News Flash

एन्डोस्कोपी – दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार

‘एन्डोस्कोपी’ हा शब्द सगळ्यांना सध्या खूप परिचित झालेला आहे. एखादी रक्त तपासणी करण्यासाठी जावे इतक्या सहजतेने लोक एन्डोस्कोपी करायला जात असतात.

| April 24, 2015 01:18 am

avinash‘एन्डोस्कोपी’ हा शब्द सगळ्यांना सध्या खूप परिचित झालेला आहे. एखादी रक्त तपासणी करण्यासाठी जावे इतक्या सहजतेने लोक एन्डोस्कोपी करायला जात असतात. काही वर्षांपूर्वी एन्डोस्कोपी ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन, भूल देऊन, एन्डोस्कोपीची जाड नळी तोंडात घालून घेणे हे अनेकांना अगदी नकोसं वाटत असते. परंतु हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे बारीक नळीमुळे, पूर्ण भूल न देता हा तपास होतो.

ही एन्डोस्कोपी काय असते व तिचा उपयोग आपल्या पचनसंस्थेचे, पचनमार्गातील विकारांचे निदान करण्यासाठी कसा करता येतो ते आपण जाणून घेऊ या. Endos – म्हणजे आतील व scopy – म्हणजे पाहणे. आपल्या डोळ्यांना अनेक मर्यादा असतात. अति दूर अंतराळात बघणे जसे आपल्याला शक्य नसते, त्याप्रमाणे आपल्या स्वत:च्या शरीरात डोकावणे, बघणे हे काही वर्षांपूर्वी शक्य नव्हते, पण विविध दुर्बिणीचा शोध लागला आणि सर्वच चित्र बदलले. एन्डोस्कोपी म्हणजे शरीराच्या आतील भाग जे डोळ्यांना दिसू शकत नाहीत ते नळीद्वारे आतपर्यंत जाऊन पाहणे.
आपल्या पचनमार्गात काही बिघाड झाला असेल तर सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय तपास पण अनेकदा तोकडे पडतात. अशा वेळेला या मार्गाच्या दोन्ही द्वाराकडून म्हणजे तोंड व गुदद्वार यातून नळी आत घालून कॅमेऱ्याद्वारे दुर्बिणीद्वारे पचननलिकेच्या आत जाऊन चक्क ‘आँखों देखा हाल’ मिळू शकतो. आता दुर्बिणीद्वारे केवळ डोकावणेच शक्य आहे असे नाही तर बरोबर कॅमेरा, दुर्बीण असल्याने शरीराच्या आतील भागातील छायाचित्र घेणे, काही आजारांचे उपचारदेखील याप्रकारे देता येते. यामुळे अनेक आजारांचे निदान करता येते, तपासासाठी biopsy (म्हणजे तुकडा) काढून घेता येतो. तपासाबरोबरच विविध उपाययोजना करणे व बऱ्याच लहान मोठय़ा शस्त्रक्रिया पोट न फाडता करणे सहज शक्य झाले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या सारखे पोटात दुखत असेल किंवा उलटीतून वा शौचातून रक्त पडत असेल तर त्यानुसार तोंडातून वा गुदद्वारातून ही दुर्बीण आत घातली जाते. या दुर्बिणीच्या टोकाला दिवे असतात, ज्यामुळे प्रकाशकिरण आत जाऊन लख्ख उजेड पडतो व सर्व व्यवस्थित दिसते. या लाईटमध्ये अजिबात उष्णता नसते, शिवाय या दुर्बिणीमध्ये कॅमेऱ्याची सोय असते – त्यामुळे आत दिसणाऱ्या विविध गोष्टी व्हीडिओच्या साहाय्याने तसेच टीव्ही किंवा मोठय़ा पडद्यावर पाहता येतात व योग्य निदान करता येते. हल्ली प्रगत तंत्रामुळे शरीरातील अवयवांच्या प्रतिमा मोठय़ा दिसतात व त्यामुळे निदान करणे सोपे होते. या दुर्बिणीची नळी इतकी लवचीक असते की पचनमार्गातील विविध पोकळ्यांतून ही कशीही वळते व विविध अवयवाचे निरीक्षण व त्यानुसार उपाययोजना या दुर्बिणीद्वारे करता येतात. दुर्बीण घालून तपास वा उपाययोजना हे साधारण तासाभराचे काम असते. यासाठी हॉस्पिटलमध्ये बहुधा अ‍ॅडमिट व्हायला लागत नाही.

एन्डोस्कोपी केव्हा करावी लागते?
विशिष्ट आजाराचे निदान करण्यासाठी
काही उपाययोजना म्हणजे उपचारांसाठी
शस्त्रक्रियेसाठी (Endoscopic वा Laproscopic सर्जरी करता)

रोगनिदानासाठी एन्डोस्कोपीचा उपयोग :
आतील विकृत किंवा आजारी अवयवांचे फोटो काढण्यासाठी व त्या आजाराचे निदान करण्यासाठी.
शरीरातील विकृतीची व रक्तस्रावाची जागा समजण्यासाठी
काही आतील भागांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी.
विकृत अवयवाचा छोटा तुकडा काढून त्याचे विविध तपास करण्यासाठी.

जठराची एन्डोस्कोपी (Upper GI Endoscopy) : ही तोंडातून नळी घालून अन्ननलिका, जठर अगदी लहान आतडय़ांपर्यंत (सुरुवातीचा भाग) आत जाऊन डोळ्यांनी ते ते अवयव तपासता येतात.

कोलोनोस्कोपी (Colonoscopy) : वरीलप्रमाणेच खालून म्हणजे संडासच्या जागेतून गुदद्वारातून नळी आत घालून संपूर्ण मोठय़ा आतडय़ाची तपासणी चक्क आपल्या डोळ्यांनी करता येते. याला कोलोनोस्कोपी म्हणतात. यामुळे या आतडय़ाला असलेला त्रास, आजार याचे निदान करता येते. त्याचे फोटो काढता येतात, तिथल्या आजारसदृश भागाची biopsy (छोटासा तुकडा काढून घेण्याची क्रिया) करता येते.
एन्डोस्कोपीपूर्वी काय तयारी करावी?
तपासापूर्वी सहा तास काहीही खाऊ नये.
रुग्ण काय औषधांवर आहे हे पाहून त्याप्रमाणे त्याची औषध समायोजित करून घ्यावीत.
ब्लडप्रेशर, मधुमेह व इतर काही आजार आहेत हे जाणून घ्यावे.
कुठल्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे का हे डॉक्टरांना सांगावे.
कधी कधी एन्डोस्कोपीपूर्वी प्रतिजैविके देण्याची गरज असते, तशी ती औषधे द्यावीत.
कोलोनोस्कोपीपूर्वी रेचके/ औषधे देऊन पोट साफ केले जाते.
जठराच्या एन्डोस्कोपीची प्रक्रिया कशी असते?
प्रथम घशात बधीर करणारा स्प्रे मारून घसा बधीर करून एन्डोस्कोपी लवचीक नळी तोंडामध्ये घातली जाते. काही जणांना झोपेचे इंजेक्शन देणे जरुरीचे असते. नंतर रुग्णाला कुशीवर झोपवतात व तोंडामधून आत ही नळी घातली जाते. ही नळी लवचीक असल्याने आरामात पुढे पुढे जाते. यामुळे श्वसनाला काहीही त्रास होत नाही. काही जणांना थोडेसे अस्वस्थही वाटू शकते. दहा ते १५ मिनिटांमध्ये ही नळी आत जाऊन हवे ते सर्व काही तपासले जाते. या तपासणीच्या वेळी तुकडा काढून तपासणे शक्य असते, परंतु त्यासाठी मात्र सौम्य झोपेचे इंजेक्शन देणे जरुरीचे ठरते.
एन्डोस्कोपी केल्यानंतर कधी कधी घसा थोडावेळ दुखत राहतो, पण यात काळजी वाटण्यासारखे काही नसते. केव्हा केव्हा पोटात हवा शिरल्याने पोट फुगल्यासारखे वाटते, जे नंतर हळूहळू कमी होते. झोपेचे इंजेक्शन जर दिले गेले असेल तर दोन-तीन तास हॉस्पिटलमध्ये राहायला लागते.
एन्डोस्कोपीनंतर काही complications होऊ शकतात का?
सहसा काही गुंतागुंत होत नाही, पण जर biopsy साठी तुकडा काढून घेतला असेल तर त्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो, जो काही वेळानंतर थांबतो. यासाठी काही औषधोपचाराची गरज नसते.
केव्हा केव्हा झोपेच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन होऊ शकते.
क्वचितच पचनमार्गाला इजा होऊ शकते, म्हणून जर या एन्डोस्कोपीनंतर गिळायला त्रास होऊ लागला किंवा घसा, पोट, छाती दुखू लागली तर मात्र लगेच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
एन्डोस्कोपीबद्दल अधिक माहिती आपण पुढील भागात घेऊ या.
(पूर्वार्ध)
डॉ. अविनाश सुपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2015 1:18 am

Web Title: endoscopy
टॅग : Kashasathi Potasathi
Next Stories
1 पोटाच्या तपासण्या
Just Now!
X