lp46वारीला जाणारे भक्त पंढरीत गेल्यावर जसे कळसालाच नमस्कार करून परततात, तसेच, तेच महत्त्व आहे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला. पण बेस कॅम्पपर्यंत जाणं तर सोपं नाहीच, शिवाय वयाच्या साठीत तर ते वेडं धाडसच!

‘साठी बुद्धी नाठी’ म्हणतात ते उगीच नाही, त्याशिवाय का, पर्वतारोहण करण्याचा एबीसीचा धडा गिरवायला घेऊन दोन-तीन र्वषच होत असताना, मी ईबीसी- एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पवर धडकण्याचा निर्णय एका अनवट क्षणी घेऊन मोकळी झाले, तेही काही वर्षांपूर्वी गुडघ्यांनी केलेली कुरकुर आणि पायांना आलेला बाक यांच्याकडे सहजपणे कानाडोळा करत! तशी मी थोडीशी बिनधास्त, चळवळी, सातत्याने काहीतरी शिकण्याच्या ऊर्मीने भारावलेली. भरतकाम, वीणकाम, पेंटिंग, नॅचरोपथी, आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा, योगविद्या, दुर्गभ्रमंती आणि साठीला नृत्यात विशारद करणारी. शिवाय ‘कॅप्टन यशवंत पवारांच्यामुळे ही जागा वाचली अन्यथा आमच्या हातून गेलेलीच होती’ असा शिलाखंड ब्रिटिश सरकारने काबूल कंदाहारच्या सीमेवर ‘ज्यांच्या’ पराक्रमाविषयी रोवला त्या कै. मेजर यशवंतराव श्रीपतीराव पवारांची मी कन्या. साहजिकच ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा’ म्हटलं की रक्त उसळणारच. त्यामुळे जाइंट अ‍ॅण्ड मोशन डॉ. सुदर्शन सिंग यांच्या आठ जणांच्या ग्रुपमध्ये सर्वात ज्येष्ठ अशी मी सामील झाले.
जगातल्या सर्वात लांब, (१२० कि.मी.) मोजक्या अवघड ट्रेकमध्ये तीन नंबरच्या आणि चढतानाच नाहीतर उतरतानासुद्धा चढ चढावा लागतो, अशांपैकी हा ईबीसी. जगातील वीस सर्वाधिक उंचीच्या पर्वतांपैकी १८ हिमालयात आहेत. त्यातील १०-१२ हिमपर्वत एकाच वेळेस जवळून या ट्रेकमध्ये बघता येतात. चढायला आठ दिवस व उतरायला चार दिवस असा १२-१३ दिवसांत हा ट्रेक पूर्ण होतो. हवामानानुसार आवश्यक कपडेपटांची खरेदी करून, दोन-तीन महिने पायाला अर्धा किलोच वजन बांधून रोज ठाण्यातल्या येऊरच्या डोंगरावर प्रभातफेरी मारायला सुरुवात केली. योगवर्ग घेण्याच्या निमित्ताने नवव्या मजल्यापर्यंत चढाई करत ‘विकास’मध्ये विकास साधत गेले. ‘मी’च्या वेलांटीचा फास सैल करत त्यात ‘आम्ही’ला सामावून घेत ‘मिळून सारेजण’ काठमांडूकडे उडत गेलो.
काठमांडूला भरदुपारीही हवेतला गारवा अनुभवताना मुंबईची हवा आठवणीची ऊब देत होती. भगवान पशुपती मंदिर, तळ्यामधील आडवी शेषशायी विष्णूची मूर्ती असलेले नीळकंठेश्वर मंदिर, उंच डोंगरावरचे अवाढव्य स्तूप आणि तिथून दिसलेला काठमांडूचा ‘एरियल व्हय़ू’ बघताना पुण्याच्या पर्वतीवर उभे असलेले माझे बालपण मनात रुंजी घालून गेले. लहरी हवामानाने वाट अडवली आणि पारंपरिक लाकडी बांधकामाच्या हॉटेलमध्ये नेपाळी संस्कृती दर्शन व आदरातिथ्याचा लाभ झाला. कुंकू लावून केलेले स्वागत, कमी उंचीच्या टेबलाभोवती गाद्या टाकून मांडय़ा घालून बसण्याची सोय, पारंपरिक नेपाळी वेशभूषा करून वाढणाऱ्या महिला, पितळी सुरईतून पणतीसारख्या छोटय़ा भांडय़ात तीन-चार फुटांवरून जराही न सांडता लोकल वारुणीचे वाटप करणारी कुशल स्त्री, लोकनृत्य, मोराचे नृत्य, मोराचा वेश करून रिझवणारा हौशी कलाकार, असे वेगळे अनुभव गाठीशी आले.
हवामानाने आमचा मान राखत साथ दिली आणि लुकलाच्या १६ सीटरच्या विमानात आम्ही स्थानापन्न झालो. मला न भांडता नेमकी खिडकी मिळाली आणि डोळ्यांनो तुम्ही घ्या रे सुख, पाहा निसर्गाचे रूप म्हणत मी स्वर्गसुखाचा आनंद घेण्यात रममाण झाले. ‘हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी..’ लग्नात घेतलेला उखाणा मनात डोकावून गेला. आज मी ‘याचि देही याचि डोळा’ त्या बर्फाच्या राशी बघत होते. महाकाय पर्वतरांगा, मधेच खोल खोल दरी, वाटेत घुटमळत धक्के देणारे पांढरे ढग, निसर्गाचं ते विलोभनीय रूप टिपायला दोन डोळ्यांचे शक्तिमान कॅमेरे सजग होतेच. परीसारखी धुक्यातून मी उडत उडत चालले होते. पाऊण तासाचा तो थरारक आणि रोमांचक प्रवास ‘येथे भान हरावे’ असाच होता. समुद्रसपाटीपासून १८८० मीटर्स उंचीवर असलेला लुकलाचा विमानतळ अगदी भातुकलीतल्या खेळण्यांसारखा पिटुकला होता. समोर दरी ‘आ’ वासून बघत असताना त्या धावपट्टीवर लीलया विमान उतरवणाऱ्या त्या ‘चक्रधराला’ कितीही धन्यवाद दिले तरी कमीच. ‘नयन मनोहर पाहुनी परिसर’ इतका वेळ पोटात आलेला भीतीचा गोळा मात्र विरघळून गेला. टेक हा आमचा गाइड आमच्या स्वागताला हजर होता. आता दळणवळणाची साधने म्हणजे खेचर, किंवा याक. त्यामुळे सगळी मदार पायावरच होती. गरजेच्या वस्तू पाठीवर घेऊन सर्व सामान लहान चणीच्या, गोऱ्या, चपटय़ा नाकाच्या, मिचमिच्या डोळ्यांच्या शेर्पाच्या स्वाधीन केले. तीस-चाळीस किलो सामान पाठीवर घेणाऱ्या त्या मुलांना बघून माझीच मान खाली वाकली. हातातल्या काठीवर सर्व भार टाकून आमच्या ईबीसीच्या प्रवासाचा शुभारंभ झाला.
lp47पहाडी परिसरातला उंचसखल दगडी रस्ता, उडय़ा मारत खळाळणारी दुधकोसी, फर्नपाईनची हिरवाई, रंगीबेरंगी फुलांचे टवटवीत बहर, तपकिरी गुबगुबीत चिमण्या, लाल पिवळ्या चोचींचे काळेकुट्ट कावळे, मधूनच दर्शन देणारी चिमुकली गावं, त्यातली टीहाउसेस म्हणजे लाकडी घरं, घराबाहेर बाकावर भरलेली स्त्रियालंकारांची प्रदर्शनं, चहापानाचं आदरातिथ्य, काहीतरी खात असणाऱ्या किंवा टाटा करणाऱ्या सफरचंदी गालांच्या गुटगुटीत बाळांना झाशीच्या राणीप्रमाणे पाठीवर घेऊन, झपझप चालणाऱ्या महिला, परदेशी पाहुण्यांची लगबग, या ‘पर्यावरणाच्या’ सोबतीने २६१० मीटर उंचीवरचे फाकडिंग गाठले. हळूहळू थंडी मी म्हणू लागली आणि सभोवतालचे हे ‘पर्यावरण’ विरळ होऊ लागले.
आता नामचे गाठायचे होते. माझ्या मंद गतीमुळे मी कायम सगळ्यांच्या शेवटी असे. वाटेत पेरिचे इथल्या रिसर्च सेंटरमध्ये हवामानाशी निगडित संशोधन करण्यासाठी २५ वर्षे मुक्काम करून राहिलेले एक इटालियन शास्त्रज्ञ भेटले. केंद्रावर येण्याचे आग्रहाचे निमंत्रण मिळालेच शिवाय वैद्यकीय सेवेची गरज लागल्यास त्यांच्या दवाखान्याची माहितीपण त्यांनी दिली. उन्हाळा असल्यामुळे ग्लेशियर वितळून छोटे-मोठे प्रवाह दुधकोसी नदीकडे धावत होते. ही नदी चांगलीच बाळसेदार होत होती. तिच्यावर अनेक झुलते पूल होते. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे गॉगल, टोपी सावरताना होणारी त्रेधात्रिरपीट, पायाखालची झुलती पुलाची जमीन, पोटात धस्स झाले होते. ताल आणि तोल संभाळत पुलावरून जाताना माझा चांगलाच नृत्याचा रियाज झाला. थोडा सराव झाल्यावर शूर वीरांगनेसारखी मी ऐटीत हात सोडून इकडेतिकडे बघत, नव्हे, कोणी माझ्या साहसाकडे बघतंय का, हे बघत झुलू लागले. पण प्रत्येक जण आपल्याच नादात असल्यामुळे मन खट्ट झाले. ३४४० मी. उंचीवर नामचेला भोज्जा करताना मी चांगलीच कुडकुडत होते. थकव्याबरोबर मळमळण्यालाही सुरुवात झाली. त्या ‘उंचीशी’ सहवासाने मैत्री करण्यासाठी एक दिवस तिथेच ठाण मांडले. उठल्या उठल्या खिडकीत डोकावण्याचा मोह झाला आणि दूरवर पसरलेली ती शुभ्रधवल हिमशिखरे अनिमिष नेत्रांनी मी बघतच राहिले. हळूहळू सोनपावलांनी रविकिरणे आली आणि सोन्यासारखी चमचमणारी हिमशिखरे बघताना खिडकीपासून हलूच नये असे वाटत होते.
इटालियन डॉक्टरांची पुनर्भेट झाली. ‘पावलं छोटी छोटी टाका. हळूहळू चाला. ही सगळी चढाई शारीरिक बळावर न चढता आध्यात्मिक बळावर चढा,’ त्यांचा सल्ला शिरोधार्य मानला. हॉटेल एव्हरेस्ट व्हय़ूमधून नेपाळची जगप्रसिद्ध शिखरे एव्हरेस्ट, लोत्से, अमाडावलम बघण्यासाठी पुढे सरसावलो. परंतु धुक्याच्या जाड चादरीखाली ती सर्व लपून बसली. मन नाराज झाले. कर्ताकरविता, त्याची मर्जी, त्याचा मान राखत निद्रादेवीला जवळ केले.
‘चाल चाल मोते, पायी मोडले काटे’ याच तालावर माझी पावलं पडत होती. तहानभूक हरपत चालली होती. जबरदस्तीने तोंड हलवत चालत होते. आठ-दहा वर्षांच्या दोन मुलांना घेऊन हिमालयभेटीला आलेले एक परदेशी जोडपे मजेत चढत होते. निसर्गाच्या सहवासात जशी भौगोलिक परिस्थिती असेल त्याला तोंड देत, जे मिळेल त्यावर उदरनिर्वाह करण्याचा धडा मुलांकडून गिरवून घेणारे ते परदेशी पालक बघताना ‘आपलं काय चुकतं?’ या प्रश्नाचं उत्तर मला झटक्यात मिळालं. मधूनच ३६० अंशांतून गिरकी घेत मी मान उंचावून माझ्याकडे बघणाऱ्या हिमशिखरांकडे कौतुकाने कटाक्ष टाकत होते. माझ्याभोवती फेर धरत त्यांची लपाछपी चालू होती. पुडिंग, सूप, हर्बल टी असं काही ना काही पोटात ढकलत ३८६० मी. उंचीवरील तेंगबोचे येथे मी विसावले. खरं तर बाकी काहीच बोचत नव्हतं. फक्त थंडी बोचे, वारा बोचे असंच म्हणावंसं वाटत होतं.
कुंद हवेत वारा घोंघावत तोंडावर गारेगार फटकारे मारत होता. ढग अंगाशी अंगाशी करत होते. धुक्यात वाट हरवेल म्हणून मी जरा सावध होते. ओलं खोबरं भुरभुरावं तसा बर्फ पडत होता. सगळी ‘विंटर केमिस्ट्री’ सांभाळूनही चेहरा गार पडल्यामुळे माझा वेग मंदावला होता. ‘परदेसीयों से न अखियाँ मिलाना’ गुणगुणत हाय- हॅलो करत होते. या पहाडांच्या प्रेमात पडून सातत्याने येणाऱ्या स्पेनच्या नागरिकांशी गप्पा मारल्यावर तर मला माझीच कीव करावीशी वाटली. दोन हात आडवे पसरत, हिमालयभेटीची साद घालत असताना ‘साठी’ गाठेपर्यंत मी का वाट पाहिली, याचे उत्तर मला सापडेना. डिंगबोचे (४४१०) गाठले आणि जमिनीला पाठ टेकली. काहींनी नागार्जुन पर्वतावर ७०० मी.ची चढाई करण्यासाठी प्रस्थान ठेवले. नाकावरच्या रागाने नव्हे, तर नाकातून रक्त आल्यामुळे काहींची नाकं लाल झाली. मी मात्र छोटय़ा टेकडीवर पाय मोकळे करून आले. नजर सतत हिमशिखरांना शोधत आणि निरखत राहिली. अन्नावरची वासनाच गेली होती; परंतु एका मैत्रिणीने ‘गृहिणीची’ भूमिका घेत सर्वासाठी चविष्ट पराठे केले. दोन घास पोटात गेल्यामुळे रसना खूप दिवसांनी तृप्त झाली. स्फटिकासारख्या धवल कांतीच्या हिमशिखरांशी अनुसंधान साधण्यासाठी पापण्या खाली झुकल्या.
lp48प्रसन्न पहाट उगवली. काठीच्या भक्कम टेकूवरच ‘पाऊल पडते पुढे शुभांगी’ मी स्वत:शीच बोलत होते. श्वास लागत होता, ‘धडधड’ माझ्या कानावर पडत होती. फोटो काढण्याचा उत्साह मावळला होता, पण ‘क्षणभर विश्रांती’ घेऊन अनुपम सौंदर्य बघण्याचा मोह आवरत नव्हता. ‘दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया’ मी कुरकुरत होते. ‘थकले गं डोळे माझे वाट तुझी पाहता’ अशी प्रतिक्षिप्त क्रिया हसत हसत स्वीकारत होते. ४९१० मी. उंचीवर लोबोचेला पोहोचले. ‘सूप प्यायले हेच खूप झाले’ म्हणत बुखारीच्या उबेत सरळ कोन साधला.
आता शेवटचा टप्पा गोरक्षेप. ‘बाप रे आपण इथपर्यंत आलो तर..’ या विचाराने ‘आनंद मनी मावेना’ असं झालं होतं. समुद्रसपाटीपासून ५१६० मी.वर गोरक्षेपला पोहोचलो. आता इबीसी आपल्या आवाक्यात आले आहे हे जाणवून मन सुखावले. ‘आता तुम्ही इथपर्यंत आला आहात ना. खूप दमला आहात. पुढे नाही आलात तरी चालेल. आराम करा.’ माझ्या शान्त आणि क्लान्त मुखाकडे बघत सहकारी सुचवू लागले. ‘‘छे, आता तर हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आपला सगळ ग्रुप शेवटपर्यंत जायलाच पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आलेला सगळा ग्रुप इबीसीपर्यंत पोहोचला आहे, असं चित्र दुर्मीळ आहे. मला नेमकं तेच साध्य व्हायला हवं आहे.’’
मी उजव्या हातात काठी घेऊन डाव्या हाताने गाईड टेकचा हात धरला. ‘‘टेक, तू माझ्यासाठी तुझी गती कमी करू नको. मी तुझ्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करीन.’’ टेकच्या आधारे मी चढू लागले. तापमान उणे पाच अंश, भन्नाट वारा, बर्फवृष्टी, हाडं गोठवणारी थंडी आणि कानावर फक्त निसर्गाचं संगीत ऐकत वर वर जात होतो. ईबीसीच्या अलीकडे सगळा ग्रुप बसलेला दिसला. ‘‘अरे, इथेच का सगळे थांबले आहेत? वाट बंद तर झाली नाही नां?’’ अशुभ शंकेची पाल मनात चुकचुकली. नंतर कळले की, ते माझ्यासाठी थांबले होते. शेवटचा टप्पा आनंदात पार करून ईबीसीच्या छोटय़ा टेकडीवर पोहोचलो. एप्रिल महिन्यात निसर्गाने रुद्रावतार धारण केला आणि खुंबु ग्लेशियरवर बर्फाचा कडा कोसळला, १६/१७ शेरपा मृत्यूच्या खाईत लोटले गेले. या दु:खी घटनेचे पडसाद म्हणून ईबीसीवर गर्दी नव्हती. ‘आम्ही गातो, नाचतो, आनंदे वेडे झालो, तव दर्शने’ म्हणत एकमेकांच्या गळय़ात पडलो. अति आनंदाने डोळे पाझरू लागले. ‘जॉइंट अ‍ॅण्ड मोशन’चा बोर्ड लावला. कॅमेऱ्यात ती मर्मबंधातली ठेव बंदिस्त केली. ‘याचसाठी केला अट्टहास, शेवटचा टप्पा गोड व्हावा’ ही इच्छा पुरी झाली. फार वेळ थांबून चालणार नव्हते. हा क्षण पुन्हा येणार नव्हता म्हणून सगळा आसमंत, त्यातली गोठलेली तळी, अर्धवट वितळलेला बर्फ नजरेत साठवला.
हिमवंतीची सरोवरे।
चंद्रोदयी होती काश्मिरे।
मग सूर्यागमी माघारे। द्रवत्व ये।
चंद्रोदय होताच गोठून स्फटिकरूप होणारे हिमालयावरील जलबिंदू सूर्योदय होताच द्रवत्व प्राप्त होऊन प्रवाही होतात. हे नाटय़ शब्दांकित करणारी माऊलींची ओवी मनात तरळून गेली. लुकला, फाकडिंग मौजूं, नामचे, तेंगबोचे, डिंगबोचे, पेरीचे, लोबोचे, गोरक्षेप आणि आता ईबीसीपर्यंत आम्ही मजल मारली होती. ५३६४ मीटर उंचीवर असलेल्या ईबीसीवरून आता परतीच्या वाटेवर पाऊल टाकले.
इटालियन डॉक्टरचे शब्द आठवले. ‘‘या पर्वतरांगा इतर देशांतील पर्वतरांगांच्या मानाने खूप तरुण आहेत. त्यांची वयामुळे झीज होऊन शिखरं गोलसर झालेली नाहीत, तर टोकदार आहेत. साहजिकच एक नैसर्गिक ऊर्जा इथे सळसळत असते आणि सर्वाना आकर्षित करत असते.’’ या पर्वतरांगांच्या प्रेमात पडून जगभरातून गिरिप्रेमी येतात आणि आपण माहिती करून घेण्यासाठी कमी पडतो. ही चैतन्याची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याची मला प्रकर्षांने जाणीव झाली.
गोरक्षेपला येऊन जवळच असलेल्या ५५५० मी. उंचीच्या कालापत्थरकडे कूच केली. जगातील सर्वोच्च ठिकाण, हिमालयाचा मुकुटमणी, विश्वशिरावर चढलेला हिऱ्यामाणकांचा टोप, असे एव्हरेस्टचे दर्शन म्हणजे या नवनवलनयनोत्सवाचा सोहळा. त्या क्षणी काय वाटले ते शब्दात पकडता येत नाही. एक विलक्षण ऊर्जा मला मिळाली, हे मात्र खरे.
परतीच्या वाटेवरचा तसाच उंच, सखल मार्ग, हिमकडा कोसळताना होणारे कानठळय़ा बसविणारे आवाज, पोटाची कुरकुर, मळमळ, पाण्याच्या घोटाबरोबर ‘आता आलंच हं’ म्हणत गाईडने करून घेतलेली दोन-तीन तासांची पदयात्रा, विदेशी बायकांनी केलेली विचारपूस, प्रेमाने दिलेले इलेक्ट्रॉलचे पॅकेट, सोळा सोमवारांसारखे कडक उपास करण्याच्या सवयीमुळे नुसतं गरम पाणी पिऊन काढलेले चार दिवस, काळाठिक्कर पडलेला चेहरा, सालपटं निघालेलं नाक, सगळंच ‘न भूतो न भविष्यति’ असं केवळ त्या नागाधिराज हिमालयाच्या दर्शनाच्या ओढीने घडून आलेलं. माथा नाही तरी पायथ्यापर्यंत तरी आम्ही जाऊन आलो. एकावर एक फ्री या न्यायाने ही वडिलांची कर्मभूमी असल्याने नकळत मनोमनी झालेली त्यांची भेट केवळ अविस्मरणीयच.
ताज्या घडामोडींनी दाखवलेलं निसर्गाचं तांडवनृत्य पाहिलं आणि मन सुन्नच झालं.
शुभांगी जाधव – response.lokprabha@expressindia.com
छायाचित्रे : डॉ. सुदर्शन सिंग