मागोवा
इस्थर अनुह्य़ा प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. त्यासंबंधीची माहितीही आता सगळ्यांसमोर आली आहे. पण एक सुशिक्षित तरुणी एका अनोळखी माणसाच्या मोटारसायकलवर बसून जायला तयार होते हे वास्तव अजूनही कुणाच्याही पचनी पडलेले नाही.

जानेवारी महिन्यातील धुक्याची एक पहाट. एक २३ वर्षीय तरुणी मुंबईतील कुर्ला टर्मिनस स्थानकात उतरते. त्यानंतर तिचा काही थांगपत्ता लागत नाही. १२ दिवसांनी तिचा मृतदेह सापडतो. कसलाच दुवा हाती लागत नाही. पोलीस यंत्रणा हतबल होते. काही दिवसांनी रेल्वेतील एका सीसीटीव्ही चित्रणात ती एका फोनवर बोलत इसमासोबत जाताना दिसते.. तिच्या फोनमधून एकही कॉल झालेला नसतो. मग ती बोलत होती कुणाशी? तो माणूस कोण होता? तिचा मृतदेह अर्धवट जळालेला होता. तिची बॅग, लॅपटॉप गायब होते पण बोटातील सोन्याची अंगठी तशीच होती. तिच्या शरीरावर जीन्स पँट नव्हती. बलात्काराची दाट शक्यता होती. पण मृतदेह कुजलेला असल्याने बलात्कार झाला ते सांगता येत नव्हतं. अनेक रहस्यमय आणि मती गुंग करणारे प्रश्न पोलिसांची झोप उडवतात. जवळपास दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर एका आरोपीला अटक होते. पण त्याने दिलेल्या माहितीवर खुद्द पोलिसांचा विश्वास बसत नसतो. या जगाचा निरोप घेताना ही तरुणी अनेक प्रश्नांची उत्तरे तिच्यासोबत घेऊन गेलेली असते.
आंध्र प्रदेशातील मच्छलिपट्टण गावातील प्राध्यापक सिंगावरपू सुरेंद्र जोनाथन प्रसाद यांना दोन मुली. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली छोटी लावण्या आणि मोठी इस्थर अनुहय़ा. ती संगणक अभियंता झाली होती. मुंबईतील प्रख्यात टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून गोरेगावच्या कंपनीच्या ब्रांचमध्ये ती काम करीत होती. तिचे मुंबईत अनेक नातेवाईक होते. पण इस्थर अंधेरीच्या वुमेन्स होस्टेलमध्ये राहू लागली. तिचे काका अरुण कुमार नवी मुंबईत राहत होते. ते तिच्यावर लक्ष ठेवून असत. वडील एस. जे. प्रसादही अधूनमधून मुंबईत तिला भेटायला येत असत. डिसेंबर महिन्यात नाताळला मोठी सुटी काढून ती घरी गेली होती. महिनाभराने सुटी संपवून ती मुंबईला परतण्यासाठी निघाली. ४ जानेवारी २०१४ रोजी ती विजयवाडा स्थानकात आली. सोबत तिचे वडील होते. तर तिचा जवळचा मित्र हेमंत भास्करसुद्धा तिच्यासाठी जेवण घेऊन आला होता. विशाखापट्टणम एक्स्प्रेसने ती मुंबईला यायला निघाली. एरवी हैद्राबादहून मुंबईला येताना ती ज्या एक्स्प्रेसने यायची ती दादर टर्मिनसला थांबायची. पण विशाखापट्टणम कुल्र्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये येणार होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास ती कुल्र्याला पोहोचणार होती. दीड वर्षे मुंबईत काढलेली इस्थर तशी निश्िंचत होती. तिच्यासोबत एक कपडय़ांची ट्रॉली बॅग आणि लॅपटॉपची पाठीवर अडकविण्याची दुसरी सॅक. प्रवासादरम्यान ती हेमंतशी जवळपास चाळीस मिनिटे बोलत होती. ४ तारखेच्या रात्री वडिलांनी इस्थरला फोन केला. तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. मी सोलापूरच्या आसपास पोहोचले आहे, काळजी करू नका, असे तिने सांगितले.

पोलिसांनी तिच्यासोबत डब्यात असणाऱ्या रेल्वेतील सर्व प्रवाशांची चौकशी सुरू केली. इस्थर ट्रेनमध्ये होती आणि पहाटे इतरांप्रमाणे फलाटावर उतरली हे प्रत्येक सहप्रवाशाने सांगितले.

५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी विशाखापट्टणम एक्स्प्रेस कुल्र्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आली. मुलगी रेल्वे स्थानकात उतरली असेल म्हणून वडिलांनी फोन केला. पण तिने फोन उचलला नाही. ते वारंवार फोन करू लागले. पण काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यांनी मग तात्काळ अरुण कुमार यांना जाऊन बघायला सांगितले. ते तडक कुर्ला टर्मिनसला आले. चौकशी केली. गाडी वेळेवर आली होती. मग त्यांनी लगेच अंधेरीत इस्थरचे हॉस्टेल गाठले. पण ती तेथेही आलेली नव्हती. काळजात धस्स झाले. कंपनीत आणि सहकाऱ्यांकडे, मैत्रिणींकडे चौकशी केली. पण ती कुणाकडेच आलेली नव्हती की कुणालाच तिने फोन केलेला नव्हता. सगळे नातेवाईक तिला फोन करत होते पण मोबाइलची केवळ िरग वाजत होती. अरुण कुमार यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पण तेथील पोलिसांनी त्यांना हैदराबादच्या विजयवाडात रेल्वे पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. कारण ती विजयवाडा येथून निघाली होती. ते कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तक्रार घेतली नाही. इस्थरचा दिवसभर शोध सुरू होता. तिच्या फोनवर केवळ िरग होत होती. दुपारी तीननंतर तिचा फोन बंद पडला. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला इस्थरच्या वडिलांनी विजयवाडा रेल्वे पोलिसांमध्ये इस्थर हरविल्याची तक्रार दिली. त्यांनी हे प्रकरण कुर्ला रेल्वे पोलिसांकडे पाठवले. ७ जानेवारीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी इस्थर अनुहय़ा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान, विजयवाडा रेल्वे पोलिसांनी इस्थरच्या मोबाइलचा सीडीआर काढला होता. तिचे शेवटचे लोकेशन दुपारी ३ पर्यंतचे भांडुप (पूर्व)कडे सापडले होते.

नातेवाइकांची शोधमोहीम
तरुण मुली बेपत्ता होतात तेव्हा त्या प्रियकरासोबत गेलेल्या असतात, असा साधारण पोलिसांचा समज असतो. हे तसेच काहीसे प्रकरण वाटल्याने पोलिसांनी सुरुवातीला लक्ष दिले नव्हते. मात्र भांडुप येथे तिच्या मोबाइलचे लोकेशन सापडले आणि मीडियाला विषयातील गांभीर्य कळले. भांडुप पूर्वेचा हा परिसर खाडीचा आहे. त्यामुळे पोलिसांना तिच्या जिवाचे काही बरेवाईट तर झाले नसेल ना, याची भीती होती. इस्थरच्या नातेवाइकांनी स्वत: इस्थरची शोधमोहीम हाती घेतली. दोन गुप्तहेरांची मदत घेतली गेली. असाच शोध सुरू असताना १६ जानेवारीला संध्याकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कांजूर येथील एका बायपास रस्त्यावरील झुडपाजवळ इस्थरचा मृतदेह तिच्या नातेवाइकांना सापडला. तो जळालेला असल्यामुळे कुजलेला होता. हाताच्या अंगठीवरून वडिलांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवली. तिचा जळालेला स्कार्फ सापडला. जीन्स पँट शेजारी पडलेली होती. काही अंतरावर तिचा मोबाइलदेखील सापडला.

या काळात माध्यमांमध्ये एक्स्क्ल्युझिव्ह बातम्या देण्याची चढाओढ लागली होती. एका वृत्तवाहिनीने तर इस्थरचे अपहरण झाले आणि चार दिवसांनी तिची हत्या केली असा जावईशोध लावला होता.

पोलीस यंत्रणा कामाला लागली
इस्थरचा मृतदेह कांजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याने तेथे गुन्ह्य़ाची नोंद झाली. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कुर्ला रेल्वे पोलीस, कुर्ला पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखा ५, ६, ७, मालमत्ता विभाग, सायबर सेल आदी कामाला लागले. सगळेच या प्रकरणाचा समांतर तपास करू लागले. रेल्वे स्थानकातील प्रत्येक रिक्षा, टॅक्सीचालक, हमाल, फेरीवाले यांच्याकडे चौकशी सुरू झाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या भागात वावर असणारे गर्दुल्ले, नशापाणी करणारे, भुरटे चोर सगळ्यांना आणून चौकशी सुरू झाली. गुन्हे शाखेचा मालमत्ता विभाग तांत्रिक पुरावे शोधण्यात निष्णात. त्यांनी इस्थरच्या मोबाइलचा अभ्यास करायला सुरुवात केली. सकाळी ५ वाजता तिच्या व्हॉटसअॅपवर लास्ट सीन होता. पण नंतर एकही कॉल केलेला नव्हता. दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे फोनची बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत एकही कॉल किंवा मेसेज तिने केलेला नव्हता. पोलिसांनी तिच्यासोबत डब्यात असणाऱ्या रेल्वेतील सर्व प्रवाशांची चौकशी सुरू केली. इस्थर ट्रेनमध्ये होती आणि पहाटे इतरांप्रमाणे फलाटावर उतरली हे प्रत्येक सहप्रवाशाने सांगितले. ती रेल्वे स्थानकात उतरली हे नक्की होते. ती बेपत्ता होण्याआधी तिला आलेल्या आणि तिने केलेल्या प्रत्येक कॉल्सची चौकशी करण्यात येऊ लागली. रडारवर आला तो इस्थरचा खास मित्र हेमंत भास्कर. डिसेंबर महिन्यात तो इस्थरशी तब्बल ४७ तास बोलला होता. प्रवासादरम्यानही तो ४० मिनिटे बोलत होता. इस्थर मुंबईत आल्यानंतर तो शिर्डीत दर्शनासाठी गेला होता. प्रेमसंबंधातील तणावामुळे त्याने काही केले का, याचा संशय आला. त्याची कसून चौकशी झाली. पण काही हाती लागले नाही. ऑनर किलिंगची शक्यताही पडताळून पाहण्यात आली. कारण या प्रकरणात सुरुवातीपासून पुढाकार घेण्यात, वरिष्ठांना भेटण्यात, माध्यमांना माहिती देण्यात अरुण कुमार यांचा पुढाकार होता. त्यांचीही चौकशी झाली. पण तसेही काही आढळले नाही. इस्थरला रेल्वेस्थानकातून बाहेर पडताना पाहणारा कुणीच सापडला नाही. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात इस्थर कुठेच दिसत नव्हती. कुर्ला रेल्वे टर्मिनस स्थानकात एकूण ३६ सीसीटीव्ही आहेत, पण त्यातील अर्धे बंद आढळून आले.

…आणि दिशा मिळाली
सर्व शक्यता पडताळून तपास करीत असताना मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण धागा लागला. ३० जानेवारीला कुर्ला रेल्वे पोलिसांना फलाट क्रमांक ३ आणि ४ चे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. एका कॅमेऱ्यातील चित्रणात इस्थर बॅग घेऊन जाताना दिसत होती. तर दुसऱ्यात ती फलाट क्रमांक ५ वरून बाहेर येत असताना दिसत होती. या वेळी ती मोबाइलवर बोलत होती. तिच्या सोबत एक इसम होता. तो इसम तिची ट्रॉली बॅग ओढत होता. त्या इसमाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याने टी शर्ट आणि निळी जीन्स पँट घातली होती. अन्य एका फुटेजमध्ये हा इसम ट्रेन येण्यापूर्वी हातात शीतपेयाची बाटली घेऊन फिरतानाही दिसत होता. हा इसम कोण होता? इस्थर कुणाशी बोलत होती? काहीच कळत नव्हते. कारण तिच्या फोनमधून एकही कॉल गेलेला नव्हता. इस्थर एका इसमासोबत स्थानकाच्या बाहेर पडत होती. पण पुढचे काहीच कळत नव्हते. कारण बाहेरील सर्व सीसीटीव्ही बंद होते. हा इसम तीस-पस्तिशीच्या घरातील दिसत होता. पोलिसांनी त्याचा फोटो इस्थरच्या नातेवाइकांना दाखविला. पण कुणीच त्याला ओळखत नव्हते. त्यामुळे संभ्रम वाढत होता..

साधारण तीनशे मीटर बाहेर चालत वाहनतळावर आल्यावर सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल आहे, असे तिला दिसले.

आगळावेगळा तपास
पोलिसांनी या इसमाचा फोटो संगणकात स्पष्ट करून घेतला. आधार कार्डात डोळ्याचा रॅटिना घेतला जातो. त्यामुळे या फोटोतील इसमाचे डोळ्यांचे ठसे आधार प्रणालीत तपासणीसाठी पाठवले. त्याचा फोटो सर्व परिवहन खात्यांकडेही पाठविण्यात आला. तो वाहनचालक असेल तर किमान तेथे तरी समजेल. सर्व टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची चौकशी सुरू करण्यात येत होती. या दोघांना पाहिले असे कोणीही सांगत नव्हता. तिच्या लॅपटॉपवर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. कुर्ला पोलिसांनी तिच्या सर्व नातेवाइकांची चौकशी केली. तिच्या कुटुंबीयांचे कुणाशी वैर आहे का, मिस्टेकन आयडेंटिटी आहे का, याचाही तपास केला गेला. तिच्या कार्यालयातील सर्वाची चौकशी केली. तिच्या आयुष्यात आलेले सर्व मित्र तपासले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक) तिचा मोबाइल पाठवून गेल्या वर्षभरातले सर्व मेसेजेस, आलेले-गेलेले कॉल्स तपासले. पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. सकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी ती बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. पोलिसांनी साडेचार ते साडेपाच या तासाभरातील कालावधीत झालेले कॉल्स तपासले. एकूण साडेसहा हजार कॉल्स या कालावधीत या टॉवरच्या क्षेत्रात झाले होते. तर बरोबर ५ वाजून ११ मिनिटांनी २३ कॉल्स झाले होते. पोलिसांनी हे सर्व कॉल्स तपासले. पण हाती काही लागत नव्हतं. या काळात पोलिसांनी या सीसीटीव्हीतील इसमाचे चित्र माध्यमांमधून प्रसारित केले. या इसमाची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. घटनास्थळावरून पोलिसांना काही कॉण्डोम्सची पाकिटे आणि बीअरचे कॅन सापडले. त्यामुळे बलात्कार करून हत्या झाल्याचा अंदाज होता. एक मफलर घटनास्थळावर सापडला होता. रिक्षाचालक थंडीच्या दिवसांत मफलर वापरत असतात. त्यामुळे एखाद्या रिक्षाचालकाचाच हा मफलर असावा असे समजून तपास करण्यात आला. पण काहीच निष्पन्न झाले नाही.

पार्टी करणारे रिक्षाचालक
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, या भागातील काही रिक्षाचालकांनी रात्रभर मद्याची पार्टी केली होती. पोलिसांनी त्यांना उचलले. परंतु त्यांच्या चौकशीतूनही काहीच निष्पन्न झाले नाही. सगळ्या बाजूंनी तपास केल्यानंतर पोलिसांचा एक निष्कर्ष पक्का झाला होता, तो म्हणजे ट्रान्सपोर्ट. कुर्ला टर्मिनसवरून ती भांडुप येथे गेली. म्हणजे ट्रान्सपोर्ट हे माध्यम होतेच. कुठल्या तरी वाहनाने ती गेली असावी. पोलिसांचा सगळा रोख वाहनांवर होता. या काळात पोलिसांना माहिती देणाऱ्या खबऱ्यांची संख्याही कमालीची वाढली होती. प्रत्येक जण फोटोत दिसणाऱ्या इसमाला पाहिले असा दावा करीत होता. पोलीस त्या त्या वर्णनाच्या माणसाला उचलून आणत होते.

तपास अधिकारी
पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहपोलीस आयुक्त सदानंद दाते (गुन्हे) अतिरिक्त पोलीस आयुक्त निकेत कौशिक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अंबादास पोटे, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील (गुन्हे शाखा ७) श्रीपाद काळे (गुन्हे शाखा ६) अविनाश सावंत (गुन्हे शाखा ५), नंदकुमार गोपाळे (मालमत्ता विभाग) आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला आहे.

सानपने हमालीचा बॅच दीड लाखांना विकून टाकला आणि पैसे मिळविण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला होता. त्याच्या नावावर मुंबईच्या गावदेवी, मध्य प्रदेशातील इटारसी, नाशिक, मनमाड आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सनसनाटी खुलासा
या काळात माध्यमांमध्ये एक्स्क्ल्युझिव्ह बातम्या देण्याची चढाओढ लागली होती. एका वृत्तवाहिनीने तर इस्थरचे अपहरण झाले आणि चार दिवसांनी तिची हत्या केली असा जावईशोध लावला होता. दरम्यान, एका इंग्रजी दैनिकाने बातमीत असे म्हटले होते, इस्थर प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. या रिक्षाचालकाच्या रिक्षात इस्थर बसली. त्याने मग आपल्या अन्य एका मित्राला सोबत घेतले. रिक्षा त्यांनी घटनास्थळी नेली. लोखंडी रॉडने तिची हत्या केली आणि बॅग घेऊन पळून गेले. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याच्या दुसऱ्या मित्रालाही अटक केली आणि त्यांनी या हत्येची कबुली दिली. पण या प्रकरणातले सत्य गंभीर आणि गमतीशीर होते. पोलिसांना चौकशी करताना काही रिक्षावाल्यांनी रामकुमार यादव (नाव बदललेले) या रिक्षाचालकाच्या रिक्षात इस्थर बसल्याचे सांगितले. रामकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. ती चौकशी (की मारहाण?) एवढी कडक होती की शेवटी तो कबूल झाला आणि मीच माझ्या मित्राच्या मदतीने इस्थरची हत्या केल्याची कबुली दिली. माझा एक मित्र सोबत होता, या घटनेनंतर गावी पळून गेला आहे असेही त्याने सांगितले. त्या मित्रालाही पोलिसांनी उचलून आणले. पण या घटनेचे वास्तव वेगळे होते. पोलीस तपास करीत आहेत हे पाहून काही रिक्षाचालकांनी रामकुमारला अडकविण्यासाठी मुद्दामहून त्याचे नाव पोलिसांना सांगितले होते. जेणेकरून पोलीस त्याला उचलून आणतील, मारतील असा त्यांचा डाव होता. पोलिसांची चौकशी चुकविण्यासाठी (तुम्ही अंदाज करा, कशी झाली असेल चौकशी) त्याने मीच इस्थरचा खून केला अशी कबुली दिली. अखेर या प्रकरणात काही निष्पन्न न झाल्याने दोघांनाही सोडून दिले.

आयुक्त बदलले, तपासाला वेग
हे दिवस पोलीस दलातील बदल्यांचे होते. आपण या ठिकाणी असेपर्यंत इस्थर प्रकरणाचे श्रेय मिळायला हवे असे प्रत्येक अधिकाऱ्याला वाटत होते. त्यामुळे त्यांनी तपास करणाऱ्या खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईचे आयुक्त कोण होणार, या वादात पंधरा दिवस पद रिकामे होते. पंधरा दिवसांनी राज्य दहशतवादविरोधी प्रमुख राकेश मारिया यांची मुंबईच्या आयुक्तपदी निवड झाली. मारिया यांनी इस्थरचे प्रकरण प्राधान्याने हाताळण्यास सुरुवात केली. तपासासाठी नऊ पथके तयार केली आणि पुन्हा सर्वाना कामाला लावले.

…आणि मारेकरी सापडला
१ मार्च २०१३. इस्थर प्रकरणात पोलीस आयुक्तांची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद असल्याचा मेसेज आला. प्रेरणा हॉल माध्यम प्रतिनिधींनी खच्चून भरला होता. मारियांनी सांगायला सुरुवात केली आणि सगळेच सुन्न झाले. चंद्रभान सानप (२८) नावाच्या इसमाने चोरीच्या उद्देशाने इस्थरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. इस्थरला त्याने वाहनचालक असल्याचे सांगून तीनशे रुपयात अंधेरीत सोडतो असे सांगितले. नंतर तिला आपल्या मोटारसायकलीवर बसवले आणि कांजूर येथे नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करून तिची हत्या केल्याचे मारियांनी सांगितले. सगळे अवाक झाले. पहिला प्रश्न आला, एखादी तरुणी एखाद्या अनोळखी माणसाच्या मोटारसायकलीवर कशी काय बसू शकेल? मोटारसायकलीवर दोन बॅगा घेऊन बसणे कसे शक्य आहे? हे प्रश्न आजही कायम आहेत.

काय घडलं त्या पहाटे…
तपासात एक एक करून सगळ्या घटनेचा उलगडा होत गेला. ५ जानेवारीला पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी इस्थरची गाडी फलाट क्रमांक ३ वर आली. इस्थर बॅगा घेऊन बाहेर आली. सुरुवातीला ती जुन्या प्रतीक्षालयात गेली. पण नंतर नवीन प्रतीक्षालयाकडे गेली. तेथे अस्वच्छता जाणवल्याने ती पुन्हा बाहेर आली आणि फलाट क्रमांक ५ वर गेली. त्याच वेळी आरोपी चंद्रभान हा तेथे सावज शोधत घुटमळत होता. सानप हा मूळ कांजूरमार्ग येथे राहणारा मात्र सध्या नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्याच्या नावावर मोबाइल तसेच इतर चोरीचे गुन्हे होते. त्या दिवशी ५ जानेवारीला पहाटे तो कुर्ला टर्मिनस स्थानकात आला. आदल्या रात्री त्याने भरपूर मद्यपान केले होते. एखाद्या प्रवाशाचा मोबाइल अथवा बॅग चोरावी असा त्याचा उद्देश होता. त्याला इस्थर एकटी बसलेली दिसली. मी वाहनचालक आहे, असे सांगत कुठे जायचे आहे, असे त्याने विचारले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर अंधेरीत जायचे असे सांगितले. मलासुद्धा अंधेरीतच जायचे आहे. अंधेरीत जायचे ८०० रुपये होतात पण ३०० रुपयांत सोडतो असे सांगितले. माझ्याकडे पेट्रोलचे पैसे नसल्याने मला पण मदत होईल असे सांगत तिची सहानुभूती संपादन करण्याचा प्रयत्न केला. दहा पंधरा मिनिटांत शॉर्टकटने अंधेरीत सोडतो असेही त्याने सांगितले. तिचा पूर्ण होकार मिळण्याच्या आतच त्याने तिची ट्रॉली बॅग घेतली आणि चालू लागला. इस्थर त्याच्या सोबत चालू लागली पण सावधगिरी म्हणून घरच्यांना फोन लावला. पण दुर्दैवाने तिच्या मोबाइलमधील टॉक टाइम संपलेला होता. त्यामुळे तिने फक्त घरच्यांशी फोनवर बोलत असल्याचे भासवले. ती वेळ होती सकाळची ५ वाजून ११ मिनिटे. नेमके हेच दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले. ती बोलत नव्हती तर केवळ फोनवर बोलत असल्याचे भासवत होती. साधारण तीनशे मीटर बाहेर चालत वाहनतळावर आल्यावर सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल आहे, असे तिला दिसले. तिने लगेच नकार दिला. पण सानपने तिला आश्वस्त केले. मॅडम, हा माझा मोबाइल क्रमांक घ्या, माझ्या बाइकचा नंबर घ्या आणि कुणालाही द्या. मी गरीब आहे, मला पैशांची गरज आहे. मला पेट्रोलला पैसे मिळतील, तुमचेही काम होईल. इस्थरच्या होकाराची वाट पाहण्यापूर्वीच त्याने इस्थरची १६ किलो वजनाची ट्रॉली बॅग मोटारसायकलीच्या पुढील भागावर (पेट्रोलच्या टाकीवर ) ठेवली. नाइलाजाने इस्थर त्याच्या मागे बसली. त्या वेळी तिने पुन्हा घरच्यांना फोन लावून बोलत असल्याचे भासवले आणि हा मोबाइल क्रमांक दिल्याचे भासवले. वास्तविक तिच्या मोबाइलमधील टॉक टाइम संपलेला होता. लॅपटॉपची १० किलो वजनाची बॅग तिने पाठीमागे अडकवली. पहाटेच्या त्या धुक्यात मोटारसायकल चेंबूरच्या सहकार सिनेमाकडून नंतर पूर्व द्रुतगती महामार्गावर आली. याच वेळी सानपच्या मनात सैतान जागा झाला. ही मुलगी एकटी आहे. तिचे सामान लुटण्याबरोबर तिलाही सहज लुटू शकतो असा विचार त्याने केला. त्यानंतर अचानक बायपास रोड पकडला. इस्थरला लगेच शंका आली. त्याला विचारले. हा कुठला रस्ता. तेव्हा तो म्हणाला हा शॉर्टकट आहे. लवकर पोहोचू आणि माझ्या मोटारसायकलीमधील पेट्रोलही संपत आले आहे. नंतर त्याने गाडी येथील एका तिवरांच्या झुडपाजवळ नेऊन थांबवली. इस्थरला पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची कल्पना आली. तिने विरोध करायला सुरुवात केली. पण तिचे काही चालले नाही. मला सोडून द्या. माझे जे सामान न्यायचे ते घेऊन जा. पण मला सोडा.. ती विनवणी करीत होती. मला सोडून दिले तर मी नंतर अजून पैसे देईन असेही तिने सांगितले. पण त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. इस्थरने खूप विरोध केला आणि आरडाओरड करायला सुरुवात केली. तीची मदतीची हाक ऐकणारे त्या निर्जन रस्त्यावर पहाटेच्या वेळी कुणीच नव्हते. इस्थर जिवंत राहिली तर आपण अडकू शकतो अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे सानपने तिचे डोके जमिनीवर आपटले. नंतर तीच्याच स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केली. डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला. या झटापटीत तिचा मोबाइल दूर जाऊन पडला. सुमारे वीस मिनिटे हा प्रकार सुरू होता. सानपने इस्थरची लॅपटॉपची बॅग पाठीवर अडकवली आणि ट्रॉली पुढच्या भागात घेऊन निघाला.

पापक्षालनासाठी विधी
ही मोटारसायकल त्याचा मित्र नंदुकमार साहू याची होती. साहू विक्रोळी स्थानकात मोबाइल कव्हर विकायचा आणि पत्त्यांचा अड्डाही चालवायचा. सानप सुरुवातीला कांजूर येथील घरी गेला. मुलाचे रक्ताळलेले कपडे पाहून त्याच्या आईला कल्पना आली. पण एका मुलीने लिफ्ट मागितली आणि नंतर मी रस्त्यात ढकलून तिची बॅग चोरून आलो, असे त्याने आईला सांगितले. आईने त्याचे रक्ताळलेले कपडे जाळून त्याची राख इमारतीसमोरच्या कचराकुंडीत टाकली आणि त्याला लवकर निघून जाण्यास सांगितले. सानपने इस्थरला खोटा मोबाइल क्रमांक सांगितला होता. पण तरी मोबाइलमध्ये मोटारसायकलीचा क्रमांक सेव्ह केला असावा, आपला फोटो काढला असावा, अशी त्याला भीती होती. त्याने मित्र साहूला उठवले. त्याला घेऊन साडेसातच्या सुमारास पुन्हा घटनास्थळावर गेला. त्याला मोबाइल सापडला नाही. मग त्याने जीन्सवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर तो मुलुंड चेकनाक्यावर आला. तेथून नाशिकला जाणाऱ्या एका टँकरमध्ये बसला आणि नाशिक गाठले. साहूसुद्धा भीतीपोटी झारखंडला निघून गेला. सानपने सोबत लॅपटॉपची बॅग आणि ट्रॉली बॅग घेतली होती. या बॅगेत त्याला पाच हजार रुपये सापडले. नाशिकला गेल्यावर त्याने एक भिकारी महिला गाठून, माझी पत्नी वारली असे सांगून बॅगेतील कपडे दान करण्यासाठी ती बॅग तिच्याकडे दिली. त्याच दिवशी त्याने नाशिकमधील एक अहिरे नावाचा ज्योतिषी गाठला. कौटुंबिक समस्या आहेत असे सांगून उपाय विचारला. तुझे येणारे दिवस वाईट आहेत, तुला कालसर्पयोग आणि अतिगंडयोग आहे असे त्याने सांगितले. हे टाळायचे असेल तर पूजा करावी लागेल, असा उपाय सांगितला. सानपने साडेतीन हजार रुपये खर्च करून विधिवत पूजा केली. त्यानंतर तो गोदावरी नदीत गेला. तेथील रामकुंडात पाप धुण्यासाठी अंघोळ केली. यानंतर त्याने खंडोबालाही जाऊन ११ वर्षे दाढी काढणार नाही आणि पांढरे कपडे घालणार असा नवस केला. नाशिकला त्याची तिसरी पत्नी पूनम आणि १४ महिन्यांचा मुलगा राहतो. तिला त्याने हे कृत्य सांगितले. तिने त्यामुळे त्याच्याशी अबोला धरला होता. पण हे कृत्य दारूच्या नशेत झाले होते आणि यापुढे दारूला स्पर्शही करणार नाही, असे त्याने पत्नीला सांगितले होते. दरम्यान, या घटनेनंतर तो दोन वेळा मुंबईला येऊन गेला होता. पण नाशिकला असताना मुंबईत घडलेल्या घटनेचा तो मागोवा घेत होता. आवर्जून वर्तमानपत्र वाचून माहिती घेत होता. जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण प्रसारित केले तेव्हा स्वत:ला टीव्हीवर पाहून तो अधिकच सावध झाला होता. त्याने आपले सीमकार्ड तोडून नवीन सीमकार्ड वापरायला सुरुवात केली होती.

काही प्रश्न अनुत्तरीत
पोलीस या प्रकरणात पुरावे जमा करण्यात लागले असताना काही प्रश्न संशय निर्माण होतात. पोलिसांनी कुर्ला टर्मिनसवरील प्रत्येक टॅक्सी आणि रिक्षाचालकाची कसून चौकशी केली. पण कुणीही इस्थरला आणि सानपला जाताना पाहिले नव्हते. पण नेमके आताच दोघांना मोटारसायकलीवर जाताना पाहणारे दोन साक्षीदार कसे सापडले? आता पोलिसांच्या कांजूर येथील त्याच्या बहिणीच्या घरातून इस्थरचा टी-शर्ट, जीन्स आणि गॉगल सापडला होता. एवढी खबरदारी घेणारा सानप तेवढे दोन कपडे ठेवण्याची चूक करेल का?

इस्थर कुणा अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलीवर बसूच शकत नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

कोण आहे हा चंद्रभान सानप?
चंद्रभान सानप ऊर्फ चौक्या याचे मूळ कुटुंबीय कांजूर रेल्वे स्थानकाजवळच्या कर्वेनगर झोपडपट्टीत गेल्या ३० वर्षांपासून राहत आहे. त्याचे वडील सीएसटी रेल्वे स्थानकात हमाल म्हणून काम करायचे. २००७ मध्ये त्याचे वडील सुदाम यांना अर्धागवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांच्या हमालीचा बॅच चंद्रभानला मिळाला. त्याने आधी सीएसटी स्थानकात व नंतर कुर्ला टर्मिनसमध्ये हमालीचे काम केले. सानपला दारूचे व्यसन होते आणि वेश्यागमन करण्याची सवय होती. जुगारही तो खेळायचा. त्याच्या पहिल्या पत्नीचे संशयास्पद निधन झाले होते. तर दुसरी पत्नी त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून घर सोडून निघून गेली होती. व्यसनापायी त्याने २००९ मध्ये आपल्या हमालीचा बॅच दीड लाखांना विकून टाकला आणि पैसे मिळविण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला होता. त्याच्या नावावर मुंबईच्या गावदेवी, मध्य प्रदेशातील इटारसी, नाशिक, मनमाड आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी नाशिकला राहून महेंद्र कंपनीत चालक म्हणून काम करू लागला.

परवान्यासाठी मुंबईत
दरम्यान, त्याच्याकडील वाहन परवान्याची मुदत संपली होती. त्यामुळे नवीन वाहन परवाना घेऊन तो मुंबईत येण्यासाठी निघाला. तो मुंबईला आला. तेव्हा त्याच्याकडे ६ हजार रुपये होते. पण दारू आणि वेश्येच्या नादापायी त्याच्याकडील पैसे संपले. ४ तारखेला तो रात्रभर दारू पीत होता. नंतर त्याने कांजूरला राहणारा मित्र नंदकुमार साहू याची मोटारसायकल घेतली. त्याच्याकडे केवळ १२६ रुपये शिल्लक होते. रेल्वे स्थानकात जाऊन एखाद्या प्रवाशाची बॅग चोरावी असा त्याचा उद्देश होता. पहाटे कुर्ला टर्मिनसला त्याला एकटी बसलेली इस्थर दिसली.

रेल्वे पोलिसांनाही चकमा
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कुर्ला रेल्वे पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. फोटोत दिसणारा हा इसम चौक्या आहे आणि तो नाशिकला राहतो. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ लगेच नाशिकला रवाना झाले. पण तो बुलढाण्यात देवीच्या दर्शनाला गेल्याचे समजले. पोलीसपथक तसेच बुलढाण्यात गेले. तेथे जत्रा सुरू होती. पोलिसांनी तेथूनच त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. त्याची दाढी वाढलेली होती. कपाळावर टिळा होता आणि पांढरे कपडे त्याने घातले होते. त्याने चौकशीत तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. साहेब, मी कांजूरला राहतो, माझा पत्ता घ्या, माझा भाऊ हमाल आहे, माझे घरही इथेच आहे. मी त्या दिवशी कांजूरलाच घरी होतो, असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या मोबाइलचा सीडीआर मिळावा म्हणून अर्ज केला आणि त्याला जबाब घेऊन सोडून दिले. गुन्हे शाखा-७ च्या पथकाला ही माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सानपला ताब्यात घेतले. पण तो बोलायलाच तयार नव्हता. पण एका तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी आपल्या खास शैलीने सानपला बोलते केले आणि त्याने गुन्हा कबूल केला.

मोटारसायकल थिअरी
इस्थर सानपच्या मोटारसायकलीवर बसली हे आजही कुणाच्या पचनी पडत नाही. एखादी मुलगी कशी काय कुणा अनोळखी माणसाच्या मोटारसायकलीवर बसू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत सानपला बोलते करणारा एक अधिकारी म्हणाला, जेव्हा सानप म्हणाला, मी तिला माझ्या मोटारसायकलवरून नेले तेव्हा मला ही गोष्ट पटण्यासाठी दोन तास लागले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, माझी मुलगी २५ वर्षांची आहे. तिलाही ही गोष्ट पटत नाही, ती म्हणाली, तुम्हीच हे काही तरी रचले असावे. एखादी मुलगी अनोळख्या, मद्यपान केलेल्या व्यक्तीच्या मोटारसायकलीवर बसू शकत नाही हे मान्य, पण इस्थर बसली होती हेही तितकेच सत्य असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आता भिस्त पुराव्यांवर
या प्रकरणात प्रत्यक्ष गुन्हा घडण्याच्या वेळी कुणीच साक्षीदार नाही. मृतदेह १२ दिवसांनी मिळाला तोही कुजलेला आणि अर्धवट जळालेला. त्यामुळे पोलिसांनी आता तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. हत्येनंतर सानप साहूला घटनास्थळी घेऊन गेला होता. त्याला पोलिसांनी आरोपी न करता मुख्य साक्षीदार बनविण्याचे ठरवले आहे. इस्थर एखाद्याच्या मोटारसायकलीवर कशी काय जाऊ शकते, ही सगळ्यांच्या मनात शंका आहे. ती त्याच्यासोबत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. शिवाय त्या दोघांना मोटारसायकलीवरून जाताना पाहणारे दोन साक्षीदार आता मिळाले आहेत. सानप नाशिकहून मुंबईला येत होता. प्रवासात त्याने इस्थरचा लॅपटॉप उघडला. परंतु या लॅपटॉपमध्ये फेस पासवर्ड सिस्टीम होती. लॅपटॉप उघडताच त्यातील वेबकॅम सुरू झाला आणि सानपला त्याचा चेहरा दिसला. त्यामुळे त्याने घाबरून तो शहापूर आणि खडवली दरम्यानच्या नदीत फेकून दिला. पाणबुडय़ांच्या साहाय्याने हा लॅपटॉप शोधण्याचे काम सुरू आहे. कांजूर येथील बहिणीच्या खाणावळीतून पोलिसांना इस्थरची जीन्स, टी-शर्ट आणि गॉगल सापडला आहे.

वडील असमाधानी
सानपच्या अटकेची माहिती इस्थरच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. परंतु मोटारसायकलीची थिअरी तिच्या वडिलांना अजिबात पटलेली नाही. माझी मुलगी सुशिक्षित आहे. मुंबईत तिने दीड वर्ष घालवले आहे. ती कुणा अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलीवर बसूच शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मला आता माझ्या छोटय़ा मुलीची, लावण्याची काळजी वाटते. मी सतत तिच्या संपर्कात असतो. तिचा फोन यायला जराही उशीर झाला की काळजी वाटते. मी बऱ्याचदा तिला कॉलेजमधून आणण्यासाठी जातो, असे ते सांगतात.

तर जीव वाचला असता…
प्रवासात इस्थरच्या प्रीपेडमधील बॅलन्स संपला होता. तिच्याकडे डय़ुएल सीम कार्ड असलेला फोन होता. त्यातला बीएसएनएलचा फोन डीअॅक्टिव्ह होता. प्रवासात तिच्या एअरटेलच्या फोनमधला बॅलन्स संपला होता. तिने ऑनलाइन रिचार्ज करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता. पण ते जमले नव्हते. इस्थर प्रथमच अनोळखी रेल्वे स्थानकात उतरली होती. तिचे अनेक नातेवाईक मुंबईत होते. पहाटे अंधार होता. उजाडेपर्यंत ती थांबली असती किंवा तिला कुणी घ्यायला आले असते, किमान घरचा चालक पाठवला असता तरी हा प्रसंग टळला असता. पोलिसांनी या घटनेनंतर वाहनचालकांना फलाटावर येण्यास बंदी घातली आहे. १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टर्मिनसवर वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सीचालकांची प्रवासी नेताना नोंद केली जाणार आहे.
अर्थात हे सारे निर्घृण कृत्य घडून गेले आहे. इस्थर अनुह्य़ा या जगात नाही. हे सत्य आपल्या व्यवस्थेचे जेवढे वाभाढे काढणारे आहे, तितकेच या साऱ्या घटनेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आरोपीच्या जबानीवरच आज जरी घटनाक्रम मांडला जात असला तरी इस्थरने जाताना काही प्रश्न हे अनुत्तरीतच ठेवलेले आहेत.