lp24फॅण्ड्री आणि एलिझाबेथ एकादशी.. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या दोन सिनेमांचे विषय टोकाचे वेगळे आहेत. पण तरीही त्यांच्यात काही साम्यस्थळंही आहेत. त्या साम्यस्थळांचा वेध-

‘फँड्री’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ हे चित्रपट कोणासाठी? ते बाल चित्रपट आहेत का? उत्तर आहे हो; पण ते केवळ बालकलाकारांनी काम केलं म्हणून ते बाल चित्रपट म्हणायचे का? तर नाही. ते लहान मुलांना मध्यवर्ती ठेवत सामाजिक चित्रपट म्हणून या चित्रपटांकडे पाहावे लागेल, किंबहुना या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे सत्य दडलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट केवळ बाल चित्रपट नाहीत, तर त्या माध्यमातून सामाजिक चित्रपट आहेत. थोडक्यात एकाच वेळी अनेकांचे आहेत. अर्थात हे साम्य येथेच संपत नाही. हे चित्रपट कोणाचे आहेत? तर ते दिग्दर्शकांचे आहेत.

या वर्षांच्या सुरुवातीला आलेल्या ‘फँड्री’ चित्रपटाचा शेवट चित्रपटाचा नायक असणाऱ्या जब्या या बाल कलाकाराने भिरकावलेल्या दगडावर होतो, तर ‘एलिझाबेथ एकादशी’ची सुरुवातच दगडावरून होते. म्हटलं तर दोघांमध्ये एक साम्य, म्हटले तर भिन्नता. ‘फँड्री’मध्ये समाजाच्या विषमतेवर भिरकावलेला दगड प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर पडताना सणकून लागलेला असतो, तर ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये ‘दगड दगड’ या गाण्यातून तो सारं कसं एक तत्त्व आहे हे सांगतानाच त्यातील भिन्नता मांडतो. दिग्दर्शकाचा हा दगड दोन्ही ठिकाणी ‘कॉमन’ आहे; पण व्यक्त होण्याची भाषाशैली थोडी भिन्न. एकाला समाजातील विषमतेची खोल दरी थेटपणे मांडायची आहे, तर दुसऱ्याला ती समाजाच्याच माध्यमातून हळूहळू उलगडून दाखवायची आहे. दिग्दर्शकीय कौशल्याची ही दोन्ही भिन्न अंगे मांडतात ते मात्र एकच सत्य.

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, या तत्त्वावर हे दोन्ही चित्रपट ठामपणे शिक्कामोर्तब करतात. माध्यम बाल चित्रपटाचे; पण त्याच वेळी थोरामोठय़ांनादेखील चार शब्द ऐकवण्याची भूमिका. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं कसब हा नकारार्थी पद्धतीनेच वापरला जाणारा हा वाक्प्रचार येथे मात्र सकारात्मक मार्गाने येतो. ‘फँड्री’त संपूर्ण चित्रपटभर काळ्या चिमणीसाठी दगड घेऊन फिरणारा जब्या आणि ‘दगड दगड’ हे बालकलाकारांचे गाणे चित्रपट संपल्यावर लहानांच्या डोक्यात घोळत राहते, तर समाजात आजदेखील ठाण मांडून बसलेलं जातिव्यवस्थेचं आणि वारीच्या काळातील पंढरपुरातील भीषण वास्तव मोठय़ांच्या थेट डोक्यात गेलेले असते.

पण हे सारं करताना चित्रपटाची म्हणून जी चौकट आहे तिला काडीचाही धक्का लागत नाही. चित्रपट हा गोष्टीवर चालतो, मग ती प्रेमकथा असो की विरहकथा, सामाजिक असो की अन्य काही.. ‘फँड्री’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये ही गोष्ट अजिबात हरवलेली नाही. आपल्यापेक्षा उच्च जातीतील मुलीला वश करण्यासाठी काळी चिमणी शोधणारा जब्या आणि आपल्या वडिलांनी तयार केलेली एलिझाबेथ सायकल विकली जाऊ नये म्हणून आटापिटा करणारी भावंडांची जोडगोळी. गोष्ट हरवत नाही. मांडणीसाठी आधार समाजाचाच. बडेजाव न करता, अभिनिवेश न बाळगता थेट आणि सरळ साधं सोप्पं भाष्य. मांडण्याची शैली मात्र थोडीशी भिन्न.

थोडका कालावधी, कपडेपटाचा बडेजाव नाही, सेटचा झगमगाट अथवा आविर्भाव न करता थेट लोकेशनवर चित्रीकरण, मात्र ते करताना तांत्रिक उणीव राहणार नाही याची काळजी, फापटपसारा टाळून प्रत्येक फ्रेम बोलती करणारी, बाल कलाकारांचा चित्रपटाच्या चौकटीतील मुक्त संचार, स्वाभाविक अभिनय आणि हे सारं मांडताना, छोटय़ा छोटय़ा संवादांतून मोठा आशय सहज पोहोचवताना, प्रेक्षकांना कथेशी जोडत त्यांना खिळवून ठेवत, गोष्ट सांगताना चार उपदेशाच्या गोष्टी सुनावणे हे दोन्ही ठिकाणी प्रकर्षांने जाणवते. दिग्दर्शकीय कौशल्याचा हा आविष्कार हा दोहोतील ‘कॉमन डीएनए’.

‘फँड्री’मधला शाळकरी जब्या आपल्याला आवडलेल्या मुलीसाठी काळी चिमणी शोधत रानोमाळ भटकतो, प्रसंगी मांत्रिकाच्या नादी लागतो; पण अखेरीस वास्तवाचा सामना करताना त्याला त्याच्या जातीच्या कामात सामील व्हावे लागते, जे त्याला अजिबात करायचं नाही. सरतेशेवटी त्याच्या संतापाचा कडेलोट होतो आणि विषमतेवर प्रहार करणारा प्रतीकात्मक दगड तो भिरकावतो. अन्यायावर आधारित गोष्टीचा हा शेवट, तर ‘एलिझाबेथ..’मध्ये केवळ तीन-चार दिवसांची पंढरपुरातील एका गरीब कुटुंबाची गोष्ट. वडील नाहीत. आई, म्हातारी आजी आणि दोन कोवळी बालकं. कर्जाचे पैसे वेळवर न फेडल्यामुळे बँकेने जप्त केलेलं स्वेटर विणकामाचे मशीन सोडविण्यासाठी तीन दिवसांत पाच हजार रुपये कसे गोळा करायचे, हा गहन प्रश्न. त्यामुळे पैशासाठी आपल्या बाबांनी तयार केलेली एलिझाबेथ सायकल विकली जाऊ नये यासाठी लहानग्यांनी केलेली धडपड.

दोहोंमधून उभा राहतो तो एक संघर्ष. आपण सारे एकाच मूलतत्त्वातून घडलेलो; पण विषमता कशी काय? जब्या ती थेटपणे मांडतो, तर ज्ञाना कीर्तनादी वारकरी परंपरेचा आणि त्यातही विज्ञानाधिष्ठित गाडगेबाबा आणि वैज्ञानिक न्यूटनचा आधार घेऊन मांडतो. अर्थात दोन्ही ठिकाणी एक भन्नाट नाटय़ अधोरेखित आहे. चित्रपटांची सारी भिस्त या नाटय़ावर आहे. मित्रपरिवार, समाज, शाळा, व्यवहार, रूढी-परंपरा, संस्कृती अशा जाणीवपूर्वक उभ्या केलेल्या, पण आजच्या काळाशी सुसंगत ‘बॅकड्रॉप’वर हे चित्रपट बेतले आहेत. हे सारं विश्व, कलाकारांची सारी हालचाल इतक्या परिणामकारक पद्धतीने पकडली आहे, की दिग्दर्शकांना पैकीच्या पैकी मार्क्‍स मिळतात. सिनेमाटोग्राफी, संवाद, संगीत या साऱ्या अंगांनी हे चित्रपट उजवे ठरतात. पठडीच्या बाहेरचा विषय हाताळतानादेखील आशयाला आणि चित्रपटाच्या चौकटीला धक्का लागू न देता सारं काही येतं.

पण सर्वात महत्त्वाचे आहे ते दिग्दर्शकीय कौशल्य. त्यांना लहान मुलांना तर खिळवून ठेवायचंच आहे; पण त्याचबरोबर मोठय़ांनादेखील काही तरी द्यायचे आहे. मात्र हे सांगताना कोणताही अभिनिवेश नकोय. जे काही मांडायचे ते लहानांच्याच माध्यमातून. त्यासाठी निरागस लहानपण जगाच्या व्यवहाराने कोळपणार नाही याची दखल घेत दिग्दर्शक वास्तव मांडतो. अर्थात ‘फँड्री’त कथानकाची गरज म्हणून ते एका टप्प्यावर थेट अंगावर येते, तर ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये ते टप्प्याटप्प्याने उलगडते. गावातील व्यवहार, आपल्या समाजाची कुचंबणा आणि जगण्याचा संघर्ष हे दाखविताना ‘फँड्री’त काहीसा नकारात्मक सूर भासतो, तर ‘एलिझाबेथ..’मधील वारीच्या काळात पंढरपुरातील व्यापाराची भरभराट, गुरांचा बाजार, वेश्या व्यवसाय, विठ्ठलप्रेमाच्या आणि पैशाच्या महापुरातदेखील एका सामान्य कुटुंबाची ओढाताण अलगद उलगडते.

पण हे सारं काही मांडलं गेलंय ते लहानग्यांच्या चष्म्यातून. कोठेही समाजसुधारकाचा आवेश नाही, की लहानांचा ‘टिपिकल’ कळवळा नाही. चित्रपट हे मनोरंजनाचेच साधन आहे, हे भान न विसरता त्या माध्यमातून कडू जहर सत्याची गोळी मनोरंजनाच्या साखरेतून कशी द्यायची हे दिग्दर्शकांनी अचूक साधले आहे, किंबहुना चित्रपट हे दिग्दर्शकाचेच माध्यम आहे हे सिद्ध होते. मग अशाच वेळी चार उपदेशाचे डोस पाजण्याचं काम दिग्दर्शक करतो.

‘फँड्री’मध्ये गावातील नवचंगळवादी वातावरण, घरात वीज नाही, पण हातातल्या मोबाइलवर फेसबुक चोवीस तास सुरू असणे, तर दुसरीकडे रोजच्या जेवणाची मारामार असणारे गावकुसाबाहेरचे जग, हेटाळणी आणि त्याच वेळी मांत्रिकाच्या मागे धावणारा समाज, तर ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये वारीकाळातील वेश्या व्यवसाय, स्वच्छतेच्या मुद्दय़ावर होणारी घमासान, अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा झगडा, धर्ममरतडांचं बेगडी प्रेम, त्याच वेळी सर्वसामान्य भोळ्या भाविकांची मानसिकता आणि एकाच वेळी एकाच समाजात आढळणारी विषमतेची खोल दरी. दोन्ही बाल (कलाकारांचे) चित्रपट असले तरी त्यातून अधोरेखित करणारं वास्तव सारखंच आहे.

दोन्ही दिग्दर्शकांना जे वास्तव अधोरेखित करायचं आहे ते अनेकांना माहीत आहे; पण ते स्वीकारून त्यात बदल करण्याची धमक कोणातही नाही, किंबहुना त्यासाठी बाल कलाकारांना कालसुसंगत बंडखोर आहेत. मात्र ते समाज बदलायची वगैरे भाषा न करता सद्य:स्थितीत कशी प्रतिक्रिया देतात हेच तेवढे मांडले आहे.

या सर्वावर दिग्दर्शकीय कडी म्हणजे ‘फँड्री’त हे मांडताना थेटपणे आंबेडकर, फुले, शाहू यांचं नाव कोठेही घेतलेलं नाही, तर त्यांच्या प्रतिमांचा शेवटच्या प्रसंगात ‘बॅकड्रॉप’ म्हणून परिणामकारकपणे वापर केलेला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये वारकरी संप्रदायाच्या मांदियाळीतील ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांना न आणता सुधारकी वृत्तीच्या आणि कठोर आचारविचारांच्या गाडगेबाबांची मदत घेतली आहे. इतकेच नाही, तर थेट न्यूटन आणि आइनस्टाइनला संतपद बहाल केलं आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना बेतलेले हे प्रसंग हवा तो परिणाम साधतात.

चित्रपटाचा शेवट हा ‘हॅप्पी एिण्डग’ असावा असे अधोरेखित करणारा आपला बॉलीवूडी फॉम्र्युला मात्र येथे सरसकट वापरलेला नाही. हा चित्रपट असल्याचं भान दोन्ही ठिकाणी जपलं आहे. मात्र एक जण कठोर वास्तवाने भंजाळून सोडतो, तर दुसरा सुखाच्या क्षणांतदेखील वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकतो. गोष्टीचा शेवट हा चुकत नाही. ‘एलिझाबेथ..’मध्ये जाताजाता वेश्येच्या तोंडी असणारा या वेळची एकादशी चांगली गेली, या संवादातून त्याला जे काही सांगायचे आहे त्यातून एकाच घटनेकडे समाजातील विविध घटक कसे वेगवेगळ्या चष्म्यांतून पाहतात आणि त्यात किती भीषण दरी आहे हेच ‘फँड्री’तलं सत्य मांडलं आहे; पण एका वेगळ्या अर्थाने हे दोन्ही चित्रपट विषय म्हणून संपत नाहीत. चित्रपटांचा शेवट हा फक्त एक अर्धविराम आहे.

‘दगड दगड, तारे दगड, पृथ्वी दगड, दगडाचाही देव दगड, पैशाचा पूर दगड, ग्रॅव्हिटीचा जोर.. ’ हे ठामपणे सांगताना न्यूटनचा वापर दोघांनीही प्रतीकात्मक आणि सहजपणे केला आहे. मूलतत्त्व एक, बाह्य़ शक्तीचा जोर नाही तोपर्यंत ‘ऑब्जेक्ट’ त्याच गतीत, क्रिया तशी प्रतिक्रिया. जब्यादेखील हेच सांगतो आणि ज्ञानादेखील तेच मांडतो; पण ते मांडताना दोघेही समाजातील विषमतेचं सत्यसुद्धा सांगतात.

मात्र दोन्ही ठिकाणी आजच्या जमान्यात असणारं मार्केटिंगचं तत्त्व डोळ्याआड होत नाही, कारण चित्रपट हा व्यवसाय आहे, ती चळवळ नाही. तो प्रतीकात्मक असू शकतो, चळवळीला पूरक ठरू शकतो; पण व्यवसाय म्हणून तो यशस्वीच झाला पाहिजे हेच ते तत्त्व. झी वाहिनीवरून ‘फँड्री’ प्रसारित होताना एक प्रेमकथा अशी जाहिरात करण्यात आली, तर ‘एलिझाबेथ आणि एकादशी’ हे परस्पर भिन्न शब्द आपल्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडतात. ‘फँड्री’ तयार करताना तो स्वतंत्र होता, तर नंतर तो झीने घेतला, तर ‘एलिझाबेथ एकादशी’च्या निर्मितीतच ‘झी मराठी’चे निखिल साने आहेत. व्यावसायिकतेचं एक ढळढळीत सत्यही या सिनेमाने पुढं आणलं आहे. चित्रपटाच्या चौकटीत आणि व्यवसायाच्या गणितात बसवून हे विषय मांडणं बडय़ा बडय़ा लोकांना आजवर जमलं नाही आणि जमलंच तर ते एक तर समांतर सिनेमे होतात अथवा तिकीटबारीवर दणकून आदळतात; पण नागराज मंजुळे आणि परेश मोकाशी या दोघांनी या घटकांवर कुरघोडी करत बाजी मारली आहे.

पण खरा मुद्दा वेगळाच आहे. तो प्रेक्षकांचा आहे. ‘फँड्री’च्या परीक्षणांमुळे आणि चर्चेमुळे अनेकांनी तो मोठय़ा प्रमाणात पाहिला, तेव्हा अनेक सर्वसामान्यांची काही प्रमाणात निराशा झाली, तर ‘एलिझाबेथ एकादशी’ बाल दिनाला प्रदर्शित झाला म्हणून त्याकडे अनेक सर्वसामान्यांनी केवळ बाल चित्रपट म्हणूनच पाहिलं. नेमका गोंधळ येथेच आहे. वर्षांच्या सुरुवातीस आलेला ‘फँड्री’ आणि अखेरीस आलेला ‘एलिझाबेथ एकादशी’ दोघांनीही एक वेगळा प्रयोग जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे आणि तितक्याच ताकदीने ते पडद्यावर मांडले आहे. थेट वेध घेणारे असे हे चित्रपट, व्यावसायिकदृष्टय़ा दोन्ही हिट झाले; पण दिग्दर्शकांच्या दगडाने नेमका वेध घेतला का? हा प्रश्न मात्र आजही काहीसा अनुत्तरितच आहे.