दहावी-बारावीमध्ये मिळणारे मार्क्स ही फूटपट्टी वापरून अनेक पालक आपल्या मुलांकडे बघत असतात. पण मुलं मात्र या वयात वेगळीच वागत असतात. अशा काळात त्यांना कसं समजून घ्यायचं?

किशोरवयातील वाटचाल मुलांसाठी रम्य, उत्साहवर्धक आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणारी होण्यासाठी मुलांच्या पालकांनी त्यांचं संगोपन करताना परस्परांतील संवाद मनमोकळा, प्रेमळ ठेवला पाहिजे. यासंदर्भात गेल्या काही लेखांत संवाद असा प्रवाही राखण्याबाबत थोडं शास्त्र समजून घेतल्यावर आपण तो संवाद का तुटतो याकडे आता पाहू या.

किशोरवयीन मुलांचं हे वेडं वय आणि दहावी, बारावीच्या परीक्षा एकदमच येतात. आठवी-नववीच्या इयत्तांत मुलं शिकत असतानाच पालकांना त्यांची दहावी डोळ्यांसमोर दिसू लागते. इथंच संगोपनाचं गणित चुकायला सुरुवात होते. या वयातलं औपचारिक शिक्षण आणि विकास म्हणजे दहावी, बारावीत भरघोस (म्हणजे ९०-९५ टक्क्यांच्या वर) मार्कस् मिळवणं अशीच आज पालकांची, शिक्षकांची कल्पना असते.

शास्त्र मात्र काही वेगळंच सांगतंय. मुलांना शिक्षण देणं, त्यांना एज्युकेट करणं याचा शब्दश: अर्थ आहे मुलांमधील विविध सुप्त क्षमता जाग्या करून त्या प्रकट करायला मुलांना अवसर देणं. या किशोर वयात मुलांना दहावी, बारावीतलं यश तर खुणावत असतंच, पण त्याचबरोबर समग्र जीवनातली नाना यशोशिखरं त्यांना दिसू लागलेली असतात. ती जणू त्यांना खुणावत असतात. कुणाला फोटोग्राफी करून पाहावीशी वाटते, कुणाला टीव्हीवरचा अँकरपर्सन व्हावंसं वाटायला लागतं. या स्वप्नाळू वयात कधी-कधी अनेक परस्परविरोधी क्षेत्रात रमण्याची, यशस्वी होण्याचीही स्वप्नं पाहण्यात मुलं रमलेली असतात. पालकांनी हे वास्तव समजून घेऊन आपली संगोपनशैली ठरवणं आवश्यक असतं. सुदैवानं आज तंत्रज्ञानानं माणसांतील अनेकानेक क्षमतांना व्यक्त करत यशस्वी होण्याची शेकडो दारं खुली केली आहेत. मग हे आजघडीचं वास्तव मुलांचे पालक आणि शिक्षक दोघंही लक्षात घेताना का दिसत नाहीत?

दहावी, बारावीचे भरघोस मार्कस् ही एकमेव फूटपट्टीच मुलांची वाढ जोखण्यासाठी मुलांचे पालक, त्यांचे आप्त, शिक्षक, सारे आज वापरताहेत, त्याबाबत चर्चा करण्यापूर्वी थोडं या दहावी, बारावीच्या परीक्षांतील वास्तव समजून घेऊ या.

या दोन्ही परीक्षा अतिशय साचेबंद आहेत. त्यातील मार्काचं वाटपही तितकंच साचेबंद आहे. त्या परीक्षांतून मुलांना तो, तो विषय स्पष्टपणे समजलेला आहे की नाही, मुलांचं अवांतर वाचन, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची सुसंगत विचार करण्याची क्षमता कितपत वाढली आहे, अशा बाबीचा अंदाजही घेता येणं शक्य नाही. या अशा साचेबंद स्वरूपाचा फायदा उठवत विविध शाळा, क्लासेस मुलांना ठरावीक प्रश्नोत्तरांचं केवळ पाठांतर करायला लावून त्या मुलांना ९०-९५ टक्के मार्कस् मिळवून द्यायचा प्रयत्न करताहेत. जी मुलं निर्बुद्धपणे पाठांतर करू शकतात, ती भरघोस मार्कस् मिळवू शकतात, त्यांना पुढील शिक्षणाची कवाडं उघडली जातात हे जसं एक वास्तव आहे, तसंच त्या मुलांना पुढे मेडिकल, इंजिनीअरिंगसारखे विषयांची खोलवर जाण असण्याची अपेक्षा करणारे अभ्यासक्रम झेपत नाहीत, हेदेखील दुसरं वास्तव आहे.

जी मुलं अभ्यास करायला बालवयातच शिकलेली असतात त्यांच्यात दहावीत पोहोचेपर्यंत अनेक क्षमता विकसित झालेल्या असतात. त्यांना विषय समजून घेण्यात रस असतो. अशा मुलांना साचेबंद उत्तरं शब्दश: पाठ करून परीक्षा देणं जड जातं. दहावी आणि बारावीच्या परीक्षा अशा बेतलेल्या आहेत, की त्यात बुद्धीचा कस न लागता निव्वळ सराव, घोकंपट्टीच महत्त्वाची ठरते. शिवाय देशभर सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार इथंही भरभक्कम पाय रोवून स्थिरावला आहे.

आज ‘पैसा फेका आणि प्रवेश मिळवा’ हा शिक्षणाचा खाक्या बनला आहे. अशा परिस्थितीत सामान्य आर्थिक कुवत असलेल्या मुलांना महागडे क्लासेस, शिकवण्या परवडत नाहीत. बौद्धिक क्षमता उत्तम असूनही ही मुलं मनाजोगतं शिक्षण घेऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडून शाळांतून या साचेबंद यशाचा फॉम्र्युला घोटून घेतला जात नाही.

दहावी, बारावीच्या परीक्षेतलं यशापयश हीच मुलांच्या विकासाची फूटपट्टी समाजानं एकमेव मानल्यानं दोन प्रकारे नुकसान होतं आहे. उच्च शिक्षण घेताना पुरेशी बौद्धिक क्षमता विकसित ना होताही केवळ ‘घोका आणि ओका’ या खाक्यानं उत्तम मार्कस् मिळविणारी किंवा देणगी देऊन पैशाच्या जोरावर कमी मार्कस् मिळवूनही चांगल्या नावाजलेल्या कॉलेजात प्रवेश मिळवू शकलेली मुलं स्वत:तील त्रुटी ध्यानात न घेता स्वत:ला बुद्धिमान, यशस्वी समजू लागतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा व्यक्तिमत्त्वाची खरी कसोटी लागण्याची वेळ येते, तेव्हा ही मुलं साधनशुचिता न बाळगता झटपट यशाचे मार्ग स्वीकारतात. साधनशुचिता खुंटीला टांगून अमाप पैसा मिळवलेल्या पालकांचा एक नुकताच डॉक्टर झालेला मुलगा मला परवा भेटला. पुढे काय करणार, असा प्रश्न मी विचारताच तो म्हणाला, ‘‘चाळीस लाख भरून अमक्या कॉलेजात अमुक पोस्ट बाबांनी घेतलीय. त्या ब्रँचमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार. तिथं तर बाबांचे आणि आईचे दोस्तच आहेत. त्यामुळे अडचण नाही. एकदा डिग्री मिळाली, की कोणत्याही पंचतारांकित हॉस्पिटलात अ‍ॅटॅचमेंट मिळणं सोपं होतं. मस्तपैकी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर प्रॅक्टिसला तिथं मिळतं. आजकाल सगळं हायटेक झालंय. अशा हॉस्पिटलात काम केलं, की भरपूर पैसा आणि शिवाय लीगल मॅटर्सही हॉस्पिटलच सांभाळतं.’’

आयुष्याचं इतकं सोपं गणित मांडून स्वप्नं साकारणारा माझ्या आप्तांचा तो मुलगा आजच्या मेडिकल क्षेत्रातल्या अनागोंदीचा कार्यकारणभाव माझ्यापुढे असा झकास रेखाटून गेला, की मी अवाक्च झाले. शिवाय मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर अशांसारख्या कॉलेजातल्या वेगवेगळ्या आरक्षित जागांमुळे ही कैक बुद्धिमान मुलांना उत्तम मार्कस् मिळवूनही त्यांना हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळत नाही. महाराष्ट्रात उत्तम कॉलेजेस आहेत, म्हणून माझ्या मित्राची मुलगी अकरावी-बारावीसाठी कोलकात्याहून मुंबईत आली आणि इथल्या उत्तम कॉलेजात तिला प्रवेश मिळाला. एका ठरावीक आरक्षित जागांच्या कोटय़ातून. तिच्याहून चार मार्क जास्त मिळालेला तिचा मुंबईतच लहानाचा मोठा झालेला चुलतभाऊ मात्र इथं प्रवेश मिळवू शकला नाही. त्याला बाहेरगावच्या दुय्यम मानल्या गेलेल्या एका मेडिकल कॉलेजात प्रवेश घ्यायला लागला. दुसरं नुकसान असं होतं आहे, की या टप्प्यावर अशा अन्याय्य वास्तवाला सामोरी जाणारी किशोरवयीन मुलं

या दहावी-बारावीच्या टप्प्यावर एका प्रचंड भीतीच्या, अनिश्चिततेच्या सावटाखाली ती दोन-तीन र्वष घालवत आहेत.

किशोरवयातले मित्रांसोबत मौजमचा करण्याचे साधेसुधे आनंद घ्यायलाही वेगवेगळ्या क्लासेसपायी त्यांना फुरसत नसते. मेंदूला ताजातवाना करणं ही माणसांची मूलभूत गरज आहे, हे वास्तव या मुलांचे आई-बाबा आणि क्लासचे संचालक डोळ्याआड तर करत आहेतच; पण आपण विचारू गेलो, तर ते परीक्षेचा बागुलबुवा दाखवून स्वत:ची भूमिका न्याय्य आहे, असं ठासून सांगतात.

यंत्रसुद्धा फार राबवली तर बंद पडतात. त्याला ‘मशीन फटीग’ म्हणतात. मग ही मुलं तर जितीजागती माणसं आहेत. त्यांना डॉक्टर, इंजिनीअर, प्रोफेसर्स बनवण्याची स्वप्नं पालकांनी बाळगाणं हे चूक नाहीच. पण ती स्वप्नं पाहणारे पालक आणि शिक्षक एक मूलभूत सत्य विसरले आहेत. आज या मुलांना त्यांचं किशोरवय डोळसपणे उपभोगायची संधी देणं हे पालकांचं, शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे, कारण किशोरवयातच मुलं स्वत:ची मूल्यव्यवस्था डोळसपणे ठरवायला सुरुवात करत असतात. अनुकरणप्रियता ओसरून स्वकर्तृत्वाची जाणीव त्यांच्यात उमटू लागलेली असते. त्या जाणिवेला नीट खतपाणी घातलं तरच विकास होणं शक्य असतं.

आज अवतीभवती अभ्यास करणं ही स्वत:ची जबाबदारी आहे हेच मुळात न उमगलेली किशोरवयीन मुलंही बरीच आहेत. त्या बेजबाबदारपणाबद्दल पालक, शिक्षक मुलांनाच दोष देताहेत, पण नीट विचार केला तर बऱ्याच बाबी त्यांच्या या अभ्यास न करण्याला कारणीभूत असतात हे ध्यानात येतं. बऱ्याच मुलांना शाळेत जे काही शिकवलं जातं ते अगदी तिसरी-चौथीच्या वर्गापासूनच कळत नाही. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असेल तर परभाषेचा अडसर हे एक महत्त्वाचं कारण ठरतं. आज सुशिक्षित पालक मुलांसाठी इंग्रजी माध्यम निवडताहेत. ते काळाच्या गरजेनुसार उचितच आहे. पण मग हे पालक बहुधा पहिल्या इयत्तेपासून मुलांना शिकवणी ठेवतात. शिकवणी ही बऱ्याच मुलांसाठी एक छोटेखानी वर्गच असतो. त्यात व्यक्तिगत लक्ष दिलं जात नाही. म्हणजे एक धडा मुलाला एकदा शाळेत आणि एकदा शिकवणीला असा दोनदा शिकवला जाते. पण त्याला तो कितपत समजला आहे हे शिक्षक कुठेही पडताळून पाहात नाहीत. वारंवार घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षांचे पेपर शिक्षकांनी थोडे अगत्यपूर्वक तपासले, तर बऱ्याचदा अभ्यासात अकारण अडखळणाऱ्या मुलांना प्राथमिक शाळेच्या टप्प्यावरच मार्गदर्शन करता येईल. हा मुद्दा मांडताच शिक्षक ठरावीक ढाल पुढे करतात ती पटसंख्येची. त्यांना खूप पेपर्स तपासावे लागतात हे खरं. पण त्यातही क्षुल्लक चुका करणारी, विषय मुळातच न समजलेली मुलं कमी असतात. सक्षम शिक्षकांना तर हे पेपर्स तपासतानाच ध्यानात येतं. पालकांना हे मार्गदर्शन मिळावं म्हणून पालकसभा असतात. त्यासाठी पालक रजा काढून आवर्जुन उपस्थित राहतात. पण मुलांची नेमकी अडचण कुठे होते आहे याचा शोध शिक्षकांनी घ्यायल हवा. पालकसभेत पालकांशी संवाद साधत, त्यांची मदत मुलांना कशी होईल याबाबत त्यांना मार्गदर्शन नेमकेपणानं करायला हवं. ही शिक्षकांची एक महत्त्वाची जबाबदारी असते. पण ही जबाबदारी शिक्षक क्वचितच पार पाडताना आढळतात. याहून गंभीर चुक शिक्षकांकडून वारंवार होताना दिसतो. ते फक्त उत्तम मार्कस् मिळवणाऱ्या मुलांचंच कौतुक करतात आणि ते करतानाच अशा अकारण अभ्यासात अडखळणाऱ्या मुलांना ते सतत हिणवतात, रागं भरतात. अशी दुखावलेली मुलं अभ्यासात मागे राहू नयेत म्हणून मग पालक पदरमोड करून नवीन शिकवणी ठेवतात. तिथंही मुलांच्या पदरात अपमान, अवहेलनाच येते. मुलांना विषय येत नाही म्हणून जर तो शिकण्यासाठी पालक शाळेत पाठवतात, शिकवणीला पाठवतात तर मग या मुलांना तो, तो विषय नीट समजावून देणं ही शिक्षकांचीच जबाबदारी असते नं? इतकं सारं करून मुलं अभ्यासात मागे पडू लागली की घरीही त्याला पालक रागावू लागतात. बरेचदा आई, बाबा स्वत: त्याचा अभ्यास घेतात. पिझ्झा आणि केक उत्तम बनवता येण्यासाठी धडपणाऱ्या त्यांच्या आया मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यावर त्यांचा अभ्यास घेण्यासाठी इंग्रजी भाषा स्वत:ला उत्तम यावी म्हणून धडपड करताना मात्र आढळत नाहीत.

मुलांना त्यांचं किशोरवय डोळसपणे उपभोगायची संधी देणं हे पालकांचं, शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे, कारण किशोरवयातच मुलं स्वत:ची मूल्यव्यवस्था डोळसपणे ठरवायला सुरुवात करत असतात.

ही मुलं किशोरवयात येईस्तोवर त्यांना अभ्यासात रसच उरलेला नसतो. या वयात घरीही त्यांची बरीच निर्भर्त्सना होत राहाते. मग ही सर्व मुलं वाह्यातपणे वागू जातात, सिगरेटही ओढू जातात. यातलीच काही मुलं पुढे ड्रग्ज, इंटरनेट, पोनरेग्राफी अशा व्यसनांचे बळी ठरतात. ती प्रेम, स्वीकार हे सारं घराबाहेर शोधू जातात.

मुलांच्या शिक्षणातून उद्भवणाऱ्या या प्रश्नांचा विचार करताना पालकांनी पुढील गोष्टी समजून घ्यायला हव्या-

१) एखादी गोष्ट वाचणे, ती समजणे म्हणजे अभ्यास नव्हे. सतत ती गोष्ट करत राहून त्यातल्या गाभ्यासकट, मुलतत्त्वासकट ती आत्मसात करणे म्हणजे अभ्यास. गणितातला एखादा भाग मुलांना शिक्षक शिकवतात तेव्हा तो त्यांना समजतो. हुबेहूब तशाच व्यवहाराचं दुसरं उदाहरण घातलं तर लगेच मुलं ते सोडवतात. म्हणजे मूलतत्त्व समजलंच असा त्याचा अर्थ नाही. प्रश्नाची मांडणी थोडी बदलताच मूलतत्त्व न समजलेली मुलं गोंधळतात. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे उदाहरणाची भाषा थोडीशी बदलली तरी त्यातला व्यवहार न समजल्यामुळे ती गोंधळतात. गणितासारख्या किंवा विज्ञानासारख्या विषयात विषय समजण्याला खूपच महत्त्व आहे. एकदा विषय समजला की पुन:पुन्हा वाचून, त्यातली उदाहरणं वारंवार सोडवून तो घोटून घ्यावा लागतो. मग तो विषय मुलांनी आत्मसात केला असं होतं. त्यातलं मूलतत्त्व त्यांना स्पष्टपणे उमगतं. हा होतो अभ्यास. भूगोल शिकताना हवामान, जीवनशैली, जमिनीचा कस आणि त्या जागेचं विषुववृत्तापासूनचं अंतर अशा वेगवेगळ्या गोष्टी परस्परांशी कशा निगडित असतात ते समजावून दिलं की भूगोल हा एक रम्य, सोपा आणि हमखाास मार्कस् मिळवून देणारा विषय बनतो. भाषा शिकतानाही त्या भाषेचं व्यक्तिमत्त्व समजलं, की धडे, कविता, व्याकरण सारं एकदम सहज सोप्पं होत जातं.

किशोरवयीन मुलांना स्वत:तल्या वेगळेपणाचं, ‘स्व’तंत्रपणाचं भान येऊ लागतं. त्या वयात त्यांच्यावर प्रेम करत, त्यांच्यातील शिक्षणेतर गुणांना खतपाणी घालत त्यांचं संगोपन करणं आवश्यक आहे.

२) अभ्यासात निव्वळ घोकंपट्टी करून मार्कस् मिळवणं ही प्रगती आहे. त्या, त्या शैक्षणिक विषयाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा परस्परसंबंध समजल्यावर तो, तो विषय नीट अभ्यासला जातो आणि त्यानंतर जेव्हा त्या विषयात मार्कस् भरपूर मिळतात तेव्हा होतो तो व्यतिमत्त्व विकास.

३) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं म्हणजे वस्तू नव्हेत. किशोरवयीन मुलांना स्वत:तल्या वेगळेपणाचं, ‘स्व’तंत्रपणाचं भान येऊ लागतं. त्या वयात त्यांच्यावर प्रेम करत, त्यांच्यातील शिक्षणेतर गुणांना खतपाणी घालत त्यांचं संगोपन करणं आवश्यक आहे. हे त्यांचं वय म्हणजे जणू एका नव्या जगातला त्यांचा नवा जन्म असतो. आपण केलेल्या बालवयातील सदोष संगोपनातून त्यांचा आत्मविश्वास गमावलेला असो किंवा त्यांच्यात नाना न्यूनगंड, भयगंड, व्यक्तिमत्त्वातल्या त्रुटी उद्भवल्या असोत तरी या किशोरवयात त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्यावर जर पोटभर माया केली, त्यांच्यातील प्रामाणिकपणावर, हुशारीवर विश्वास दाखवत त्यांचा अभ्यास आपुलकीनं घेतला तर ही मुलं त्या भयगंडावर, न्यूनगंडावर, इतर त्रुटींवर स्वत: मात करतात. ती आपल्यापेक्षा खूप क्षमाशील असतात. एखाद्या नवजात बालकाप्रमाणे प्रेमाला ती आसुसलेली असतात. अभ्यासाच्या निमित्तानं त्यांच्या भावविश्वात डोकावायची संधी पालकांना, शिक्षकांना आयतीच मिळत असते. त्या संधीचा फायदा जर त्यांनी मुलांचा विश्वास संपादन करण्यासाठी घेतला आणि स्वत:च्या मुलांवरील निरपेक्ष प्रेमाबाबत मुलांची खात्री पटवली तर ही मुलं लगेचच शहाण्यासारखी वागू लागतात. याचं कारण सांगू?

याचं कारण मुलं मुळात शहाणीच असतात. आपणच उफराटे वागत असतो.