महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या कारणांचा वेध घेणारी प्रयोगशाळा लवकरच आकाराला येणार असून, त्यातून फक्त महाराष्ट्र आणि भारतालाच नाही, तर जगातील भूवैैज्ञानिकांना भूकंपाबाबत मोलाचे ज्ञान मिळू शकणार आहे.

मान्सून, दुष्काळ, चक्रीवादळ आदी नैसर्गिक घटनांचे पूर्वानुमान वर्तवणे आता आपल्या आवाक्यात असले, तरी भूकंपाचा अंदाज वर्तवणे अद्यापही विज्ञानाला शक्य झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, भूकंपाचा उगम असणाऱ्या जमिनीखालील घडामोडींबद्दल अद्यापही आपल्याला नेमकी माहिती नाही. भूकवचाच्या हालचालींमधून निर्माण होणारा ताण आणि त्यातून मुक्त होणाऱ्या ऊर्जेतून निर्माण होणारी कंपने असे भूकंपाचे ढोबळमानाने कारण दिले जाते. भूकवचावरील ताण हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांनी निर्माण होऊ  शकतो हे सैद्धांतिकरित्या सिद्ध झाले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक, तसेच एकमेकांच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने भूखंडांच्या सरकण्यातून ताण निर्माण होऊन त्यातून बहुतांश वेळेला भूकंप होत असतो. काही प्रसंगी मोठय़ा धरणांच्या जलसाठय़ाचा त्याच्या आसपासच्या प्रदेशावर ताण निर्माण होऊन त्यातूनही भूकंपाचे धक्के बसू शकतात असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.              
भूकंपाची कारणे विज्ञानाला ज्ञात असली तरी, भूकंपांच्या स्वरूपामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय याचे स्पष्ट आकलन भूशास्त्रज्ञांना अद्याप झालेले नाही. पृथ्वीच्या कवचाखाली घडणाऱ्या घडामोडींचे निरीक्षण करणे ही तशी सोपी गोष्ट नाही. सर्वप्रथम भूकंपाच्या उगमस्थानापर्यंत पोहचणे आणि नंतर तेथील अति तापमान आणि दाबाच्या स्थितीत उपकरणांनी योग्यप्रकारे नोंदी घेणे आवश्यक असते. अमेरिका, तैवान, जपानमध्ये जमिनीखाली खोलवर वैज्ञानिक उपकरणे पाठवून तेथील नैसर्गिक स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातून भूकवचाखाली तप्तावस्थेत असणारा लाव्हा, जमिनीखालील त्याचा प्रवाहीपणा, भूकवचावर त्याचा असणारा दाब यांबाबत आता शास्त्रज्ञांना मोलाची माहितीही मिळू लागली आहे.
lp14भूकंपाच्या उगमाचा वेध घेण्यासाठी खोल बोअर खणून त्यातून वैज्ञानिक उपकरणे पाठवण्याचे तंत्र भूशास्त्रज्ञ वापरतात. कॅलिफोर्निया येथे जगातील सर्वात खोल बोअर खणून त्याद्वारे भूकंपाच्या नेमक्या कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, ही सुविधा निर्माण झाल्यापासून त्या भागात मोठा भूकंप न झाल्यामुळे त्यातून अद्याप अपेक्षित वैज्ञानिक माहिती हाती आलेली नाही. मात्र, भूकंपाबाबतची ही अस्पष्टता आता भारत दूर करेल असा विश्वास भारतीय भूशास्त्रज्ञांना वाटत आहे. महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या कारणांचा वेध घेणारी प्रयोगशाळा लवकरच आकाराला येणार असून, त्यातून फक्त भूवैैज्ञानिकांना भूकंपाबाबत मोलाचे ज्ञान मिळू शकणार आहे.
जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडी आणि भूकंपाचे विज्ञान उलगडण्यासाठी कोयना-वारणा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भूकंप संशोधन केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यंदाच्या मान्सूननंतर कोयना परिसरात साडेचार किलोमीटर खोलीचे बोअर घेण्यास सुरुवात होणार आहे. कोयना धरणाच्या परिसरात सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्य़ांमागे जलाशय कारणीभूत आहे की, भूअंतर्गत घडामोडी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘डीप बोअरहोल इन्व्हेस्टिगेशन’ हा प्रकल्प भूविज्ञान मंत्रालयाच्या पुढाकाराने २०१२ मध्ये कार्यान्वित झाला होता. मात्र, जमिनीखाली भूकंप केंद्राजवळ घडणाऱ्या घडामोडींचीही शास्त्रीय माहिती या प्रकल्पातून मिळणार असल्यामुळे भूकंपाचे विज्ञानही या प्रकल्पातून उलगडण्यास मदत होईल, असा विश्वास भूविज्ञान मंत्रालय व्यक्त करीत आहे. या संशोधन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, बोअर घेण्याच्या जागा, प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा, जमिनीखाली सोडण्यात येणारी उपकरणे या सर्वाची निश्चिती झाली असून, येत्या ऑक्टोबरमध्ये साडेचार किलोमीटर खोली असलेल्या बोअरच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. पुढील टप्प्यात ही खोली सात किलोमीटपर्यंत नेण्याचा प्रयत्न असून, त्यातून प्रत्यक्ष भूकंपकेंद्राजवळ पोहचणे शक्य होणार आहे. भूकंपाच्या आधी आणि नंतर भूकंपाच्या केंद्रापासून जमिनीपर्यंत कशा घटना घडतात याची नेमकी स्थिती प्रथमच या अभ्यासातून समोर येणार आहे. दख्खनच्या भूरचनेत होणाऱ्या भूकंपांची कारणमीमांसा करणेही या संशोधनातून शक्य होऊ शकणार आहे. या सर्व अभ्यासातून भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडींची श्रृंखला आपल्या समोर आल्यामुळे भविष्यात भूकंपाचे पूर्वानुमान वर्तवणे काही अंशी शक्य होऊ शकेल, असा विश्वास भारतीय भूशास्त्रज्ञांना वाटतो.     
‘डीप बोअरहोल इन्व्हेस्टिगेशन’ या प्रकल्पात नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी, नॅशनल जिओ फिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थांचा सहभाग असून, इंटरनॅशनल कॉन्टिनेन्टल सायंटिफिक ड्रिलिंग प्रोग्रामचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने चारशे कोटी रुपये मंजूर केले असून, प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवातही झाली आहे. पुढील १५ ते २० वर्षांमध्ये या प्रकल्पातून कोयना परिसरातील भूकंपाचे नेमके मॉडेल हाती येण्याची अपेक्षा आहे. कोयना-वारणा क्षेत्रातील वीस बाय तीस किलोमीटर क्षेत्रात भूकंपांच्या नोंदी घेण्यासाठी निरीक्षण केंद्रं उभारली जात असून, त्यातून भूकंपाचे उगमस्थान शोधले जाणार आहे. पुढील टप्प्यात जमिनीखाली सात किलोमीटर खोलीवर बोअर घेण्यात येणार असून, त्यातून भूकंपाचे चित्र अधिक स्पष्ट होऊ  शकेल. बोअरहोलमध्ये पाठवण्यात येणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने भूकवचावरील ताण, खोल जमिनीखाली असणाऱ्या मिश्रद्रवांचा दाब, उष्णतेचे वहन आणि त्यातील बदल, लाव्हाचे रासायनिक गुणधर्म आदी घटकांच्या भूकंपाच्या आधी आणि नंतर नोंदी घेण्यात येतील. या शास्त्रीय नोंदींच्या आधारे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करून भूकंपाचे पूर्वानुमान वर्तवणे शक्य आहे का, याचीही चाचपणी करण्यात येईल.
भूकंपाचे अंदाज वर्तवण्याबाबत सध्या तथाकथित तज्ज्ञांकडून अनेक दावे केले जात आहेत. मात्र, या विषयाला वाहिलेल्या संस्थांना त्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य आढळत नाही. वैज्ञानिकदृष्टय़ा विचार केल्यास, भूकंपामागील नेमके विज्ञान माहीत असल्याशिवाय या क्लिष्ट घटनेचा अंदाज वर्तवणे शक्य नाही हे स्वाभाविक वाटते. भूकंपाची कारणमीमांसा करणाऱ्या या वैज्ञानिक प्रकल्पाचे समाजाकडून स्वागतच व्हायला हवे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Household expenditure of Indians doubled in a decade
भारतीयांचा घरगुती खर्च दशकभरात दुप्पट
ratangiri devlopment
रत्नागिरीच्या विकासासाठी शासकीय धोरणांसह सामूहिक प्रयत्नांची गरज; ‘व्हिजन रत्नागिरी २०५०’ परिसंवादातील मत

– वरुण शास्त्री