01-vachak-lekhakयुरोपची सफर म्हणजे नयनरम्य निसर्ग, टापटीप, जुन्या नव्या सुंदर इमारती एवढय़ापुरतंच सीमित नाही. तेथील जनजीवन, मानवी भावभावना हे देखील आवर्जून अनुभवावे असेच आहे.

‘‘आता ना दूध बाहेर ठेवले तरी चालेल, थंडी चालू झाली ना?’’ असा आमच्या दोघांच्या संवादाने मला एकदम आमच्या युरोप ट्रीपची आठवण आली. आम्ही युरोपला गेलो होतो तेव्हा प्रत्यक्षच पाहिलं होतं की थंडीत फ्रीज बंद करून बाल्कनीचाच फ्रीज केलेला असतो. आहे की नाही गम्मत? हेच तर सगळं सांगायचे आहे मला तुम्हाला. युरोपची ही वेगळी बाजू मला सांगायची आहे.

२०१३च्या मे महिन्यात आम्ही माझ्या मावसभावाकडे गेलो होतो. युरोपातील सौंदर्य वगैरेच्या गोष्टी तर आपण कायमच वाचत आलो आहोत, पण आज मी तुम्हाला युरोपच्या सौंदर्याखेरीज दुसरं काही सांगणार आहे. युरोप म्हटले की आपण हिंदी सिनेमात पाहतो तो नयनरम्य निसर्ग, सुंदर घरं, टापटीपपणा, छान छान बागा आणि जतन केलेल्या पुरातन वास्तू हे तर सर्वानाच माहीत आहे. पण युरोपियन लोकं असतात कशी, राहतात कशी हे सर्व आम्हाला अगदी जवळून बघायला मिळाले तेच सर्व आज आपल्याला सांगायच आहे.

माझा मावसभाऊ ‘स्लोवाकिया’ या देशात नोकरीनिमित्त राहतो. त्याच्याकडे जाऊन मग आसपासचे देश बघायचे असे ठरले आणि प्रथम ऑस्ट्रिया करून आम्ही त्याच्या स्लोवाकियात गेलो.

ऑस्ट्रियाची राजधानी ‘व्हिएन्ना’ एक सुबक आणि नीट मांडलेले शहर. सार्वजनिक वाहतूक कशी असावी हे त्यांच्याकडून शिकावे. आपल्या इथल्या वाहतुकीसाठी तेथील कमिटी नेमावी; खरंच भले होईल आपलं. मेट्रो, ट्राम, इलेक्ट्रिक बस आणि आपली नेहमीची बससेवा इतकी वाहने व्यवस्थित चालू होती, कशाला कोण आपले स्वत:चे वाहन चालवेल?

तिकडे सकाळी सातलाच ऑफिसेस चालू होतात, त्यामुळे अगदी सकाळी साडेपाचपासूनच वाहतूक चालू होते, आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा असल्यामुळे सकाळी पाचलाच उजाडत असे. यावेळी काही वाटले नाही, पण थंडीच्या काळात ही माणसे कशी काय इतक्या सकाळी ऑफिसला जाऊ शकतात हा मला मोठा प्रश्नच पडला. पण कदाचित जास्त थंडीत वेळेवर घरी जावं म्हणून दुपारी चापर्यंत ऑफिस हा तेथील शिरस्ताच झाला lp63असावा.

आम्ही व्हिएन्ना आणि साल्झबर्ग करून स्लोवाकियातील ‘कोशित्से’ या त्याच्या गावाला (शहरात) गेलो. युरोपमधील साधारण सर्व शहरं जशी असतात तसेच हेही होते. आपण ज्याला मुख्य शहर म्हणतो आणि साधारण बाजार जिथे असतो त्याला इथे ‘सिटी सेंटर’ असे म्हणतात. पण इथे नुसताच बाजार नसून छान छान फुलांनी सजवलेले फूड जॉइंट असतात. विविध कलाकार आपापली कला तेथे सादर करताना दिसतात. याचा अनुभव आम्ही युरोपातील बऱ्याच मोठय़ा शहरातील सिटी सेंटरमध्ये घेतला.

असो, त्यांच्या दृष्टीने उन्हाळा असला तरी आपल्या दृष्टीने ते थंडीचेच दिवस असावेत इतपत, बऱ्यापैकी गार होते. रस्त्यावर काहीही गर्दी नसताना प्रत्येक जण सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळत होता हे बघून मला अगदी भरून आले. भावाची स्लोवाक मैत्रीण ‘लुसिया’ आम्हाला थंडी वाजणारच हे गृहीत धरून भले मोठे स्वेटर घेऊनच आली. तिच्या या प्रेमाने आम्ही भारावून गेलो. आधी ती भारतात आमच्याकडेही येऊन गेली असल्यामुळे ती आमच्यासाठी नवी नव्हती, तरीही तिने ज्या प्रेमाने आमच्यासाठी स्वेटर आणले तेवढे तर आपल्याकडेही कोणी करत नाही. आम्हाला ‘स्लोवाक’ कुटुंब कसे असते आणि त्यांची माहिती जाणून घेण्यात रस होता आणि ती देखील आम्हाला घरी घेऊन जाण्यास उत्सुक होती.

ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी गेलो. ‘अर्ली डिनर’ असे त्याचे स्वरूप होते. घर अगदी आपल्या घरासारखे होते. लुसिया वगळता त्यांच्या घरातील कोणालाही इंग्रजी येत नव्हते. तरीही त्यांच्या नजरेतील प्रेम, आमच्याबद्दलचा आदर जाणवत होता. आम्ही तिघे, भाऊ, मावशी आणि तिचे यजमान असे आम्ही सहा जण त्यांच्याकडे अगदी मिसळून गेलो होतो. कुठेही भाषेचा, देशाचा असा कुठलाही अडसर मध्ये येत नव्हता. लुसिया आणि माझा भाऊ वरुण हे दोघे भाषांतराचे काम उत्तमपणे करीत होते. त्यांना आपल्या देशाबद्दल वरुणमुळे बरीच माहिती होती, पण माझ्या मिस्टरांना विचारलेले प्रश्न अत्यंत मार्मिक होते आणि त्यातून त्यांची विचारातील प्रगल्भता जाणवली. त्यांचे पदार्थ आणि आपल्यासाठी म्हणून थोडे त्यांच्या भाषेत ‘स्पाईसी’ असे दोन्ही प्रकार त्यांनी केले होते. सुंदर केले होते जेवण. त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते की शेवटी माणूस सारखाच, मग तो भारतातील असो किंवा युरोपमधील. घर दाखविताना त्यांनी सांगितलं की lp64थंडीत आम्ही फ्रीज बंद करतो आणि सर्व पदार्थ या बाल्कनीत ठेवतो. तेव्हा मला खरंच गम्मत वाटली. पण खरंच बाहेरचे तापमान उणे २५-३० असताना त्याचा असा उपयोग करून घ्यायचा नाही म्हणजे काय?

त्यांच्याकडे थंडीत सर्व भाज्या, फळे साठवून ठेवण्याची पद्धत आहे, त्यासाठी प्रत्येक घराला छोटीशी साठवणीची खोली (स्टोररूम) असते. अतिशय थंडीत एक तर काही मिळत नाही आणि बाहेर पडणे नोकरीव्यतिरिक्त अवघड असते म्हणून ही सोय. सर्व भाज्या, फळे टिकाव्यात म्हणून बाटल्यांमध्ये व्हिनेगरच्या किंवा साखरेच्या पाण्यात ठेवल्या होत्या. म्हणजे आपण कसे उन्हाळ्यात पापड, लोणची घालतो तसे येथील आज्या आणि काकू फळे आणि भाज्या साठवण्याची कामे करतात. एकूण काय ‘साठवण’ ही सर्व मानवजातीसाठी सारखीच.

लुसियाचे वडील तेथील लोकनृत्यांच्या कार्यक्रमात भाग घेत किंवा त्यांचा तसा ग्रुप आहे. त्यांचे वर्षांत ठरावीक दिवशी कार्यक्रम फक्त कोशित्सेलाच नाही तर बाहेरही होत असतात. आपल्या लोकनृत्याचा बाज यांच्या नृत्यप्रकारात जाणवला. साधारण ‘टॅप’ डान्स या प्रकारचा असेही म्हणता येईल. पण सुंदर आणि सगळ्यांच्या शरीराची लवचीकता जाणवणारा नृत्यप्रकार होता हे मात्र नक्की. तिच्या वडिलांनी आम्हाला त्यांचा ड्रेस अगदी पिसे लावलेल्या टोपीसकट दाखविला. आम्ही त्यांच्या संस्कृतीबद्दल विचारल्यामुळे त्यांना खूपच छान वाटले, त्यामुळे तेही भरभरून बोलत होते, अर्थात त्यांच्या भाषेत. शेवटी अनुवाद करणारे माझा भाऊ आणि लुसिया दोघे कंटाळले.

एकदा लुसिया आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेली. तिने दिलेली ऑर्डर मला आजही आठवते. मी म्हटले ही इतका वेळ बोलते आहे, असे किती पदार्थ सांगते आहे ही? पण ते तसे नव्हते, एकंदरच तेथील लोकांना सविस्तर बोलायची सवय असते असे जाणवले. एखादी गोष्ट नुसती न सांगता ते ती समजावतात. आपल्याकडे जर असे समजावले तर लगेच ‘तुला मी काय वेडा वाटलो का रे?’ असे ऐकायला मिळेल.

त्याबरोबरच पैशाचा अपव्यय हे लोक टाळतात. कदाचित पूर्वी रशियाचा भाग असल्यामुळे कम्युनिझमचा परिणाम असावा. त्याचे गंमतशीर उदाहरण म्हणजे बिल्डिंगच्या लिफ्टला आतला दरवाजाच नव्हता, मला प्रथम विचित्र वाटले ते, पण नंतर समजले की त्याची आवश्यकता नसतेच खरेतर.

नंतर आम्ही पोलंडला गेलो तेथील लोक तर सगळेच गोडबोले. ‘क्राको’ हे पोलंडमधील एक प्रमुख शहर, पर्यटनाचे शहर असल्यामुळे लोकांशी गोड बोलत असतील, पण या शहराला इतिहास असल्यामुळे तो जाणून घेण्यासाठी त्यांचे हे गोड बोलणे आमच्या पथ्यावर पडले. ‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटातील भांडी बनवायचा ‘तो कारखाना’ आम्ही तिथे पाहिला. तिथे दाखविली जाणारी फिल्म मन सुन्न करून गेली. शिंडलरने ज्यूंना केलेली मदत थक्क करते. बॅटरीवर चालणाऱ्या गाडीने तिथे गेलो. गाडी चालवणाऱ्या मार्गदर्शक मुलीला, अ‍ॅनाला भारतीय खाणं विशेष आवडत होतं. तेथील भारतीय हॉटेलमध्ये ती जाऊन आली आहे असे तिने आम्हाला सांगितले. तिला बटर चिकन व नान फार आवडले होते म्हणून ते कसे बनवायचे असे आम्हाला विचारले. रेसिपीसाठी नक्की माहिती मिळावी म्हणून तिचा मेल आय.डी. द्यायलाही ती विसरली नाही. तिला भारतात यायचे होते पण तत्पूर्वी तिचा ‘इज इंडिया सेफ?’ हा प्रश्न मात्र मला अस्वस्थ करून गेला.

lp65

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून जरा लांब असलेल्या ‘सॉल्ट माइन’मध्ये गेलो. जगातील अद्भुत आश्चर्य म्हणू आपण त्याला. तिथे मीठ मिळणे म्हणजे आपल्याकडे सोने मिळण्यासारखी गोष्ट होती एकेकाळी. अगदी दुर्मीळ आणि जीवनावश्यक असल्यामुळे तेथील राजकन्येने आपल्या वडिलांकडे लग्नात बाकी काही नको पण ही मिठाची खाण द्या असे सांगितले म्हणे. वडिलांनीसुद्धा तिची मागणी पूर्ण केली, मग या मिठाच्या खाणीवर ती राजकन्या नक्कीच खूप भाव खाऊन गेली असणार. जमिनीच्या खाली कमीत कमी दहा मजले गेल्यावर ती अद्भुतरम्य दुनिया बघण्यात तीन तास कधी संपले तेच कळले नाही. त्याकाळात इतक्या खाली घोडे नेऊन तेथील मिठाची वाहतूक त्यांनी कशी होत असे ते दाखविण्यात आले. ते पाहून आम्ही थक्क झालो. जुन्याबरोबर त्यांनी नव्याची सांगड खूपच छान घातली आहे. एका मजल्यावर येशू ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’चे सुंदर चित्र लावले आहे. सुंदर झुंबरं लावून त्याची शान वाढवली आहे, ते पाहताना डोळे दिपून जातात. तेथील दुकानांत मिठाच्याच सुंदर सुंदर वस्तू होत्या. आपल्या हवेत टिकतील की नाही या भीतीने नाही आणल्या, हळहळ मात्र वाटत राहिली.

यापुढील दिवस मी कधी विसरणार नाही. नाझी लोकांनी ज्यू लोकांवर जिथे अत्याचार केले त्या ‘औत्स्विझ’ या ठिकाणी आम्ही गेलो होतो. बघवत नाही ते आपल्याला. हिटलर हा माणूस होता का, असा प्रश्न पडावा इतके हाल केलेत त्यांनी. त्या ज्यू लोकांचे कपडे, त्यांच्या वस्तू अगदी चप्पल बुटासकट जपले आहे. अंगावर शहारा येतो जेव्हा आपल्याला त्यांचे केस बघायला नेतात तेव्हा. कारण गॅस चेम्बरमध्ये जाळताना केसांचा वास येतो, तो येऊ नये म्हणून त्यांचे केस कापले जात असत. एकेका खोलीत किती-किती लोकांना कसे कोंबले जायचे, अगदी कशाचाही विचार न करता. सर्वात भयंकर म्हणजे त्यांना प्रातर्विधी करण्यासाठीही जायची मुभा नसायची. काय हा अत्याचार, एखाद्या राक्षसाच्या गोष्टीत आपण ऐकले असतील तसे भयंकर हाल हिटलरने ज्यू लोकांचे केले.

पण तरीदेखील हे सारं जतन करायचं, खरंच कमाल आहे. त्या सर्व वस्तू, लोकांचे केस, सगळं इतकी र्वष जपून ठेवायचं म्हणजे चेष्टा नाही. ते सारे सांगणारी गाइडही इतकं सगळं सविस्तरपणे सांगत होती, की प्रत्येक वेळी तिला त्रास नसेल का होत, याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. मला मात्र या सगळ्या ज्यू लोकांचे आत्मे तिथेच भरकटत असतील की काय अशी शंका मात्र आली. अतिशयोक्ती सोडून द्या पण खूप वेळ मनाला अस्वस्थता लागून राहिली होती हे मात्र नक्की. जर्मन विद्यार्थाना मुद्दाम इथे आणले जाते. असे परत कोणी करू नये हे मनावर बिंबवले जावे म्हणून. याबद्दल त्यांचे कौतुक मात्र खरंच केले पाहिजे, की आपल्या माणसाने केलेल्या चुकांचा जाहीर पश्चात्ताप ते करत आहेत. काळा इतिहास परत घडू नये यासाठी केलेला हा प्रपंच नक्कीच अनुभवण्याजोगा आहे.

प्राग आणि हंगेरी ही आणखी काही आम्ही बघितलेली शहरे. जी नीटनेटकी आणि बघत राहावी अशीच आहेत. हे बघितले म्हणून दुसरे नाही बघितले तरी चालेल असे न वाटणारी दोन्हीही आहेत. प्रत्येकाचे सौंदर्य निराळे. प्रागमध्ये इतक्या जुन्या इमारती आहेत की प्रश्न पडावा, या सर्वात राहते तरी कोण? पण तरीही कुठे घाण नाही दिसली. कसं काय जमतं बुवा यांना? असा भाबडा प्रश्न माझ्या भारतीय मनाला पुन्हा एकदा पडला. बऱ्याच सिनेमांचे तिथे कायम शूटिंग चालूच असते. तिथे सोन्याचा मुलामा दिलेली ‘पोर्शे’ बघितली. काय दिसत होती म्हणून सांगू?

या सगळ्या शहरांत समान जाणवलेली गोष्ट ती अशी की तिकडे सगळीकडे खूप बहुरूपी असतात. म्हणजे मोझार्टचा वेष घेऊन पण पुतळ्यासारखा उभा राहिलेला माणूस, तसेच कोणी दुसरा कलाकार एखाद्या शिल्पासारखा उभा असतो, तर कोणी जोकरचा वेश घेऊन उभा असतो. हे सगळेच लोक किती तरी वेळ असे पुतळ्यासारखे उभे असतात आणि लोक त्यांच्यासमोर पैसे टाकतात. माझ्यामते ठरावीक पैसे जमले की ते निघून जात असावेत. पोटासाठी कोणकोण कायकाय करतं याचा आणखी एक नमुना. प्रागला एक माणूस असाच वाकून भिक मागत होता, तोही पुतळ्यासारखाच, प्रागला असे भिकारी असतात. त्याची टोपी एका बाईकडून उडवली गेली. काय वैतागला म्हणून सांगू तो! पुतळ्याचा अचानक माणूस झाला.

बुडापेस्ट हे आणिक एक सुंदर शहर. सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे भव्य मूर्ती असलेला मोठ्ठा ‘हिरो स्क्वेअर’. ही भव्यता पाहायलाच हवी. ‘दानुबे’ नदीमुळे झालेले दोन भाग आणि एका भागात असलेला हा हिरो स्क्वेअर आणि दुसऱ्या भागात असलेला किल्ला. हे सर्व पाहण्यासाठी आम्ही ‘सिटी टूर’ घेतली होती, आपल्या ‘पुणे दर्शन’ बससारखी बस होती. पण एकाच बसने प्रवास केले पाहीजे असे नाही. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ बसावेसे वाटले तर तुम्ही बसू शकता. त्या रूटने फिरणाऱ्या दुसऱ्या बसमधून पुढचा प्रवास करू शकता. ही सोय युरोपातील अनेक शहरांत असते. बसमध्ये प्रत्येक भाषेतून माहिती देणारे ‘हिअरिंग एड’ होते. कोणाचीही गैरसोय अजिबात करायची नाही हे धोरण सगळीकडेच दिसले. जे नेमके आपल्याकडे नाही. आपल्याकडे म्हणजे दुसऱ्याला त्रास कसा होईल याचाच विचार आधी केला जातो. आणि माझ्यामते हे मुख्य कारण असावे जे आपल्या भारतीयांना परदेशात राहण्यास प्रवृत्त करते.