अनेक जण हल्ली याच सेवनाच्या मार्गाने जाणे पसंत करतात, असे लक्षात आले आहे.

हे व्यसन पदपथावर राहणाऱ्या अल्पवयीन मुलांपासून उच्चभ्रूंपर्यंत कोणालाही जडू शकते, जडवले जाऊ शकते. त्यामागे प्रचंड आणि विक्राळ अर्थकारण आहे. अन्य कोणत्याही व्यसनापेक्षा यातून सुटका करून घेणे जास्त कठीण आहे. मुलांना याविषयी जागरुक करणे आणि त्यांच्या सवयी, वर्तन आणि स्वभावातल्या लहान-मोठय़ा बदलांकडे गांभीर्याने लक्ष ठेवून वेळीच मदत मिळवून देण्याचे आव्हान पालकांना पेलावे लागणार आहे.

तुमच्या मुलाकडे मश्रूम तर नाही ना?

तपास यंत्रणांपासून लपण्यासाठी ड्रग्ज तस्करही नवनवीन अमली पदार्थ बाजारात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी रासायनिक अमली पदार्थासह अगदी परदेशातील पारंपरिक ड्रग्सही भारतात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यात ‘मॅजिक मश्रूम’चाही समावेश आहे. दक्षिण अमेरिका, मेक्सिको व इंडोनेशियात प्रचलित असलेल्या या प्रतिबंधित मश्रूमसह कोलकात्याहून एका डिस्क जॉकीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून २.४९ ग्रॅम मॅजिक मश्रूम, २० एलएसडी ब्लॉट्स, ९ गोळ्या (एमडीएमच्या) व १३.५ ग्रॅम इक्स्टसीसारखा पदार्थ हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत विवेक शर्मा, रिशम शर्मा व डिक्स जॉकी दीप चक्रवर्ती यांना अटक झाली होती. नियमित मश्रूम व मॅजिक मश्रूममध्ये तपास फारसा फरक कळत नाही. फक्त चवीमध्ये ते थोडे कडू असते. त्यामुळे इतर खाद्यपदार्थ अथवा चॉकलेट सिरप वरच्या बाजूस घालून त्याचे सेवन केले जाते. त्याची नशा आठ तास राहाते. रासायनिक ड्रग्स एमडी व एलएसडीपेक्षाही ही नशा अधिक काळ टिकणारी असते. प्रस्तुत प्रकरणातील आरोपींनी पोलिसांना दिलेली माहिती या तस्करी प्रकरणावर नवा प्रकाश टाकणारी होती. त्यानुसार नवे नेटचलन असलेल्या बिटकॉईनच्या माध्यमातून डार्कनेटवरून आता अमली पदार्थ तस्करी केली जाते.

वागण्याताील बदल कसे ओळखाल

पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्याताील बदल लक्षात घेतले तर वेळीच पाल्याची ड्रग्सच्या विळख्यातून सुटका करता येऊ शकते.

  • शारीरिक बदल : ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी वागू लागतात. स्वत:च्या दिसण्याकडेही त्यांचे लक्ष नसते. कपडय़ावरही लक्ष देत नाहीत. अनेकवेळा दाढी करत नाहीत, आंघोळही करणे टाळतात.
  • एकांत : सर्वासोबत राहणारी मुले ड्रग्जच्या व्यसनामुळे एकांतात राहणे पसंत करतात. कुटुंबीय किंवा इतर नातेवाईकांपासून दूर राहतात. टीव्ही पाहणे बंद होते, उत्सव साजरे करण्यापासून दूर राहतात. जुने मित्र सोडून ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात.
  • सक्रियता कमी होते : त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात उत्तम असलेली मुलेही खेळांपासून दूर राहतात. त्यांचा स्टॅमिना कमी होतो, लवकर दम लागतो.
  • राग : तात्काळ राग येतो. पालकांच्या अंगावर ओरडणे, खेकसणे असे बदलही मुलांमध्ये पाहायला मिळतात.

मुंबईतून २०० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबई पोलीस व केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक यांनी मिळून गेल्या वर्षभरात २०० कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. एनसीबीने वर्षभरात ११४ गुन्ह्य़ांमध्ये ३०० तस्करांना अटक केली होती. या कारवाईत सुमारे १५० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या वर्षी तीन हजार ८१३  किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहे. त्याची किंमत ८६ कोटी ५० लाख रुपये आहे. दोन्ही यंत्रणांचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. यात अमली पदार्थ विरोधी पथकाने या वर्षी ८८ गुन्हे दाखल करून १२९ आरोपींना अटक केली. त्यांनी दोन हजार ५६९ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याची किंमत ६० कोटी १६ लाखांची तर, मुंबईतील पोलीस ठाण्याच्या स्तरावर तीन हजार २४५ गुन्हे दाखल करून तीन हजार ४४६ आरोपींना अटक केली आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर २६ कोटी ३४ लाख किमतीचे एक हजार २४३ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहे. एवढय़ा कारवाईनंतरही तरुणांना अमली पदार्थ मिळत आहेत. त्यावरून मुंबईत किती अमली पदार्थ छुप्या मार्गाने आणले जातात, याचा अंदाज येऊ शकतो.