‘मुलींच्या स्कर्टच्या लांबीवर देशाचे शेअर मार्केट अवलंबून असते. म्हणजेच स्कर्टची लांबी जास्त असेल, तर देशाची अर्थव्यवस्था संकटात असते. लांबी आखुडलेली असेल तर मात्र अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस असतात.’ अशी एक थिअरी मांडली जाते..

हेडिंग वाचूनच गोंधळलेले तुमचे चेहरे पाहण्यासाठी ना मला महाभारतातल्या संजयच्या दूरदृष्टीची गरज आहे आणि ना कुठल्या आकाशवाणीची. कारण तुमच्या याच प्रश्नार्थक चेहऱ्याच्या उत्तरावर आजचा माझा लेख अवलंबून आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ तरी हे प्रश्नार्थक भाव तुमच्या चेहऱ्यावर कायम असू द्यात. कारण या लेखाच्या शेवटापर्यंत तुम्हाला आजवर पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत. फॅशन म्हटलं की शॉपिंग हे समीकरण ठरलेलं आहे. त्यामुळे फॅशन आणि अर्थकारणाचा केवळ एकच संबंध लागू, तो म्हणजे खर्चाचा. आपल्या घरापासून ते जगभरात अर्थकारणाची स्थिती काहीही असो, लोकांची खरेदीची हौस काही भागत नाही. ‘शॉपिंग करणाऱ्यांना शॉपिंग करण्याचे बहाणे हवे असतात.’ काहीच कारण नाही म्हणून शॉपिंग करणाऱ्यांची संख्याही कमी नाही बरं का.. आणि या गैरसमजुतीत बिलकूल राहू नका, की हे फक्त मुलींबाबतच आहे. स्टायलिश राहण्यात मुलांचा टक्का थोडा जास्तच आहे. त्यामुळे ‘आम्ही बुवा नाही त्यातले!!’ असा आव आणण्याची काहीच गरज नाही.
मार्चअखेरीस आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस आपल्याकडे टॅक्स, बजेट याच्या चर्चा रंगू लागतात. पण त्याचबरोबर घरातील यंग ब्रिगेडियर्सच्या परीक्षा संपून त्यांना पिकनिकचे वेध लागलेले असतात. पण हे फक्त ट्रिपपुरतं संकट नसतं. त्याच्यामागून शॉपिंगचं सत्रसुद्धा न विचारता मागे लागतं. काळ-वेळ काही असो, शॉपिंगच गुऱ्हाळ मागे असतंच. अशा वेळी आपल्या वडीलधाऱ्यांना कायम एक प्रश्न सतावत असतो, ‘हे तुमच्या फॅशनचं खूळ सतत आमच्या मानगुटीवर का बसलेलं असतं?’ ‘काळ, परिस्थिती काय, पैसा पडो किंवा चढो, खिसा भरलेला असो की रिकामा, ही फॅशनची बिऱ्हाडं कायम तेजीत चालतात. या चढ-उताराचा काही फरक पडतो की नाही? अगदी हे बदलते ट्रेंडसुद्धा या परिस्थितीवर अवलंबून नसतात का?’
जर असा सवाल एकदा जरी तुमच्या मनात आला असेल, तर त्याचं ‘नाही’ असं उत्तर देण्याआधी जरा थांबा. अर्थकारणाचा फॅशनवर खूप मोठा परिणाम होतो. अगदी ट्रेंड्स ठरवण्यात आसपासचं अर्थकारण मुख्य भूमिका बजावतं असं जर मी म्हटलं तर दचकू नका. हे कसं, याचं उत्तर आज आपण शोधू या.
इतिहासाची पानं चाळल्यास फॅशन आणि समाजजीवनावर पडलेला प्रभाव पदोपदी दिसून येतो. लोकांच्या राहणीमानानुसार त्यांच्या पेहरावात झालेला बदलांची हलकीशी झलक आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलेली आहे. पण अर्थकारणाचा आणि फॅशनचा काही संबंध लागू शकतो, याचा पहिल्यांदा विचार प्रो. जॉर्ज टेलर यांनी ‘द हेमलाइन इंडेक्स थिअरी’मधून १९२६ मध्ये मांडला होता. या थिअरीनुसार, ‘मुलींच्या स्कर्टच्या लांबीवर देशाचे शेअर मार्केट अवलंबून असते.’ म्हणजेच ‘जर स्कर्टची लांबी जास्त असेल, तर देशाची अर्थव्यवस्था संकटात असते. लांबी आखुडलेली असेल तर मात्र अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस असतात.’ अर्थात या थिअरीवर अनेकांचा आक्षेप आहे. पण इतिहासातील फॅशनची वाटचाल पडताळण्यासाठी ही थिअरी आधार मानली जाते.
याची पडताळणी करण्यासाठी आपण २०व्या शतकातील फॅ शनवर एक नजर मारू या. १९०० ची सुरुवात आलबेल झाली होती, पण १९१४ च्या दरम्यान पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि सर्व वातावरण गढूळ होऊ लागलं. उच्चवर्गीयांवर, त्यांच्या राहणीमानावर बंधनं येऊ लागली होती. त्यांच्या खर्चावर बंधनं आली, पर्यायाने फॅशनमध्ये हलचल होऊ लागली. पूर्वी लांबच लांब गाऊन्समध्ये वावरणाऱ्या युरोपियन तरुणी १९३० पर्यंत मिड काफ लेन्थ ड्रेसमध्ये वावरू लागल्या होता. याला त्यांचा बोल्डनेस जितका कारणीभूत होता, तितकाच यादरम्यान सौंदर्यप्रसाधनांचा वाढता वापरसुद्धा जबाबदार होता. १९३० पर्यंत लिपस्टिक ते व्ॉक्सिंगपर्यंत मेकअपच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या होत्या आणि त्या लोकांच्या अवाक्यातसुद्धा होत्या. त्यामुळे अर्थातच पेहरावावर या सर्वाचा प्रभाव पडू लागला होता.
१९३९-१९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान, तर अमेरिका आणि युरोपात कापड रेशनवर मिळू लागलं होतं. प्रत्येकाला गरजेइतकंच कापड सरकारकडून दिलं जाई. अशा वेळी पुन्हा पायघोळ ड्रेसेस आणि स्कर्ट ट्रेंडमध्ये येऊ लागले. हा चढउतार पुन्हा १९६० च्या दरम्यान दिसू लागला. ६० च्या शतकात मिनीज, मायक्रो मिनी ट्रेंडमध्ये होते. हे थोडंसं गोंधळात टाकणारं आहे ना? कारण पैसे कमी तर कपडा कमी, म्हणजे मंदीच्या वेळी तोकडे कपडे असायला हवे. पण हे तर उलट आहे. याचं सरळ-सोप्पं उत्तर तुमच्या जवळच्या पार्लरमध्ये आहे. म्हणजे बघा हां, जिन्स आणि टी-शर्ट घालायचं तुम्ही ठरवता तेव्हा कोणत्या ब्युटी ट्रीटमेंट्स कराव्या लागतात? आणि मिनी स्कर्ट घालताना कोणत्या, याचा जरा विचार करा. शॉर्ट कपडय़ांमध्ये ब्युटी ट्रीटमेंट्सवर अधिक पैसे खर्च करावे लागतात. आणि कपडे एकदा घेतले की प्रश्न सुटतो. पण व्ॉक्सिंग, फेशियल, ब्लिचिंग यांसारख्या ब्युटी ट्रीटमेंट्सवर वेळोवेळी पैसे खर्च करावे लागतात. आज तुलनेने हा खर्च आटोक्यात येणारा आहे; परंतु त्या काळी पार्लरवरचा खर्चसुद्धा लोकांसाठी अवाक्याबाहेरचा असे. त्यामुळे यावर उतारा म्हणजे जास्त लांबीचे कपडे घालणे. अर्थात त्या काळीसुद्धा काही धाडसी तरुणी होत्या, ज्या काही छुप्या पद्धतींचा अवलंब करून आपली तोकडे कपडे घालण्याची हौस भागवत असत. त्यातील एक म्हणजे लायनरची बारीक रेघ पायावर काढून स्टॉकिंगचा फिल देणं. पण या सर्वापेक्षा लांब बाह्यंचे, जास्त लेंथचे कपडे घालणं सोयीचं असं. १९४० च्या सुमारास, मुलींनी आपल्या युद्धावर गेलेल्या भावाचे, वडिलांचे किंवा नवऱ्याचे कपडे घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे साहजिकच, हे ओव्हरसाइज कपडे ट्रेंडमध्ये आले होते. मुलींचे गाऊन्स ते जिन्स हे परिवर्तन याचाच एक परिणाम.

१९६० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था स्थिरावली होती. लोकांना ना मंदीची फिकीर होती, ना नोकरी-धंद्याची. त्यांच्या हातात पैसा खेळू लागला होता. त्यांच्या वागण्यामधली बेफिकिरी, स्वच्छंदपणा आता त्यांच्या कपडय़ांमध्ये दिसू लागला होता. साहजिकच, कपडय़ांची लांबी कमी होऊ लागली होती. हा बदल रंगांबाबत सुद्धा दिसू लागला होता. १९२०-४० मधल्या नेव्ही, ग्रे, मरुन अशा डार्क किंवा बेबी पिंक, पिवळा, क्रीम या
पेस्टल शेड्स जाऊन लाल, नारंगी, निळा, जांभळा या भडक रंगांचं, प्रिंट्सचं आगमन झालं होतं. एलिगंट अ‍ॅक्सेसरीजची जागा हाय हिल्स, लाँग बूट्स, बोल्ड ज्वेलरीने घेतली.
आता हे झालं पाश्चात्त्य जगाचं. आपल्याकडे हे कु ठं होतं? असं तुमच्या मनात आलं असेल तर एक उदाहरण आहे. १९९० दरम्यान, आपल्याकडे आर्थिक मंदी होती. आणि याचाच परिणाम म्हणजे ‘हम आपके है कौन?’मधला माधुरीचा बॅकलेस, जांभळा ब्लाऊज आणि संपूर्ण चित्रपटातील तिचा वॉर्डरोब. इतकंच नाही, तर त्या काळातील एकूणच बॉलीवूड स्टाइलवर हाच प्रभाव होता. हीरोंसाठी ओव्हरसाइज शर्ट आले ते याचमुळे. हीरोंचे केससुद्धा त्या काळी मोठे, झुपकेदार, विस्कटलेले असत.
पण आता हा प्रभाव कमी होतोय. त्याला कारणंही वेगवेगळी आहेत. पार्लरचा खर्च आवाक्यात आलाय, लोकांना कपडय़ांमध्ये व्हरायटी हवी असते आणि आज-काल ब्युटी ट्रीटमेंट्स, मेकअप फक्त चैन न राहता गरज बनली आहे. त्यामुळे फॅशनमध्ये इतका मोठा फरक दिसत नाही. पण काही हलके बदल नक्कीच दिसून येतात. कित्येक डिझायनर्ससाठी मंदी एक चॅलेंज घेऊन येते. कमीत कमी खर्चात छान कलेक्शन बनवण्याचं. मग जरा तुमच्या वॉर्डरोबवर नजर मारून सांगा, तुमच्याकडे सध्या मंदी आहे की तेजी?