डॉ. हर्षद दिवेकर – response.lokprabha@expressindia.com

मानवप्राणी (होमो सेपियन) हा पृथ्वीतलावरील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी जीव समजला जातो. अन्य जीवांच्या तुलनेत माणसाकडे कोणतीच विशेष शारीरिक क्षमता नसूनही उत्क्रांतीच्या प्रवासात त्याला अतिप्रगत मेंदू आणि तल्लख बुद्धिमत्ता अशी दोन प्रभावी आयुधे प्राप्त झाली. त्यांच्या जोरावर, आफ्रिका खंडात उत्पन्न होऊन पुढील एक लाख वर्षांत जगभर बस्तान बसविलेल्या माणसाने आपले ऐहिक जीवन अधिकाधिक सुलभ तसेच समृद्ध करण्यासाठी सभोवतालच्या नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

भटक्या अवस्थेत वन्य प्राण्यांची शिकार तसेच वनस्पती यावर जेमतेम गुजराण करणारा आदिमानव निसर्गाच्या अन्नसाखळीत शिकार आणि शिकारी अशी दुहेरी भूमिका बजावत होता. पण पुढे बौद्धिक प्रगतीच्या जोरावर तो अन्य सर्व सजीवांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्पर्धा करत गेला आणि अन्नसाखळीतून बाहेर पडला. अस्तित्वाच्या या संघर्षांत सजीवांच्या अनेक प्रजातींबरोबरच निएण्डरथाल, डेनीसोवान असे त्याचे सख्खे जातभाई देखील नामशेष झाले. तरीही इथपर्यंत माणसाकडून झालेले निसर्गाचे नुकसान मर्यादित स्वरूपाचे होते असेच म्हणावे लागते. कारण, ‘शेतीचा शोध आणि औद्योगिकीकरणाची सुरुवात’ या मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील नंतरच्या काळात घडलेल्या दोन घटनांनी निसर्गाची घडी पूर्णत: विस्कटून टाकली.

सुमारे दहा हजार वर्षांंपूर्वी माणसाला शेतीचे तंत्र अवगत झाले असे इतिहास सांगतो. सुरुवातीच्या काळात माणसाची लोकसंख्या खूपच नगण्य असल्याने त्याला लागणाऱ्या खाद्यान्नाची गरज मर्यादित होती. पण शेतीमुळे माणसाचे भटके आयुष्य स्थिर व्हायला लागले. शिकार करताना चुकून जिवंत हाती लागलेल्या पशूंच्या स्वरूपात मांस आणि दूध यांचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाल्याने पशुपालन या व्यवसायाचा जन्म झाला. या सर्वांमुळे मानवी जीवनमान उंचावले. वाढत्या लोकसंख्येची पोटं भरण्यासाठी घनदाट अरण्ये, गवताळ प्रदेश, डोंगरउतार, दलदली इत्यादी नैसर्गिक परिसंस्थांवर अतिक्रमण करत शेतजमीन निर्माण केली गेली. तेथील वन्य पशुपक्षी आणि वनस्पती यांच्या अधिवासावर गदा आली. शेतीच्या पाण्यासाठी नदी, तलाव, ओढे, नाले, जमिनीच्या पोटातील भूजल अशा नैसर्गिक जलस्रोतांचा अर्निबध वापर केला गेला. आज अशी परिस्थिती आहे की आपण आपल्या उपलब्ध भूजल साठय़ातील सुमारे ७०टक्के पाणी वापरून संपवलेले आहे. त्यातील जास्तीत जास्त पाणी शेतीसाठी वापरले गेल्याचे सर्वच जलतज्ज्ञ सांगतात.

आधुनिक काळात पिकांची वेगवान वाढ आणि कीडनियंत्रण यासाठी वापरली गेलेली रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा मोठा दुष्परिणाम पर्यावरणावर झालेला आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे पोषकद्रव्ये निर्माण करण्याची जमिनीची मूलभूत क्षमता संपून जमिनी नापीक होतात. रासायनिक कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड तर मरते, पण या किडीवर उपजीविका करणारे पक्षी, बेडूक, सरडे यांच्यावर संक्रांत येते. आणि कीटकनाशकांना दाद न देणारी एखादी कीड आल्यास किडीच्या नैसर्गिक शत्रूंअभावी अख्खे पीकच हातचे जाऊ शकते. बेडूक हे नैसर्गिक कीड नियंत्रक असून त्यांच्या स्वरूपात साप, घोरपडी, पक्षी यांनाही अन्न उपलब्ध होते. पण या प्राण्यांच्या घटत्या संख्येमुळे एक अख्खी परिसंस्थाच कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. पिकांमध्ये राहिलेला कीटकनाशकांचा अंश अन्नाबरोबर माणसाच्या शरीरात जातो आणि दुष्परिणाम दाखवितो. जमिनीत झिरपणारी कीटकनाशके, तणनाशके भूजलात मिसळून भूजल प्रदूषित करतात आणि तिथून पुन्हा माणूस, वन्यप्राणी आणि वनस्पती यांच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचे अंश काही शीतपेयांमध्ये आणि अगदी आईच्या दुधातही सापडलेले आहेत.

१८ व्या शतकात झालेल्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. मानवाचे ऐहिक जीवन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने उभारण्यासाठी नैसर्गिक भूप्रदेश बळकावले गेल्याने अधिकाधिक परिसंस्था उजाड झाल्या. उद्योगांना लागणारे पाणी नैसर्गिक जलस्रोतातून मिळविले गेले आणि कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळल्यामुळे पुन्हा नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित झाले. हळूहळू कार्बनडायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फरडायऑक्साईड असे विषारी वायू घेऊन कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषित झाली. दगडी कोळसा, धातूंची खनिजे, हिरे यासाठी होणाऱ्या खाणकामामुळे जंगले तुटली, डोंगर-टेकडय़ा फुटल्या. परिणामी, नदीकाठ आणि डोंगरउतारावर होणाऱ्या भूस्खलनामुळे गावेच्या गावे पुरात वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. २० व्या शतकात अवतरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरच्या युगामुळे त्यातून निर्माण झालेल्या इ-कचऱ्याची समस्या आ वासून उभी राहिली आहे.

हे सगळं कमी होतं म्हणून की काय, पण वाढत्या शहरीकरणामुळे त्यात आणखी भर पडली. घरबांधणीसाठी लागणाऱ्या वाळू, विटा, सिमेंट, लाकूड यासाठी नदीपात्र, नदीकाठ, डोंगर, वृक्ष ओरबाडले गेले आणि अनेक परिसंस्थांवर अतिक्रमण करून जागा उपलब्ध केली गेली. मानवी वस्तीतील सांडपाण्यामुळे जमीन तसेच जलस्रोत आणखी प्रदूषित झाले. गाव-शहरांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येने आता अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. त्यातही जैवविघटन होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याने गटारी, नाले, डम्पिंग ग्राऊंड्स भरून गेले आहेत. अनेक ठिकाणच्या समुद्रांवर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचे थर मैलोन्मैल पसरले आहेत. प्लास्टिक खाल्लय़ामुळे किंवा त्याचा फास बसल्यामुळे गुदमरून अनेक जलचरांचा जीव जातो आहे. दळणवळणासाठी रस्ते बांधताना आणि नंतर त्याचे रुंदीकरण करताना मोठमोठय़ा वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्यामुळे अनेक पशुपक्ष्यांचे निवारे आणि अन्नस्रोत उद्ध्वस्त झाले आहेत. आज शहरे आणि गावे उष्णता उत्सर्जन करणारी बेटे बनली आहेत, ज्याला अर्बन हीट आयलॅण्ड इफेक्ट असे म्हटले जाते. यामुळे वातावरणाचे तापमान वाढते आहे.

निसर्गचक्रात सर्वच सजीवांचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. या परस्परावलंबी जैवविविधतेमुळेच पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव व्यवस्था टिकून आहेत. माणसाने वृक्षतोड करून वन्यजीवांचे हक्काचे निवारे हिसकावून घेतलेच. पण त्याचबरोबर गरज नसताना, केवळ छंद म्हणून वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या अस्तित्वावर घाला घालायचा प्रयत्न केला. मनुष्येतर प्राण्यांच्या बाबतीत २०१८ सालच्या एका अभ्यासात समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. संख्येने मनुष्यप्राणी जगातील जीवसृष्टीच्या फक्त ०.०१ टक्का आहे. मात्र त्याच्यामुळे गेल्या पाच हजार वर्षांत पृथ्वीवरील ८३ टक्के सस्तन प्राणी आणि ५० टक्के वनस्पती नामशेष झाल्या आहेत. आज जगातील सस्तन प्राण्यांपैकी ६० टक्के प्राणी हे गायी, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा असे पाळीव पशू आहेत आणि केवळ ४० टक्के सस्तन प्राणी वन्य अवस्थेत शिल्लक आहेत. जगातील एकूण पक्ष्यांपैकी ७० टक्के पक्षी हे कोंबडी, बदक असे पाळीव पक्षी आहेत, तर केवळ ३० टक्के पक्षी वन्य अवस्थेत आहेत. गेल्या ४०० वर्षांत सुमारे ८०० सजीव नामशेष झाले. आज दर दिवसाला सजीवांच्या १५० जाती नामशेष होत असून सुमारे १० लाख जाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर आहेत आणि याला माणूस कारणीभूत आहे असे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन फॉर बायलॉजिकल डायव्हर्सिटी ही आंतरराष्ट्रीय संस्था सांगते. यामुळेच माणूस-वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. वाघ, बिबटे यांचे माणसावरील हल्ले; हरीण, गवे, हत्ती यांनी केलेले शेताचे नुकसान; पक्षी, वटवाघळे यांनी केलेले फळशेतीचे नुकसान याचे प्रमाण वाढते आहे. टोळधाडीसारखी संकटे आल्यास माणूस हतबल होतो आहे.

माणसाने निसर्गाला एवढं ओरबाडल्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसले नसते तरच नवल! पलटवार करण्यासाठी निसर्गाकडे पुष्कळ हत्यारे आहेत आणि निसर्ग ती वेळोवेळी उपसत असतो. माणसाने प्रदूषण करून निर्माण केलेले अतिरिक्त कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन सारखे हरितगृह वायू सूर्याची उष्णता वातावरणात धरून ठेवतात आणि जागतिक तापमानवाढीस कारणीभूत होतात. त्यामुळे दोन्ही ध्रुवांवरील आणि हिमनद्यांमधील बर्फ झपाटय़ाने वितळते आहे. यामुळे भविष्यात समुद्राची पातळी वाढून त्याने अनेक भूप्रदेश गिळंकृत करण्याचा धोका आहे. पाण्याचे तापमान आणि आम्लता वाढल्यामुळे समुद्रातील प्रवाळभिंती तसेच त्यावर अवलंबून असलेले अनेक संवेदनशील जलचर सजीव नामशेष होत आहेत. तापमानवाढीमुळे जंगलाला लागणारे वणवे, अचानक येणारे पूर, वारंवार पडणारे दुष्काळ, समुद्रातील चक्रीवादळे यांचे प्रमाण वाढले आहे.

अनेक ठिकाणी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)‘आणि ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’ या संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका अभ्यासानुसार आपल्या देशाचे झपाटय़ाने वाळवंटीकरण होत असून त्यात राजस्थान पहिल्या स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राच्या ४४.९३ टक्के भूभागावर वाळवंटीकरण सुरू आहे. पूर्वी चार महिने विभागून पडणारा पाऊस आता एखाद्याच महिन्यात बदाबदा कोसळतो आणि शेती तसेच नागरी वस्तीचे नुकसान करून जातो. प्रदूषित जलस्रोत आणि हवेमुळे माणसाला जडणाऱ्या विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे.

१९७० च्या दशकात रेफ्रिजरेटरमधील विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे तसेच इतरही काही कारणांनी वातावरणातील ओझोन वायूच्या थराला छिद्र पडले. त्यामुळे या भागाच्या खालील प्रदेशावर सूर्याचे अतिनील किरण थेट पोहोचून माणसासहित अनेक सजीवांना त्वचेच्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका उत्पन्न झाला. निसर्गाच्या नासाडीमुळे आजपर्यंत झालेल्या नुकसानाची ही यादी आणखी हवी तेवढी लांबविता येऊ शकते.

‘मग आता या समस्येवर उपाय काय’ असा प्रश्न कोणालाही पडेल. खरी गोष्ट अशी की काळाचे चक्र उलटे फिरविणे शक्य नसल्यामुळे निसर्गाचं आजवर झालेलं नुकसान पूर्णत: भरून काढणं अशक्य आहे. पण किमान आपली वर्तमानातील जीवनशैली बदलून निसर्गाचं भविष्यकालीन नुकसान कमी करता येऊ शकेल. त्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतील. व्यक्तिगत पातळीवर पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.

  • आपल्याला विजेचा आणि सर्वच प्रकारच्या ऊर्जेचा वापर कमी करावा लागेल. आपण घरातील ज्या खोलीत आहोत ती वगळता अन्य खोलीतील दिवे, पंखे बंद ठेवणे; पूर्ण चार्ज झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे तशीच चार्जरला लावून न ठेवणे, पारंपरिक दिव्यांऐवजी ८० टक्के कमी वीज वापरणारे एलईडी बल्ब वापरणे; शक्य असल्यास घरगुती वीजपुरवठय़ासाठी सौरऊर्जेचा वापर करणे, तरुणांनी शक्य असेल तिथे लिफ्टचा वापर न करता इमारतीच्या पायऱ्या चढून वर जाणे असे उपाय करून आपल्याला विजेची बचत करावी लागेल.
  • पाण्याचा वापर कमी करण्यासाठी चेहरा/हात धुताना किंवा दाढी करताना नळ विनाकारण वाहते न ठेवणे, आपल्या टाकीला/नळाला असलेली गळती वेळच्या वेळी दुरुस्त करणे, शॉवरऐवजी बादली तसेच तांब्या वापरणे, जिथे शक्य आहे तिथे प्रसाधनगृहासाठी व्हॅक्युम फ्लशचा वापर करणे असे उपाय करावे लागतील.
  • जेवणखाण करताना आपल्याला आवश्यक आहे तेवढेच अन्न शिजवून किंवा विकत घेऊन खावे जेणेकरून अन्नाची नासाडी टाळता येईल. कारण अन्न वाया घालविले तर ते पिकविण्यासाठी शेतीत वापरले गेलेले पाणी, ऊर्जा या सगळ्याची अप्रत्यक्ष नासाडी होते. मांसाहारी लोकांनी अतिमांसाहार करणे टाळावे. कारण मांस निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात पाणी तसेच अन्य नैसर्गिक स्रोंचा वापर होतो.
  • वाहने निवडताना शक्यतो जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांची निवड करून खनिज तेलाची बचत करावी. जिथे शक्य असेल तिथे खाजगी वाहनांऐवजी बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. गाडीच्या टायरमधील हवेचा दाब नेहमी योग्य राखावा, ज्यामुळे इंधनाची बचत होते. केवळ चैन म्हणून केलेले अनावश्यक प्रवास टाळावेत. कार रेसिंग, मोटरबाईक रेसिंग यामुळे खनिज तेलाची प्रचंड नासाडी होते. त्यामुळे शक्यतो अशा साहसी खेळात भाग घेऊ नये.
  • प्रवासात घेतलेली बिस्किटे, चॉकलेट्स, वेफर्स याचे पुडे, पाण्याच्या बाटल्या वाट्टेल तिथे भिरकावून देऊ नये. त्यासाठी कचराकुंडीचा वापर करावा. घरगुती कचऱ्याचे ओला तसेच सुका असे वर्गीकरण करून ते सरकारी यंत्रणेकडे द्यावे. शक्य झाल्यास ओल्या कचऱ्याचे घरीच कंपोस्टिंग करावे. विशेषत: लहान मुलांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या चांगल्या सवयी लावाव्यात.
  • शक्य असल्यास आपल्या घराच्या आजूबाजूला देशी झाडेझुडपे लावून त्याची निगा राखावी.
  • याच पद्धतीने सामाजिक पातळीवर काही उपाययोजना करूनही आपण निसर्ग, पर्यावरण याचे रक्षण कसे करू शकतो हे पाहू.
  • गेल्या काही वर्षांत पृथ्वीवरील वनस्पतींचे हिरवे आवरण कमी झाल्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडच्या स्थिरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जंगलतोड झालेल्या जमिनींवर, गावा-शहरातील इमारतींच्या आणि रस्त्याच्या कडेने, महामार्गांच्या कडेने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. ही झाडे देशी असावीत जेणेकरून त्यांचा स्थानिक पशुपक्ष्यांना फायदा होईल. वृक्षारोपणासाठी सरकारी योजना अस्तित्वात असतातच. पण त्या अमलात आणल्या जातात की नाही याचा पाठपुरावा सरकारी अधिकाऱ्यांकडे करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. तसेच नागरिकांनी एकत्र येऊन किंवा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. गवताळ प्रदेश, दलदली प्रदेश यावर बेकायदेशीर अतिक्रमण होत असेल तर नागरिकांनी त्याबाबत आवाज उठवला पाहिजे. कारण असे प्रदेश म्हणजे पडीक, निरुपयोगी जमिनी नसतात. त्यासुद्धा एक नैसर्गिक परिसंस्था असतात.
  • कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतात सोडले जाणारे सांडपाणी याला आळा घालण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. परंतु अनेकदा त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी नागरिकांनीच सरकारी यंत्रणांवर दबाव आणून औद्योगिक प्रदूषणाला आळा घातला पाहिजे. तसेच कारखान्यांच्या आवारातील मोकळ्या परिसरात आणि आजूबाजूला, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण केल्यास तेथील कार्बन उत्सर्जनाला बऱ्याच अंशी कमी करता येते. सरकारी यंत्रणांनी याची अंमलबजावणी करायला हवी.
  • शेतीमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासारख्या पर्यावरणपूरक सिंचन पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहीत करायला हवे. रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांना खतांच्या वापराबद्दल शिक्षित करायला हवे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके यांचा कमीतकमी वापर करून शेतकऱ्यांना जैविक कीड निर्मूलन पद्धतीचा उपयोग करण्यासाठी मदत करायला हवी. शेतीच्या बांधावर एखादे झाड लावल्याने पिकांचे नुकसान होते या गैरसमजापोटी शेतकरी झाड लावत नाहीत. त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना बांधावर किमान एखादे देशी झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावे.
  • गावे आणि शहरातून निर्माण होणारा कचरा ही आजकाल एक भयानक समस्या झाली आहे. हा कचरा गावाबाहेरच्या एखाद्या डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन पडतो. तिथे तो एक तर जाळला जातो, त्यामुळे हवाप्रदूषण होते. किंवा तो तिथे कुजतो आणि त्यातून झिरपणारी विषारी द्रव्ये जमिनीत मुरून तिथून भूजलात मिसळतात. हे रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सरकारी यंत्रणांचा पाठपुरावा करायला हवा. यासाठी सिंगापूरसारख्या देशांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे हिवाळ्याच्या काळात झाडांची पानगळ होऊन निर्माण होणारा कचरा तसेच वाळलेले तण जाळण्याची फार चुकीची पद्धत प्रचलित आहे. त्याने खूप प्रदूषण होते. ते करू नये यासाठी लोकांचे प्रबोधन करायला हवे.
  • बंगले, अपार्टमेंटस, हाऊसिंग सोसायटय़ा येथील लोकांनी एकत्र येऊन पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना कराव्यात. सरकारी पातळीवर, केवळ मोठमोठय़ा नद्यांवर भलीमोठी धरणे बांधण्याचा विचार न करता छोटेमोठे ओढे, नाले, उपनद्या, तलाव याचे पाणी कसे उपयोगात आणता येईल याचाही विचार करावा. नद्या, नाले, ओढे याच्या पात्रात अतिक्रमणे असतील तर त्यावरही सरकारने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने आणि सातत्याने होणे गरजेचे आहे.
  • खाजगी वाहनांच्या अतिवापरामुळे होणारा खनिज तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.
  • आपल्या देशात वन्यजीवांची चोरटी शिकार तसेच तस्करी हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही देशात अनेक ठिकाणी अशी शिकार होतच असते. आधीच अधिवास नष्ट झाल्याने धोक्यात आलेल्या वन्यजीवांचे असे हकनाक बळी जाणे परवडणारे नाही. त्यामुळे निसर्गातील उरल्यासुरल्या परिसंस्था कोलमडून पडतील. यासाठी असे प्रकार रोखणाऱ्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करायला हवी. तसेच गरज भासल्यास या कायद्यात बदलही करायला हवेत.

या प्रकारे व्यक्तिगत, सामुदायिक आणि सरकारी पातळीवर संघटित प्रयत्न केल्यास निसर्गाच्या ऱ्हासाची गती कमी करता येऊ शकते. तसे झाल्यास निसर्गाची घसरलेली गाडी काही अंशी रुळावर येईल. महात्मा गांधी म्हणत की पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने ही पृथ्वीवरील सगळ्या माणसांची गरज भागविण्यासाठी पुरेशी आहेत, मात्र अगदी एका माणसाचीदेखील हाव भागविण्यासाठी ती पुरेशी नाहीत. आपल्या पुढील पिढय़ा सुखाने नांदाव्यात असे आपणास वाटत असेल तर आपण गरज आणि हाव यातून एकाची निवड करणे गरजेचे आहे. निसर्ग हा छोटय़ा-मोठय़ा आपत्तींमधून धोक्याचे इशारे देत असतो. हे इशारे वेळीच ओळखले नाहीत तर सर्वनाश अटळ आहे. पृथ्वीच्या इतिहासात आजपर्यंत पाच वेळा सार्वत्रिक विनाश (मास एक्स्टिंग्शन) होऊन गेलेला आहे, ज्यात अनेक सजीव नष्ट झालेले आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या २५० ते ५०० वर्षांत सहावा सार्वत्रिक विनाश येऊ शकेल असे शास्त्रज्ञ सांगतात. तो प्रयत्नपूर्वक टाळायचा की त्याच्याकडेच वाटचाल करायची हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.