26 April 2019

News Flash

पर्यावरणपूरकतेचा वसा

पुठ्ठय़ापासून तयार केलेल्या मखरींचे उत्पादक नानासाहेब शेंडकर.

गेली अठरा वर्षे नानासाहेब ही मखरे तयार करत आहे. आजवर त्यांनी जवळपास १०० प्रकारची मखरे तयार करून त्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन केले आहे.

गणेश विशेष
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2

या वर्षी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलबंदी लागू केली. गणेशोत्सवात मखर व सजावटीसाठी थर्माकोल वापरता येणार नाही अशी विशेष ओळदेखील अध्यादेशात घातली होती. नंतर त्यामध्ये अनेक कोलांटउडय़ा मारून झाल्या. पण त्यामुळे का होईना या वर्षी एकूणच सर्वसामान्यांमध्ये काही प्रमाणात जागरूकता आली. पण अशी जागरूकता थर्माकोलचा वापर करून सजावट व मखर तयार करण्याऱ्या एका उत्पादकाला १८ वर्षांपूर्वीच आली होती. आणि त्याने अगदी जोरात सुरू असलेला आपला थर्माकोल मखरींचा व्यवसाय बंद करून पुठ्ठय़ापासून तयार केलेल्या मखरींचे उत्पादन सुरू केले होते. या उद्योजकाचे नाव नानासाहेब शेंडकर.

अहमदनगरच्या लोणीमावळ या छोटय़ाशा गावातून ते शिक्षणासाठी मुंबईत आले. जे. जे. कला महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झालेच, पण शिक्षण सुरू असतानाच त्यांची वेगवेगळ्या कामांशी ओळख होत गेली. त्यातूनच नाटय़क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. नाटकांसाठी लागणाऱ्या नेपथ्याची कामे त्यांनी घ्यायला सुरुवात केली. जोडीने चित्रपटांसाठी सेट डिझाइन करण्याची कामे त्यांना मिळत गेली. दरम्यान १९८५ मध्ये त्यांनी स्वत:च्या गावी दोन एकर जागेत थर्माकोलपासून सजावटीचे साहित्य तयार करण्याचा कारखाना सुरू केला. वजनाला हलके, सहज उपलब्ध आणि खर्चात आटोपशीर यामुळे थर्माकोलच्या मखरी आणि इतर वस्तूंना प्रचंड मागणी असायची. नानासाहेबांचा व्यवसायदेखील चांगलाच सुरू होता. पण १९९९ च्या आसपास या कारखान्याला आग लागली. आगीत बरंच नुकसान झालं. तयार वस्तू सर्वच संपल्या होत्या. साठा करून ठेवलेले थर्माकोल शिल्लक होते. पण या आगीच्या बातमीने नानासाहेबांच्या मनात संमिश्र भावना आल्या होत्या.

नानासाहेब सांगतात की, कारखान्याला आग लागण्यापूर्वी त्यांचा थर्माकोलचा व्यवसाय जोरात सुरू असला तरी त्याचे दुष्परिणाम त्यांना दिसत होते. निर्माण होणाऱ्या ट्रकच्या ट्रक  कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागायची. त्याचबरोबर थर्माकोलच्या कामातून संपूर्ण परिसरात थर्माकोलचे बारीक बारीक कण हवेत भरून राहायचे. अंगाला चिकटले की निघायचे नाहीत. या कणांचा आरोग्यावरदेखील परिणाम होत असे. ते सांगतात की, ज्या दिवशी कारखान्याला आग लागली असा फोन आला तेव्हा मला आर्थिक नुकसान झाल्याचा धक्का होताच, पण त्याच वेळी या सगळ्या दुष्परिणामांपासून सर्वाचीच सुटका झाल्याचे समाधानदेखील होते. त्यातूनच मग त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्या काळी पर्यावरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये आजच्या इतकी जागरूकता नव्हती. शासनदरबारी तर थर्माकोलबंदीची चर्चादेखील नव्हती. सर्वसामान्यांमध्ये थर्माकोल मखर हा आवडता पर्याय होता. अशा वेळी नानासाहेबांनी कागदाच्या, पुठ्ठय़ाच्या मखरी तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. एव्हाना त्यांची जाहिरात क्षेत्रात कामं सुरू होती. त्यांनी मोडय़ूलर साईनेज सिस्टिम विकसित करून त्या व्यवसायात जम बसवला होता. पण त्यांची संशोधक वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच मग पुठ्ठय़ाच्या मखरींचे उत्पादन करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला. त्यासाठी घाटकोपरला जागा घेऊन प्रयोग सुरू झाले. हे प्रयोग बरेच खर्चीक होते. डिझाइन तयार करणे, त्यानुसार छपाई करणे आणि ती मखर प्रत्यक्षात एखाद्या घरात उभी राहणे हा बराच मोठा प्रवास होता.

नानासाहेब सांगतात की, त्यांच्यापुढे तांत्रिक बाबी, उत्पादन, अर्थपुरवठा ही आव्हानं होतीच, पण गणेशोत्सवामध्ये आणखीन दोन महत्त्वाची आव्हानं होती. एक म्हणजे हा प्रत्येकासाठी भावनिक आणि म्हणून नाजूक विषय. मखर पडली, तिला काही झाले तर लोकांसाठी ते खूप नाजूक प्रकरण असते. त्याला धक्का न लावता अशा मखरी तयार कराव्या लागणार होत्या. आणि दुसरे म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसांच्या घरातदेखील ती मखर सहजपणे लावता आली पाहिजे. नानासाहेबांचा नाटय़क्षेत्रातील अनुभव या वेळी उपयोगी पडला. नानासाहेब सांगतात, ‘‘नाटकाचे सेट करताना मर्यादित जागेत अनेक गोष्टी दाखवायच्या असतात. तसेच एखाद्या कामगाराच्या घरातला गणपती त्याच्या एका खोलीतच टीव्हीच्या जागी किंवा एका छोटय़ाशा कोपऱ्यात बसवला जातो. तेथेदेखील आमची पुठ्ठय़ाची मखरे व्यवस्थित बसवता आली पाहिजेत. ती आकर्षक असली पाहिजेत आणि त्याचबरोबर ती सहजपणे उभी करता आली पाहिजेत. वापरानंतर पुन्हा घडी करून ठेवून पुढच्या वेळीदेखील वापरता आली पाहिजेत.’’ नानासाहेबांपुढील या सर्व आव्हानांमुळे अर्थातच मखर डिझाइन करणे, त्याचे प्रयोग करून पाहणे यात वेळदेखील गेला आणि खर्चही वाढत गेला. आणि अखेरीस २००१ मध्ये त्यांनी पहिली पुठ्ठय़ाची मखरे बाजारात आणली.

पण तेव्हा लोकांची मानसिकता बदलेली नव्हती. लोकांना थर्माकोलच प्रिय असायचा. पण नानासाहेबांनी मागे न हटता ही मखरे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास घेतला होता. नानासाहेबांच्या मते हा व्यवसाय पैसे मिळवून देणारा म्हणून त्यांनी पाहिलाच नाही. आपण वर्षांनुवर्षे पर्यावरणाला ओरबाडत आलो आहोत. त्याच्याकडून फक्त घ्यायची सवय आपल्याला लागली आहे. पण ते परत देण्याची ही वेळ असल्याचे ते सांगतात. दरवेळी फक्त पर्यावरणाबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वत:हून काहीतरी करण्याची गरज असल्याचे ते नमूद करतात.

गेली अठरा वर्षे नानासाहेब ही मखरे तयार करत आहे. आजवर त्यांनी जवळपास १०० प्रकारची मखरे तयार करून त्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन केले आहे. मखरांमध्ये असंख्य प्रयोग केले आहेत. अगदी अध्र्या फुटापासून ते २२ फूट उंच मखरे त्यांनी तयार केली आहेत. जयपूर पॅलेस, सिद्धिविनायक अशा प्रकारच्या जवळपास २५ वर्गवारीत त्यांनी या रचना केल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन डिझाइन करणे वेळखाऊ असते. त्यातदेखील आकर्षकपणा आणि मांगल्याची प्रचीती येणे गरजेचे असते. नानासाहेब सांगतात की, एकेका डिझाइनवर लाखांनी पैसे खर्च होतात. तेव्हा नवीन काहीतरी हाती लागते. ताम्रपर्णी नावाचं डिझाइन करताना सहा महिन्यांचा वेळ लागला. पण या सर्वातून अंतिम मखर तयार होते तेव्हा त्याचे समाधान वेगळेच असते.

या मखरांसाठी ते क्रोम बोर्ड वापरतात. हा पुनर्चक्रित कागद आहे. पण तो इतर पुर्नचक्रितसारखा तकलादू नाही. नुसता पुठ्ठा हा उभा राहत नाही. त्यासाठी त्याला विशिष्ट ठिकाणी घडी घातली की तो उभा राहू शकतो. त्यामुळे या सर्व घडय़ा योग्य जागी येणे महत्त्वाचे असते. ते गणित जमले की मग २२ फूट उंचीची मखरेदेखील तयार करता येते. नानासाहेब सांगतात, ‘‘आमचे हे तंत्र वापरून आम्ही ४० फूट उंचीची मखरेदेखील उभी करता येतील. पण त्यासाठी जागा आणि तितकी गुंतवणूक करणारा प्रायोजक असेल तरच ते शक्य होऊ शकेल.’’ नानासाहेबांचे हे स्वप्न नक्कीच साकार होईल, कारण आजही ते मोठय़ा जोमाने कार्यरत आहे. गणपतीच्या आधीचे दोन महिने तर पूर्णवेळ याच कामात व्यग्र असतात.

खरे तर आजचा जमाना हा प्रचंड स्पर्धेचा आहे. नानासाहेबांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा इकोफ्रेण्डली मखर वगैर आजच्या काळातील शब्द अस्तित्वातदेखील नव्हते. आज बाजारात अनेक उत्पादक उतरले आहेत. काहीजण तर चक्क लॅमिनेशन करून वर इकोफ्रेण्डली मखर म्हणून मिरवत आहेत. नानासाहेब सांगतात की, त्यांची मखरांची प्रसिद्धी ग्राहकांनीच केली आहे. एखाद्या गावात कोणाच्याही घरी त्यांचे मखर बसवले की सगळं गाव ते मखर बघायला येतो. त्यातूनच आज त्यांनी तयार केलेली मखरे परदेशातदेखील गेली आहेत. या वर्षी अबूधाबीतील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात त्यांची मखरे वापरली जात आहेत. हाताळायला सोपी आणि टिकावू असे दोन्ही गुण असल्यामुळे कोकणात गावी गणपतीला जाणारेदेखील अशी मखरे घेऊन जाताना दिसतात.

नानासाहेब गेली १७ वर्षे ही इकोफ्रेण्डली मखरे तयार करण्याचे काम नेटाने करत आहेत. या व्यवसायाला असलेल्या कलात्मक स्वरूपामुळे आपल्या मनाला शांती मिळते असे त्यांचे मत आहे.
(छाया : प्रशांत नाडकर)

First Published on September 7, 2018 1:05 am

Web Title: environment friendly ganapati decorations