काही वर्षांपूर्वी गावाला गेलो असता घराला लागून असलेल्या आणि आता वापरात नसलेल्या शेतघरात डोकावलो. कोकणात सामान्यत: घराच्या मागील दारी नारळी-पोकळीची वाडी आणि त्याही मागे भातशेतीची खाचरे असत. या शेतीवाडीच्या मशागतीसाठी अनेक अवजारे लागत आणि ती या शेतघरात म्हणजे स्टोअररूममध्ये ठेवलेली असत. त्यातील अनेक अवजारे आताच्या यांत्रिकयुगात कालबाह्य़ झाली असली तरी ती धूळ खात पडली होती म्हणून आताच्या पिढीला त्यांचा परिचय करता आला. शेतकऱ्याच्या रोजच्या वापरातील ही अवजारे त्याच्या जीवनाशी इतकी निगडित होती की, त्यावरून मराठीत अनेक म्हणी प्रचलित झाल्या. 

यात प्रमुख होते ते शेतकऱ्याचा ‘ब्रॅण्ड अम्बॅसीडर’ मानला जाणारा विळा-कोयता. शेतकऱ्यांच्या जीवनासाठी तो इतका घट्ट मैत्रीचा की कळसासह एका राजकीय पक्षाचा तो चिन्ह होऊन राहिला होता. जड आणि लोखंडी पाते आणि ते धरण्यासाठी मोठी लाकडी मूठ हे त्या विळय़ाचे सामान्य रूप. गोल पात्याच्या आतील बाजूला धार तर दुसरी बाजू बोथट. या विळय़ाचा उपयोग शेतातील तयार पीक मुळापासून कापण्यासाठी केला जायचा. अनुभवी शेतमजूर ती कापणी इतकी सराईतपणे करायचे की अल्पावधीतच त्यांच्या हातापायांना कोठेही दुखापत न होता कापलेल्या कणसांचे ढीग रचले जात. या विळय़ाचा नाजूक अवतार म्हणजे ‘विळी’, घरातलीच भाजी चिरण्यासाठी अजून काही घरांत वापरली जाणारी. शेतकऱ्याच्या या अत्यावश्यक अवजारावरून मराठीत एक म्हण सर्रास वापरली जाते. दोन व्यक्तींमध्ये शत्रुत्व असले की त्याचे नाते ‘विळय़ा-भोपळय़ाचे आहे’ अशी संज्ञा त्याला चिकटते.
कोयता हे असंच एक अवजार जे बागायतीतील नारळ-पोफळीला खाण्यायोग्य अवस्थेत आणण्यासाठी वापरले जाते. माडावरून उतरविलेले असोले नारळ, सराईत कोकणी माणूस दाने पावलांमध्ये घट्ट धरून कोयत्याच्या चार-पाच घावांत तो शेंडीधारक नारळाच्या स्वरूपात घरात आणतो. शहरातील घरात या अवजाराची माहिती नसते आणि आवश्यकताही नाही. कारण भाजी बाजारात दोन नारळवडय़ा सहज उपलब्ध असतात. शेतघरातील आणखी दोन प्राचीन अवजारे म्हणजे फावडे-घमेले. तीनएक फुटी दणकट लाकडी दांडक्याच्या एका टोकाला घट्ट बसविलेला चौकोनी लोखंडी फाळ हे फावडय़ाचे रूप. शेताच्या निगराणीसाठी मातीची ढेकळे या फावडय़ाने एकत्र करायची आणि ती वळचणीला टाकण्यासाठी साहाय्य घ्यायचे घमेल्यांचे. आजच्या पिढीला समजण्यासाठी घमेले म्हणजे दीड फूट घेराचा लोखंडी बाऊल. याचेच एक जुळे भावंड जवळ असतेच ‘कुदळ.’ पाण्याचे पाट तयार करण्यासाठी किंवा पाणी वळविण्यासाठी शेतात नेहमी चर (लहानसे खोदकाम) करावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्याकडे ‘कुदळ’ हे अवजार आवश्यकच. एका जाड भक्कम दांडय़ाला एका बाजूला धार असलेला लोखंडी फाळ असलेले हे कुदळ शेतात उपयुक्त तर असतेच, पण वापरताना शेतकऱ्यांच्या अंगातून घाम काढून व्यायामही देते.
शेतघरात गवतातून साकारलेला मानवी शरीराचा सांगाडाही धूळ खात पडलेला असतो. तो होता आता निरुपयोगी असलेले ‘बुजगावणे.’ दोन पाय, दोन पसरलेले हात, मध्ये धड आणि त्यावर मुंडके हा गवताचा मानवी पुतळा शेतात उभा केला जात असे. त्यामुळे स्वत: शेतकरीच पिकाची राखण करायला उभा आहे असा भास होऊन, कणसाचे दाणे खाणारे पक्षी बिचकून परत फिरतात असा अनुभव. आता म्हणे पाखरे हुशार झाली आहेत. ती बुजगावण्याच्या डोक्यावर बसून त्याचा खोटारडेपणा उघडा पाडतात. हे बुजगावणेही मराठी म्हणीत विणलेले. माणसांच्या एखाद्या गटामध्ये लटकी भीती दाखविणारा, पण दुर्बल व्यक्ती असली तर त्याला.. ‘अरे हे तर पुढे केलेले बुजगावणे आहे’ असे म्हटले जाते.
शेते कसण्यासाठी टिलरसारखी आता यांत्रिक आयुधे आली आहेत. बडे शेतकरी शेताची निगराणी कंत्राटाने देऊ लागले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची पारंपरिक अवजारे त्याला स्वत:कडे बाळगावी लागतातच असे नाही. मग ती कायमची विस्मृतीत तर जाणार नाहीत ना?
मधुसूदन फाटक

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
police arrest suspected killer in double murder case
चिखलात लपून बसलेल्या संशयित खुनीला पकडले
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…